Friday 4 November 2011


विशेष लेख         जिल्हा माहिती कार्यालय,वर्धा      दि.4 नोव्हेंबर 2011
                           कुपोषण मुक्त गावांकडे  …. !
     कुपोषण सर्वच स्तरातून संपविण्यासाठी 14 नोव्हेंबर अर्थात बाल दिनापासून राज्यात राजमाता जिजाऊ कुपोषणमुकत ग्राम योजना सुरु होत आहे. प्रत्यक्ष कामात गावक-यांनी सहभाग घेऊन आपला गाव कुपोषणमुक्त करण्याची संकल्पना यात आहे. या मोहिमेची माहिती थोडक्यात.
                            -प्रशांत दैठणकर                                    
      मानवी जीवनक्रमातला महत्वाचा टप्पा असं ज्याला म्हणता येईल तो अर्थातच नवं अपत्य जन्मायला येण्याचा असतो. जन्माला येणारा हा जीव कसा असेल हे त्याच्या मातेच्या आरोग्यावर अवलंबून असतं. स्त्री ला गर्भधारणा झाल्यावर पुरेसं सकस अन्न मिळालं नाही तर त्या बाळाची वाढ व्यवस्थित होत नसते.
      आपल्याकडे अद्यापही घरातील स्त्री ही घरादाराला जेवणं घालून उरलं सुरलं तर कधी शिळं अन्न खाते असं चित्र सर्वच घरातून दिसतं. अशा कमी सकस अन्नामुळे मुळात स्त्री कमजोर होते. आणि कुपोषित मातेच्या त्या स्थितीमुळे मुलही कुपोषित जन्माला येण्याची शक्यता असते.
      या कुपोषणातून होणा-या मृत्यूंना रोखण्यासाठी येत्या बाल दिनापासून राजमाता जिजाऊ यांच्या नावाने कुपोषणमुक्त ग्राम संकल्पना राबविण्यात येणार आहे. या अंतर्गत राज्यात गावपातळीवर स्पर्धात्मक पध्दतीने या विषयाबाबत जागरुकता व गाव कुपोषण मुक्त करण्यात प्रत्येक गावक-याचा सहभाग घेतला जाणार आहे. यात बालकांचे सर्वांसमोर चावडीवर वजन करुन सगळा गाव कुपोषित मुलांना पोषण आहाराच्या माध्यमातून कुपोषणापासून मुक्त करणे अपेक्षित आहे.
      कमी वयात होणारे मुलींचे विवाह तसेच अल्पवयातील गर्भधारणा आणि अपत्य संख्येवर नियंत्रण नसणे ही देखील काही कारणे कुपोषणास जबाबदार आहे. त्या दृष्टीकोणातून  जनजागरण करुन या काळात प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहचण्याचे आव्हान यंत्रणेसमोर राहणार आहे. मुळात कुपोषण ही एक सामाजिक समस्या असून आरोग्याबाबत जागरुक न राहिल्याने ही समस्या कायम आहे हे समाजाने समजून घेतले पाहिजे याकरिता गावागावात किर्तन तसेच पथनाट्य आदी माध्यमातून संदेश पेाहचविला जाणार आहे.
      आजही वृत्तपत्रात छापून आलेल्या गोष्टी समाजात मानल्या जातात त्यामुळे या मोहिमेच्या यशस्वी होण्याच्या दृष्टीकोणातून वृत्तपत्रे आणि घरोघरी पेाहोचलेल्या वृत्त वाहिन्यांना आपला वाटा उचलावा लागेल.
      हाताला काम आणि कामाला धान्य अशी संकल्पना राबवून गरीबी रेषेखाली जगणा-यांना महिन्याला पुरेल इतकं धान्य तसेच सरकारी दवाखान्यांमधेन मोफत उपचार सुविधा आदी उपलब्ध असूनही कुपोषण कमी होत नाही ही अतिशय गंभीर अशी बाब आहे.
      सा-या गावानं शासकीय यंत्रणेच्या मदतीनं ही कुपोषणाची समस्या संपविण्यासाठी पुढाकार घ्यावा आणि आपली भावी पिढी सक्षम बनवावी इतकच यावेळी सांगता येईल
                                               - प्रशांत दैठणकर

No comments:

Post a Comment