Wednesday 17 February 2016

210 गावात राबविणार जलयुक्त शिवार अभियान
                                                 -आशुतोष सलिल
Ø  जिल्हास्तरीय कार्यकारी समितीची बैठक
Ø  माथा ते पायथा संकल्पनेनुसार गावांची निवड
Ø  शिवारफेरी घेऊन गावक-यांना जलयुक्तची माहिती
Ø  ग्रामसभेच्या ठरावानंतरच कामाचे देयक
Ø  जलयुक्त मधील प्रत्येक कामे वेबसाईटव                
वर्धा, दि. 15  – जलयुक्त शिवार अभियानांतर्गत गावांची निवड करताना माथा ते पायथा या प्रणालीनुसार पाणलोट विकासाची कामे घेण्याला प्राधान्य देण्यात आले असून यावर्षी याच तत्त्वानुसार 210 गावांची निवड करण्यात आली आहे. जलयुक्त शिवार अभियानामध्ये निवड करण्यात आलेल्या प्रत्येक गावात शिवार फेरी घेऊन पाण्याच्या ताळेबंदाबाबत गावक-यांना विश्वासात घ्या, अशा सूचना जिल्हाधिकारी आशुतोष सलिल यांनी दिल्यात.
         जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात जिल्हास्तरीय कार्यकारी समितीची बैठक जिल्हाधिकारी आशुतोष सलिल यांच्याअध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती त्याप्रसंगी मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी मुख्य कार्यपालन अधिकारी संजय मीणा, अपर मुख्य कार्यपालन अधिकारी प्रमोद पवार, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी ज्ञानेश्वर भारत, जलतज्ञ सोमनाथे, तसेच सर्व विभाग प्रमुख यावेळी उपस्थित होते.
         जलयुक्त अभियानांतर्गत यावर्षीसाठी नवीन आराखडा तयार करताना पाणलोट विकासासाठी माथा ते पायथा याच पद्धतीने गावांची निवड करण्यात आली असल्याचे सांगताना जिल्हाधिकारी आशुतोष सलिल म्हणाले, की गाव शिवारात पडणारे पावसाचे पाणी अडविण्यासोबतच गाव टंचाईमुक्त करण्यासाठी गावांसाठी आवश्यक असलेल्या पाण्याचा ताळेबंद तयार करण्यात येणार आहे. शिवारातील वाहणाऱ्या नाले व ओढ्यांवर माथ्यांपासून ते पायथ्यापर्यंत विविध विभागांमार्फत घेण्यात येणा-या कामांचे नियोजन करण्यात येणार आहे.
           जलयुक्त शिवार अभियानांतर्गत निवडण्यात आलेल्या प्रत्येक गावाला संबंधित विभागांच्या अधिका-यांनी प्रत्यक्ष भेट देऊन पाणलोट विकासाचे नियोजन करावे, त्यानुसार तालुकास्तरावर सर्व यंत्रणांची बैठक घेण्यात येणार असून या सर्व बैठकांसाठी जिल्हाधिकारी व मुख्य कार्यपालन अधिकारी उपस्थित राहणार आहेत. त्यानंतरच तालुकास्तरावर प्रत्यक्ष आराखडा तयार करण्यात येऊन त्यानुसार कामांना मंजुरी देण्यात येईल. या बैठकी आधी निवड करण्यात आलेल्या गावात शिवार फेरी घेऊन जागृती निर्माण करा, अशा सूचना यावेळी जिल्हाधिकायांनी दिल्या    जलयुक्त शिवार अभियानांतर्गत मागील वर्षी 930 कामांना प्रशासकीय मान्यता देण्यात आली होती, यासाठी 46 कोटी 91 हजार रुपयांच्या निधीपैकी 35 कोटी रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे. विविध विभागांतर्फे पूर्ण झालेल्या कामासंदर्भातील देयकांच्या मंजुरीपूर्वी ग्रामसभेचा ठराव जोडणे आवश्यक आहे. ज्या देयकांसोबत ग्रामसभेचा ठराव आहे, अशी देयके तत्काळ मंजूर करावी, अशा सूचनाही जिल्हाधिकारी आशुतोष सलिल यांनी दिल्या आहेत.
             जलयुक्त शिवार अभियानांतर्गत मागील वर्षी मंजूर झालेल्या कामांचा आढावा घेताना जिल्हाधिकारी आशुतोष सलिल यांनी अपूर्ण कामे 31 मार्चपूर्वी पूर्ण करण्याचे नियोजन करावे, अशा सूचना करताना पूर्ण झालेल्या कामासंदर्भातील देयके तत्काळ सादर करावीत, जिल्ह्यातील विविध यंत्रणांच्या कामांचे त्रयस्थ संस्थेमार्फत ऑडिट करण्यात आले असून बहुतांश कामे पूर्ण झाली आहेत. अपूर्ण कामांसंदर्भातील निधी मार्च नंतर परत जाणार नाही, याचीही खबरदारी घेण्यात यावी, असेही त्यांनी यावेळी सांगितले
              भूजल सर्वेक्षण विभागातर्फे 75 कामांना प्रशासकीय मान्यता देण्यात आली होती, त्यापैकी 27 कामे पूर्ण झाली असून 21 कामे प्रगतीवर आहेत. ग्रामीण पाणी पुरवठा विभागाद्वारे 77 कामांपैकी 69 कामे पूर्ण झाली असून 8 कामे प्रगतीपथावर आहेत. जलसंधारण विभागातर्फे 78 कामांपैकी 61 कामे प्रगतीवर असून वनविभागातर्फे 82 कामे पूर्ण झाली आहेत. जिल्हा परिषदेच्या लघु सिंचन विभागातर्फे 169 कामांपैकी 75कामे पूर्ण झाली असून इतर कामे 31 मार्च पर्यंत पूर्ण करण्यात येणार आहेत. कृषी विभागातर्फे 539 कामांपैकी 384 कामे पूर्ण झाली असून 110 कामे प्रगतीवर आहेत तर 45 कामांना लवकरच सुरू होत आहे. ही सर्व कामे 31 मार्चपूर्वी पूर्ण करण्यात यावीत, अशा सूचना देण्यात आल्या.
               अपूर्ण असलेल्या या कामांना प्रशासकीय मान्यता देण्यात येईल, अशी कामे घेताना नाला खोलीकरण सिमेंट बांध तसेच शेततळ्यांची कामे प्राधान्याने घेण्याच्या सूचना यावेळी दिल्यात. प्रारंभी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी श्री. भारती यांनी स्वागत करून अभियानांतर्गत सर्व कामांची यंत्रणानिहाय माहिती यावेळी दिली.
000000


No comments:

Post a Comment