Sunday 21 February 2016

केंद्राचा निधी परत जाणार नाही याची खबरदारी घ्या
-रामदास तडस
Ø जिल्हास्तरीय दक्षता संनियंत्रण समितीची बैठक
          वर्धा, दिनांक 17 – जिल्ह्यातील विविध विकासकामांसाठी केंद्र शासनातर्फे प्राप्त झालेला निधी  31 मार्चपूर्वी खर्च होईल यादृष्टीने कामांचे नियोजन करून उपलब्ध झालेला निधी परत जाणार नाही याची खबरदारी संबंधित विभागप्रमुखांनी घ्यावी, अशा सूचना खासदार रामदास तडस यांनी आज अधिका-ऱ्यांना दिल्यात.
           विकास भवन येथे आयोजित जिल्हास्तरीय दक्षता सनियंत्रण समितीच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष तथा समिती सदस्य विलास कांबळे, समूद्रपूरच्या पंचायत समिती सभापती नंदाताई साबळे, आर्वीच्या तारा ताडाम, सेलूच्या मंजूषा दुधबडे, कारंजाच्या संगीता खोडे, देवळीचे भगवान भरणे आणि हिंगणघाट पंचायत समितीचे संजय तपासे, सुचिता मडावी, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक तथा प्रमोदकुमार पवार, जिल्हा नियोजन अधिकारी प्रकाश डायरे आदींची उपस्थिती होती.
          बैठकीमध्ये केंद्राच्या जिल्ह्यात राबविण्यात येणा-या विविध योजनांचा आढावा खासदार रामदास तडस यांनी घेतलायामध्ये त्यांनी केंद्रीय निधी प्राप्त विकास कामे लवकरात लवकर पूर्ण करावीत. तसेच तसा अहवाल सादर करावा सांसद आदर्श ग्राम योजनेंतर्गत उर्वरीत राहिलेली सर्व कामे 31 मार्चपूर्वी पूर्ण करावीत. महावितरणने ग्रामीण भागात प्राधान्याने वीज जोडणी करावी, अशा सूचनाही संबंधित अधिका-यांना केल्यात.
              महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या प्रगतीचा आढावा उपमुख्य कार्यकारी अधिकारी विवेक इलमे यांनी सादर करून जिल्ह्यात 26 कामे सुरू असून उर्वरीत कामे करण्याच्या सूचना गटविकास अधिकारी यांना देण्यात आलेल्या आहेत, असे सांगितले. तसेच महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाचा प्रगतीचा आढावा प्रकल्प संचालक प्रमोदकुमार पवार यांनी सादर करून आज रोजी खर्च पूर्ण करण्यात आले असल्याचे सांगितले. त्याचबरोबर इंदिरा आवास योजनेंतर्गत 1 हजार 951 घरकुल मंजूर करण्यात आली असून 1 हजार 893 घरकुले पूर्ण करण्यात आली आहेत, असे सांगितले. उर्वरीत कामे प्रगतीपथावर असल्याचा अहवालही सादर केला. महावितरणचे कार्यकारी अभियंता श्री. देशपांडे यांनी दीनदयाल उपाध्याय ग्राम ज्योती योजना, एकात्मिकऊर्जा विकास योजना भाग एक दोन आदी योजनांबाबत अहवाल सादर केला
               भूमिलेख अभिलेख्याचे वर्धा आणि देवळी तालुक्यातील स्कॅनिंग पूर्ण करण्यात आलेले आहे. तसेच वर्धा, देवळी, सेलू आणि आर्वी तालुक्यात ऑनलाईन सात बारा देण्यात येत असल्याचे भूमि अभिलेख कार्यालयाच्या अधिका-यांमार्फत सांगण्यात आले. तसेच इतर तालुक्यांचे आधुनिकीकरण करण्यात येत असून कामे प्रगतीवर असल्याचेही सांगण्यात आले.  पंतप्रधान ग्राम सडक योजनेंतर्गत जुन्यासह नवीन कामांचा प्रगतीचा अहवाल सादर करण्यात यावा, अशा सूचनाही खासदार रामदास तडस यांनी संबंधित अधिका-यांना केल्यात.    
                  एकात्मिक पाणलोट विकास कार्यक्रम, ग्रामीण पाणी पुरवठा योजना, स्वच्छ भारत अभियान, राष्ट्रीय सामाजिक सहाय्यता कार्यक्रम, सांसद आदर्श ग्राम योजना, राजीव गांधी जीवदायी योजना, माता बाल संगोपन योजना, नियमित लसीकरण, जननी सुरक्षा योजना, सर्व शिक्षा अभियानाबाबतही त्यांनी आढावा घेऊन लवकरात लवकर विकास कामे पूर्ण करावीत, असे सांगितले.
                     प्रारंभी  बैठकीचे प्रास्ताविक सहायक नियोजन अधिकारी हरीश चवरे यांनी केले. आभार श्री. गोहड यांनी मानले. बैठकीला सर्व विभागांचे प्रमुख उपस्थित होते.
0000


No comments:

Post a Comment