Friday 26 February 2016

मागेल त्याला शेततळे योजनेंतर्गत
जिल्ह्यास 2 हजार 34 शेततळ्यांचे लक्षांक
-         जिल्हाधिकारी
Ø शेतक-यांनी योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन
             वर्धा, दिनांक 26 – शेती उत्पादनात शाश्वतता आणण्यासाठी, दुष्काळावर मात करण्यासाठी शेततळे उपयुक्त असल्याने पर्जन्यावर आधारीत कोरडवाहू शेतीसाठी पाणलोट जलसंवर्धनाच्या माध्यमातून जलसिंचनाची उपलब्धता वाढविणे तसेच संरक्षित शाश्वत सिंचनाची सुविधा निर्माण करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मागेल त्याला शेततळे महत्त्वकांक्षी अशी योजना जाहीर केली आहे. या योजनेंतर्गत जिल्ह्यास 2 हजार 34 शेततळ्यांचे लक्षांक निर्धारीत करण्यात आलेले आहेत. या योजनेची अमलबजावणी राज्य शासनाच्या कृषी विभागामार्फत करण्यात येणार आहे.  योजनेबाबत अधिक माहितीसाठी  कृषी विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हाधिकारी आशुतोष सलिल यांनी केले आहे.
              योजनेचा लाभ घेऊ इच्छिणा-या शेतक-यांनी विहित नमुन्यातील अर्ज तथा संमतीपत्र सादर करणे अनिवार्य आहे, याबाबत  शेतक-यांनी  त्यांची मागणी संगणकीय प्रणालीद्वारे भरावयाची आहे. यासाठी करावयाचे अर्ज http://aaplesarkar.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येत आहे. संकेतस्थळावरून नमुना प्रपत्र क्रमांक 2 इच्छुक लाभार्थ्यांनी डाऊनालोड करून घ्यावे. नमूद माहिती जमा करून मूळ अर्ज भरून लाभार्थ्यांनी स्वत:च्या स्वाक्षरीसह सर्व कागदपत्रे स्कॅन करून ठेवावे. ऑनलाईन पद्धतीद्वारे http://aaplesarkar.maharashtra.gov.in  या संकेतस्थळावर अर्जाची माहिती ऑनलाईन भरून अर्जाची माहिती ऑनलाईन भरून अर्जात नमूद केलेली जोडपत्रे स्कॅन कॉपी जोडून अपलोड करावी. ऑनलाईन अर्जाची पोचपावती इच्छुक लाभार्थ्यांनी डाऊनलोड करून स्वत:कडे ठेवावी. ऑनलाईन अर्ज अपलोड करण्याची प्रक्रिया 29 फेब्रुवारी 2016 रोजी सकाळी 11 वाजेपासून नमूद केलेल्या संकेतस्थळावर उपलब्ध राहील. योजनेत अर्ज करणा-या व्यक्तीने आपले सरकार संकेतस्थळावर जाऊन मागेल त्याला शेततळे या लिंकवर क्लिक करावे. अर्जदाराकडे स्वत्:चा मोबाईल क्रमांक असणे आवश्यक आहे.        
        लाभार्थ्यांनी संकेतस्थळावरून अर्ज उपलब्ध करून घेऊन अर्जासोबत जोडावयाची प्रमाणपत्रे प्राप्त करून घेणे  पूर्ण भरलेले अर्ज आवश्यक प्रमाणपत्रासह स्कॅन करून अपलोड करण्याची अंतिम मुदत 45 दिवसांपर्यंत आहे, असेही ते म्हणाले
           सदरील कार्यक्रम शासनाचा महत्त्वाकांक्षी कार्यक्रम आहेयोजनेचा आढावा संनियंत्रणासाठी पालकमंत्री  यांच्या अध्यक्षतेखालील जिल्हा तालुकास्तरीय उपविभागीय अधिकारी  यांच्या अध्यक्षतेखाली तालुकास्तरीय समिती गठित करण्यात आलेली आहे
         योजनेत सहभागी होणा-या शेतक-यांकडे त्यांच्या नावावर कमीत कमी 0.60 हेक्टर जमीन असणे आवश्यक आहे, याकरीता कमाल मर्यादा नाही. योजनेत सहभागी होऊ इच्छिणा-या अर्जदारांनी यापूर्वी शेततळे, सामुहिक शेततळे या घटकाचा शासकीय योजनांमधून लाभ घेतलेला नसावा. या कार्यक्रमांतर्गत प्राप्त अर्जातून प्रथमत: दारिद्रय रेषेखालील शेतकरी ज्या कुटुंबांमध्ये आत्महत्या झालेली आहे. त्याच्या वारसांना निवड प्रक्रियेत ज्येष्ठता यादीत सूट देऊन प्रथम प्राधान्याने निवड करण्यात येईल. या व्यतीरिक्त इतर सर्व प्रवर्गातील शेततळे मागणी करणा-या शेतक-यांची प्रथम येणा-यास प्रथम प्राधान्य या तत्त्वाने ज्येष्ठता यादीनुसार या योजनेत निवड करण्यात येईल. मागील पाच वर्षात किमान एक वर्ष तरी 50 पैशांपेक्षा कमी पैसेवारी जाहीर झालेल्या गावामधील लाभार्थी या योजनेसाठी पात्र राहतील
                 शेततळी बांधण्याचा कार्यक्रम लाभार्थ्याने स्वत: , मजुराद्वारे,  जेसीबी, पोकलेनेसारखे मशीन्स यांच्या साहाय्याने पूर्ण करावयाचे आहेत, मात्र याकरीता मशीन उपलब्ध करून घेण्याची जबाबदारी संबंधित लाभार्थ्यांची राहील. शेततळ्याचे काम पूर्ण झाल्यानंतर लाभार्थीने संबंधित तालुका कृषी अधिकारी यांना लेखी कळविणे बंधनकारक राहील. तसेच त्यासोबत लाभार्थीने राष्ट्रीयकृत बँक, इतर बँक खात्याच्या पासबुकाची बँक खाते क्रमांक नमूद असलेली झेरॉक्स प्रत सोबत जोडावी. काम पूर्ण झाल्यानंतर उपलब्ध निधीतून अथवा निधी उपलब्ध झाल्यानंतर 30 दिवसाचे आत संबंधित लाभार्थ्याच्या बँक खात्यावर रक्कम थेट जमा करण्यात येईल, असेही त्यांनी कळविले आहे.
0000