Monday 16 May 2016

महात्‍मा गांधी तंटामुक्‍त गाव मोहीम
 पुरस्‍कार प्रवेशिका स्वीकारणे सुरू
Ø 15 जूनपर्यंत प्रवेशिका सादर स्वीकारणार
             वर्धा, दि. 10 – महात्‍मा गांधी तंटामुक्‍त गाव मोहीम 2015-16 अंतर्गत प्रसिद्धीसाठी बातमीदार, माध्‍यम प्रतिनिधींना जिल्‍हा, विभाग आणि राज्‍यस्‍तरावर प्रथम, द्वितीय आणि तृतीय पुरस्‍कार देण्‍यात येणार आहेत. या पुरस्‍कारासाठी प्रवेशिका  सोमवार, दिनांक 15 जूनपर्यंत पाठवाव्‍यात, असे आवाहन जिल्‍हाधिकारी आशुतोष सलील यांनी केले आहे.
               लहानसहान कारणांवरून निर्माण होणारे तंटे सामोपचाराने सुटावेत. गावागावात शांतता नांदावी, याकरीता माध्‍यमे अत्‍यंत महत्‍त्‍वपूर्ण भूमिका बजावत असतात. ही बाब लक्षात घेऊन शासनाने महात्‍मा गांधी तंटामुक्‍त गाव मोहिमेच्‍या प्रभावी अमलबजावणीसाठी प्रसिद्धी देणा-या पत्रकारांना पारितोषिक जाहीर केलेले आहे.  जिल्‍हास्‍तरावरील प्रथम पुरस्‍कार 25 हजार, द्वितीय 15 हजार आणि तृतीय 10 हजार रूपये आहे. विभागीय स्‍तरावर प्रथम 1 लक्ष रूपये तर राज्‍यस्‍तरावर 2 लक्ष 50 हजार रूपयांचा प्रथम पुरस्‍कार आहे. जिल्‍हास्‍तरावरील प्रथम पुरस्‍काराची प्रवेशिका विभागस्‍तरावर पात्र ठरेल. मोहिमेंतर्गत  दिनांक 2 मे 2015 ते 1 मे 2016 या वर्षात प्रसिद्ध झालेल्‍या बातम्‍या, लेख, यशकथा अथवा  या मोहिमेत सहभागाबद्दल पुरावे छायाचित्रांसह संपूर्ण कात्रणांची फाईल प्रवेशिकेसह जिल्‍हा माहिती अधिकारी यांचे कार्यालयात सोमवार, दिनांक 15 जून 2016 पर्यंत पाठवावयाची आहे.
                 पुरस्‍काराच्‍या पात्रतेसाठी वृत्‍तपत्रे, नियतकालिके यातून प्रसिद्ध मराठी, हिंदी आणि इंग्रजी साहित्‍याचा विचार करण्‍यात येईल. पुरस्‍कारासाठी वृत्‍तपत्र बातमीदार, स्‍तंभलेखक, मुक्‍त पत्रकार पात्र असतील. प्रवेशिका ज्या स्‍तरावरील पारितोषिकांसाठी अर्ज करावयाचा आहे. त्‍या स्‍तरावरील समितीच्‍या सदस्‍य सचिवाकडे अर्ज करता येईल. मात्र, कोणत्‍याही एका पारितोषिकासाठीच अर्ज करता येईल. पारितोषिकासाठी विहित मुदतीत वैयक्‍तीक केलेले अर्ज विचारात घेण्‍यात येतील.  
एका वृत्‍तपत्राच्‍या एका आवृत्‍तीतील  एकाच पत्रकाराचा अर्ज संपादकांमार्फत स्‍वीकारण्‍यात येईल. जर एका वृत्‍तपत्राच्‍या एकापेक्षा जास्‍त पत्रकार सहभागी होऊ इच्छित असतील तर त्‍यांनी केलेल्‍या अर्जांपैकी एकाच पत्रकारांच्‍या साहित्‍याची निवड संबंधित संपादक संबंधित समितीकडे पाठवतील.
                       बातमीदाराचे साहित्‍य अनेक वृत्‍तपत्रातून प्रसिद्ध झालेले असेल तर त्‍यासंबंधित एकत्रित अर्ज  संपादकांपैकी कोणतेही एक संपादक संबंधित समितीकडे पाठवतील. जिल्‍हास्‍तरीय पारितोषिकांसाठी संबंधित जिल्‍ह्यातून प्रसिद्ध होणारी वृत्‍तपत्रे, नियतकालिके यांच्‍या प्रत्‍येक आवृत्‍तीच्‍या एकाच पत्रकारास संबंधित आवृत्‍तीत प्रसिद्ध साहित्‍यासंदर्भात अर्ज करता येईल. माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामार्फत प्रसिद्ध करण्‍यात आलेल्‍या अ, ब, क वर्गवारीतील वृत्‍तपत्रे नियतकालिकातून प्रसिद्ध साहित्‍याचाच पारितोषिकांसाठी विचार होईल. पुरस्‍कारासाठी गठित निवड समितीतील सदस्‍य या स्‍पर्धेत सहभागी होऊ शकणार नाहीत.
          प्रवेशिका अर्जदारांनी विहित नमुन्‍यातील अर्ज  तीन नमुन्‍यात मुदतीत सादर करावेत. जिल्‍हास्‍तरीय समिती प्राप्‍त प्रवेशिकांच्‍या साहित्‍याचे निर्धारित निकष व द्यावयाचे गुण यानुसार परीक्षण करून निकाल जाहीर करील. अर्जदारांनी साहित्‍य, कात्रणे स्‍वच्‍छ को-या कागदावर एकाच बाजूने चिकटवावेत. त्‍यावर वृत्‍तपत्राचे नाव, प्रसिद्धीचा दिनांक नमूद करावा. तसेच संपादकांची स्‍वाक्षरी व शिक्‍का प्रमाणित अर्जासह प्रवेशिका जिल्‍हा माहिती अधिकारी, जिल्‍हा माहिती कार्यालय, प्रशासकीय भवन, वर्धा येथे मुदतीत सादर करावी. सदर प्रवेशिका जिल्‍हाधिकारी यांच्‍या अध्‍यक्षतेखाली गठित करण्‍यात आलेल्‍या समितीसमोर ठेवण्‍यात येईल. परीक्षणानंतर जिल्‍हाधिकारी, वर्धा हे स्‍पर्धेतील निवड झालेल्‍या स्‍पर्धकांचे नावे जाहीर करतील. या महात्‍मा गांधी तंटामुक्‍त गाव मोहीम पुरस्‍कार योजनेत सर्व माध्‍यमांच्‍या प्रतिनिधींनी सहभागी व्‍हावे, असे आवाहन जिल्‍हाधिकारी आशुतोष सलील व जिल्‍हा पोलिस अधीक्षक अंकित गोयल यांनी केले आहे. 

                                                0000

No comments:

Post a Comment