Saturday 5 November 2011

न्यायमुर्ती सी.एम.थुल यांचा दौरा

                          महाराष्ट्र शासन
प्रसिध्दी पत्रक        जिल्हा माहिती कार्यालय,वर्धा    दि.5/11/2011
-----------------------------------------------------------
                   न्यायमुर्ती सी.एल.थुल यांचा दौरा
     वर्धा,दि.5- महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती व जमाती आयोगाचे सदस्य न्यायमुर्ती सी.एल.थुल यांचे गुरुवार दिनांक 10 नोव्हेंबर 2011 रोजी  दुपारी 12 वाजता सर्किट हाऊस वर्धा येथे नियोजित सेवा व विधी प्रकरणांच्या सुनावण्यास उपस्थित राहतील.
रात्री वर्धा येथून सोयीनुसार वाहनाने नागपूरकडे प्रयाण करतील.

जिल्हाधिकारी कार्यालयात आचारसंहिता कक्ष

प्रसिध्दी पत्रक जिल्हा माहिती कार्यालय,वर्धा  दि. 5 नोव्हेंबर 2011
---------------------------------------------------------------
            जिल्हाधिकारी कार्यालयात आचारसंहिता कक्ष
     वर्धा, दि.5- जिल्ह्यातील वर्धा, हिंगणघाट, आर्वी, पुलगाव,देवळी व सिंदी रेल्वे हया नगर परिषदाच्या निवणूका घेण्यात येणार असून आचार संहितेचे काटेकोरपणे पालन व्हावे यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात आचारसंहिता कक्ष स्थापन केलेला असून त्या कक्षामध्ये अधिकारी व कर्मचारी वर्गाची नियुक्ती करण्यात आली असल्याची माहिती जिल्हाधिकारी जयश्री भोज यांनी दिली आहे.
     निवडणूकीचे कालावधीमध्ये आचारसंहितचे काटेकोरपणे पालन होण्याचे दृष्टीने योग्य ती कार्यवाही करणे, निवडणूक निर्णय अधिकारी यांचेकडून आचार संहितेची माहिती प्राप्त करणे, आचारसंहिता भंग होत असेल तर कायदेशीर कारवाई करणे तसेच शासन स्तरावरुन वेळोवेळी प्राप्त आदेश वेब साईडवर टाकणे व त्या अनुषंगाने इतर अनुषंगीक कार्य करणे व दररोज घडलेल्या घटनांची माहिती जिल्हाधिका-यांना अवगत करणे या कामासाठी कक्ष प्रमुख म्हणून निवासी उपजिल्हाधिकारी आर.आर.खवले यांची तर अव्वल कारकून धनंजय वाघ व कनिष्ठ लिपीक शिवदास गायधने या  कर्मचा-यांची नियुक्ती करण्यात आली असल्याचे जिल्हाधिकारी वर्धा कळवितात.

संत रविदास पुरस्कारासाठी अर्ज आमंत्रित

                          महाराष्ट्र शासन
प्रसिध्दी पत्रक       जिल्हा माहिती कार्यालय,वर्धा    दि.5/11/2011
-------------------------------------------------------------------
       संत रविदास पुरस्कारासाठी अर्ज आमंत्रित
      वर्धा, दि.5- सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे अनुषंगाने संत रविदास पुरस्कार ही योजना लागु केली आहे. या योजने अंतर्गत राज्यातून एक व्यक्ती व एका संस्थेस हा पुरस्कार वितरीत करण्यात येतो. सन 2011-12 करीता पुरस्कारासाठी इच्छूक व्यक्ती व स्वयंसेवी संस्थाकडून मंगळवार दिनांक 15 नोव्हेंबर 2011 पर्यंत अर्ज सादर करावयाचे आहे.
     पुरस्कारा अंतर्गत व्यक्तीसाठी सन्मानपत्र व रोख रुपये 21000 आणि सामाजिक संस्थेसाठी सन्मानपत्र व रोख रुपये 30001 असे आहे. व्यक्तीसाठी पुरस्कार मिळण्यासाठी अर्जदार व्यक्ती चर्मकार अथवा दलित समाजातील सामाजिक दूर्बल घटकाच्या कल्याणासाठी किमान 15 वर्षापासून कार्यरत असावे. अर्जदाराचे वय पुरुषांसाठी किमान 50 वर्षे व महिलासाठी किमान 40 वर्षे इतके असावे. मात्र अपवादात्मक परिस्थितीमध्ये वय शिथील करण्याचे अधिकार शासनास आहेत. कोणत्याही व्यक्तीस अथवा संस्थेस एकादाच पुरस्कार देण्यात येईल. पुरस्कार मिळण्यासाठी जात. धर्म, लिंग व क्षेत्र यांचे बंधन नाही. पुरस्कारासाठी आमदार, खासदार, जिल्हा परिषद सदस्य किंवा इतर कोणत्याही पदाधिका-यास अर्ज करता येणार नाही.
     सामाजिक संस्थासाठी पुरस्कार मिळण्यासाठी संस्था नोंदणीकृत असावी. समाज कल्याण क्षेत्रामध्ये किमान 10 वर्षे सामाजिक कार्य असावे. संस्था राजकारणापासून अलिप्त असावी. पुरस्कारासाठी जात, धर्म, पंथ व क्षेत्र याचा विचार केला जाणार नाही.
     व्यक्ती व सामाजिक संस्थांनी अश्या अटी व शर्ती पुर्ण करीत असल्यास विहीत नमून्यातील अर्ज दिनांक 15 नोव्हेंबर 2011 पूर्वी विशेष जिल्हा समाज कल्याण अधिकारी, सेवाग्राम रेल्वे स्टेशन रोड, वर्धा येथील कार्यालयात सादर करावे. व अधिक माहितीसाठी  दुरध्वनी क्रमांक 07152-243331 वर संपर्क साधावा.
                                000000

Friday 4 November 2011

नगर परिषद निवडणूक आचार संहितेमुळे लोकशाही दिन रद्द

वर्धा,दि.4- राज्यात नगर परिषद सार्वत्रिक निवडणूकीचा कार्यक्रम जाहिर झाला असुन राज्यात दिनांक1 नोव्हेंबर 2011 पासुन आचार संहिता लागु करण्यात आली आहे. नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक आचार संहितेच्या कालावधीत माहे नोव्हेंबर 2011 मध्ये मंगळवार दिनांक 8 नोव्हेंबर 2011 व माहे डिसेंबर 2011 मध्ये पहिलया सोमवारी होणारा लोकशाही दिन आयोजित करण्यात येणार नाही. याची जिल्ह्यातील नागरिकांनी नोंद घ्यावी. असे जिल्हाधिकारी, वर्धा कळवितात.
                          0000
        पेन्शन व भ.नि.नि. संबंधी कार्यशाळा नागपूर येथे
     वर्धा, दि.4- नियंत्रक तथा लेखा परिक्षक भारत सरकार यांच्या कार्याचे 150 वे वर्ष साजरे करण्यात येत आहे. त्या अनुषंगाने आयुक्त नागपूर विभाग नागपूर व महालेखापाल यांचे संयुक्त विद्यमाने पेन्शन व भ.नि.नि. संबंधी मुद्दे निकाली काढण्याचे हेतूने दिनांक 8 नोव्हेंबर 2011 रोजी सकाळी 10-30 ते 5 वाजेपर्यंत नागपूर येथे कार्यशाळेचे आयोजनकरण्यात आलेले आहेत.
     उपरोक्त विषयांकित प्रलंबित प्रकरणा संबधी आवश्यक त्या कागद पत्रासह संबधितांनी कार्यशाळेस उपस्थित राहून मार्गदर्शनाचा लाभ घ्यावा असे कोषागार अधिकारी वर्धा कळवितात.

न्यायमुर्ती सी.एम.थुल यांचा दौरा

     वर्धा, दि.4- महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती व जमाती आयोगाचे सदस्य सी.एल.थुल यांचे गुरुवार दिनांक 10 नोव्हेंबर 2011 रोजी नागपूर येथून वर्धा येथे मोटारीने 12-30 वाजता आगमन होईल. निर्धारीत कार्यक्रमाला उपस्थित राहून रात्री सोयीनुसार नागपूरकडे प्रयाण करतील.

विशेष लेख         जिल्हा माहिती कार्यालय,वर्धा      दि.4 नोव्हेंबर 2011
                           कुपोषण मुक्त गावांकडे  …. !
     कुपोषण सर्वच स्तरातून संपविण्यासाठी 14 नोव्हेंबर अर्थात बाल दिनापासून राज्यात राजमाता जिजाऊ कुपोषणमुकत ग्राम योजना सुरु होत आहे. प्रत्यक्ष कामात गावक-यांनी सहभाग घेऊन आपला गाव कुपोषणमुक्त करण्याची संकल्पना यात आहे. या मोहिमेची माहिती थोडक्यात.
                            -प्रशांत दैठणकर                                    
      मानवी जीवनक्रमातला महत्वाचा टप्पा असं ज्याला म्हणता येईल तो अर्थातच नवं अपत्य जन्मायला येण्याचा असतो. जन्माला येणारा हा जीव कसा असेल हे त्याच्या मातेच्या आरोग्यावर अवलंबून असतं. स्त्री ला गर्भधारणा झाल्यावर पुरेसं सकस अन्न मिळालं नाही तर त्या बाळाची वाढ व्यवस्थित होत नसते.
      आपल्याकडे अद्यापही घरातील स्त्री ही घरादाराला जेवणं घालून उरलं सुरलं तर कधी शिळं अन्न खाते असं चित्र सर्वच घरातून दिसतं. अशा कमी सकस अन्नामुळे मुळात स्त्री कमजोर होते. आणि कुपोषित मातेच्या त्या स्थितीमुळे मुलही कुपोषित जन्माला येण्याची शक्यता असते.
      या कुपोषणातून होणा-या मृत्यूंना रोखण्यासाठी येत्या बाल दिनापासून राजमाता जिजाऊ यांच्या नावाने कुपोषणमुक्त ग्राम संकल्पना राबविण्यात येणार आहे. या अंतर्गत राज्यात गावपातळीवर स्पर्धात्मक पध्दतीने या विषयाबाबत जागरुकता व गाव कुपोषण मुक्त करण्यात प्रत्येक गावक-याचा सहभाग घेतला जाणार आहे. यात बालकांचे सर्वांसमोर चावडीवर वजन करुन सगळा गाव कुपोषित मुलांना पोषण आहाराच्या माध्यमातून कुपोषणापासून मुक्त करणे अपेक्षित आहे.
      कमी वयात होणारे मुलींचे विवाह तसेच अल्पवयातील गर्भधारणा आणि अपत्य संख्येवर नियंत्रण नसणे ही देखील काही कारणे कुपोषणास जबाबदार आहे. त्या दृष्टीकोणातून  जनजागरण करुन या काळात प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहचण्याचे आव्हान यंत्रणेसमोर राहणार आहे. मुळात कुपोषण ही एक सामाजिक समस्या असून आरोग्याबाबत जागरुक न राहिल्याने ही समस्या कायम आहे हे समाजाने समजून घेतले पाहिजे याकरिता गावागावात किर्तन तसेच पथनाट्य आदी माध्यमातून संदेश पेाहचविला जाणार आहे.
      आजही वृत्तपत्रात छापून आलेल्या गोष्टी समाजात मानल्या जातात त्यामुळे या मोहिमेच्या यशस्वी होण्याच्या दृष्टीकोणातून वृत्तपत्रे आणि घरोघरी पेाहोचलेल्या वृत्त वाहिन्यांना आपला वाटा उचलावा लागेल.
      हाताला काम आणि कामाला धान्य अशी संकल्पना राबवून गरीबी रेषेखाली जगणा-यांना महिन्याला पुरेल इतकं धान्य तसेच सरकारी दवाखान्यांमधेन मोफत उपचार सुविधा आदी उपलब्ध असूनही कुपोषण कमी होत नाही ही अतिशय गंभीर अशी बाब आहे.
      सा-या गावानं शासकीय यंत्रणेच्या मदतीनं ही कुपोषणाची समस्या संपविण्यासाठी पुढाकार घ्यावा आणि आपली भावी पिढी सक्षम बनवावी इतकच यावेळी सांगता येईल
                                               - प्रशांत दैठणकर

रुपेरी पडद्यावरील संधी …. !


            
  
भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक दादासाहेब फळके यांच्या पहिल्या चित्रपटात स्त्री भूमिका करणारं कुणी मिळालं नाही. समाजाची त्या काळजी रुपेरी पडद्याबाबतची धारणा पूर्णपणे बदलून गेली आहे. आज हाच रुपेरी पडदा करिअरची मोठी संधी बनून स्त्रियांपुढे आलाय. यासंधीबाबत हा खास लेख.
                                                        -प्रशांत दैठणकर  

सौंदर्य ही महिलांची मक्तेदारी आहे असं मानलं जातं आणि याच्याच बळावर महिलांना अनेक क्षेत्रात संधी आहेत. भारतीय चित्रपटसृष्टीचे संस्थापक दादासाहेब फाळके यांनी पहिला चित्रपट काढला त्यावेळी त्यांच्या त्या चित्रपटात राज हरिश्चंद्राची पत्नी तारामतीची भूमिका करण्यास स्त्री पात्र उपलब्ध नव्हते मात्र आज हेच चित्र बदललं असल्याचं आपणास दिसेल.


चित्रपट किंवा नाटकात काम करणं काही काळ आधी कमीपणाचं मानलं जायचं पण आता त्याला प्रतिष्ठा प्राप्त झाली आहे. हिंदी तसेच मराठी चित्रपटसृष्टी आणि नाट्यसृष्टीत स्त्रियांना करिअर करण्याची संधी आता उपलब्ध आहे. नुसत्या सौंदर्याच्या बळावर यात करिअर घडवयाचं असेल तर मॉडेलिंगचं क्षेत्र हा उत्तम पर्याय आहे.


याच व्यवसायातून आता अभिनय शिकविणा-या संस्था समोर आल्या आहेत.विद्यापीठांमधून अभिनयात पदवी घेणं शक्य आहे. पुण्यातील फिल्म अन्ड टेलिव्हीजन इन्स्टीट्यूट दिल्लीची ड्रामा अन्ड थिएटर अकादमी. मराठवाड्यात असलेल्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा नाट्शास्त्र विभाग या काही नामांकित संस्थांची नावे यात घेता येतील.


या संस्थांमध्ये अभिनयाच्या जोडीला प्रकाश योजना नेपथ्य तसेच दिग्दर्शन आदींबाबत पदविका ते पदव्यूत्तर पदवी पर्यंत अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. यातून करिअर घडविण्याची संधी मिळू शकते.


याच्याशी संलग्न अशी न्यूज कास्टर होण्याची संधी देखील याच माध्यमातून आपणास मिळते. डेली सोपच्या जमान्यात दुस-या बाजूला वृत्तवाहिन्यांची संख्या वाढली आहे. यात वृत्तनिवेदिका म्हणून करिअरचा पर्याय आजकाल उपलब्ध आहे. आता छोट्या शहरांमधून एफ.एम.रेडिओचे जाळे विस्तारताना दिसत आहे. या रेडिओ केंद्रांवर रेडिओ जॉकी होणे ही देखील एक करिअरची उत्तम संधी मुलींना उपलब्ध आहे. शब्दफेक आणि आवाज यांच्या बळावर या क्षेत्रात नाव कमावणं शक्य आहे.


पडद्यावर ज्याप्रकारे संधी आहे त्याच प्रकारची संधी पडद्यामागे देखील आहे. हल्ली इंग्रजी चित्रपट हिंदीत डबिंग करुन दाखवले जातात त्याचप्रमाणे डिस्कव्हरी, नॅशनल जिओग्राफिक आदी वाहिन्या देखील भारतीय भाषेत प्रक्षेपण करीत आहेत. आवाजाच्या भांडवलावर या क्षेत्रातही मोठ्या प्रमाणावर संधी उपलब्ध असून त्यात उत्पन्नही चांगले आहे आणि विशेष म्हणजे येणा-या काळात याचा मोठ्या प्रमाणावर संधी उपलब्ध असून त्यात उत्पन्नही चांगले आहे आणि विशेष महणजे येणा-या काळात याचा मोठ्या प्रमाणावर विस्तार होणार आहे.


कधी काळी वर्ज्य असणारं क्षेत्र स्त्रियांसाठी आता मोठ्या संधीचं क्षेत्र बनलय. यात आपणही करिअर म्हणून निश्चित विचार करायला हरकत नाही


- प्रशांत दैठणकर

Thursday 3 November 2011

नगर परिषद क्षेत्रामध्ये आचार संहिता लागू


                  महाराष्ट्र शासन
प्रसिध्दी पत्रक     जिल्हा माहिती कार्यालय,वर्धा   दि.3नोव्हेंबर 2011
--------------------------------------------------------------
वर्धा, दि.3- राज्याच्या राज्य निवडणूक आयोगाने डिसेंबर 2011 ते फेब्रुवारी 2012 या कालावधीमध्ये मुदत संपणा-या नगर परिषदा, नगर पंचायतांच्या सदस्य पदाच्या सार्वत्रिक निवडणूकांचा काय्रक्रम घोषित केला आहे.
 या कार्यक्रमानुसार दिनांक 16 नोव्हेंबर 2011 रोजी जिल्हाधिका-यांनी निवडणूक कार्यक्रम जारी करावयाचा आहे. जिल्ह्यातील वर्धा, देवळी, पुलगाव, आर्वी, सिंदी, हिंगणघाट या नगर पालिकांच्या निवडणूका घेण्यात येणार आहेत. निवडणूक कार्यक्रम घोषित झाल्यामुळे संबंधीत नगर परिषद क्षेत्रामध्ये दि. 1 नोव्हेंबर 2011 पासून आचारसंहिता लागू झाली आहे. या आदर्श आचार संहितेचे सर्वांनी काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी जयश्री भोज यांनी केले आहे.
                      0000

फिरते नांव नोंदणी पथकाचा दौरा


प्रसिध्दी पत्रक     जिल्हा माहिती कार्यालय,वर्धा   दि.3/11/2011
-------------------------------------------------------------------------
          फिरते नांव नोंदणी पथकाचा दौरा
वर्धा,दि.3-जिल्हा रोजगार व स्वयंरोजगार मार्गदर्शन केंद्र, वर्धा या कार्यालयाचे फिरते नांव नोंदणी पथकाचा माहे नोव्हेंबर2011 दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे आहे.
      दि. 6 नोव्हेंबर रोजी पंचायत समिती, आष्टी, दि. 7 नोव्हेंबर रोजी पंचायत समिती कारंजा, दि. 10 नोव्हेंबर रोजी पंचायत समिती, आर्वी, दि. 12 नोव्हेंबर रोजी पंचायत समिती, सेलू, दि. 15 नोव्हेंबर रोजी पंचायत समिती, समुद्रपूर, दि. 16 नोव्हेंबर रोजी पंचायत समिती हिंगणघाट, दि. 18 नोव्हेंबर रोजी नगर परिषद पुलगांव, दि.19 नोव्हेंबर रोजी पंचायत समिती, देवळी येथे नोंदणी करण्यात येणार आहे.
      नोंदणी करणा-या इच्छूक उमेदवारांनी शैक्षणिक पात्रतेच्या मुळ प्रती, जातीचे मुळ प्रमाणपत्र सोबत आणणे आवश्यक आहे. नोंदणी सकाळी 11 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत स्वत: हजर राहून करुन घ्यावी.
                              0000

ई-गव्हर्नन्सचं पाऊल ...!

 शासनाने ई-गव्हर्नन्स धोरण जाहीर केलं आणि त्याची अंमलबजावणी सुरु झाली आहे. नागरिकांना गतिमान आणि पारदर्शी सेवा देणं या उद्देशाने हे पाऊल टाकलय त्याला नागरिकांनी प्रतिसाद देण्याची आता वेळ आली आहे. याबाबत माहिती देणारा लेख.
-प्रशांत दैठणकर


जग झपाट्याने बदलत आहे त्याला कारण अर्थातच झपाट्याने बदलत असलेलं तंत्रज्ञान हेच आहे. तंत्रज्ञान बदलण्याचा झपाटा इतका प्रचंड आहे की आपण त्यांच्या वेगासोबत वेग राखणं अवघड बनलं आहे. मात्र आपण हा वेग राखला नाही तर निश्चितपणाने आपण लगेच आऊटडेटेड ठरण्याची शक्यता देखील वाढली आहे.
दळणवळण क्षेत्रात गेल्या दोन दशकात मोठ्या प्रमाणात क्रांती झाली. यात सुरुवात अर्थात उपग्रहाच्या आधाराने संपर्क साधणं शक्य झाल्यानंतर टेलिफोनचं रुप बदललं. घरात दिवाणखान्यात असणारा हा डबा खिशात मिरवायला लागला त्यात झपाट्याने संशोधन आणि विकास झाल्यामुळे आता हा मोबाईल फोनने थेट इंटरनेट सर्फींगचा पल्ला गाठत आहे.
सध्या भारतात थ्री जी तंत्राची चर्चा सुरु आहे काही कंपन्यांनी ही सेवा उपलब्ध करुन दिली असली तरी व्हिडिओ कॉलिंगला मर्यादीत ठेवण्यात आलं आहे. याच सुमारास विकसित देशांमध्ये त्याच्याही पुढचं पाऊल असलेल्या 4–जी तंत्रज्ञानाचा वापर सुरु झाला आहे हे उल्लेखनीय आहे.
इंटरनेटच्या माध्यमातून जग जवळ आलं आहे या नव्या माध्यमानं प्रत्येक व्यक्तीला अभिव्यक्तीचं नवं दालन खुलं करुन दिलेलं आहे मात्र आजही या तंत्राचा प्रचार-प्रसार मोठ्या प्रमाणात झालेला नाही तीच बाब थ्री – जी तंत्रज्ञानाची आहे. या दोन्ही बाबी अद्याप सामान्यांच्या आर्थिक क्षमतेत बसणा-या नाहीत त्यामुळे याच्या प्रसारावर मर्यादा आहेत.
 हे युग संगणक युग आहे त्यामुळे प्रत्येकाने संगणकाचा वापर आता शिकलाच पाहिजे. येणा-या काळात गतिमानता आणण्यासाठी ई-गव्हर्नन्स ची अंमलबजावणी होणार आहे. शासनाने त्याबाबतचं धोरण देखील नक्की केलेलं आहे आणि त्या दृष्टीकोनातून काम सुरु झालेलं आहे.
नागरिकांना गतिमान आणि पारदर्शी सेवा देण्याचा प्रयत्न सर्वच स्थरात सुरु झालेला आहे. टाळी एका हातानं वाजत नाही या उक्तीप्रमाणे शासनोन एक पाऊल उचललं आहे. आता नागरिकांनाही आपलं कर्तव्य म्हणून पुढचं पाऊल उचलावं लागणार आहे.
शासनाच्या सा-या सेवा येणा-या काळात ऑनलाईन होवू घातल्या आहेत. सध्या नोकरभरती याच पध्दतीने होत आहे. इतकेच नव्हे तर विविध अभ्यासक्रमांचे प्रवेश देखील याच पध्दतीने होताना आपणास दिसतील. त्यामुळे येणा-या काळात होणा-या बदलांची दखल सर्वांनी घेतली तर गतिमान पध्दतीने कामे शक्य होणार आहेत.
- प्रशांत दैठणकर    

.....बचतगटामुळे सक्षमीकरण

      ग्रामीण भारतात महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनविण्याचे काम बचत गटांच्या माध्यमातून होत आहे. त्यामुळेच आता महिला देखील पुरुषांच्या बरोबरीने संसाराचा भार उचलत असल्याचे दिसते. या बचतगटांच्या वाटचाली बाबत हा खास लेख.
                                    -प्रशांत दैठणकर

     देशाच्या लोकसंख्येने नुकताच नवा उच्चांक गाठला त्या पाठोपाठ आता जगाची लोकसंख्या देखील नव्या टप्प्यावर पेाहोचली आहे. 700 कोटींचा आकडा आता ओलांडला गेला आहे. भारताचं मोठ्या प्रमाणावर नागरीकरण सध्या सुरु आहे. असं असलं तरी बहुतांश भारत आज ग्रामीण भागातच आहे. ग्रामीण भागात सध्या आर्थिक स्तर उंचावणे यासाठी मोठ्या प्रमाणात प्रयत्न शासन स्तरावर सुरु आहेत. त्यात महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजना एक महत्वाची योजना आहे. त्याच्याच जोडीला महिला बचतगटांची चळवळ ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात आर्थिक स्तर उंचावण्यात मदत करणारी ठरली आहे.
     लहान प्रमाणात बचत करुन त्या बचतीच्या आधारे गृहउद्योग आणि इतर कुटीरोद्योग सुरु करण्यासाठी शासन बँकांच्या मदतीने 4 टक्के व्याजदराने वित्तसहाय्य उपलब्ध करुन देत असल्याने या बचत गटांना व्यवसाय वाढविण्याची संधी मिळत आहे.
   जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा तसेच महिला आर्थिक विकास महामंडळाने या कामी पुढाकार घेतला असल्याने मोठ्या प्रमाणावर ही बचतगटाची संकल्पना विस्तारली गेली आहे. केवळ उत्पादनासाठी आर्थिक मदत देण्यापर्यंत मर्यादीत न राहता यात सातत्य राखण्यासाठी संघटिका आणि संयोगिनी यांच्या माध्यमातून मार्गदर्शन देणे त्या सोबतच या बचत गटांच्या उत्पादनांना बाजारपेठ मिळावी या उद्देशाने प्रदर्शन व विक्री यासाठी मेळावे आयोजित करणे अशा उपक्रमातून या बचतगटांना मोठ्या प्रमाणावर पाठबळ मिळाले आहे.
     बचत गटाच्या चळवळीतून आपणही आर्थिकदृष्ट्या सक्षम होवू शकतो असा आत्मविश्वास ग्रामीण महिलांमध्ये जागा झाला आहे. शहरात शिकलेल्या स्त्रिया नोकरी करतात त्याप्रमाणे आपणही स्वयंरोजगार निर्माण करुन त्यातून इतरांना रोजगार देवू शकतो असा विश्वास आता या महिलांमध्ये आलेला आपणास दिसतो.
     कायम पुरुषांच्या कमाईवर अवलंबून राहणा-या स्त्री ला आता स्वत:च्या उत्पन्नाचे कौतूक नाही तर मोठा आधार झाला आहे. या बचतगटांमुळे अनेक संसार सुरळीत झाले असून, या महिला शक्तीला जीवनाचा मार्ग सापडला असल्याने त्यांच्या चेह-यावर समाधानाचे हसू उमटल्याचे चित्र आता दिसत आहे.
- प्रशांत दैठणकर                        

Wednesday 2 November 2011

पदवीधर अंशकालीन उमेदवारांना सुचना


                      महाराष्ट्र शासन
प्रसिध्दी पत्रक        जिल्हा माहिती कार्यालय,वर्धा   दि. 2 नोव्हेंबर 2011
-------------------------------------------------------------------- ---------------------
                  
      वर्धा,दि.2- जिल्ह्यातील सर्व पदवीधर अंशकालीन उमेदवारांना सुचीत करण्यात येते की  जिल्हा रोजगार व स्वयंरोजगार मार्गदर्शन कार्यालयात पदवीधर अंशकालीन उमेदवार म्हणून 3 वर्षे काम केल्याबाबत नोंद केलेल्या अनुभव प्रमाणपत्राची मूळ प्रत घेऊन तात्काळ जिल्हा रोजगार व स्वयंरोजगार मार्गदर्शन केंद्र, प्रशासकीय इमारत, तळ मजला, सिवहील लाईन, वर्धा या कार्यालयात तपासणीसाठी सकाळी 11 ते 4 या वेळेत उपस्थित रहावे.
तसेच येतांना सेवायोजन नोंदणी कार्ड व अंशकालीन कर्मचारी म्हणून काम केलेल्या अनुभव प्रमाणपत्राच्या दोन छायांकीत प्रती सोबत आणाव्यात.
      याबाबत सर्व पदवीधर अंशकालीन उमेदवारांना पत्रे पाठविली आहेत. अपु-या पत्यामुळे काही ऊमेदवारांना पत्र मिळाले नसल्यास संबंधित उमेदवारांनी जिल्हा रोजगार व स्वयंरोजगार मार्गदर्शन कार्यालय,वर्धा येथे संपर्क साधावे. असे सहाय्यक संचालक,रोजगार व स्वयंरोजगार, वर्धा यांनी कळविले आहे.
                              00000000

जवाहर नवोदय विद्यालय परीक्षा आवेदनाच्या तारखेत मुदतवाढ


महाराष्ट्र शासन
प्रसिध्दी पत्रक       जिल्हा माहिती कार्यालय,वर्धा   दि. 2 नोव्हेंबर 2011
-------------------------------------------------------------------- --
           
      वर्धा, दि.2- जवाहर नवोदय विद्यालय, सेलू काट, जि. वर्धा येथे वर्ग 6 मध्ये प्रवेश घेण्यास ईच्छुक विद्यार्थ्यांची प्रवेश परीक्षा 12 फेब्रुवारी 2011 रोजी होणार असून त्याकरीता आवेदनपत्र 31 ऑक्टोंबर 2011 ऐवजी 15 नोव्हेंबर 2011 पर्यंत आवेदन पत्र गटशिक्षणाधिकारी कार्यालयात स्विकारण्यात येणार आहेत. असे प्राचार्य यु. राजा रेड्डी यांनी कळविले आहे.
                                00000

Tuesday 1 November 2011

जिल्हास्तर शालेय कॅरम स्पर्धा

                                       महाराष्ट्र शासन
प्रसिध्दी पत्रक जिल्हा माहिती कार्यालय,वर्धा दि.2 नोव्हेंबर 2011
------------------------------------------------------------
             
     वर्धा,दि.2- जिल्हास्तर शालेय कॅरम स्पर्धेचे आयोजन दिनांक    8 ते 9 नोव्हेंबर 2011 या दरम्यान जिल्हा क्रीडा संकुल, वर्धा येथे सकाळी 10 वाजेपासून करण्यात येणार आहे. या स्पर्धा फक्त 19 वर्षे वयोगट शालेय मुला मुलींकरीता आहे.
     ज्या शाळांनी किंवा महाविद्यालयांनी आपला प्रवेश निश्चित केला असेल त्या शाळेतील  किंवा महाविद्यालयातील मुख्याध्यापक व शारीरिक शिक्षक यांनी नोंद घ्यावी व शारीरिक शिक्षकांनी आपल्या संघास दिनांक 8 नोव्हेंबर 2011 रोजी सकाळी 9.30 वाजता जिल्हा क्रीडा संकुल,वर्धा येथे उपस्थित राहावे.
     अधिक माहितीकरीता जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, सेवाग्राम रोड,वर्धा येथे कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा.
                        000000

भेसळयुक्त खाद्यतेलाची विक्री केल्याबद्दल दंड व शिक्षा

                                 महाराष्ट्र शासन
प्रसिध्दी पत्रक जिल्हा माहिती कार्यालय,वर्धा दि. 2 नोव्हेंबर 2011
-----------------------------------------------------------
             
            वर्धा,दि.2- भेसळयुक्त जवस तेल विक्री केल्याप्रकरणी वर्धा येथील किराणा व्यापा-यास नुकतेच मुख्य न्यायदंडाधिकारी,वर्धा यांनी आरोपीस 1 वर्षे सक्त मजुरीची शिक्षा व रु. 5000 दंड व दंड न भरल्यास 1 महिन्याची शिक्षा सुनावली आहे.
     मे.विजय तेल भंडार, कच्छी लाईन, वर्धा येथून अन्न व औषध प्रशासन, वर्धा येथील अन्न निरीक्षक सु.पै.नंदनवार यांनी दि. 26 ऑक्टोंबर 2002 रोजी जवस तेलाचा नमुना अन्न भेसळ प्रतिबंधक कायदा 1954 व त्याअंतर्गत नियम नुसार विश्लेषक,पुणे यांचेकडे पाठविला होता. विश्लेषणाअंती जवस तेल भेसळयुक्त असल्याचे निष्पन्न झाल्यावरुन आरोपीविरुध्द मुख्य न्यायदंडाधिकारी, वर्धा यांच्या न्यायालयात नंदनवार यांनी अन्न भेसळ प्रतिबंधक कायद्या अंतर्गत खटला दाखल केला होता. सदर खटल्याचा निकाल दि. 22 सप्टेंबर 2011 रोजी लागला असुन, आरोपीस दंड व शिक्षा सुनावण्यात आली आहे.
     सदर खटल्याचा पाठपुरावा अन्न निरीक्षक  स्मिता बाभरे यांनी सहाय्यक आयुक्त राजेश शहा व पर्यवेक्षक (अन्न) दिलीप संगत यांचे मार्गदर्शनाखाली यशस्वीरीत्या केला. शासनातर्फे सहायक सरकारी वकील एम.एम.महाजन यांनी विविध न्यायालयाचे न्यायनिवाडे न्यायालयात सादर केले व शासनाची बाजु न्यायालयात योग्यरित्या मांडली. असे सहाय्यक आयुक्त अन्न व औषध प्रशासन, वर्धा कळवितात.
                        000000

महात्मा साखर कारखान्याच्या गळीत हंगाम मोठया थाटात शुभारंभ शेतक-यांना आर्थिक दृष्टया समृध्द करावे - मुख्यमंत्री धुमल


                     महाराष्ट्र शासन
प्रसिध्दी पत्रक जिल्हा माहिती कार्यालय,वर्धा दि.1नोव्हेंबर 2011
-------------------------------------------------------------

वर्धा, दि.1: विदर्भात शेतीला सिंचनाची अपूरी जोड असल्यामुळे येथील शेतकरी आर्थिकदृष्टया डबघाईला आला आहे. या समस्येवर मात करण्यासाठी शेतक-यांच्या शेतीला सिंचनाची पूरेशी व्यवस्था झाल्यास त्यांना शेतीतून भरघोष असे उत्पन्न मिळेल व तो आर्थिक दृष्टया समृध्द होईल असा विश्वास हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री प्रेमकुमार धुमल यांनी व्यक्त केला.
पूर्ती उघोग समुहव्दारा संचालीत महात्मा शुगर अन्ड पॉवर लिमीटेड जामणी ता.सेलू येथे महात्मा साखर कारखान्याचा गळीत हंगामाच्या शुभारंभ मोठया थाटात आज हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री प्रेमकुमार धुमल व राज्यसभा विरोधी पक्ष नेते अरुण जेटली व भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी यांच्या प्रमुख उपस्थित संपन्न झाला त्या प्रसंगी ते बोलत होते.
यावेळी मंचावर राज्यसभेचे खासदार पियुष गोयल, आमदार दादाराव केचे,  सुर्यप्रकाश साही,  डॉ. शिरीष गोडे, माजी खासदार सुरेश वाघमारे, रामदास तडस, जि.प.सदस्य मिलिंद भेंडे, अरुण अडसड आदी मान्यवर उपस्थित होते.
शेतक-यांना मुलभुत सोयी पुरविल्यास भविष्यांत त्यांची प्रगतीकडे वाटचाल होऊ शकते असे सांगून मुख्यमंत्री धुमल म्हणाले की, शेतक-यांच्या हिताचे नवनविन उपक्रम पूर्ती उद्योग समुहाने राबविले असून याचा लाभ शेतक-यांनी घेतल्यास त्यांच्या आर्थिक परिस्थिती मध्ये निश्चितपणे बदल घडून येईल असेही ते म्हणाले.
राज्यसभेचे विरोधी पक्ष नेते अरुण जेटली म्हणाले की, विदर्भाचा शेतकरी हालाखीचे जीवण जगत असून त्यांनी पूर्ती उद्योग समुहाचे नवनविन तंत्रज्ञान आत्म्सात करुन अनूदानांवर साहित्याची खरेदी केल्यास शेतक-यांना आर्थिक प्रगती सोबत उज्वल भविष्याकडे वाटचाल करता येईल असे ते म्हणाले.
यावेळी भाजपा राष्ट्रीय अध्यक्ष नितिन गडकरी यांनी पुर्ती उद्योग समुहाव्दारे  शेतक-यांच्या हिताचे करण्यात आलेल्या निर्णयाची माहिती देवून भविष्यांत शेतक-यांच्या जीवनांत आनंदाची पर्वणी येईल असे निर्णय घेण्यांत येतील असे ते म्हणाले.
यावेळी आमदार दादाराव केचे व इतर मान्यवरांनी मार्गदर्शन केले.
तत्पूर्वी मान्यवरांनी उसाचा गठ्ठा संयत्रात टाकून साखर गळीत हंगामाचे उद्घाटन केले. त्यानंतर त्यांनी कृषी प्रदर्शनीला भेट देवून पाहणी केली.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुधीर दिवे यांनी केले तर संचालन बाळ कुळकर्णी यांनी व आभार प्रदर्शन विजय मुडे यांनी केले या कार्यक्रमाला परिसरांतून मोठया संख्येने ग्रामस्थ पदाधिकारी ग्रा.प.सदस्य उपस्थित होते.

राज्यातील 196 नगरपरिषदा / नगरपंचायतींच्या निवडणुकींसाठी 8 डिसेंबर रोजी मतदान

नागपूर, दि. 01 : राज्यातील 196 नगरपरिषदा आणि नगरपंचायतींची मुदत डिसेंबर 2011 ते फेब्रुवारी 2012 या कालावधीत संपत असल्याने त्यांचा निवडणूक कार्यक्रम राज्य निवडणूक आयुक्त नीला सत्यनारायण यांनी आज येथे जाहीर केला. सर्व ठिकाणी गुरूवार, दि. 8 डिसेंबर 2011 रोजी मतदान घेण्यात येणार असून मतमोजणी त्याच दिवशी सायंकाळी 6.30 वाजता किंवा दुसऱ्या दिवशी होईल. संबंधित नगरपरिषदा आणि नगरपंचायतींच्या क्षेत्रात आजपासून आचार संहिताही लागू झाली आहे, असेही श्रीमती सत्यनारायण यांनी सांगितले.

नागपूर येथील रविभवनमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत श्रीमती सत्यनारायण यांनी ही माहिती दिली. राज्य निवडणूक आयोगाचे अपर मुख्य सचिव चाँद गोयल यावेळी उपस्थित होते. आज जाहीर झालेल्या निवडणूक कार्यक्रमानुसार नामनिर्देशनपत्रे 16 ते 22 नोव्हेंबर 2011 या दरम्यान सकाळी 11 ते दुपारी 3 वाजेच्या कालावधीत दिली व स्वीकारली जातील. 20 नोव्हेंबर रोजी रविवारची सुट्टी असल्याने नामनिर्देशनपत्र देण्यात येणार नाहीत. बुधवार, दि. 23 नोव्हेंबर 2011 रोजी नामनिर्देशनपत्रांची छाननी करून वैध उमेदवारांची यादी प्रसिद्ध केली जाईल. नामनिर्देशनपत्र मागे घेण्याची अंतिम मुदत मंगळवार, दि. 29 नोव्हेंबर 2011 पर्यंत असेल. बुधवार, दि. 30 नोव्हेंबर 2011 रोजी निवडणूक चिन्हाचे वाटप आणि अंतरिमरीत्या निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची यादी प्रसिद्ध केली जाईल. गुरूवार, दि. 1 डिसेंबर 2011 रोजी मतदान केंद्रनिहाय मतदार यादी प्रसिद्ध केली जाईल. गुरुवारी, दि. 8 डिसेंबर 2011 रोजी सकाळी 7.30 वाजेपासून ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत मतदान घेण्यात येईल. संबंधित जिल्हाधिकारी स्थानिक परिस्थिती लक्षात घेऊन मतदानाच्याच दिवशी सायंकाळी 6.30 वाजता किंवा सर्व मतदान केंद्रांवर मतदान समाप्तीनंतर अथवा शुक्रवार, दि. 9 डिसेंबर 2011 रोजी मतमोजणी होईल.

लातूर, चंद्रपूर नगरपरिषदांचे शासनाने महापालिकांमध्ये रुपांतर केल्यामुळे तेथील नगर परिषदांच्या निवडणुका होणार नाहीत. या नव्या महानगरपालिकांच्या निवडणुका यथावकाश घेण्यात येतील. निवडणूक होणाऱ्या 196 पैकी दापोली, शिर्डी, अर्धापूर आणि माहूर या चार नगरपंचायती आहेत. तर उर्वरित 192 नगरपरिषदा आहेत. यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी नगरपरिषद; तर नांदेड जिल्ह्यातील माहूर व अर्धापूर येथे नव्याने नगरपंचायत अस्तित्वात आल्याने त्यांच्या प्रथमच निवडणुका होत आहेत. सर्व ठिकाणी बहुसदस्यीय पद्धतीने निवडणुका होणार असून त्यासाठी इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांचा वापर केला जाणार आहे. एकूण 4,303 जागांसाठी या निवडणुका होणार असून त्यातील 50 टक्के जागा महिलांसाठी राखीव आहेत. उमेदवारांच्या निवडणूक खर्चातही राज्य निवडणूक आयोगाने वाढ केली असून तो पुढील प्रमाणे असेल (कंसात पूर्वीची खर्च मर्यादा): `अ` वर्ग नगरपरिषद- 3,00,000 (45,000), `ब` वर्ग नगरपरिषद- 2,00,000 (45,000), `क` वर्ग नगरपरिषद- 1,50,000 (45,000), नगरपंचायत- 1,50,000 (45,000)

या निवडणुकांच्या आनुषंगाने राज्य निवडणूक आयोगाने मतदान केंद्रांच्या निकषांमध्ये सुधारणा केल्या असून मतदारांच्या सोयीसाठी मतदान केंद्र दोन किलोमीटरच्या आत व मध्यवर्ती ठिकाणी राहील; तसेच मतदान केंद्रे मुख्यत: शासकीय, निमशासकीय किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या इमारतीत असतील. ती बहुतांश तळमजल्यावर असतील. मतदान केंद्रात पिण्याचे पाणी, प्रसाधनगृह; तसेच वृद्ध, गरोदर स्त्रिया व अपंग व्यक्ती यांच्यासाठी रॅम्पची व्यवस्था करण्यात येईल. मतदान केंद्रांवर लांब रांगा लागू नयेत व मतदारांना सुलभरीत्या मतदान करता यावे यासाठी नगरपरिषदा व नगरपंचायतींच्या निवडणुकींच्या मतदान केंद्रांची कमाल मतदार संख्या 600 करण्यात आली आहे.

निवडणूक होणाऱ्या नगरपरिषदा/नगरपंचायतींची जिल्हानिहाय संख्या:

रायगड- 10, रत्नागिरी- 5, सिंधुदुर्ग- 3, नाशिक- 6, धुळे- 2, जळगाव- 12, अहमदनगर- 8, नंदुरबार- 1, पुणे- 10, सोलापूर- 9, सातारा- 8, सांगली- 4, कोल्हापूर- 9, वर्धा- 6, चंद्रपूर- 4, भंडारा- 3, गडचिरोली- 2, अमरावती- 9, अकोला- 5, यवतमाळ- 8, बुलडाणा- 9, वाशीम- 3, औरंगाबाद- 5, बीड- 6, नांदेड- 11, परभणी- 8, उस्मानाबाद- 8, लातूर- 4, जालना- 4, हिंगोली- 3, नागपूर- 9 आणि गोंदिया- 2.

दृष्टिक्षेपात निवडणूक कार्यक्रम :

· नामनिर्देशनपत्रे देणे व स्वीकारणे- 16 ते 22 नोव्हेंबर 2011

· नामनिर्देशनपत्रांची छाननी व वैध उमेदवारींची यादी प्रसिद्ध करणे- 23 नोव्हेंबर 2011

· नामनिर्देशनपत्र मागे घेण्याची अंतिम मुदत- 29 नोव्हेंबर 2011

· चिन्हांचे वाटप व उमेदवारांची अंतिम यादी प्रसिद्ध करणे-30 नोव्हेंबर 2011

· मतदान केंद्रनिहाय मतदार यादी प्रसिद्ध करणे- 1 डिसेंबर 2011

· मतदान- 8 डिसेंबर 2011 मतमोजणी- मतदानाच्या दिवशी सायंकाळी 6.30 वाजता किंवा 9 डिसेंबर 2011

सन 2011-12 मधील उत्कृष्ट सार्वजनिक ग्रंथालयासाठी पुरस्कार योजना


महाराष्ट्र शासन
प्रसिध्दी पत्रक  जिल्हा माहिती कार्यालय,वर्धा   दि.1/11/11
-------------------------------------------------------------
             
     वर्धा,दि.1- महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्रशिक्षण विभागांतर्गत ग्रंथालय संचालनालयाकडून राज्यातील शासनमान्यताप्राप्त सार्वजनिक ग्रंथालयाचा गुणात्मक विकास व्हावा, त्यांना अधिक चांगल्या सेवा देण्यासाठी प्रोत्साहन मिळावे याउद्देशाने दरवर्षी उत्कृष्ट ग्रंथालये व ग्रंथालय चळवळीतील उत्कृष्ट कार्यकर्ते व सार्वजनिक ग्रंथालयामधील कर्मचारी यांना शासनातर्फे पुरस्कार देऊन गौरविण्यात येते.
     या योजनेतून डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार यांचे नावे शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांच्या शहरी व ग्रामीण पातळीवरील अ,ब,क,ड वर्गातील प्रत्येकी एक अशा एकूण 8 पुरस्कारासाठी प्राप्त प्रस्तावांतून निवड समितीकडून निवड करण्यात येते. तसेच डॉ.एस.आर.रंगनाथन ग्रंथमित्र पुरस्कार यांचे नावे ग्रंथालय चळवळीच्या विकासाच्या विकासासाठी योगदान देणा-या कार्यकर्त्यांना व सेवाभावी वृत्तीने काम करणा-या उत्कृष्ट सेवकाना प्रोत्साहन मिळावे या उद्देशाने राज्यस्तरावर प्रत्येकी एकेक व महसूली विभागातून प्रत्येकी एक याप्रमाणे एकूण 14 पुरस्कारासाठी निवड समितीकडून निवड करण्यात येते.
     2011-12 या वर्षासाठी या पुरस्कार योजनेमध्ये सहभागी होऊ इच्छिणा-या शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांनी तसेच ग्रंथालय चळवळीत ज्या कार्यकर्त्यांनी व सेवकांनी किमान 15 वर्ष ग्रंथालयीन सेवेत योगदान दिलेले आहे. अशा पात्र  ठरणा-या इच्छुक ग्रंथालये, कार्यकर्ते, सेवक यांनी आपल्या विभागाच्या सहाय्यक ग्रंथालय संचालक या कार्यालयाकडे अर्जाची मागणी करुन व्दिप्रतीत परिपूर्ण प्रस्ताव सहाय्यक ग्रंथालय संचालक कार्यालयाकडे दिनांक 30 नोव्हेंबर 2011 पूर्वी सादर करावे. असे आवाहन ग्रंथालय संचालनालयाचे संचालक चव्हाण यांनी केले आहे.