आष्टीचा लढा

१९४२ आष्टीचा लढा
(लेखक- श्री विजय अजमिरे, आर्वी)
भारतीय स्वातंत्र्य चळवळीच्या इतिहासांत आठ ऑगस्ट बेचाळीस हा दिवस रोमहर्षक तेवढाच स्फूर्तिमय ठरला. त्या दिवशी ऑल इंडिया काँग्रेस कमेटीच्या सभेतला अंतिम निर्णय ऐकायला उभा देश आसुसलेला होता. देशाच्या कानाकोपऱ्यातून कार्यकर्ते मुंबईला गेले होते. तेथे ''चले जाव'' ठराव पास झाला. शांतीवाल्यांनी केलेली ती क्रांती होती. बापुजींनी नवा अंतिम मंत्र दिला. करा अथवा मरा' क्रांतीदिनाच्या क्रांतीमंत्राने क्रांती मैदान (गोवालिया टँक) टाळयांच्या कडकडाटाने आणि गगनभेदी घोषणांच्या आवाजाने निनादले होते. बापूंनी अहिंसात्मक प्रतिकाराचा संदेश दिला त्यावेळी जनता प्रक्षुब्ध झाली तर काय प्रकार घडतील ह्याचा इशाराही सरकारला केला होता. सरकार चवताळले, धरपकड सुरु केली. बापुजींनाही पकडले. कार्यकर्त्यांना ह्याची आधीच जाणीव होती, म्हणून त्यांनी डूब मारली. दुसरे दिवशी मुंबईत गुप्त ठिकाणी एकत्र जमले होते. डॉ. पट्टाभी सितारामैया ह्यांनी कार्यक्रमाचा मसुदा तयार केला होता. त्यानुसार अहिंसक सत्याग्रहाच्या मार्गाने देशातील सरकारी कार्यालये ताब्यात घेणे, जाळणे शिवाय तारा तोडणे, रुळ काढणे, अडथळे निर्माण करणे, असा 'करो वा मरो' चा प्रत्यक्ष कार्यवाहीचा कार्यक्रम ठरला होता.
आष्टीचा क्रांतीदिन
बापूजींचा अंतीम क्रांतीचा निर्णायत मंत्र 'करो या मरो' ह्यांच्या कार्यवाहिला संपूर्ण भारतात चांगला प्रतिसाद मिळाला. शहरातच नव्हे तर अशिक्षित खेडयामध्ये सुध्दा त्याची अंमलबजावणी झाली. वर्धा जिल्ह्यातील आष्टी परिसर मागे मागे कसा राहिल? परिसरांतील सर्व गावांची पोलीस पाटलांची दफ्तरं शांततेने जाळली गेली. आणि 16 ऑगस्ट ही क्रांती दिवसाची दरोग्याने निशस्त्र लोकांवर गोळीबार करुन सहाजण ठार आणि अनेक जखमी केले. त्यामुळे जनता प्रक्षुब्ध झाली. बापूजींनी सरकारला केलेला इशारा खरा ठरला होता. जुलमी सरकारने तो इशारा समजून घेतला नाही. त्यामुळे आष्टीच्या क्रांतीदिनी हिंसाचार होऊन क्रांतीदिन लंडनपर्यंत गाजला. त्यामुळे येथील लोकांना मरणप्राय यातना सहन कराव्या लागल्या. दहा जणांना फाशी व शेकडो लोकांना जन्मठेपेच्या शिक्षा सुनावल्या गेल्या. काळाच्या ओघात हे विसरल्यासारखं झालं. म्हणून नव्या पिढीला जिज्ञासा आहे, त्या दिवशी नेमकं काय कसं आणि कां घडल? हे जाणून घेण्याची ती इच्छा पूर्ण करण्याचा हा चित्रमय घटनाक्रम आहे.
दिनांक 8 ऑगस्ट 1942 राष्ट्रपिता महात्मा गांधींना मुंबईला ऑगस्ट क्रांती मैदानावरुन (गोवालिया टँक) इंग्रजांना 'चले जाव' चा आदेश दिला व भारतीय जनतेला 'करो वा मरो' चा संदेश दिला. ह्या सभेला आष्टीचे गोपाळराव वाघ आणि लक्ष्मणराव मोकदम उपस्थित होते.
दिनांक 9 ऑगस्टला आष्टीला संत तुकडोजी महाराजांचा भजनाचा कार्यक्रम होता. त्या कार्यक्रमांमधूनही त्यांनी करो वा मरो चा संदेश 'मारो' म्हणून दिला व फत्तर सारे बॉम्ब बनेंगे, भक्त बनेगी सेना असे भविष्योद्गार काढले. आष्टीत चैतन्य संचारले होते.
दिनांक 14 ऑगस्ट 1942 ला खडकी येथे सभा होऊन महात्माजींचा संदेश वाचून दाखविला. त्यानुसार सोळा ऑगस्ट 1942 हा दिवस आष्टी पोलीस स्टेशनवर मोर्चा नेण्याचा दिवस ठरला. तशी पत्रके खेडयात वडाळयापर्यंत पाठविण्यात आली.
दि. 14 ऑगस्ट
1942 ऑगस्ट डॉ. पाचघरेंकडे सभा होऊन 17 तारीख ठरली होती. परंतु खडकीचे पत्र आल्यावर विचारविनिमय झाल व रविवार दिनांक 16 ऑगस्ट 1942 ह्या नागपंचमीच्या दिवशी पोलीस स्टेशनवर तिरंगा चढविण्याचा निर्णय घेण्यात आला.
रविवार 16 ऑगस्ट 1942, तो नागपंचमीचा दिवस होता. आष्टी गावातील लोक घरगुती कामात होते. गृहिणींनी नागोबा काढले होते. त्या दिवशी शेतातील काम बंद होते. म्हणून सर्वजण गावात होते. आज काय घडणार ह्याची फारशी कल्पना लोकांना नव्हती. गुपचूप निरोप गेले होते. 16 ऑगस्ट 1942 आष्टीचा क्रांतीदिन खडकीला ठरला व आष्टीने मान्य केला होता.
तेवढयात वडाळयावरुन रामकृष्ण जोमदे आले. आष्टीतील ओळखीच्या माणसांना पाहून घोडयावरुन खाली उतरले. त्यांना पाहून ते म्हणाले, 'वडाळयाचे लोक सकाळीच यायला निघाले आहेत. मी घोडयावरुन पुढे तुम्हाला सांगण्यासाठी आलो. तुम्ही सर्वजण तयार रहा. मी पांडुरंग दादांना निरोप देऊन येतो' ते पुन्हा घोडयावर बसून पांडुरंगजीच्या घराच्या दिशेने निघाले.
बाजूच्या गोठयात घोडे बांधून ते पांडुरंग दादाकडे आले. त्यांना वडाळयाचे लोक येत असल्याचे सांगितले. दादांनी ताबडतोब दवंडीवाल्यांना बोलावले. त्याला घंटी वाजवून दवंडी द्यायला सांगितले. त्याने एक ललकारी तेथेच मारली. नवचैतन्य निर्माण झाले होते. प्रथम पोलीसस्टेशनवर शांततेने मोर्चा न्यायचा होता. अनुचित प्रकार होईल हे कोणाच्या ध्यानी मनी नव्हते.
ठिक दहा वाजता वडाळयाचे लोक दुरुन दिसले. रामभाऊ लोहे, व्यंकटराव ठाकरे, पंची गोंड, उदेभान कुबडे, केशव ढोंगे, झ्यापूजी पोटे, लालजी कोकाटे सोबत शे-दिडशे तरुण घोषणा देत येत होते. व्यंकटराव ठाकरे चे गीत गात होते.
जन्मसिध्द है हक्क् हमारा। होगा भारत प्यारा ॥
ते पेठ अहमदपूरला आले. मल्लीकार्जुन आप्पांच्या वाडयासमोर थांबले. आप्पाजी घरी नव्हते. वाडयासमोर विश्रांतीसाठी खाली बसले. 5-6 कोसावर पायी आल्यामुळे थकवा आला होता. त्यांना तहान लागली होती. पाणी मागण्यात आले. न्याहारी त्यांनी नाल्यावरच केली होती. पुन्हा तहान लागली. सर्वांना पाणी देण्यात आले.
रामभाऊंनी खडकीचे लोक आले काय म्हणून विचारले त्यांना उत्तर नाही म्हणून मिळाले. कोणीतरी बोलले. 'अरे बा. त्याहीन काऊन उशीर केला? त्याहीचे गाव जवळचं आहे' तसे रामभाऊ म्हणाले, ''येतील- आल्याशिवाय राहणार नाही. आपण थोडावेळ त्यांची वाट पाहू- मग निघूं''
त्यांची वाट पहावी की पुढे चलावे हा आपसात विचार सुरु झाला. काही उत्साही वीर पुढे आले. ते वाट पाहायला तयार नव्हते. केशव ढोंगे म्हणाल, ''आधीच उशीर झाला. आता उशीर करणं ठीक नाही.'' सर्वांना त्याच्या बाजूने री ओढली. रामभाऊचा निरुपाय झाला. पोलीसस्टेशनकडे चालण्याची त्यांनी सूचना केली.
शेवटी तो जथा पोलीस स्टेशनच्या दिशेने निघाला. रस्त्याने घोषणा देत होते. सामील होण्याची विनंती करीत होते. ते निशस्त्र होते. झेंडयाशिवाय एकही काठी त्यांच्याजवळ नव्हती. पाटलाने पाठविलेला काठीधारी लोकांच्या जथा त्यांनी वापस केला होता. ते अहिंसेचे सच्चे पुढारी व सच्चे देशभक्त होते.
पांडुरंगदादांच्या घराकडून आष्टीला जथा आला. दोन नेत्यांनी हातात हात मिळविला. घोषणांचे आवाज आकाशाला भिडू लागले. उत्साह वाढला होता. लोकांचा महापूर पोलीस स्टेशनच्या दिशेने जात होता. स्वातंत्र्य मिळविण्यासाठी 'करो वा मरो' चा संदेश घेऊन.
त्यावेळी रामनाथ मिश्रा दरोगा होता. देशभक्तांच्या गगनभेदी गर्जना पोलीस स्टेशनमध्ये ऐकू येऊ लागल्या. इन्स्पेक्टरने फाटक बंद करण्यास सांगितले. सर्वांना हुश्शारचा आदेश दिला. त्यावेळी तेथे 3 जमादार आणि 5 पोलीस होते. इन्स्पेक्टरने त्यांना योग्य त्या सूचना दिल्या.
सकाळी अकराचा सुमार होता. देशभक्तांचा जत्था फाटकाजवळ येऊन पोहचला. त्यात रामभाऊ लोहे, व्यंकटराव ठाकरे, श्री पांडुरंगजी सव्वालाखे, मोतीरामजी होले, गोविंदराव मालपे, पंचीगोंड केशव ढोंगे, उदेभान कुबडे आघाडीवर होते. लोहे म्हणाले, ''आम्हाला आंत येऊ द्या. झेंडा चढवू द्या'. इन्स्पेक्टर गरजला, ''यह नही होगा.''
''क्यो नही आने देते? पांडुरंग दादांचा आवाज, ''आप अकेले नही है ! दादा आपले साथ ये सेना है।'' इन्स्पेक्टर. जमावाने घोषणा दिली, 'भारत माता की जय, महात्मा गांधी की जय' देशभक्तांच्या गगनभेदी जयजयकाराने दारोगा नरमला. आणि काही लोकांना आत घेण्यास राजी झाला.
फाटक उघडलं गेल्यावर पुढारी मंडळी आत आली. त्यांच्यासोबत सत्याग्रहींचा लोंढा आपोआप आत आला. लोहेंनी सर्वांना शांत बसविले. त्यांनी शांतपणे आपली भूमिका मांडली. आपण येथे 'करो वा मरो' या गांधीजींच्या संदेशावरुन आलो आहोत. तिरंगी झेंडा चढविणं व रेकार्ड जाळणं हे आपल काम.'
लोहे म्हणाले, 'आपण हिंसाचार करु नये. गोळीबार झाला तरी विरोध करु नये. आपण बहुसंख्य आहोत. तेवढया गोळया ह्यांच्या जवळ नाहीत. (टाळया) पांडुरंग सव्वालाखेंनी दुजोरा दिला. लोहे पुन्हा म्हणाले 'ज्यांना बंदुकीची भिती वाटते त्यांनी आताच येथून निघून जावं' 4-5 भित्री माणसे उठून निघून गेली.
दरोग्याच्या मनांत वेगळे विचार आले. त्याने गुपचूप ह्या नेत्यांना पकडण्याचा आदेश एका शिपायाला दिला. लोक दरोग्यावर बारकाईने लक्ष ठेवून होते. त्यांनी तो ऐकला. ते खवळले. बाचाबाची सुरु झाली. त्यांना आवरणे कठीण झाले. काही लोक पोलीस स्टेशनमध्ये घुसले. काही घोषणा देत होते. नेते शांत राहण्यास सांगत होते, पण व्यर्थ.
समद जमादार गांगरुन गेला. त्याने पहिली गोळी झाडली. ती डॉ. मालपेला लागली. त्या दिवशी ते जेवण न करताच आले होते. अन्ना ऐवजी गोळी त्यांच्या पोटात गेली. पोटावर हात ठेऊन ते अंधारी आल्यासारखे गर्दींच्या रेटयाने बाहेर फेकले गेले.
नबाब रशिद खाँ कपाउंडच्या बाहेर उभे होते. एका गोळी सू-सू करीत आली व पोटरीत लागली. पोटरीतून घळाघळा रक्त वाहू लागले. नबाब खाली कोसळले. लोक धावले. काही घराकडे पळायला लागले. सर्वत्र धावपळ सुरु झाली. गोळीबार सुरुच होता.
वडाळयाचा केशव ढोंगे, नव्या दमाचा तरुण, सहा महिन्यापूर्वी त्याचे लग्न झाले होते. पोलीस स्टेशनच्या दिशेने धावला. एक गोळी सूं-सूं करीत आली. गोळी नरडयाला लागली. दोन्ही हातांनी गळा दाबून धरला. अंधारी येऊन जमिनीवर कोसळला. धन्य तो वीर! एक गोळी सूं-सूं करीत झ्यापूजीच्या पायाला लागली. ते विव्हळून खाली पडले.
बेछूट गोळीबार सुरु होता. गर्दीतून आवाज आला, 'भारत माताकी जय'। तो आवाज होता वडाळयाच्या उदेभान कुबडेचा. भारतमातेचा जयजयकार त्या नराधमांना कसा खपणार ? बंदुक त्याच्याकडे वळली. नेम धरुन गोळी छातीवर बसली. दोन्ही हात छातीशी धरुन वीर कोसळला. भारतमातेच्या कुशीत.
'अरे त्यांना कशाला मारता, मी त्यांना आणले, मला मारा' रामभाऊ जीवाच्या आकांताने ओरडले होते. स्वतःहून गोळीला सामोरे जात होते. त्यांच्या रोखाने बंदुक वळली. अण्णाजी धुडे त्यांना रोखण्याचा प्रयत्न करीत होते. बंदुकीचा चाप ओढला गेला, गोळी सुटली, पण लोहेंना लागली नाही.
रामभाऊच्या रोखात गोळी येत आहे असे पाहून त्यांच्यावर जीवापाड प्रेम करणारा पंची गोंउ तिरासारखा धावला. गोळी त्याने आपल्या छातीवर झेलली. आपल्या नेत्याला वाचविण्यासाठी एका अशिक्षीत उघडया नागडया आदीवासीच केवढं मोठ बलीदान. त्याची सर कोणालाच येणार नाही.
समदला धुंदी चढली होती. त्याने पुन्हा बंदुक रामभाऊवर रोखली. आपल्याला ह्यांनी अनेक वेळा जेऊ घातले हे तो विसरला. पिशाच्च जागा झाल्यावर भान कुठून असणार! समद रामभाऊला गोळी मारेल असं कोणालाही वाटलं नाही. पण तसं घडलं. त्याने रामभाऊवर गोळीबार सुरु केला.
समदची बंदुक आग ओकू लागली. पहिली गोळी रामभाऊला चाटून गेली. दुसरी गोळी छातीच्या बाजूला लागली. तरी रामभाऊ पडत नाही हे पाहिल्यावर त्याने तिसरी गोळी पायावर मारली. गोळी पोटरीत घुसली रामभाऊ खाली पडले.
रामभाऊ पडले हे पाहताच लालजी कोकाटे, व्यंकटराव ठाकरे, श्रावण मास्तर, रामकृष्ण जोमदे धावून आले. व्यंकटराव ठाकरेनं रामभाऊला सावरलं. ते दृष्य पाहून भित्रे लोक पळू लागले. तानाजी पडल्यावर मराठे पळायला लागले होते तसे.
लोक पळाल्याचे पाहून दारोग्याने गोळीबार थांबवला. त्याने पोलिसांना काही गुप्त सूचना दिल्या. ह्या संधीचा फायदा घेऊन लालजी कोकाटे, व्यंकटराव ठाकरे, रामकृष्ण जोमदे ह्यांनी रामभाऊला व झ्यापूजीला उचलले व दवाखान्याकडे नेले. डॉ. मालपेला आणि नवाबला आधीच नेण्यात आलं होतं.
परंतु ह्या रणसंग्रामाचे खरे शूरवीर केशव ढोंगे, उदेभान कुबडे आणि पंची गोंड हे तेथेच तळमळत होते. अंगातून रक्त गेल्यामुळे त्यांना गुंगी आली होती. उन्हात तशा वेळी ते पाणी पाणी करुन विव्हळत होते. पण आवाज येत नव्हता. ते क्षणाक्षणाला क्षीण होत होते. पंची गोंडाचा भाऊ हे झाडाआडुन पाहत होता, पण करणार काय! असहाय होता.
तो दारातून बाहेर गेला. फाटक बंद झाले होते. त्याने रामकृष्ण जोमदेला सोबत घेतले. विहिंरीवरची दोरबादली घेतली व पाणी आणले. आतून दरडावणीचा आवाज आला 'खबरदार पाणी पाजाल तर', बादली दोर तेथेच टाकून ते निघून गेले.
दारोग्यानं शिपायांना गुप्त संदेश दिला. कारण त्याने पांडुरंग सव्वालाखे आणि मोतीराम होलेला भिंतीमागे पाहिले होते. ते गुपचूप मागून गेले व नकळत दोघांनाही पकडले. त्यांनी सुटण्याचा कसून प्रयत्न केला, पण व्यर्थ.
त्यानंतर सर्व शिपायी धावले. त्यांनी पांडुरंगजी व मोतीरामजीला फरफटत पोलीस स्टेशनमध्ये आणले व हवालातील बंद केले. कुलूप लावले व एका शिपायाला तेथेच पाहारा देण्यास सांगितले.
त्या लोकांनी जखमींना दवाखान्यात आणले. त्यावेळी डॉ. कामत सरकारी डॉक्टर होते. ते जखमींना आत घेण्यास तयार-नव्हते. त्यांचाही नोकरीचा प्रश्न होता. सर्वांनी हात जोडले. विनंती केली. शेवटी डॉ. पाचघरे आले. त्यांच्या विनंतीला मान देऊन त्यांनी जखमींना आत घेतले.
आष्टीला त्यावेळी फार मोठया सोई नव्हत्या. त्यामुळे प्रथमोपचाराशिवाय काही सोय नव्हती. त्यांच्यावर प्रथमोपचार करण्यात आला. परंतु काहींची स्थिती गंभीर होती. म्हणून डॉ. पाचघरे जखमींना आर्वीला नेण्याच्या तयारीला लागले.
गोळीबार झाला आणि लोक जखमी झालेत ही बातमी वाऱ्यासारखी गावभर पसरली. जखमींना पाहण्यासाठी दवाखान्या बाहेर लोकांनी गर्दी केली. त्यांना आत येण्यास मनाई होती. म्हणून सर्वजण बाहेर उभे होते.
इकडे गावात गणपत भोई अंगात आल्यासारखा नाचत होता. त्याच्या हातात रिकामी बंदूक होती. त्या धुमश्चक्रीत त्याने ती पोलीस स्टेशनमधून पळविली होती. आपला पराक्रम लोकांना दाखून तो बेभान होऊन नाचत होता. लोक त्याच्याकडे आश्चर्याने पहात होते. क्रांतीदिनाचा मध्यांतर झाला होता.
पोलीस स्टेशनमध्ये शिरकाव कठीण आहे हे पाहून रामकृष्ण जोमदे गावात गेले आणि घोडीवर बसून खडकीच्या दिशेने निघाले. भगोतीच्या नाल्याजवळ त्यांना खडकीचे लोक दिसले. खडकी, सिरसोली, परसोडा, भारसवाडा, येरवंडली, किन्हाळा, पिपळा, शिरी, नांदोरा, टेकोडा, वाघोली सर्वच गावचे लोक होते. रामकृष्ण त्यांच्या जवळ गेले. त्यांचे रक्ताने माखलेले कावरेबावरे रुप पाहून मंडळी चमकली.
रामकृष्ण जोमदेच्या तोंडातून शब्दाऐवजी हुंदके येत होते. ते घोडयावरुन उतरुन मटकन खाली बसले. काहीतरी विपरीत घडल्याची जाणीव झाली. लोक त्यांच्याभोवती जमले. त्यांनी रडत रडत सारी हकीगत सांगीतली. सारे हैराण झाले. त्यांचे सांत्वन करण्याचेही भान नव्हते.
लोक कुजबूज करु लागले. 'पोलीस कातावले आहेत्, आता आपली बरी सोय नाही.' सारे लोक तर पळाले, तिथं आपला काय निभाव लागणार' काही जणांनी भितीने बोबडी वळली. काहीजण वापस जाण्याची भाषा बोलू लागले. सर्वांचे चेहरे उतरले होते. आंदोलनाचा उत्साह मावळला होता.
येवढयात विजेसारखी कासाबाई कडाडली 'अरे ढमक्यांनो, येवढे नामर्द होते तर आलेय कशाले ? आताही जायचं अशीन तर वापस जावा. पण जाण्याआधी आमचे बायकांचे कपडे चढवा आणि बांगडया भरा. आम्ही बायातरी तुमच्या पेक्षा लाखपटीने ब-या आहेत. जा...... चालते व्हा.'
लोक भणकून गेले. त्यांच्यातील मर्दपणा जागा झाला. तसे गुलाबराव पुढे झाले व म्हणाले 'भारत माता की जय'. सर्वांनी मोठयांने जयजयकार केला. भीती तर पळाली होती. त्यांना स्फुरण चढलं होतं. गुलाबराव म्हणाले, ''आपण हिमतीने गेलो तर सात शिपाई चटणीले उरणार नाही.''
नारायण मुंदाने म्हणाले, ''तुकडोजी महाराज की'' सर्वांनी पुन्हा जयजयकार केला. बदला घेण्याची भाषा त्यांच्या तोंडात आली. 'पत्थर सारे बाँम्ब बनेंगे,' बाबाचं वाक्य त्यांना आठवलं. पत्थर बाँब गोळा करणे तेथूनच सुरु झाले. प्रत्येकानी ओटा करन त्यात दगड वेचणे चालू केले.
गावांतून जात असतांना आष्टीचे लोकही जत्थात सामील झाले. लोकांना स्फुरण चढले होते. निर्धाराची नशा चढली होती. गांधींचा व तुकडोजींचा जयजयकार त्यांना स्फूर्ती देत होता. जथ्याच्या समोर कालेखां नाचू लागला. तो ओरडत होता., 'पोलीस थाना जायेंगे। बदला लेके रहेंगे।
जथा दवाखान्याजवळ आला. आता जमाव फुगला होता. अंतोरा, खंबेत, किन्ही, देलवाडी, लहान आर्वीचे सत्याग्रही मोर्च्यात सामील झाले होते. 'भारत माता की जय' ललकारी सुरु होती. ती ऐकून जखमींना जखमांचा विसर पडला होता.
गूलाबराव, शामराव, वगैरे मंडळी व काही बाया जखमींची विचारपूस करण्यासाठी आत गेले. 'काऊन घाई केली? मले त येऊ याचं होतं' गुलाबराव म्हणाले, 'रामभाऊंनी फक्त डोळे किलकिले करुन त्यांच्याकडे पाहिले. त्यांच्या डोळयात आनंदाश्रू व चेह-यावर स्मित झळकले.
आता तो अथांग जनसमूह सागरा सारखा पोलीस स्टेशनकडे निघाला. नत्थोबा, शामराव, साहेबराव, जामरान, चंद्रभान, नारायणराव, वामनराव विष्णुजी, (दौलतराव,) मारोतराव , रंगराव आंबेकर, पंजाब मानकर, वासुदेव सोनार किती नावे घ्यावी! अनेक खेडयातून हा जनप्रवाह आला होता. सोबत 60-65 बाया होत्या.
ते फाटका जवळ येऊन पोहोचले- फाटक बंद होते. दरोग्यासहीत सर्वजण बंदुका रोखून उभे होते. 'खबरदार' म्हणून मिश्राने हवेत गोळी झाडली. जमावातून ललकारी आली, ''भारत माता की-जय' गुलाबराव म्हणाले, 'आम्हाला जखमींना पाणी पाजू द्या' दरोगा म्हणाला, 'वह मर गये है।
गुलाबरावांनी फाटकावर चढून आंत उडी घेतली. त्याचे अनुकरण इतरही करु लागले. गुलाबराव धोतरात पाय अडकून खाली पडले. दरोग्याने मारलेली गोळी त्यांना लागली नाही. त्यांनी तुकडोजी बाबांचे व गांधीजींचे आभार मानले व उठले.
जेव्हा गुलाबरावांनी फाटकावरुन उडी मारली, त्यावेळी दरोग्याने त्यांच्या दिशेने बंदूक वळवून नेम धरला आणि चाप ओढायच्या वेळी एक दगड दाणदिशी त्याच्या हाताजवळ बंदुकीवर बसला. गोळी हवेत उडाली व इन्स्पेक्टर चिडून दगड मारणा-याला हेरु लागला.
परंतु लोकांनी आडोशाला मोर्चेबांधणी केली होती व तेथून दगडाचा मारा सुरु केला. दरोगा व पोलीस दगड कोठून येतात शोध घेऊ लागले. आता फाटकाकडे त्यांचे दुर्लक्ष होते. दगडांचा मारा अचूक होत होता. काय करावे त्यांना सुचत नव्हते.
इकडे दरोग्यावर दगड बरसल्याचे पाहून लोकांची शक्ती वाढली व त्या शक्तीने फाटकावर धडक मारताच फाटक पिलरसहित जमीनदोसत झाले. लोंढा आत घुसला व त्याने पोलीसस्टेशनला वेढा दिला. दगड मारणारे पोलीसांना हलू देत नव्हते. त्यामुळे घुसणारे निर्धाराने घुसले.
इकडे दगड बरोबर लागला की नाही हे पाहण्यासाठी वासुदेव सोनाराने झाडा आडून तोंड बाहेर काढले. दरोगा वेध घेत होता. त्यांची गोळी वासुदेव सोनाराच्या हनुवटीला लागली व भळभळा रक्त जाऊ लागले तसे खंतीतचे कृष्णराव व लोंक धावले व त्यांना सावरले.
गोटमार जोरात सुरु झाली. पोलीस ठाण्यावर गोटमार करणा-या स्त्रिया स्वातंत्र्याच्या इतिहासात कोठेच झाल्या नाहीत. आष्टीला मात्र ते आश्चर्य घडले. स्त्रियांनी राणी लक्ष्मीबाई आणि दुर्गेचे रुप घेतले होते. त्यांच्या हातात गोटयांची शस्त्रे होती. तो देखावा विलक्षण होता.
स्त्रियांवर गोळीबार करणारे पोलीसही आष्टीलाच दिसले. त्यांनी स्त्रियांवर गोळीबार केला. एक गोळी कासाबाईच्या हाताला लागली. ते पाहून मंजुळाबाई धावून आली. कासाबाई गरजली, 'माझ्या रक्ताकडे पाहू नका मरा पण कोणी माघार घेऊ नका' त्यामुळे लोकांना आणखी स्फुरण चढले.
एक गोळी अहिल्याबाईंच्या दंडाला लागली. रक्त येऊ लागले. ती म्हणाली भिऊ नका 'देशासाठी मरण्याची वेळ पुन्हा येत नाही. अरे दुष्मनांनो, आया बहिणीवर गोळया घालतांना तुम्हाला लाज कशी वाटत नाही? तुमच्या बायकांवर गोटमार करुन त्यांना जाळले तर कसे वाटेल? पोलीस मनांत भ्याले.
त्या वाक्याने पोलीस खरोखरीच घाबरले. त्यांच्या गोळया संपल्या होत्या गोटमारीने उग्र रुप धारण केले होते. अहिल्याबाईच्या वाक्याने ते चरकले. दरोग्याला एकटे टाकून ते पळाले. त्यांना प्राणाची भीती होती. कुटुंबियांची काळजी होती. म्हणून जीव वाचविण्यासाठी पळाले.
लालसिंग सर्वात लठ्ठ जमादार होता. त्याच्याजवळ काठी होती. त्याला पळतांना पंजाब मानकरने पाहिले. एक दगड त्याच्या गुडघ्यावर मारला, लालसिंग पडला. त्यांचीच काठी घेऊन त्याला झोडपणे सुरु केले. तिकडे दरोग्याचे लक्ष गेले. त्याने गोळीबार केला. छर्रा पोटरीत घुसला. तसाच पंजाब दवाखान्याकडे पळाला.
पोलीस पळाल्याचे पाहून लोक इमारतीत घुसले. त्यांनी हवालतीचे कुलूप फोडले. पांडुरंग सव्वालाखे आणि मोतीराम होलेला हवालातीत बंद केले होते. त्यांना सोडविले. मोर्चाचे बिकट स्वरुप पाहून त्यांना वाईट वाटले. पोलिसांच्या कुटुंबियांचे काही बरेवाईट होऊ नये म्हणूत ते गेले.
आता दरोगा एकटा होता. 'फूंक दूंगा' म्हणून भिती दाखवीत होता. ते पाहून खडकीच्या हलीलालला वाटले की त्याच्या बंदुकीत गोळीच नाही. तो दरोग्याच्या दिशेने झेपावला. दारोग्याची बंदूक हिसकवण्यासाठी कासाबाई, मनकर्णाबाई, मंजुळाबाई त्याला, 'अरे थांब थांब' म्हणत होत्या.
दरोग्याने ते पाहिले. बंदूक हरीलाल कडे वळली. बंदूक कडाडली. गोळी नेम धरुन बसली. तिने हरीलालचा कंठबिंदू छेदला. त्याने हात आपल्या गळयाला लावला. ते दृष्य भयावह होते. सर्व चिडले, 'आता दरोग्याला जिता ठेवायचा नाही.' एकच आरोळी आली.
हरीलालला धरण्यासाठी मंजुळाबाई, मंजुबाई, शांताबाई धावल्या. त्यांनी त्याला उचललं त्याचे शरीर अखेरचे झटके देत होते. बाया मोठयाने रडल्या. दरोग्याला शिव्याशाप देऊ लागल्या. त्यांचे मातृत्व जागे झाले. पण ! काय उपयोग हरीलालने प्राण सोडला. सर्वत्र एकच आवाज - 'हरीलाल मेला.'
हरीलाल मेल्याचे ऐकताच नत्थोबाचा बाप धावत जाऊन खेकसला. तो झाडा आडून गोटमार करीत होता. म्हाता-याचे हरीलालवर पोराप्रमाणे प्रेम होते. पोरका मुलगा त्याने वागविला होता. पूर्ण खडकी गावचे त्यांच्यावर प्रेम होते. त्यामुळे सर्वजण चवताळले.
आता एकटया दरोग्यावर दगडांचा वर्षाव चारही बाजूंनी होऊ लागला. जीव वाचविण्यासाठी तो जमावाच्या दिशेने जावू लागला. एक महाकाय दगड त्याच्या कपाळावर बसला. कपाळातून रक्त येऊ लागले. तरी तो बंदूक हातातून सोडत नव्हता.
नारायण मुंदानेनं लाठी हाणून त्याची बंदूक पाडली. तो निशस्त्र झाला. त्याचे हात जोडले गेले. हरीलालच्या कंठात गोळी घालणारा तो पापी क्षमा मागत होता. दयेची भीक मागत होता. दया कोणालाही त्याची येत नव्हती, उलट जवळ आल्यामुळे मोठे दगड बरसू लागले.
शेवटी एक मोठा दगड त्याचे टाळक्यावर बसून तो कोसळला. प्रक्षुब्ध जमावाने हातात मिळेल त्या वस्तूने त्याला ठेचले. काठया, लाथा-बुख्या, प्रत्येक जण आपला राग काढत होते. जमाव अनावर होता. खून चढला होता. त्यामुळे दरोग्याचा त्यांनी फडशा पाडला होता.
तिकडे हवालतीतून सुटका झाल्यावर पांडुरंग सव्वालाखे व मोतीराम होले ह्यांनी इन्स्पेक्टरच्या क्वार्टरकडे जाऊन तेथे जमलेल्या सर्व स्त्रियांना सुरक्षित स्थळी चालण्याची विनंती केली. दक्षता म्हणून त्यांना संरक्षण देऊन विवेधर भागीवच्या आवारांतील देवळात नेऊन ठेवला.
पोलीस स्टेशनचा जमावाने ताबा घेतला होता. सव्वालाखे आणि होलेंना सोडविले होते. तेवढयात जयस्वालच्या दुकानातून बापूराव कामडीने काढून दिलेले रॉकेलची पिंपे लोकांना दिसली. ते पोलीस क्वार्टर जाळण्यासाठी नेत होते. काही लोकांनी त्यातील पिंपे घेऊन कागदपत्राला आग लावली. पाहता पाहता स्टेशन पेटले.
तिकडे पोलीस क्वार्टरला आग लावण्यात आली. विनायक जमादार गाद्यांमध्ये लपला होता. लालसिंग व महादेव प्रसाद इंधनाच्या सुडीत होते. सुड पेटवून दिली. विनायक जमादारालाही त्या आगीत टाकण्यात आले. आता जमावाला बेफाम झाला होता.
परंतु गोळीबाराचा सूत्रधार समद मात्र जंगलात पळाला होता. त्याला पाहण्यासाठी लक्ष्मण वाघ, नागोराव मोरे, पांडुरंग खटाळे, शामराव डांगे, उकडया भोयी, दाजीबा मळसणे, कालेखा आघाडीवर होते. नदी नाले, टेकडया तुडवून काढल्या आणि समदचा शोध लावला.
समद सापडल्याबरोबर सर्वजण त्याच्यावर तुटून पडले. त्याचे तंगउे धरुन त्याल फरफटत आणले. त्याच्यावर लाथा बुक्क्या, काठया, दगडाचा मार बसू लागला व तो विनवणी करु लागला. पण ऐकतो कोण! सर्वजण त्याला मिळेल त्या वस्तुने मारत होते.
मार बसूनही समद मरत नाही असे पाहिल्यावर त्याचे हातपाय बांधून त्याला काठीला बांधून बुडविण्यात आले. मेला की नाही हे पाहायचे व पुन्हा डुबवायचे. शेवटी गुदमरुन तो मेला. त्याचे प्रेत तेथेच टाकले. ते कुत्र्यांनी खाल्ले.
रात्री सर्व शहिदांची अन्तयात्रा निघाली. त्याला पूर्ण गाव हजर होते. आष्टी वडाळयांच्या शहीद्यासोबत इन्स्पेक्टरचे प्रेत त्याच्या पत्नीच्या परवानगीने घेतले होते. ही अभूतपूर्व अन्तयात्रा बाकळी नदीच्या काठावर आली.
बाकळी नदीच्या काठावर सरण रचून सर्व शहिदांना एकत्र दहन करण्यात आले. त्याच्या ज्वाला आकाशाला भिडल्या. त्या सांगत सुटल्या-'इस मिट्टीसे तिलक करो, यह धरती है बलिदान की।' सर्वांनी तेथील चिमूटभर माती कपाळाला लावून प्रतिज्ञा केली, 'कोणी कोणाचे नांव सांगणार नाही' सर्व मौन होते. सर्वांना उद्याची काळजी लागली होती.
तेथून सारेजण गांधीचौकात आले. तेथे डॉ. बळीराम मालपे यांचे अध्यक्षतेखाली सभा झाली. सव्वालाखेचे हृदयद्रावक भाषण झाले. देशाला स्वातंत्र्य मिळण्यास आता फारच थोडा अवकाश आहे. तोपर्यंत यातना सहन कराव्या लागतील, पोलीसांचा मार, पोलीस कोठडी फाशी ह्यासाठी सज्ज राहा किंवा भूमिगत व्हा. आष्टीने घडविलेला हा रोमांचक इतिहास सदैव स्मरणात राहील.
क्रांतीदिनी बाकळी नदीच्या काठावर जेथे पंची गोंड, केशव ढोंग, उदेभान कुबडे आणि गोविंद मालपे ह्यांना अग्नी दिला. त्या जागेवर शहीद स्मारक उभे आहे. तेथे रस्त्याने येणारा जाणारा प्रत्येकजण नतमसतक होतो.. ते स्मारक सांगत आहे...
जो शहीद हुये है उनकी जरा याद करो कुरबानी।

परिशिष्ट 1 क्रातीदिन आरोपी व शिक्षा
(5-12-42 ला विशेष न्यायालयातर्फे शिक्षा सुनावण्यात आलेले आरोपी)
फाशी
आरोपी क्र. 2 श्री. पांडुरंग जैराम कलार
आरोपी क्र. 12 श्री. रघुनाथ पांडुरंग कुंभार
आरोपी क्र. 13 श्री. तुळशीराम सखाराम पांचघरे
आरोपी क्र.16 श्री. तुकाराम रामजी मुकदम
आरोपी क्र. 25 श्री. वामन बळीराम तेली
आरोपी क्र. 42 श्री. तुकडयार आनंदराव भोई
आरोपी क्र. 46 श्री. कालेखान विलायतखान
आरोपी क्र. 52 श्री. नत्थु श्रीराम माळी
आरोपी क्र. 60 श्री. माधव श्रावण देशमुख
आरोपी क्र. 89 श्री. गुलाबराव विठ्ठलराव (सिरसोली)
जन्मठेप
आरोपी क्र. 1 श्री. महादेव बळीराम सव्वालाखे
आरोपी क्र. 3 श्री. मोतीराम चैतू गौंड
आरोपी क्र. 6 श्री. काशीराम बळीराम मालपे
आरोपी क्र. 7 श्री. श्रावण जानबा सुतार
आरोपी क्र. 8 श्री. बापुराव कृष्णराव मालपे
आरोपी क्र. 9 श्री. गणपत विठू माळी
आरोपी क्र. 17 श्री. लोद्या कचऱ्या कोतवाल
आरोपी क्र. 20 श्री. विनायक बापूराव ब्राम्हण
आरोपी क्र. 21 श्री. चंपक हमद्या भोई
आरोपी क्र. 22 श्री. उध्या गणपत कासार
आरोपी क्र. 24 श्री. बापूराव माधव तेली
आरोपी क्र. 27 श्री. रामभाऊ शिवराम पाटील
आरोपी क्र. 28 श्री. सुर्यभान शिवराव पाटील
आरोपी क्र. 30 श्री. राजाराम शिवा भोई
आरोपी क्र. 32 श्री. इशराम बापूजी तेली
आरोपी क्र. 33 श्री. इठया सखाराम माळी
आरोपी क्र. 36 श्री. बापूराव नत्थू तेली
आरोपी क्र. 37 श्री. नागो गणपत गुरव
आरोपी क्र. 38 श्री. मारोती राजाराम गुरव
आरोपी क्र. 39 श्री. मल्लीकार्जुन नारायणप्पा गवळी
आरोपी क्र. 40 श्री. माधोराव नारायण मुकदम
आरोपी क्र. 41 श्री. रामा चैतु गोंड
आरोपी क्र. 42 श्री. शंकर तुळशीराम कुणबी
आरोपी क्र. 45 श्री. शिवराम पैकू माळी
आरोपी क्र. 47 श्री. मनिराम लक्ष्मण माळी
आरोपी क्र. 48 श्री. मारोती भानाजी माळी
आरोपी क्र. 49 श्री. बंडयाप्पा सदाशिवआप्पा वाणी
आरोपी क्र. 50 श्री. बाव्या बकाराम जवादे, तेली
आरोपी क्र. 53 श्री. शंकर सदोबा कोष्टी
आरोपी क्र. 55 श्री. बालमुकूंद रामलाल बनिया
आरोपी क्र. 56 श्री. शंकर तुळशीराम माळी
आरोपी क्र. 58 श्री. काशिनाथ माळी
आरोपी क्र. 59 श्री. पांडुरंग रामजी माळी
आरोपी क्र. 61 श्री. शामराव नागोबा माळी
आरोपी क्र. 63 श्री. नामदेव बळीराम सोनार
आरोपी क्र. 64 श्री. नत्थू कृष्णाजी रामे
आरोपी क्र. 66 श्री. कृष्णराव गोविंदराव कुणबी
आरोपी क्र. 75 श्री. नत्थू राघोजी नागपूरे (खडकी)
आरोपी क्र. 76 श्री. जानराव आनंदराव कुणबी (खडकी)
आरोपी क्र. 78 श्री. नारायण धन्नूजी मुंदाने (खडकी)
आरोपी क्र. 79 श्री. चंद्रभान शिवराम नागपुरे (खडकी)
आरोपी क्र. 83 श्री. शामराव राघोजी नागपुरे (खडकी)
आरोपी क्र. 85 श्री. गंगाधर भगवान नागपुरे (खडकी)
आरोपी क्र. 86 श्री. सूर्यभान धनाजी मुंदाने (नरसापूर)
आरोपी क्र. 87 श्री. वामन गोविंद भडके (नरसापूर)
आरोपी क्र. 88 श्री- बांकेराव विठोबाजी भडके (नरसापूर)
आरोपी क्र. 90 श्री. दौलत बालाजी वाघ (सिरसोली)
आरोपी क्र. 92 श्री. विष्णू तात्याजी वाघ (सिरसोली)
आरोपी क्र. 96 श्री. कृष्णराव बळीराम कोहळे (देलवाडी)
आरोपी क्र.101 श्री. तुकाराम बकाराम महार (अंतोरा)
आरोपी क्र.108 श्री. रंगराव व्यंकटराव कुणबी
आरोपी क्र. 109 श्री. पुत्ता मोहनजी कुणबी
आरोपी क्र. 110 श्री. भीमराव राजाराम भिवापुरे कुणबी (किन्हाळा)
आरोपी क्र.114 श्री. बलदेव बाळकृष्ण कुणबी
( नागपूर हायकोर्टात न्यायमूर्ती गिल यांच्या निवाड्यानुसार फाशी-ऐवजी जन्मठेप)
1. श्री पांडुरंग कलार
2. श्री. कलेखान विलायखान
3. श्री माधव देशमुख
4. श्री. गुलाबराव वाघ
(प्रांतीय सरकार द्वारे फाशीऐवजी जन्मठेप)
1. श्री. बकाराम तेली
2. श्री. नत्थू जयराम
3. श्री. रघुनाथ कुंभार
4. श्री. वामन बळीराम तेली
(केंद्रसरकारतर्फे फाशी रद्द 18 ऑगस्ट 1945)
1. श्री. तुळशीराम पाचघरे
2. उकडया आनंदराव भोई
निरनिराळया मुदतीच्या शिक्षा
1) श्री. मणिराम लक्ष्मणराव काळे (आष्टी)
2) श्री. शिवराम पैकाजी लेकुरवाळे (आष्टी)
3) श्री. विठू सखाराम वैराळे (आष्टी)
4) श्री. नामदेव बळीराम कासुलकर (आष्टी)
5) श्री. लक्ष्मण रामजी बोराडे (आष्टी)
6) श्री. नारायण सिताराम विंचूरकर (आष्टी)
7) श्री. नत्थू गोविंद ढोले (आष्टी)
8) श्री. विश्राम बापूजी ढबाले (आष्टी)
9) श्री. नंदलाल मनसुखदास राठी (खंबीत)
10) श्री मनोहर प्रेमसुखदास (खंबीत)
11) श्री महादेव खोडे (खंबीत)
12) आनंद बाळकृष्ण सुतर (खंबीत)
13) श्री. वासुदेव सोनार (खंबीत)
14) श्री. अंबादास नत्थू सोनटक्के (खंबीत)
15) गोपाळराव विठोबा वाघ (सिरसोली सिक्यूरिटी कैद)
16) श्री. नागदेव विठोबा बिजवे
17) श्री. माधव मारोती वैद्य (आष्टी)
18) श्री परमेश्वर कालिकाप्रसाद (खडकी)
19) श्री. साहेबराव पुंजाराम नागपुरे (खडकी)
20) श्री. रामभाऊ लोहे (वडाळा)
21) श्री. झापूजी पोटे (वडाळा)
22) श्री. कृष्णा मास्तर (वडाळा)
23) श्री. नत्थू मास्तर (वडाळा)
24) श्री. दलपतराव कोहळे (वडाळा)
25) श्री. मारोती कृष्णाजी कोहळे (दलनाव)
26) श्री. पंजाबराव मानकर (इत्तमगांव)
27) श्री दामू मारवाडी (अंतोरा)
17 फरारी आरोपी पैकीपकडलेल्या 10 जणांवर समन्स कोर्ट, वर्धा येथे चाललेल्या खटल्याचा निकाल 21-10-1944
1. श्री. अन्ना दौलतराव पाटील, खडकी, निर्दोष मुक्तता
2. श्री. नत्थू बाबूजी कुणबी, वडाळा 3 वर्षे सश्रम कारावास
3. श्री दलपत भगवान कुणबी, वडाळा
4. श्री. रामराव बकाराम कुणबी, वडाळा, निर्दोष मुक्तता
5. श्री मारोती कृष्णाजी कोहळी, देलवाडी, 3 वर्षे सश्रम कारावास
6. श्री. वेंकटी याबलाजी कुणबी, किन्हाळा, निर्दोष मुक्तता
7. श्री मारोती हणमंतराव मराठा, सिरसोली
8. श्री पंजाबराव गणपतराव मानकर, इत्तमगांव, जन्मठेप
9. श्री. गणपती किसन भोई, आष्टी, जन्मठेप
10. श्री. पांडुरंग हिरसा सव्वालाखे, आष्टी, जन्मठेप
निर्दोष मुक्तता
आरोपी क्र. 5 श्री. महादेव चिन्नुजी कलार
आरोपी क्र. 11 श्री. गणपतलाल अयोध्यालाल बनीया
आरोपी क्र. 14 श्री. लक्ष्मणराव बोराडे माळी
आरोपी क्र. 15 श्री. भानुदास बकाराम गालपे
आरोपी क्र. 18 श्री. शामराव विठोबा कुंभार
आरोपी क्र. 19 श्री. महादेव हरी तेली
आरोपी क्र. 26 श्री. नत्थू गोविंद तेली
आरोपी क्र. 29 श्री. रामकृष्णा उकंडया न्हावी
आरोपी क्र. 31 श्री. देविदास उर्फ भैय्या व. ठाकुरदास बनीया
आरोपी क्र. 35 श्री. पंढरीनाथ आत्माराम मुकदम
आरोपी क्र. 43 श्री. आत्माराम लहानू न्हावी
आरोपी क्र. 51 श्री. नाना शंकरआप्पा जंगम
आरोपी क्र. 54 श्री. कालूलाल भवनजीदास बनीया
आरोपी क्र. 57 श्री. नारायण सिताराम सोनार
आरोपी क्र. 65 श्री. गुलाब नारायण माळी
आरोपी क्र. 65 श्री. सित्या बालजी माळी
आरोपी क्र. 67 श्री. राजाराम सिताराम धोबी
आरोपी क्र. 68 श्री. खुशाल भजनसा कलार
आरोपी क्र. 69 श्री. हंसराज तुळशीराम कुनबी
आरोपी क्र. 73 श्री. लहान्या उकडया महार
आरोपी क्र. 74 श्री. शामराव पुंजाजी कुणबी
आरोपी क्र. 80 श्री. तुळशीराम हरीसा सोनार
आरोपी क्र. 82 श्री. गुलाब झांगोजी कुणबी
आरोपी क्र. 84 श्री. परमेश्वर सिताराम कुलवी
आरोपी क्र. 93 श्री. नत्थू जागो मराठा
आरोपी क्र. 95 श्री. पुंडलीक खुशाल कुणबी
आरोपी क्र. 97 श्री. मैपतराव माधवराव कुणबी
आरोपी क्र. 98 श्री. पुंडलीक माधवराव कुणबी
आरोपी क्र. 100 श्री. गुणवंत बापुराव कुणबी
आरोपी क्र. 107 श्री. मुरारी इश्रामजी कुणबी
आरोपी क्र. 112 श्री. दामोधर आनंदलाल मारवाडी
आधार
1) बंडखोर खेडयांची गोष्ट - ले. रमेश गुप्ता, प्रकाशक, रामकृष्ण आप्पा गंजीवाले
2) आष्टी स्वातंत्र्य संग्राम - ले. प्रा. रघुनाथ कडवे.