Saturday 16 June 2012

7 लाख 44 हजार लिटर केरोसिन मंजूर - श्रीमती जयश्री भोज


              ·         जीपीआरएस प्रणालीच्‍या टँकरव्‍दारा पुरवठा
                   ·         जून महिन्‍यासाठी शंभर टक्‍के केरोसिन पुरवठा
वर्धा, दि. 16- केरोसिनचा (रॉकेल)  7 लाख 44 हजार लिटर पुरवठा जून महिन्‍यात उपलब्‍ध होणार असून,ऑईल कंपन्‍यांना जिल्‍हयातील केरोसिन वितरकांपर्यंत जीपीएस प्रणाली असलेल्‍या टँकरव्‍दारे पुरवठा करण्‍याच्‍या सूचना देण्‍यात आल्‍या असल्‍याची माहिती  जिल्‍हाधिकारी  श्रीमती जयश्री भोज यांनी दिली.
      वर्धा शहर तसेच  तालुका स्‍तरावर जून महिन्‍यात वितरणासाठी केरोसिन वितरकांना निश्चित केल्‍या प्रमाणे आवंटन देण्‍यात आले आहे. केरोसिनचा पुरवठा करतांना 10 तारखेपर्यंत     60 टक्‍के , 17 तारखेपर्यंत 85 टक्‍के व 25 तारखेपर्यंत शंभर टक्‍के नियतनानुसार कोटा देण्‍याच्‍या सूचना आज जिल्‍हाधिकारी श्रीमती भोज यांनी संबंधित कंपण्‍यांना दिल्‍यात.
जून महिन्‍याकरीता जिल्‍ह्यातील केरोसिन वितरकांना मंजूर केलेल्‍या आवंटनानुसार  जी.एम.राठी (वर्धा) यांना 96 हजार लिटर, ईब्राहीमखान मनवरखान (आर्वी) 84 हजार लिटर, मे. प्रद्युम्‍नकुमार अँड ब्रदर्स (पुलगाव) 24 हजार लिटर, रतनलाल केला (वर्धा) 721 हजार लिटर, सौ. वंदाना सुनिल गावंडे (देवही) 36 हजार लिअर, एस.आर.शेंडे (समुद्रपूर) 60 हजार लिटर, ईब्राहीमजी आदमजी (वर्धा) 1 लाख 68 हजार लिटर, एी.ण्‍न.लाठीवाला (आर्वी) 72 हजार लिटर, एफ.ए.रहेमतुल्‍ला (हिंगणघाट)72 हजार लिटर, टी.के.अँड सन्‍स (पुलगाव) यांना 60 हजार लिटर केरोसिनचे आवंटन मंजूर करण्‍यात आले आहे.
जिल्‍ह्यातील सर्व केरोसीन टँकरवर जीपीएस प्रणाली लावण्‍यात आली असून, तहसिलदारांनी या प्रणालीव्‍दारेच टँकरची वाहतूक होईल यादृष्‍टीने खबरदारी घ्‍यावी.
                                                                        00000

सैन्‍यदलात अधिकारी व्‍हा..परिक्षेच्‍या पूर्व तयारीसाठी नाशिक येथे प्रशिक्षण

        वर्धा दि.16- सैन्‍यदलामध्‍ये अधिकारी पदासाठी संघ लोकसेवा आयोगामार्फत दिनांक 16 सप्‍टेंबर रोजी परिक्षा घेण्‍यात येणार असून राज्‍यातील युवकांसाठी परिक्षेची पूर्व तयारी करुन घेण्‍यासाठी नाशिक येथे राज्‍य शासनातर्फे प्रशिक्षणाची सुविधा उपलब्‍ध करुन देण्‍यात आली आहे.  
             कम्‍बाईन डिफेन्‍स सर्विसेस (सीडीएस) परिक्षेची पूर्व तयारी  छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र,नाशिकरोड, नाशिक येथे दिनांक 26 जून  ते 8 सप्‍टेंबर पर्यन्‍त राहणार आहे.निवास व प्रशिक्षणाची सुविधा राज्‍य शासनातर्फे मोफत करण्‍यात आली आहे.
                                               
संघ लोकसेवा आयोग (युपीएससी), नवी दिल्‍ली यांचे मार्फत दिनांक 16 सप्‍टेंबर,2012 रोजी घेण्‍यात येणा-या कंम्‍बाईन डिफेन्‍स सर्विसेस (सीडीएस) या संरक्षण दलातील अधिकारी पदाच्‍या परिक्षेकरीता दिनांक 2 जून,2012 च्‍या रोजगार समाचार पत्रामध्‍ये जाहिरात प्रसिध्‍द झालेली आहे.केंद्रीय लोकसेवा आयोगाकडे ऑनलाईन अर्ज पोहचविण्‍याची अंतिम मुदत दिनांक 2 जूलै,2012 आहे.या परिक्षेव्‍दारा कायमस्‍वरुपी व अल्‍पमुदतीचे कमीशनसाठी निवड करण्‍यात येत असते.जे उमेदवार पदवीधर असून कंम्‍बाईन डिफेन्‍स सर्विसेस (सीडीएस) परिक्षेचा फॉर्म भरुन पाठवतील आणि रोजगार समाचार पत्रामध्‍ये दिलेल्‍या शैक्षणिक,शारिरीक, वयोगट पात्रतेनुसार पात्र आहेत. अशाच उमेदवारांची निवड परिक्षापूर्व तयारीसाठी छात्रपूर्व पक्षिण केद्र , नाशिकरोड, नाशिक येथे करण्‍यात येणार आहे. परिक्षेचा ऑनलाईन फॉर्म भरण्‍यासाठी http://www.upsconline.nic.in  या वेबसाईट चा वापर करण्‍यात यावा असे जिल्‍हा  सैनिक कल्‍याण अधिकारी यांनी कळविले आहे.

            परिक्षेसाठी वर्धा जिल्‍हयातील तरुणांना संधी उपलब्‍ध व्‍हावी यासाठी  जिल्‍हा सैनिक कल्‍याण कार्यालय,वर्धा येथे दिनांक 19 जून,2012 रोजी इयत्‍ता दहावी ते पदवीधर पर्यन्‍तच्‍या सर्व मूळ प्रमाणपत्रासह व गुणपत्रिकेसह व ऑनलाईन फॉर्म भरल्‍यानंतर  त्‍याची प्रिंट घेवून मुलाखतीच्‍या वेळेस दाखविल्‍याशिवाय उमेदवारांची निवड करण्‍यात येणार नाही.
            मुलाखतीचेवेळी वस्‍तुनिष्‍ठ पध्‍दतीची लेखी परिक्षा व तोंडी मुलाखत जिल्‍हा सैनिक कल्‍याण अधिकारी यांचेकडून घेण्‍यात येईल. अधिक माहितीसाठी छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र, नाशिकरोड, नाशिक दूरध्‍वनी – 0253-2451032 येथे प्रत्‍यक्ष अथवा दूरध्‍वनी क्रमांकावर संपर्क साधता येईल.
00000

पुलगाव येथे मुलींच्‍या वसतीगृहात प्रवेश 25 जून पर्यन्‍त अर्ज स्विकारणार



वर्धा दि.16- सामाजीक न्‍याय विभागातर्फे पुलगांव येथील शासकीय मुलींचे वसतीगृहात 75 मुलींच्‍या निवासाची सुविधा उपलब्‍ध असून प्रवेशासाठी 25 जून पर्यन्‍त अर्ज स्किारण्‍यात येणार आहे.
            वसतीगृहात ग्रामीण विद्यार्थीनींना वर्ग 8 वी ते पुढील अभ्‍यासक्रमातील 75 विद्यार्थीनींना प्रवेश देण्‍यात येईल. वसतीगृहात वर्गवारीनुसार, गुणानुक्रमे, तसेच आर्थीक मागासवर्गीय विद्यार्थीनींना दरवर्षी रिक्‍त जागेवर प्रवेश देण्‍यात येतो. तसेच प्रवेशित विद्यार्थीनींना भोजन, शैक्षणिक साहित्‍य विनामुल्‍य पुरविण्‍यात येईल.
            सन 2012-13 करीता प्रवेश प्रक्रीया सुरु असून प्रवेश अर्ज कार्यालयीन वेळात दिनांक 24 जून,पर्यन्‍त विनामुल्‍य वितरीत करण्‍यात येत आहे. अधिक माहितीसाठी कार्यालयीन वेळेत गृहपाल, शासकीय मुलींचे वसतीगृह,पुलगांव जिल्‍हा वर्धा येथे संपर्क साधावा असे मागासवर्गीय मुलींचे वस्‍तीगृहाच्‍या गृहपाल यांनी कळविले आहे.
00000

बालकामगार प्रथा मुक्‍तीकरिता लोकसहभाग हवा

             वर्धा दि.16- बालके ही राष्‍ट्राची संपत्‍ती आहे, देशाचा भावी आधारस्‍तंभ आहे. त्‍यांच्‍यावर देशाचे भवितव्‍य अवलंबून आहे. बालकांना सुदृढ बनविणे ही समाजातील प्रत्‍येक घटकांची जबाबदारी नव्‍हे तर आद्यकर्तव्‍य आहे. आज आपण पाहतो की अल्‍प वयात मुले प्रौढासारखी किंबहुना त्‍याहून अधिक काम करतांना आढळतात. बालकामगार ही समाजातील अत्‍यंत क्रूर व अनिष्‍ट प्रथा आहे.बालकामगारांना शिक्षणाच्‍या माध्‍यमातून मुक्‍त प्रवाहात आणून वर्धा जिल्‍हा बालकामगार मुक्‍त करण्‍यासाठी विविध उपक्रम सुरु आहेत.
   जागतिक बालकामगार विरोधी दिन सर्वत्र साजरा करण्‍यात येतो त्‍यानिमित्‍य कामगार अधिकारी कार्यालय, वर्धा जिल्‍हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय, जिल्‍हा सामाजिक न्‍याय प्राधिकरण यांच्‍या विद्यमाने शासकीय मुलांचे निरिक्षण गृह केळकर वाडी येथे विशेष कार्यशाळा आयोजित करण्‍यात आली होती. यावेळी प्रमुख पाहुने म्‍हणून न्‍यायमूर्ती  स.मा. येलट्टी ,जिल्‍हा महिला व बालविकास अधिकारी मनीश कुरसंगे, अॅड. वंदना काकडे यांची यावेळी उपस्थित होते.
समाजात बालमजुरी निर्मुलनाचे वातावरण निर्माण करण्‍याचे काम शासन करीत असून यासाठी समाजाची माणसीकता व सर्व सामान्‍याचे लक्ष या समस्‍येकडे केंद्रीत केले गेले तर समस्‍येचे निर्मुलन करण्‍यात निश्चितपणे यश मिळेल असा विश्‍वास कामगार अधिकारी स.मा.धुर्वे यांनी व्‍यक्‍त केला.
          समाजातील सर्व स्‍तरातील नागरीक, सामाजिक संस्‍था,प्रसारमाध्‍यम यांनी या कार्यास सहकार्य करावे असे आवाहन न्‍यायमूर्ती.येलट्टी यांनी केले.
          जागतिक कामगार विरोधी दिनाचे औचित्‍य साधून सरकारी कामगार अधिकारी कार्यालयामार्फत शहरातील विविध उपहारगृह, रेस्‍टारेंट व इतर काही ठिकाणी मालकांनकडून आमच्‍याकडे बालकामगार काम करीत नाही आणि यापुढे ठेवणार नाही असे हमीपत्र लिहून घेण्‍यात आले.
         विविध ठिकाणी भित्‍तीपत्रके वितरीत करण्‍यात आली. फक्‍त एक तास बाल‍मजुरी विरुध्‍द अभियान राबविण्‍यात आले. जिल्‍हा कृती दलामार्फत विविध धोकादायक उद्योगावर छापे घालण्‍यात आले.
00000

Friday 15 June 2012

जिल्‍हा वार्षिक योजनेतील विकास कामांचे प्रस्‍ताव सादर करा - श्रीमती जयश्री भोज



·         80 कोटी रुपये खर्चाच्‍या जिल्‍हा योजनेचा आढावा
·         कामधेनू दत्‍तक योजनेसाठी 2 कोटी रुपये
·         कौशल्‍य वृध्‍दी विकास उपक्रमासाठी 3 कोटीची तरतूद
·         जिल्‍हयातील पर्यटन व तीर्थक्षेत्र विकासाला प्राधान्‍य

वर्धा दि.15- जिल्‍हा वार्षिक योजनेमध्‍ये विविध विभाग प्रमुखांनी सादर केलेल्‍या योजने संदर्भातील प्रत्‍यक्ष अंमलबजावणी व यासाठी आवश्‍यक मंजुरीसाठीचे प्रस्‍ताव तात्‍काळ सादर करण्‍याच्‍या सूचना जिल्‍हाधिकारी श्रीमती जयश्री भोज यांनी आज दिल्‍या.
         जिल्‍हा वार्षिक योजनेचा आढावा जिल्‍हाधिकारी श्रीमती जयश्री  भोज यांनी आज घेतला त्‍याप्रसंगी त्‍या बोलत होत्‍या. जिल्‍हाधिकारी कार्यालयाच्‍या सभागृहात झालेल्‍या बैठकीत जिल्‍हयातील सर्व विभाग प्रमुख उपस्थित होते.
         जिल्‍हा वार्षिक योजनेमध्‍ये यावर्षी सर्व साधारण योजना 80 कोटी रुपयाची मंजुर झाली असून शासनाकडून निधी उपलब्‍ध होणार असल्‍याचे सांगतांना श्रीमती भोज म्‍हणाल्‍या की, प्रत्‍येक योजनेत प्रशासकीय मान्‍यता घेण्‍यासाठी विभाग प्रमुखांनी कामाचे तसेच खर्चाचे नियोजन करुन सविस्‍तर प्रस्‍ताव सादर केल्‍यास विकास कामे त्‍वरीत सुरु करणे सुलभ होईल.
        कृषी विकासासाठी 10 योजना राबविण्‍यात येणार असून पशुसंवर्धन विभागातर्फे दुध उत्‍पादन वाढीसाठी कामधेनु दत्‍तक योजना जिल्‍हयात राबविण्‍यात येणार आहे या योजनेमध्‍ये 95 गावाची निवड करण्‍यात आली असून या गावातील जनावरांची संपूर्ण माहिती संकलीत करुन दुधाचे उत्‍पादन वाढविण्‍यासाठी  पशुसंवर्धन विभागाच्‍या संपूर्ण योजना एकत्रितपणे राबविण्‍याची संकल्‍पना आहे.या उपक्रमासाठी जिल्‍हा योजनेत 2 कोटी रुपयाचा निधी उपलब्‍ध करुन देण्‍यात आला असल्‍याची माहिती जिल्‍हाधिकारी श्रीमती जयश्री भोज यांनी दिली.
         कौशल्‍य विकास हा अभिनव उपक्रम जिहयात राबविण्‍यात येत असून सुशिक्षित बेरोजगारांमध्‍ये कौशल्‍य निर्माण करण्‍यासाठी औद्योगिक प्रशिक्षण संस्‍थेसह विविध संस्‍थांच्‍या माध्‍यमातून प्रशिक्षण आयोजित करण्‍यात येणार आहे.रोजगारांच्‍या संधी व जिल्‍हयात प्रशिक्षित मनुष्‍यबळ निर्माण व्‍हावे यासाठी हा उपक्रम राबविण्‍यात येणार असून यासाठी जिल्‍हा वार्षिक योजनेत 3 कोटी रुपयाच्‍या निधीची तरतूद करण्‍यात आली  असल्‍याची माहितीही जिल्‍हाधिकारी श्रीमती जयश्री भोज यांनी दिली.
                                            
          जिल्‍हयातील पर्यटन स्‍थळ व तिर्थ क्षेत्र विकासा सोबत पायाभूत सुविधा निर्माण करण्‍यासाठी प्रस्‍ताव तयार करण्‍यात येत असल्‍याचेही जिल्‍हाधिका-यांनी यावेळी सांगितले. जिल्‍हा उद्योग केंद्र, रेशिम उद्योग,रुग्‍णालय व वैद्यकीय सुविधामध्‍ये वाढ करणे व सामाजिक वणीकरण, महिला व बालकल्‍याण, रस्‍ते विकास,पूर नियंत्रण आदि विविध उपक्रमासाठी जिल्‍हा वार्षिक योजनेत तरतूद करण्‍यात आली आहे.
          अनुसूचित जाती उपयोजने अंतर्गत 28 कोटी 71 लाख तर आदिवासी उपयोजनेमध्‍ये 10 कोटी 50 लाख रुपयाचा निधी मंजुर झाला असून या योजनेमधून सामुहिक विकासाच्‍या तसेच वैयक्तिक लाभाच्‍या योजना जिल्‍हयात राबविण्‍यात येणार आहेत.
          प्रारंभी जिल्‍हा नियोजन अधिकारी प्रकाश डायरे यांनी स्‍वागत करुन जिल्‍हा वार्षिक योजनेची माहिती दिली. विकास यंत्रणांनी चालू वर्षासाठी ज्‍या योजना सादर केल्‍या आहे त्‍यांना प्रशासकीय मान्‍यता घेतांना वर्षभरात योजना राबवितांना कामांचा प्राधान्‍यकृत ठरवून त्‍यानुसार अहवाल सादर करावेत अशी सूचना केली.
00000

Thursday 14 June 2012

प्रवेशाबाबत बैठक



            वर्धा दि.14- वर्धा जिल्‍हयातील शाळे नजिकच्‍या दुर्बल घटकातील आणि वंचित गटातील बालकांना  पहिल्‍या इयत्‍तेत  त्‍या इयत्‍तेतील विद्यार्थ्‍यी संखेच्‍या किमान 25 टक्‍के मर्यादेपर्यन्‍त प्रवेश देणे मान्‍यताप्राप्‍त शाळांना अनिवार्य केलेले आहे.
          याबाबत दिनांक 18 जून,2012 ला दुपारी 4.00 वाजता शिक्षणाधिकारी (प्राथमिक) यांचे दालणात सभा आयोजित करण्‍यात आलेली आहे. सर्व खाजगी प्राथमिक शाळेचे मुख्‍याध्‍यापक यांनी सदर बैठकीस उपस्थित राहावे असे आवाहन शिक्षणाधिकारी (प्राथमिक) यांनी केले आहे. 

पात्र उमेदवारांची यादी जिल्‍हयाच्‍या संकेत स्‍थळावर



            वर्धा दि.14- जिल्‍हयातील महसूल विभाग, वन विभाग व सह जिल्‍हा  निबंधक (मुद्रांक) या विभागातील शिपाई संवर्गाची रिक्‍त पदे भरणेसंदर्भात दिनांक 8 एप्रिल,2012 रोजी लेखी परिक्षा घेण्‍यात आलेली होती. त्‍यानंतर दिनांक 19,20 व 30 एप्रिल,2012  रोजी मौखिक परिक्षा घेण्‍यात आलेली होती.सदर परिक्षेत पात्र ठरलेल्‍या व निवड झालेल्‍या उमेदवारांची यादी जिल्‍हयातील संकेतस्‍थळी www.wardha.nic.in  प्रसिध्‍द करण्‍यात आलेली आहे याची संबंधीतांनी नोंद घ्‍यावी.
0000

डॉ.मिलींद सोनोवने जिल्‍हा शल्‍य चिकित्‍सकपदी रुजू



           वर्धा दि.14- जिल्‍हा शल्‍य चिकित्‍सक पदावर डॉ. मिलींद लक्ष्‍मण सोनोवने यांची नियुक्‍ती झाली असून त्‍यांनी नव्‍या पदाची सुत्रे स्विकारली.
          जिल्‍हा सामान्‍य रुग्‍णालयात औषोधोपचारासाठी येणा-या रुग्‍णांना अद्यावत आरोग्‍य सुविधा पुरविण्‍या सोबतच बाहेरुन औषधी खरेदी करावी लागणार नाही यासाठी  झिरो प्रिस्क्रिप्‍शन, हा उपक्रम राबविण्‍याचा मनोदय जिल्‍हा शल्‍य चिकित्‍सक पदाची सुत्रे स्विकारल्‍यानंतर डॉ. मिलींद सोनोवने यांनी व्‍यक्‍त केला.
        जिल्‍हा सामान्‍य रुग्‍णालयात दररोज सरासरी आठशे रुग्‍ण उपचारासाठी येतात त्‍यांना दर्जेदार वैद्यकीय सुविधा तसेच आवश्‍यकतेनुसार शस्‍त्रक्रिया आदी उपचार वेळेवर मिळण्‍यासाठी रुग्‍णालयाच्‍या सुविधेमध्‍ये वाढ करण्‍यासाठी प्राधान्‍य असल्‍याचे त्‍यांनी सांगीतले.
        डॉ.मिलींद लक्ष्‍मण सोनोवने हे अकोला जिल्‍हयातील असून शासकीय वैद्यकीय महाविद्यालय,नागपूर येथून पदवी संपादन केल्‍यानंतर एप्रिल, 1981 मध्‍ये वैद्यकीय अधिकारी या पदावर शासकीय सेवेत दाखल झाले.चिपळून, रत्‍नागिरी, यवतमाळ, तळेगांव, बाळापूर,जामठी व अकोला येथील  सामान्‍य रुग्‍णालयात काम केले. त्‍यानंतर नागपूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात नेत्र शल्‍य चिकित्‍सक या विषयात एम.एस. केल्‍यानंतर त्‍यांची लोकसेवा आयोगामार्फत 1996 मध्‍ये जिल्‍हा शल्‍य चिकित्‍सक या पदावर नियुक्‍ती झाली. काटोल, कळमेश्‍वर, कामठी, भंडारा त्‍यानंतर गोदिया येथे जिल्‍हा शल्‍य चिकित्‍सक म्‍हणून यशस्‍वीपणे काम केले.
         वैद्यकीय सेवेत राष्‍ट्रीय कुटूंब कल्‍याण कार्यक्रमात उल्‍लेखनिय कार्याबद्दल अकोला येथे विशेष पुरस्‍कार, कामठी येथे  डॉ. आनंदीबाई जोशी उत्‍कृष्‍ट रुग्‍णालयाचा सतत दोन वेळा पुरस्‍कारही त्‍यांना मिळाला आहे. जिल्‍हयात दोन उप रुग्‍णालय व 6 ग्रामिण रुग्‍णालयातील वैद्यकीय सेवा अधिक प्रभावीपणे जनतेपर्यन्‍त पोहचविण्‍याचा मानसही यावेळी डॉ. मिलींद सोनोवने यांनी व्‍यक्‍त केला.
00000

अनधिकृत शाळेत विद्यार्थ्‍यांनी प्रवेश घेवू नये


            वर्धा दि.14- कारंजा तालुक्‍यातील सर्व मान्‍यताप्राप्‍त खाजगी प्राथमिक शाळांची यादी शिक्षण विभाग( प्राथमिक), जिल्‍हा  परिषद,वर्धा तसेच गट शिक्षणाधिकारी, पंचायत समिती कारंजा या कार्यालयात प्रसिध्‍द करण्‍यात आली असून त्‍यात ग्रामीण विकास प्राथमिक शाळा, कन्‍नमवार ग्राम स्‍व.राजीव गांधी प्राथमीक शाळा, गुरुकुंज कॉन्‍हवेंट, व मातोश्री कॉन्‍हवेंट, कारंजा हया चारच शाळा मान्‍यताप्राप्‍त आहेत.
         विद्यार्थ्‍यांनी मान्‍यताप्राप्‍त शाळाव्‍यतिरिक्‍त दुस-या शाळेत प्रवेश घेवू नये. प्रवेश घेतल्‍यास त्‍याची सर्वस्‍वी जबाबदारी पालकांची राहील. असे गट शिक्षणाधिकारी पंचायत समिती, कारंजा यांनी कळविले आहे.                                         

राष्‍ट्रीय अन्‍न सुरक्षा अभियानाअंतर्गत शेतक-यासाठी विशेष उपक्रम -- संजय भागवत




         वर्धा दि. 13-  राष्‍ट्रीय अन्‍न सुरक्षा अभियाना अंतर्गत जिल्‍हयात कृषी उत्‍पादन वाढीसाठी 18 लाख 446 हजार रुपये खर्चाचा शेतक-यासाठी विशेष उपक्रम राबविण्‍यात येत असल्‍याची माहिती अपर जिल्‍हाधिकारी संजय भागवत यांनी आज दिली.
         जिल्‍हाधिकारी कार्यालयाच्‍या सभागृहात राष्‍ट्रीय अन्‍न सुरक्षा अभियान कार्यक्रमाचा आढावा अपर जिल्‍हाधिकारी  श्री.भागवत यांनी घेतला त्‍यावेळी मार्गदर्शन करतांना ते बोलत होते.
        यावेळी अधिक्षक कृषी अधिकारी बी.एस.ब-हाटे, जिल्‍हा कृषी अधिकारी आर.व्‍ही.गायकवाड नाबार्डच्‍या महाव्‍यवस्‍थापक  श्रीमती  स्‍नेहल बन्‍सोड, कृषी विकास अधिकारी बी.के. जेरापूरकर कार्यक्रम समन्‍वयक डॉ.सुरेश नेमाडे,सदस्‍य वसंत पाटील, मनिश देवळे, पी.आर.भारती आदि उपस्थित होते.
        राष्‍ट्रीय अन्‍न सुरक्षा अभियाना अंतर्गत कृषी विकासासोबत उत्‍पादन वाढविण्‍यासाठी जिल्‍हयात 22 उपक्रम राबविण्‍यात येणार आहे. यामध्‍ये 17 प्रकल्‍पामध्‍ये 1 हजार 100 शेतक-यासाठी गट प्रात्‍यक्षिकाचा समावेश आहे.शेतक-यांना तूर व हरभरा पीकाच्‍या अनुदानाचाही यामध्‍ये समावेश आहे.
         शेतक-यांना प्रमाणित बीयान्‍याचे वाटप सुक्ष्‍म मुलद्रव्‍य वाटप जिप्‍सम पुरवठा, एकात्मिक कीड व्‍यवस्‍थापन, पीक संरक्षण औषधी नॅपसॅक स्‍प्रेपंप,पंपसंच, तननाशक,अत्‍याधुनिक शेती औजारे ,तसेच शेतक-यासाठी प्रशिक्षण आदी राष्‍ट्रीय अन्‍न सुरक्षा अभियान कार्यक्रमा अंतर्गत या उपक्रमामध्‍ये समावेश असल्‍याचेही अपर जिल्‍हाधिकारी संजय भागवत यांनी सांगीतले.
          राष्‍ट्रीय अन्‍न सुरक्षा अभियान कार्यक्रम जिल्‍हयात प्रभावीपणे राबवून शेतक-यांच्‍या शेतापर्यन्‍त तांत्रिक माहिती व उत्‍पादन वाढविण्‍यासाठी उपक्रम पोहचवा असे आवाहनही यावेळी श्री. भागवत यांनी केले.
          जिल्‍हा अधिक्षक कृषी अधिकारी बी.एस.ब-हाटे यांनी प्रास्‍ताविकात राष्‍ट्री अन्‍न सुरक्षा अभियाना अंतर्गत यावर्षी राबविण्‍यात येणा-या उपक्रमांची माहिती दिली.
                                             0000

शतकोटी वृक्ष लागवड कार्यक्रम जिल्‍हयात 17 लाख 80 हजार वृक्ष लावणार श्रीमती जयश्री भोज


                                        

            वर्धा दि. 13- शतकोटी वृक्ष लागवड कार्यक्रमा अंतर्गत जिल्‍हयात 17 लाख 80 हजार वृक्ष लावण्‍यात येणार असून वृक्ष लागवड कार्यक्रमास सामाजीक व शैक्षणिक संस्‍थांनी सहकार्य करावे असे आवाहन जिल्‍हाधिकारी श्रीमती जयश्री भोज यांनी केले आहे.
          जिल्‍हाधिकारी कार्यालयाच्‍या सभागृहात आत्‍मा जिल्‍हा नियामक मंडळाची बैठक जिल्‍हाधिकारी श्रीमती जयश्री भोज यांच्‍या अध्‍यक्षतेखाली झाली. त्‍याप्रसंगी मार्गदर्शन करतांना त्‍या बोलत होत्‍या.
         शतकोटी वृक्ष लागवडीचा कार्यक्रम जिल्‍हयात प्रभाविपणे राबविण्‍यात येणार असून वृक्ष लागवड अभियान ही लोक चळवळ व्‍हावी यासाठी मोठया प्रमाणात जागृती मोहीम राबविण्‍यात येणार असल्‍याची माहितीही श्रीमती जयश्री भोज यांनी दिली.
          शतकोटी वृक्ष लागवड कार्यक्रमा अंतर्गत जिल्‍हयाला 17 लाख 80 हजार वृक्ष लागवडीचे उदिष्‍ट देण्‍यात आले असून वर्धा तालुका पातळीवर या मोहिमे अंतर्गत वृक्ष लागवड करण्‍यात येणार आहे. वर्धा तालुक्‍यासाठी 1 लाख 9 हजार 412  वृक्ष लागवड करण्‍यात येणार असून सेलू, देवळी व आर्वी तालुक्‍यात प्रत्‍येकी 2 लाख 8 हजार, आष्‍टी तालुक्‍यासाठी 1 लाख 4 हजार 706, कारंजा 2 लाख 9 हजार 412, हिंगणघाट व समुद्रपूर तालुक्‍यासाठी प्रत्‍येकी 3 लाख 14 हजार 117 वृक्ष लागवडीचे उदिष्‍ट देण्‍यात आले आहे.
          कृषी विभाग, सामाजीक वणीकरण,वन तसेच विविध विभगाच्‍या समन्‍वयाने वृक्ष लागवड मोहीम यशस्‍वी करण्‍यात येणार आहे. वृक्ष लागवडीसाठी कृषी विभागाच्‍या 7 रोप वाटिकेत 7 लाख 50 हजार रोपे तयार आहेत.तसेच किसान नर्सरी, सामाजीक वनीकरण व वन विभागाच्‍या रोप वाटीकेमधून उपलब्‍ध होणारे सर्व रोपे वृक्ष लागवड अभियाना अंतर्गत जिल्‍हयात लावण्‍यात येणार असल्‍याची माहितीही जिल्‍हाधिकारी श्रीमती जयश्री भोज यांनी दिली.
        यावेळी अपर जिल्‍हाधिकारी संजय भागवत, जिल्‍हा अधिक्षक कृषी अधिकारी बी.एस.ब-हाटे, जिल्‍हा कृषी अधिकारी आर.व्‍ही. बायकवाड, डी.के. जेरापूरकर, आदी अधिकारी व पदाधिकारी उपस्थित होते.
00000

Tuesday 12 June 2012

वर्धा जिल्‍ह्यात 37 (1) व 3 कलम लागू


वर्धा, दि. 12 – जिल्‍ह्यात शांतता व सुव्‍यवस्‍था  अबाधित राहावी यासाठी जिल्‍हा दंडाधिकारी  जयश्री भोज यांना  प्रदान केलेल्‍या अधिकारान्‍वये मुंबई पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 (1) व 3 लागू केले आहे.
     या कामलाचा अंमल दि. 23 जून 2012 च्‍या रात्री 12 वाजेपर्यंत राहणार असून, या कलमाचा भंग करणा-या व्‍यक्‍ती विरुध्‍द कायदेशिर कारवाई करण्‍यात येईल असे आदेशात नमूद आहे.
                                                            000000

30 जूनपर्यंत संगणक प्रशिक्षणासाठी अर्ज करावे


              
         वर्धा दि.12- वर्धा जिल्‍हा परिषदेच्‍या गेल्‍या वर्षाच्‍या अंदाजपत्राकातील तरतूदीप्रमाणे महिला व बालविकास समितीने सन 2012-13 वर्षात वैयक्तिक लाभाच्‍या योजनेनुसार ग्रामीण क्षेत्रातील 10 वी किंवा 12 वी पास महिला व मुलींनी एमएससिआयटी संगणक प्रशिक्षणासाठी 30 जून 2012 पर्यंत अर्ज करावयाचा आहे. अर्जाचा नमुना सर्व गट विकास अधिकारी पंचायत समितीमध्‍ये उपलब्‍ध आहे.
     संगणक प्रशिक्षणासाठी पुढीलप्रमाणे निकष ठरविण्‍यात आले असून त्‍यानुसार अर्जदार हा वर्धा जिल्‍ह्यातील ग्रामीण भागातील रहिवासी असावा. अर्जदाराचे वार्शिक उत्‍पन्‍न 50 हजार  रुपयापर्यंत असावे. बि.पी.एल.चे कार्ड तहसिलदार किंवा तलाठ्याचे प्रमाणपत्रा अर्जासोबत जोडावे. अनुसूचित जाती व जमातीच्‍या अर्जदारांनी तहसिलदार किंवा उपविभागीय अधिकारी यांचे जातीचे प्रमाणपत्र जोडावे. लाभार्थीनी प्रशिक्षध शुल्‍काच्‍या 10 टक्‍के रक्‍कम प्रवेश घेतेवेळी निवउून दिलेलया प्रशिक्षण केंद्रावर भरावी.  एकदा निवड केलेले नाव बदलून मिळणार नाही. लाभार्थी निवड ग्रामसभेने केलेली असावी. असे उपमुख्‍य कार्यकारी अधिकारी जि.प.वर्धा कळवितात.
                                                            0000000

Monday 11 June 2012

पाण्‍याचे नियोजन करुन शेतक-यांनी फायद्याची शेती करावी दत्‍तात्रय वने



                        
वर्धा दि.11- तुषार संचाचा शेतात वापर करीत असतांना या संचातील दाब 2 केजी ठेवणे,सोयाबीनची पट्टा पेरणी पध्‍दतीचा वापर वेगवेगळया पिकाच्‍या  आवश्‍यकतेनुसार द्यावयाच्‍या पाण्‍याचे प्रमाण व त्‍यानुसार तुषार संच चालविण्‍याचा कालावधी तसेच त्‍याच पाण्‍यामध्‍ये गहू,हरभरा व कांदा या पिकांना नेमकी पाण्‍याची गरज याचे नियोजन करुन शेतक-यांनी फायदेशिर शेती करावी असा हितोपदेश राहुरी येथील प्रगतीशिल शेतकरी डॉ. दतात्राय वने यांनी दिला.
         येथील विकास भवन येथे आत्‍मा अंतर्गत जिल्‍हयातील निवड केलेल्‍या कृषी मित्राची कार्यशाळा नुकतीच संपन्‍न झाली त्‍याप्रसंगी ते बोलत होते. याप्रसंगी जिल्‍हा अधिक्षक कृषी अधिकारी भाऊसाहेब ब-हाटे, नागपूर येथील कृषी महाविद्यालयाचे डॉ.व्‍ही. व्‍ही. पत्‍तीवार, किटक नाशक तज्ञ डॉ. लक्ष्‍मीकांत पेशकर आदि मान्‍यवर मंचावर उपस्थित होते.
         पिकासाठी पाण्‍याचे नियोजन केल्‍यास 33 टक्‍के होणारी पाण्‍याची बचत व उत्‍पादनात होणारी वाढ याबाबत स्‍वतःचा अनुभव कथन करुन डॉ. वने म्‍हणाले की, शेतीचा ताळेबंध ठेवणे,काळाजी गरज असून शेती करीत असतांना पाळावयाची पथ्‍थे तसेच  प्राथमिक  गरजा सिमीत ठेवणे यातून स्‍वतःला घडविणे आदिबाबत मार्गदर्शन करुन कृषी विद्यालयाचे संशोधित झालेले तंत्रज्ञान गरजू शेतक-यापर्यन्‍त झापाट्याने व परिनामकारक पध्‍दतीने पोहचविण्‍यासाठी कृषी मित्र व कृषी  विभागाची भुमीका ही महत्‍वपूर्ण ठरत आहे.असे त्‍यांनी यावेळी सांगीतले.
       याप्रसंगी जिल्‍हा अधिक्षक कृषी अधिकारी भाऊसाहेब ब-हाटे यांनी आत्‍मा संकल्‍पना व प्राप्‍त परिस्थिती व त्‍याचे महत्‍व शेतकरी गट संघटन पिकानुसार शेतक-यांचे समह स्‍थापन करणे त्‍यावर त्‍यांना पिकाच्‍या असलेल्‍या समस्‍यानुसार प्रशिक्षण, प्रात्‍याक्षिके व सहली यांचे तालुकास्‍तरावरील समितीव्‍दारे प्राथमिक नियोजन करुन प्रस्‍तावित करणे व त्‍याला जिल्‍हास्‍तरावरील मा.जिल्‍हाधिकारी यांचे अध्‍यक्षतेखाली आत्‍मा नियामक मंडळाखाली बैठकीमध्‍ये मान्‍यता घेवून राबविण्‍याची कार्यपध्‍दती सांगीतली तसेच गेल्‍यावर्षी आत्‍मा अंतर्गत निर्माण झालेल्‍या यशोगाधा यामध्‍ये संत्रा पिकाचे आंबीया बहार घेणे, कपाशीवरील लाल्‍या नियंत्रण करणे, रब्‍बी हंगामात ज्‍वारी उत्‍पादन करणे, यांत्रिकीपध्‍दतीने कापूस वेचणी करणे, सामुहिक पध्‍दतीने कमी खर्चाचे शेताला कुंपन करुन जंगली प्राण्‍याव्‍दारे जिल्‍हयात उत्‍पन्‍न झालेली समस्‍या बाबत सविस्‍तर माहिती दिली.
         यावेळी डॉ.व्‍ही.व्‍ही. पत्‍तीवार , यांनीही कापूस  पिकाच्‍या बाबतीमध्‍ये सविस्‍तर माहिती दिली.या कार्यक्रमाला वर्धा जिल्‍हा परिषदेचे माजी उपाध्‍यक्ष व माजी कृषी सभापती  सुनिल राऊत यांनी संबोधित करतांना असे सांगितले की विदर्भामध्‍ये पाणी,जमीन मुबलक असून त्‍याव्‍दारे शास्त्रिय पध्‍दतीने शेती करणे आवश्‍यक झाले असून वेळोवेळी कृषी विभागाचे मार्गदर्शन घेणे गरजेचे आहे असे आर्वजून सांगितले.यावेळी डॉ.लक्ष्‍मीकांत पेशकर यांनी ऐकात्‍मीक कीड नियंत्रण पध्‍दतीने कीड नियंत्रणाबाबत  तसेच मित्र व शत्रूकिडीची ओळख करुन घेणेबाबत व शास्त्रिय पध्‍दतीने किटकनाशकाचा वापर करुन उत्‍पादन खर्च कमी करण्‍यासाठी शेतक-यांना हितोपदेश केले.
         या कार्यक्रमामध्‍ये शेतकरी काशिनाथ राउत यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्‍ताविक  रविन्‍द्र धर्माधिकारी, यांनी केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कडू यांनी केले.कार्यक्रमाचे आभार उपविभागीय कृषी अधिकारी जेजूरकर यांनी मानले.
                                                            000000

शेतक-यांच्‍या गटांना 296 मेट्रीकटन खताचा पुरवठा


       
·        संरक्षित साठयातून पाचहजार मेट्रीकटन खत
·        21 गावातील 442 शेतक-यांना लाभ

वर्धा दि. शेतक-यांना खरीप हंगामासाठी शेतकरी गटाच्‍या माध्‍यमातून बांधावर खत पुरवठा योजने अंतर्गत 25 गटांना 296 मेट्रीकटन खताचा पुरवठा करण्‍यात आला आहे. जिल्‍हयातील 21 गावातील 442 शेतक-यापर्यन्‍त खताचा पुरवठा करण्‍यात आला असल्‍याची माहिती जिल्‍हा अधिक्षक कृषी अधिकारी भाऊसाहेब ब-हाटे  यांनी आज दिली.
          खरीप हंगामासाठी शेतक-यांना खताचा पुरवठा सुलभपणे व्‍हावा यासाठी शेतक-यांच्‍या बांधावर खत ही योजना सुरु करण्‍यात आली आहे.जिल्‍हयात या योजने अंतर्गत 100 गटाची नोंदणी करण्‍यात आली असून विविध योजने अंतर्गत स्‍थापन झालेले शेतकरी गट या योजनेत सहभागी होवू शकतात.
          खरीप हंगामासाठी उपलब्‍ध असलेल्‍या संरक्षित रासायनिक साठ्यामधून 5 हजार मेट्रीकटन साठा शेतक-यांना विक्रीकरीता खुला करण्‍यात आला आहे. संरक्षित साठा शेतक-यांच्‍या गटांना बांधावर त्‍यांच्‍या मागणी नुसार वाटप करण्‍यासाठीच असल्‍याची माहितीही जिल्‍हा अधिक्षक कृषी अधिकारी भाऊसाहेब ब-हाटे  यांनी दिली.
          शेतकरी गटांसाठी असलेले सर्व खत,खताच्‍या अधितम मुल्‍यापेक्षा जास्‍त किंमतीत पुरवठा होणार नाही याची दक्षता घेवूनच शेतकरी गटाच्‍या मागणी नुसार गावापर्यन्‍त पोहचविण्‍यात येत असल्‍याचे त्‍यांनी स्‍पष्‍ट  केले.
          संरक्षित साठयामधून मुक्‍त करण्‍यात आलेल्‍या खतामध्‍ये 1 हजार टन युरीया, प्रत्‍येकी 2 हजार टन संयुक्‍त खत व डीएपीचा समावेश आहे. हा साठा तालुका विकास कृषी अधिका-यामार्फत वितरीत करण्‍यात येणार आहे. युरीया, संयुक्‍तखत व डीएपीचा पुरवठा  आर्वी 605 मेट्रीकटन, आष्‍टी 560, देवळी 625, हिंगणघाट 695, कारंजर 555, समुद्रपूर 710, सेलू 825 व वर्धा तालुक्‍यासाठी 625 मेट्रीकटन खताच्‍या पुरवठ्याचा समावेश आहे.
          जिल्‍हयातील सर्व शेतक-यांना खताचा पुरवठा व्‍हावा यासाठी जिल्‍हास्‍तरावर नियोजन करण्‍यात आले असून कंपनीकडून प्राप्‍त होणा-या 2 हजार सहाशे मेट्रीकटन युरीया वितरणाचे आदेशही देण्‍यात आल्‍याची माहिती अधिक्षक जिल्‍हा कृषी अधिकारी भाऊसाहेब ब-हाटे यांनी दिली.
                                            94 हजार 300 मेट्रीकटन खते
      जिल्‍हयाला 94 हजार 300 मेट्रीकटन खताचे आवंटन मंजुर झाले आहे.या खतामध्‍ये 26 हजार 810 मेट्रीकटन युरीया 29 हजार 900 मेट्रीकटन डीएपी 10 हजार 120 टन एसएसपी 8 हजार 370 टन एमओपी  तसेच 19 हजार 840 मेट्रीकटन संयुक्‍त खताचा समावेश असल्‍याची माहिती जिल्‍हा अधिक्षक कृषी अधिकारी भाऊसाहेब ब-हाटे यांनी दिली.
                                                       ०००

शेतक-यांच्‍या गटांना 296 मेट्रीकटन खताचा पुरवठा


                                           शेतक-यांच्‍या गटांना
                         296 मेट्रीकटन खताचा पुरवठा
               
·        संरक्षित साठयातून पाचहजार मेट्रीकटन खत
·        21 गावातील 442 शेतक-यांना लाभ

वर्धा दि. शेतक-यांना खरीप हंगामासाठी शेतकरी गटाच्‍या माध्‍यमातून बांधावर खत पुरवठा योजने अंतर्गत 25 गटांना 296 मेट्रीकटन खताचा पुरवठा करण्‍यात आला आहे. जिल्‍हयातील 21 गावातील 442 शेतक-यापर्यन्‍त खताचा पुरवठा करण्‍यात आला असल्‍याची माहिती जिल्‍हा अधिक्षक कृषी अधिकारी भाऊसाहेब ब-हाटे  यांनी आज दिली.
          खरीप हंगामासाठी शेतक-यांना खताचा पुरवठा सुलभपणे व्‍हावा यासाठी शेतक-यांच्‍या बांधावर खत ही योजना सुरु करण्‍यात आली आहे.जिल्‍हयात या योजने अंतर्गत 100 गटाची नोंदणी करण्‍यात आली असून विविध योजने अंतर्गत स्‍थापन झालेले शेतकरी गट या योजनेत सहभागी होवू शकतात.
          खरीप हंगामासाठी उपलब्‍ध असलेल्‍या संरक्षित रासायनिक साठ्यामधून 5 हजार मेट्रीकटन साठा शेतक-यांना विक्रीकरीता खुला करण्‍यात आला आहे. संरक्षित साठा शेतक-यांच्‍या गटांना बांधावर त्‍यांच्‍या मागणी नुसार वाटप करण्‍यासाठीच असल्‍याची माहितीही जिल्‍हा अधिक्षक कृषी अधिकारी भाऊसाहेब ब-हाटे  यांनी दिली.
          शेतकरी गटांसाठी असलेले सर्व खत,खताच्‍या अधितम मुल्‍यापेक्षा जास्‍त किंमतीत पुरवठा होणार नाही याची दक्षता घेवूनच शेतकरी गटाच्‍या मागणी नुसार गावापर्यन्‍त पोहचविण्‍यात येत असल्‍याचे त्‍यांनी स्‍पष्‍ट  केले.
          संरक्षित साठयामधून मुक्‍त करण्‍यात आलेल्‍या खतामध्‍ये 1 हजार टन युरीया, प्रत्‍येकी 2 हजार टन संयुक्‍त खत व डीएपीचा समावेश आहे. हा साठा तालुका विकास कृषी अधिका-यामार्फत वितरीत करण्‍यात येणार आहे. युरीया, संयुक्‍तखत व डीएपीचा पुरवठा  आर्वी 605 मेट्रीकटन, आष्‍टी 560, देवळी 625, हिंगणघाट 695, कारंजर 555, समुद्रपूर 710, सेलू 825 व वर्धा तालुक्‍यासाठी 625 मेट्रीकटन खताच्‍या पुरवठ्याचा समावेश आहे.
          जिल्‍हयातील सर्व शेतक-यांना खताचा पुरवठा व्‍हावा यासाठी जिल्‍हास्‍तरावर नियोजन करण्‍यात आले असून कंपनीकडून प्राप्‍त होणा-या 2 हजार सहाशे मेट्रीकटन युरीया वितरणाचे आदेशही देण्‍यात आल्‍याची माहिती अधिक्षक जिल्‍हा कृषी अधिकारी भाऊसाहेब ब-हाटे यांनी दिली.
                                            94 हजार 300 मेट्रीकटन खते
      जिल्‍हयाला 94 हजार 300 मेट्रीकटन खताचे आवंटन मंजुर झाले आहे.या खतामध्‍ये 26 हजार 810 मेट्रीकटन युरीया 29 हजार 900 मेट्रीकटन डीएपी 10 हजार 120 टन एसएसपी 8 हजार 370 टन एमओपी  तसेच 19 हजार 840 मेट्रीकटन संयुक्‍त खताचा समावेश असल्‍याची माहिती जिल्‍हा अधिक्षक कृषी अधिकारी भाऊसाहेब ब-हाटे यांनी दिली.
                                                       0000