Thursday 14 June 2012

राष्‍ट्रीय अन्‍न सुरक्षा अभियानाअंतर्गत शेतक-यासाठी विशेष उपक्रम -- संजय भागवत




         वर्धा दि. 13-  राष्‍ट्रीय अन्‍न सुरक्षा अभियाना अंतर्गत जिल्‍हयात कृषी उत्‍पादन वाढीसाठी 18 लाख 446 हजार रुपये खर्चाचा शेतक-यासाठी विशेष उपक्रम राबविण्‍यात येत असल्‍याची माहिती अपर जिल्‍हाधिकारी संजय भागवत यांनी आज दिली.
         जिल्‍हाधिकारी कार्यालयाच्‍या सभागृहात राष्‍ट्रीय अन्‍न सुरक्षा अभियान कार्यक्रमाचा आढावा अपर जिल्‍हाधिकारी  श्री.भागवत यांनी घेतला त्‍यावेळी मार्गदर्शन करतांना ते बोलत होते.
        यावेळी अधिक्षक कृषी अधिकारी बी.एस.ब-हाटे, जिल्‍हा कृषी अधिकारी आर.व्‍ही.गायकवाड नाबार्डच्‍या महाव्‍यवस्‍थापक  श्रीमती  स्‍नेहल बन्‍सोड, कृषी विकास अधिकारी बी.के. जेरापूरकर कार्यक्रम समन्‍वयक डॉ.सुरेश नेमाडे,सदस्‍य वसंत पाटील, मनिश देवळे, पी.आर.भारती आदि उपस्थित होते.
        राष्‍ट्रीय अन्‍न सुरक्षा अभियाना अंतर्गत कृषी विकासासोबत उत्‍पादन वाढविण्‍यासाठी जिल्‍हयात 22 उपक्रम राबविण्‍यात येणार आहे. यामध्‍ये 17 प्रकल्‍पामध्‍ये 1 हजार 100 शेतक-यासाठी गट प्रात्‍यक्षिकाचा समावेश आहे.शेतक-यांना तूर व हरभरा पीकाच्‍या अनुदानाचाही यामध्‍ये समावेश आहे.
         शेतक-यांना प्रमाणित बीयान्‍याचे वाटप सुक्ष्‍म मुलद्रव्‍य वाटप जिप्‍सम पुरवठा, एकात्मिक कीड व्‍यवस्‍थापन, पीक संरक्षण औषधी नॅपसॅक स्‍प्रेपंप,पंपसंच, तननाशक,अत्‍याधुनिक शेती औजारे ,तसेच शेतक-यासाठी प्रशिक्षण आदी राष्‍ट्रीय अन्‍न सुरक्षा अभियान कार्यक्रमा अंतर्गत या उपक्रमामध्‍ये समावेश असल्‍याचेही अपर जिल्‍हाधिकारी संजय भागवत यांनी सांगीतले.
          राष्‍ट्रीय अन्‍न सुरक्षा अभियान कार्यक्रम जिल्‍हयात प्रभावीपणे राबवून शेतक-यांच्‍या शेतापर्यन्‍त तांत्रिक माहिती व उत्‍पादन वाढविण्‍यासाठी उपक्रम पोहचवा असे आवाहनही यावेळी श्री. भागवत यांनी केले.
          जिल्‍हा अधिक्षक कृषी अधिकारी बी.एस.ब-हाटे यांनी प्रास्‍ताविकात राष्‍ट्री अन्‍न सुरक्षा अभियाना अंतर्गत यावर्षी राबविण्‍यात येणा-या उपक्रमांची माहिती दिली.
                                             0000

No comments:

Post a Comment