Thursday 21 February 2013


    दुर्मिळ  पिवळा पळस बहारला.....

          पळसाच्‍या   लाल,नारंगी  फुलांनी  वसंत ऋतूत फुलल्‍यानंतर  संपूर्ण  जंगल  लाल रंगाने  बहारुन  जाते.  पळस फुलांनी  बहारलेल्‍या  जंगलाला         ` फ्लेम ऑफ  फॉरेस्‍ट `  अशी  उपमा इंग्रजांनी  दिली आहे.  पळसाच्‍या  लाल, नारंगी फुलांच्‍या  प्रदेशात  दुर्मिळ अशा पिवळ्या  रंगाच्‍या बहारलेला   पळसवृक्ष  नागपूर-वर्धा  जिल्‍ह्याच्‍या  सिमेवरील जंगलात  बहारलेला  आहे. पिवळा पळस  क्‍वचितच  पहायला  मिळतो. वसंत ऋतूत   फुललेल्‍या   पळसाचे  झाड सर्वांचेच लक्ष  वेधून घेते.


          पळसाला  जसा  आकार नाही, तसाच त्‍याच्‍या  सुंदर रंगांना गंधही  नाही.  परंतू    फुललेला  पळस सर्वांनाच  आवडतो. कारण  पळस फुलला  की, संपूर्ण  जंगल लाल रंगांनी    न्‍हाऊन  निघते. आणि पळसाच्‍या  फुलातील  मध वेचण्‍याकरीता  पळस  मैनेसह  असंख्‍य  पक्षी  झाडावर येतात. वसंत पंचमीला पळसाच्‍या फुलांच्‍या  रंगालाही  विशेष  महत्‍व  आहे.
          लाल, नारंगी  रंगाचा पळस  सर्वत्र आढळतो परंतू  पिवळा  आणि  पांढरा पळस  हा  दूर्मिळ  असतो. नवेगावबांधच्‍या  जंगलात पांढरा  पळस प्रत्‍यक्ष  पाहिल्‍याचं  सुप्रसिध्‍द  निसर्ग  लेखक  व पक्षीतज्ञ  मारुती  चितमपल्‍ली   यांनी  सांगितले. पिवळा  पळस  सुध्‍दा  विदर्भातील  अगदी  मोजक्‍याच  ठिकाणी  आढळून  येतो . काळ्या  रंगाचा पळस सुध्‍दा   मध्‍य प्रदेशातील   शिवनीच्‍या  जंगलात असल्‍याचं   श्री.जोग  यांनी  बस्‍तरच्‍या   प्रवासात  सांगितले होतं.
          पिवळ्या पळसाबद्दल अद्यापपर्यंत  संशोधन झाले नाही. लाल, नारंगी, फुलांबद्दल  व त्‍याच्‍या  गुणधर्माबद्दल  आर्युवेदामध्‍ये   अभ्‍यास  झालेला आहे. पिवळ्या  व पांढ-या  पळसाच्‍या   झाडांचं संवर्धन   तसेच  संशोधनही  अत्‍यंत  आवश्‍यक   असल्‍याचे   मारुती  चितमपल्‍ली   यांनी सांगितलं. परंतू  40 वर्षे जंगलात राहून, प्रत्‍येक  वृक्षाचं  तसेच  निसर्गाचं  अभ्‍यास   करुन  संशोधन केलं. परंतू  झालेल्‍या  संशोधना नंतर  नवीन  संशोधन  होत नाही. त्‍यामुळे   तरुण  पिढीला  समृध्‍द   निर्सगाची  माहिती  होण्‍यासाठी   मोठ्या  प्रमाणात  संशोधनाची  आवश्‍यकताही  त्‍यांनी  व्‍यक्‍त  केली.
          पिवळा  व पांढरा  पळस  संवर्धन   करताना  त्‍याच्‍या   बियापासून   पिवळा  पळसच  निर्माण  होईल याची  शाश्‍वती  नसल्‍यामुळे  गुटी  कलमाव्‍दारे  या दुर्मिळ   वृक्षवल्‍लीचे  संशोधन व्‍हावे,अशी  मनोमन  इच्‍छाही  त्‍यांनी  व्‍यक्‍त  केली.
          पांढरा व पिवळा  पळस  संपूर्ण  जंगलात  क्‍वचीत  आढळतो. त्‍यामुळे  उत्‍सुकतेपोटी   त्‍या  झाडाची  मुळापासून  तोडणी   होते. संपूर्ण  जगात  केवळ  भारतातच  पळस  आढळतो. हिमालय  अथवा  राजस्‍थानच्‍या  वाळवंटात  पळस  आढळत  नाही. वसंत  ऋतूमध्‍ये  पळस फुलल्‍यानंतर  संपूर्ण  जंगल  लाल  रंगात  न्‍हाऊन   निघते. धुलीवंदनामध्‍ये   पळसाच्‍या  फुलांचाच   रंगाचा  वापर  होत होता.  त्‍यामुळे   शरीरालाही   हा रंग  पोषक  होता. पळसाच्‍या  झाडापासून  लाख  मोठ्या  प्रमाणात   येत  असल्‍यामुळे   शेतकरी   आपल्‍या  बांधावर  पळसाच्‍या  झाडाचे  संवर्धन  करतात.  पळसापासून मिळणा-या  बिया, फुले, पाने, यामध्‍ये  औषधी गुणधर्म  असल्‍यामुळे   त्‍याचा वापरही  औषधी  गुणधर्म  म्‍हणून   मोठ्या  प्रमाणात   करण्‍यात येतो.
          वर्धाच्‍या  जंगलात  आढळलेल्‍या   दुर्मिळ  पिवळ्या पळसाच्‍या  झाडाचे  संवर्धन  करण्‍यासाठी   सामाजिक   वनीकरण   विभागाचे उपसंचालक  प्रविनकुमार बडगे  यांनी  पुढाकार घेतला  आहे. मारुती   चितमपल्‍ली   यांनी   सुचविलेल्‍या   गुटी  कलमाव्‍दारे  पिवळ्या झाडांच्‍या  संवर्धनासाठी  शासकीय  नर्सरीमध्‍ये  विशेष प्रयत्‍न   सुरु आहेत. बिया पासून  पळसाच्‍या  झाडाला  25 ते 30 वर्षापर्यंतही  फुले  आलेले नाहीत.  परंतु   गुटी  कलमाव्‍दारे  अल्‍पावधीत  पळस  बहरु  शकतो.
          पळसाची  लाल,नारंगी  फुलं पोपटाच्‍या  चोचीसारखी  दिसतात.संपूर्ण  विदर्भातील जंगलात पळसाच्‍या   झाडाखाली पळसाच्‍या  फुलांचा सडा  पहायला  मिळतो.  तसेच  पळसाचा  संपूर्ण  झाड  सुध्‍दा  लाल  रंगाने न्‍हाऊन   निघालेल्‍या  असून,  सुध्‍दा  आपण  मुद्दाम   फुलोरा  पहायला  जात नाही.
             अनिल गडेकर
            9890157788
000000

Tuesday 19 February 2013

ग्रामीण जनतेला दर्जेदार आरोग्‍य सेवा देणार - जि.प.अध्‍यक्ष


वर्धा दि.19- बदलत्‍या वातावरणामुळे ग्रामीण क्षेत्रात अनेक आजार लोकांमध्‍ये आढळून येत असतात गाव निरोगी रहावे यासाठी प्रत्‍येक गावामध्‍ये स्‍वच्‍छता पाळणे गरजेचे असून ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्‍य केंद्र यापुढे सर्व सुविधेने सुसज्‍ज करण्‍याचा प्रयत्‍न राहणार आहे.वैद्यकीय अधिका-यांचे रिक्‍त पदे तसेच आरोग्‍य संस्‍थेचे इतर पदे भरण्‍यावर भर राहणार असून ग्रामीण जनतेला दर्जेदार आरोग्‍य सेवा देण्‍याचा प्रयत्‍न असेल अशी माहिती जिल्‍हा परिषदेचे अध्‍यक्ष ज्ञानेश्‍वर ढगे यांनी दिली.
समुद्रपूर तालुक्‍यातील मांडगाव या गावामध्‍ये जिल्‍हा नियोजन समितीच्‍या निधीमधून 3 कोटी 71 लक्ष रुपये खर्च करुण बांधण्‍यात येणा-या  नविन प्राथमिक आरोग्‍य केंद्राच्‍या इमारतीच्‍या बांधकामाचे  भुमिपूजन त्‍यांच्‍या हस्‍ते झाले त्‍यावेळी ते बोलत होते.
याप्रसंगी जिल्‍हा परिषदेचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी शेखर चन्‍ने, जि.प. शिक्षण व आरोग्‍य सभापती प्रा. उषाकिरण थुटे,पंचायत समिती समुद्रपूरच्‍या सभापती नंदाताई साबळे,उपसभापती संध्‍याताई डांगरी, वर्धा पंचायत समितीचे उपसभापती संदेश किटे, सरपंच अर्चनाताई घुसे जि.प.सदस्‍य संगिताताई उईके, आदि मान्‍यवर मंचावर उपस्थित होते.
          बदलत्‍या काळानुसार ग्रामीण क्षेत्रात कार्यरत आरोग्‍य यंत्रणा अद्यावत करण्‍याचा प्रयत्‍न असलयाचे सांगून जि.प.अध्‍यक्ष ढगे म्‍हणाले की येथील प्राथमिक आरोग्‍य केंद्राची इमारत जिर्ण अवस्‍थेत असल्‍यामुळे नवीन इमारतीचे बांधकाम करण्‍याचा प्रस्‍ताव आरोग्‍य विभागाने सादर केला. या इमारतीमध्‍ये आवश्‍यक त्‍या सर्व सुविधा पुरविण्‍यात येतील. येत्‍या 9 महिन्‍याच्‍या आत या इमारतीचे बांधकाम करण्‍यात येईल. असा विश्‍वास व्‍यक्‍त करुण ढगे म्‍हणाले की, जिल्‍हा नियोजन समितीच्‍या निधीमधून यावर्षी 71 लक्ष रुपये उपलब्‍ध करुण देण्‍यात आले आहे. उर्वरित 3 कोटी रुपये येणा-या आर्थीक वर्षात उपलब्‍ध होतील जिल्‍ह्यातील ग्रामीण भागातील आरोग्‍य सुदृढ रहावे यासाठी प्रयत्‍न करण्‍यात येणार असून गरोदर महिलांनी त्‍यांचे बाळंतपण प्राथमीक आरोग्‍य केंद्र किंवा शासकीय संस्‍थेत करावे असे आवाहन त्‍यांनी केले.
                                                                                                                                                  
          याप्रसंगी बोलतांना सभापती थुटे म्‍हणाल्‍या की, जनतेच्‍या आरोग्‍याकडे लक्ष ठेवून आरोग्‍य विभागाने वेळीच उपचार करणे गरजेचे आहे.सुदृढ गाव,सुदृढ जिल्‍हा व सुदृढ महाराष्‍ट्र  असला पाहिजे अशी भावनाही त्‍यांनी यावेळी बोलून दाखविली.
यावेळी बोलतांना जिल्‍हा परिषदेचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी चन्‍ने म्‍हणाले की जिल्‍ह्यातून कुपोषण आजार हद्दपार करण्‍यासाठी शासन प्रयत्‍नशिल असून नागरिकांनीसुध्‍दा या कार्यात सहकार्य करावे. शून्‍य ते सहावर्ष वयोगटापर्यंतच्‍या  मुलांच्‍या आरोग्‍याकडे लक्ष देण्‍यात यावे. बाळ पोटात असल्‍यास मातेने योग्‍य प्रमाणात व सुतुलीत आहार घ्‍यावा आपले बाळ कुपोषित होणार नाही याची दक्षता संबंधित कुटूंबांनी घ्‍यावी. राष्‍ट्रीय आरोग्‍य कार्यक्रमात महाराष्‍ट्रामध्‍ये वर्धा जिल्‍हा आघाडीवर असून अनेक कार्यक्रमामध्‍ये आतापर्यंतच्‍या सर्वेक्षणात अव्‍वल आहे. आरोग्‍य सेवा बळकट करण्‍यासाठी वैद्यकीय अधिका-यांचे रिक्‍तपदे भरण्‍याची कार्यवाही सुरु असून गुनात्‍मक व दर्जेदार आरोग्‍य सेवा देण्‍याचा मानस असल्‍याचे त्‍यांनी सांगितले.
          प्रास्‍ताविक  करतांना डॉ. दिलीप  माने  म्‍हणाले की, आरोग्‍य   विभागाच्‍या आराखड्यानुसार जिल्‍ह्यात 5 नवीन प्राथमिक आरोग्‍य केंद्र व 7 उपकेंद्र मंजुर झालेले आहे.वर्धा जिल्‍ह्याने नेत्रदिपक प्रगती साधली असून महाराष्‍ट्रात वर्धा जिल्‍हा शासनाच्‍या कार्यक्रमामध्‍ये आघाडीवर असून ही गुणाक्रमे ठरलेली आघाडी सतत कायम राहील यासाठी आरोग्‍य यंत्रणेचे प्रयत्‍न सुरु आहे.  पुढील वर्षाच्‍या जिल्‍हा नियोजन समितीच्‍या अनुदानातून ई.सी.जी. यंत्र घेण्‍यात येणार असून ग्रामीण भागातील ह्रृदय रुग्‍णांनाया यंत्राचा  मोठा दिलासा मिळू शकेल असेही ते म्‍हणाले.
          यावेळी डॉ.पोहाने यांनी सुध्‍दा आपले विचार व्‍यक्‍त केले. कार्यक्रमाचे संचलन विजय कुंभलकर व आभार डॉ. शंभरकर यांनी मानले.यावेळी समुद्रपूर पंचायत समितीचे संवर्ग प्रकल्‍प अधिकारी एन.के.भांडारकर यांचेसह पं.स.व ग्रामपंचायतीचे पदाधिकारी,सदस्‍य,अधिकारी व ग्रामस्‍थ मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.
                                                    0000