Thursday 3 November 2011

.....बचतगटामुळे सक्षमीकरण

      ग्रामीण भारतात महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनविण्याचे काम बचत गटांच्या माध्यमातून होत आहे. त्यामुळेच आता महिला देखील पुरुषांच्या बरोबरीने संसाराचा भार उचलत असल्याचे दिसते. या बचतगटांच्या वाटचाली बाबत हा खास लेख.
                                    -प्रशांत दैठणकर

     देशाच्या लोकसंख्येने नुकताच नवा उच्चांक गाठला त्या पाठोपाठ आता जगाची लोकसंख्या देखील नव्या टप्प्यावर पेाहोचली आहे. 700 कोटींचा आकडा आता ओलांडला गेला आहे. भारताचं मोठ्या प्रमाणावर नागरीकरण सध्या सुरु आहे. असं असलं तरी बहुतांश भारत आज ग्रामीण भागातच आहे. ग्रामीण भागात सध्या आर्थिक स्तर उंचावणे यासाठी मोठ्या प्रमाणात प्रयत्न शासन स्तरावर सुरु आहेत. त्यात महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजना एक महत्वाची योजना आहे. त्याच्याच जोडीला महिला बचतगटांची चळवळ ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात आर्थिक स्तर उंचावण्यात मदत करणारी ठरली आहे.
     लहान प्रमाणात बचत करुन त्या बचतीच्या आधारे गृहउद्योग आणि इतर कुटीरोद्योग सुरु करण्यासाठी शासन बँकांच्या मदतीने 4 टक्के व्याजदराने वित्तसहाय्य उपलब्ध करुन देत असल्याने या बचत गटांना व्यवसाय वाढविण्याची संधी मिळत आहे.
   जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा तसेच महिला आर्थिक विकास महामंडळाने या कामी पुढाकार घेतला असल्याने मोठ्या प्रमाणावर ही बचतगटाची संकल्पना विस्तारली गेली आहे. केवळ उत्पादनासाठी आर्थिक मदत देण्यापर्यंत मर्यादीत न राहता यात सातत्य राखण्यासाठी संघटिका आणि संयोगिनी यांच्या माध्यमातून मार्गदर्शन देणे त्या सोबतच या बचत गटांच्या उत्पादनांना बाजारपेठ मिळावी या उद्देशाने प्रदर्शन व विक्री यासाठी मेळावे आयोजित करणे अशा उपक्रमातून या बचतगटांना मोठ्या प्रमाणावर पाठबळ मिळाले आहे.
     बचत गटाच्या चळवळीतून आपणही आर्थिकदृष्ट्या सक्षम होवू शकतो असा आत्मविश्वास ग्रामीण महिलांमध्ये जागा झाला आहे. शहरात शिकलेल्या स्त्रिया नोकरी करतात त्याप्रमाणे आपणही स्वयंरोजगार निर्माण करुन त्यातून इतरांना रोजगार देवू शकतो असा विश्वास आता या महिलांमध्ये आलेला आपणास दिसतो.
     कायम पुरुषांच्या कमाईवर अवलंबून राहणा-या स्त्री ला आता स्वत:च्या उत्पन्नाचे कौतूक नाही तर मोठा आधार झाला आहे. या बचतगटांमुळे अनेक संसार सुरळीत झाले असून, या महिला शक्तीला जीवनाचा मार्ग सापडला असल्याने त्यांच्या चेह-यावर समाधानाचे हसू उमटल्याचे चित्र आता दिसत आहे.
- प्रशांत दैठणकर                        

No comments:

Post a Comment