Saturday 26 January 2019










               राज्य शासन शेतक-यांच्या पाठीशी
-         प्रकाश महेता
Ø प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा
Ø विविध पुरस्काराचे वितरण

   
        वर्धा, दि. 26 :  राज्य शासन वर्धा जिल्हयाच्या विकासासाठी अनेक प्रकल्प राबवित आहे. विकासाची फळे शेवटच्या घटकापर्यंत पोहचावित असे प्रत्येक राज्यकर्त्याला वाटत असते. राज्याच्या दुष्काळी परिस्थितीत शेतक-यांच्या अडचणी वाढल्याची जाणिव शासनालस असून राज्य शासन कायम शेतक-यांच्या पाठीशी खंबिरपणे उभे राहिल, असे प्रतिपादन राज्याचे गृह निर्माण मंत्री प्रकाश महेता यांनी केले.
          भारतीय प्रजासत्ताकाच्या 69 व्या वर्धापन दिन कार्यक्रमाच्या मुख्य शासकिय ध्वजारोहण प्रसंगी जनतेला संबोधित करतांना ते बोलत होते.
जिल्हा क्रिडा संकुल येथे पार पडलेल्या कार्यक्रमाला आमदार डॉ. पंकज भोयर, जिल्हाधिकारी शैलेश नवाल, मुख्य कार्यकारी अधिकारी अजय गुल्हाणे, जिल्हा पोलिस अधिक्षक बसवराज तेली,  अपर जिल्हाधिकारी संजय दैने, अपर पोलिस अधिक्षक निखिल पिंगळे, निवासी उपजिल्हाधिकारी उत्तम दिघे यासह सर्व अधिकारी उपस्थित होते.
यावेळी प्रकाश महेता यांनी  परेड निरिक्षण करुन सर्व स्वातंत्र संग्राम सैनिक आणि शहिदांना विनम्र  अभिवादन करुन  उपस्थित नागरिकांना  शुभेच्छा दिल्यात. याप्रसंगी गृह विभाग, होमगार्ड, एन.सी.सी., स्काऊट, गाईड पथकांनी पथसंचलन  करुन मान्यवरांना मानवंदना दिली. तसेच  सामान्य रुग्णालयातर्फे  प्रधानमंत्री मातृत्व  योजनेवर उत्कृष्ट झाकी ,  आपात कालीन वैद्यकिय सेवा,  पोलिस विभागाचे श्वान पथक, दंगल नियंत्रण व वज्र वाहन पथक, स्वच्छता व पाणी पुरवठा विभागाचा चित्ररथ आदी चित्ररथाव्दारे जनजागृतीपर संदेश देण्यात आला. 
यावेळी पुढे बोलतांना श्री. महेता म्हणाले, यावर्षी कमी पाऊस पडल्यामुळे शासनाने राज्यात 151 तालुक्यामध्ये दुष्काळ घोषित केला असून दुष्काळावर मात करण्यासाठी विविध उपाययोजना हाती घेतल्या आहेत.वर्धा जिल्हयातही तीन तालुक्यात मध्यम स्वरुपाचा दुष्काळ असून या ठिकाणी पिण्याचे पाणी आणि  जनावरासाठी चा-याची टंचाई निर्माण होऊ नये म्हणुन प्रशासनाच्या वतीने योग्य नियोजन करण्यात आले आहे.

          जगातील सर्वात मोठी लोकशाही व्यवस्था असलेला देश म्हणून भारताकडे पाहिले जाते. आपण साजरा करीत असलेला प्रजासत्ताक दिन हा लोकशाहीचा उत्सव असून विविध प्रयत्नांमुळे आपली लोकशाही अधिकाधिक मजबूत होत असल्याचे श्री महेता म्हणाले.  लोकशाही विकेंद्रीकरणाची कास धरणा-या राष्ट्रपिता महात्मा गांधींचे 150 वे जयंती वर्ष साजरे होत असतांना त्यांच्या स्वप्नांची पुर्तता करणा-या 73 व 74 व्या घटना दुरुस्तीचे सुध्दा हे रौप्य महोत्सवी वर्ष आहे. त्यामुळे  वर्षभरात  व त्यापुढे होणा-या सर्व निवडणूकांमध्ये सर्व मतदारांनी राष्ट्रीय कर्तव्य भावनेतून सहभाग घेणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन श्री. महेता यांनी केले.
          राज्य शासनाने जिल्ह्यातील विकास कामांना प्राधान्य दिले आहे. गांधी जिल्हा म्हणून आंतरराष्ट्रीय स्तरावर ओळख निर्माण करण्यासाठी सेवाग्राम विकास आराखड्याच्या माध्यमातून सेवाग्राम , पवनार व वर्धा या तीन गावांत पर्यंटनाच्या दृष्टीने पायाभूत सुविधा निर्माण करण्यात येत आहे. यासोबतच विदर्भातील दळणवळणाच्या सुविधेसाठी नागपूर-वर्धा -तुळजापूर रस्त्याचे चौपदरीकरण, शहरातील  अंतर्गत रस्ते , वर्धा बसस्थानकाचे आधुनिकीकरण व नुतणीकरण, जिल्हाधिकारी कार्यालय आणि कृषि कार्यालयाच्या नविन इमरातीचे भूमीपूजन, भूयारी गटार योजना, पाणी पुरवठा योजना   अशा अनेक आघाड्यांवर जिल्हयातील विकास कामांना गती मिळाली असल्याचे त्यांनी सांगितले.  
          वृक्षलागवड अंतर्गत वन विभागाच्या 154 हेक्टर झुडपी जागेवर 20 ठिकाणी ‘ऑक्सीजन पार्क’ हा नाविण्यपूर्ण प्रकल्प राबविण्यात येत आहे. वर्धा जिल्हयाचे ऑक्सीजन पार्कचे मॉडेल राज्यभर राबविण्याचा मानस वन मंत्री तथा जिल्हयाचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केला आहे. यासाठी त्यांनी वन विभाग आणि जिल्हा प्रशासनाचे अभिनंदन केले.
         
    जिल्हाधिकारी  यांनी जिल्हयात राबविलेल्या नाविण्यपूर्ण व रोजगारभिमुख प्रकल्पाची राज्य शासनाने राज्यस्तरावर दखल घेतली असून  यासाठी जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांची उत्कृष्ट जिल्हाधिकारी म्हणुन निवड केली आहे. या  उत्कृष्ट कामगिरीसाठी त्यांनी जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांचे अभिनंदन केले.
          यावेळी मंत्रिमहोदयाचे हस्ते उत्कृष्ट पथसंचलनाचा पुरस्कार एन.सी.सी. कॅडेट देवळी, जे.बी. सायन्स कॉलेज आणि महिला पोलिस पथक यांना देण्यात आला.  चित्ररथामध्ये पोलिस श्वान पथक, वृक्ष लागवडीचा संदेश देणारे सायकल स्वार श्री. अडसूड तसेच स्वच्छतेचा संदेश देणारा नगर परिषद विभागाचा चित्ररथ याशिवाय सांस्कृतिक सादरीकरणामध्ये  पिपरी येथील  अग्रग्रामी शाळा,  गो.से. वाणिज्य महाविद्यालय व न्यु. इंग्लीश  शाळेच्या चमूला पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
          यावेळी विविध विभागाचे वतीने देण्यात येणा-या पुरस्काराचे वितरणी करण्यात आले यामध्ये जिल्हा स्तरीय लघु उद्योजक पुरस्कार हिंगणघाट येथील मे. गोलछा बायोसायन्स प्रा.लि. आणि मे. कलोडे अग्रो. इंडस्ट्रिज  देवळी यांना प्रथम व व्दितीय पुरस्कार देण्यात आला. तर भारत स्काऊट गाईड चळवळी अंतर्गत राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त गाईड व हिरकापंख प्राप्त बुलबुल यांना मंत्री महोदयाचे हस्ते प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. तसेच यावेळी केरळ राज्यात पुर परिस्थतीमध्ये उत्कृष्ट वैद्यकिय सेवा दिलेल्या वैद्यकिय चमूला , क्रिडा क्षेत्रात संघटक , प्राविण्य प्रात्प खेळाडू , माझी कन्या भाग्यश्री योजनेच्या लाभार्थ्यांना मुदती ठेव प्रमाणपत्र ,आरोग्य विभागाच्या कर्मचा-यांना प्रशस्ती प्रमाणपत्र, संयुक्त वन व्यवस्थापन समित्यांना रोख पारितोषिक, पोलिस उपअधिक्षक अभय वानखेडे यांना विशेष सेवा पदक तसेच निखिल शेंडगे यांना मंत्रिमहोदयाचे हस्ते दिव्यांग व्यक्ती प्रेरणा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
          यावेळी स्वातंत्र्य संग्राम सैनिक , मोठया संख्येने शालेय विद्यार्थी, शिक्षक, कर्मचारी, नागरिक उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन अतुल राजपायले यांनी केले.
                                                0000