Tuesday 25 November 2014


                    राष्‍ट्रपतींच्‍या आगमनासाठी वर्धा नगरी सज्‍ज      
      
Ø  राष्‍ट्रपतींच्‍या वर्धा दौ-याची तयारी पूर्ण
Ø  विभागीय आयुक्‍तांनी घेतला आढावा
Ø  सेवाग्राम आश्रमात राष्‍ट्रपती करणार वृक्षारोपण
Ø आश्रम प्रतिष्‍ठानतर्फे राष्‍ट्रपतींचे स्‍वागत
Ø बजाजवाडीला भेट

वर्धा,दि.25 – राष्‍ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्‍या वर्धा येथील कार्यक्रमाप्रसंगी अचूक नियोजन करुन  संपूर्ण कार्यक्रम यशस्‍वी करा अशा सुचना विभागीय आयुक्‍त  अनुपकुमार यांनी आज दिल्‍यात. वर्धा शहरातील सर्व रस्‍ते तसेच सेवाग्राम परिसरही संपूर्ण स्‍वच्‍छ राहील यासाठी नगर परिषदेने तात्‍काळ  उपाययोजना कराव्‍यात असेही त्‍यांनी यावेळी सांगितले.
राष्‍ट्रपती  यांच्‍या  वर्धा येथील आगमण तसेच विविध कार्यक्रमाच्‍या  नियोजना संदर्भात व सुरक्षेसंदर्भातील आढावा विभागीय आयुक्‍त अनुपकुमार तसेच विशेष पोलीस महानिरीक्षक सुरक्षा जयजितसिंग, राज्‍य गुप्‍तवार्ता विभागाचे उप आयुक्‍त रंजन शर्मा,जिल्‍हाधिकारी  एन.नवीन सोना, जिल्‍हा पोलीस अधिक्षक अनिल पारस्‍कर, मुख्‍य कार्यपालन अधिकारी  उदय चौधरी, शिक्षा मंडळाचे अधिकारी  संजय भार्गव, आश्रम प्रतिष्‍ठानचे अध्‍यक्ष जयंत मटकर, निवासी उपजिल्‍हाधिकारी  संजय गाढे आदी वरिष्‍ठ अधिकारी उपस्थित होते.
राष्‍ट्रपती  प्रणव मुखर्जी यांचे बुधवार दिनांक 26 नोव्‍हेंबर रोजी दुपारी 2.15 वाजता आगमन होत असून, हेलीपॅडवर स्‍वागतासह कार्यक्रमस्‍थळी  जाण्‍याची व्‍यवस्‍था तसेच सुरक्षा व्‍यवस्‍था  आणि स्‍वागतासाठी  निमंत्रीतांची यादी  याबाबत विभागीय  आयुक्‍त  अनुपकुमार यांनी आढावा घेतला. राष्‍ट्रपती  बजाजवाडीला भेट देणार असून बजाजवाडी  येथील  ऐतिहासीक असलेले जमनालालजी बजाज या वास्‍तुला स्‍वातंत्र्य आंदोलनातील विविध महनीय व्‍यक्‍तींनी  भेट  दिली आहे. येथे  पंडित जवाहरलाल नेहरु  तसेच नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्‍यासाठी  विशेष खोल्‍या  आहेत. तसेच कमलनयन बजाज, डॉ. राजेंद्रप्रसाद, सरदार वल्‍लभभाई  पटेल, पंडित जवाहरलाल नेहरु, श्रीमती इंदिरा गांधी, आचार्य कृपलानी  यांचे दुर्मिळ  छायाचित्र या वास्‍तुत लावण्‍यात आले आहेत.
1938 मध्‍ये  कॉंग्रेस अध्‍यक्ष  सुभाषचंद्र बोस यांचे स्‍वागताप्रसंगी सरदार वल्‍लभभाई पटेल, जवाहरलाल नेहरु, आचार्य कृपलानी यांचे दुर्मिळ छायाचित्र या वास्‍तुत असून राष्‍ट्रपती प्रणव मुखर्जी येथे भेट देणार आहेत. राष्‍ट्रपतींच्‍या  भेटीप्रसंगी करण्‍यात आलेल्‍या  व्‍यवस्‍थेचा आढावा घेवून विभागीय आयुक्‍त  अनुपकुमार यांनी घेतला. त्‍यानंतर   विज्ञान केंद्र  येथेही राष्‍ट्रपती  भेट देणार आहेत.
 शिक्षा मंडळाचा शतकमहोत्‍सवी  समारंभ जी.एस.कॉमर्स कॉलेजच्‍या प्रांगणात आयोजीत करण्‍यात आला आहे. येथे उभारण्‍यात आलेला भव्‍य सभा मंडप व सुरक्षेसंदर्भात करण्‍यात आलेली व्‍यवस्‍था निमंत्रितांसाठी तसेच राष्‍ट्रपती  यांच्‍या  कार्यक्रमानिमीत्‍त दिल्‍लीहून येणा-या वरिष्‍ठ अधिकारी, लोकप्रतिनिधी यांच्‍या  आसन व्‍यवस्‍थेचाही  आढावा त्‍यांनी घेतला. राष्‍ट्रपती  यांच्‍या आगमणाप्रसंगी  प्रोटोकॉलनुसार करावयाच्‍या  सुविधा  तसेच वाहतूक, दूरध्‍वनी, आवश्‍यक सुरक्षा  आदी व्‍यवस्‍थेबाबतही  माहिती देण्‍यात आली.
                                    सेवाग्राम आश्रमाला भेट
            राष्‍ट्रपती  प्रणव मुखर्जी  सेवाग्राम येथील महात्‍मा  गांधी यांच्‍या आश्रमाला भेट देणार असून आदि निवास, बापू कुटी तसेच परिसरातील पाहणी करुन महात्‍मा  गांधी  यांच्‍या दैनंदिन वापरातील वस्‍तुंची  पाहणी करणार आहेत. तसेच प्रार्थनेतही  सहभागी होणार आहेत. आश्रम परिसरात राष्‍ट्रपतींच्‍या  हस्‍ते  वृक्षारोपण करण्‍यात येवून  जिल्‍हा प्रशासनातर्फे  तयार करण्‍यात आलेल्‍या  सेवाग्राम विकास आराखड्याची  माहिती  राष्‍ट्रपतींना देण्‍यात येणार आहे. सेवाग्राम विकास आराखड्याच्‍या अंमलबजावणीसाठी जिल्‍हा प्रशासनातर्फे सुरु असलेल्‍या  प्रयत्‍नांबाबतही  येथे जिल्‍हाधिकारी  एन.नवीन सोना सादरीकरण करणार आहेत.
सेवाग्राम आश्रम प्रतिष्‍ठानचे अध्‍यक्ष जयंत मटकर तसेच सर्व पदाधिकारी राष्‍ट्रपतींचे  सुतमाला घेवून स्‍वागत  करतील व पुस्‍तकांची  भेट  देतील. यावेळी  राज्‍यपाल  सी. विद्यासागर राव, मुख्‍यमंत्री  देवेंद्र फडणवीस, केन्‍द्रीय  भुपृष्‍ठ  वाहतूक मंत्री  नितीन गडकरी आदी राष्‍ट्रपतींच्‍या  समवेत उपस्थित  राहणार आहेत.
जिल्‍हाधिकारी  एन.नवीन सोना व जिल्‍हा  पोलीस अधिक्षक अनिल पारस्‍कर यांनी राष्‍ट्रपतींच्‍या दौ-यानिमीत्‍त  प्रशासकीय  तसेच सुरक्षा व्‍यवस्‍थेसंबंधात केलेल्‍या  व्‍यवस्‍थेसंदर्भात  यावेळी  माहिती दिली.
सेवाग्राम आश्रम अभ्‍यागतांसाठी  बंद
            राष्‍ट्रपती  प्रणव मुखर्जी  बुधवार दिनांक 26 नोव्‍हेंबर रोजी  सेवाग्राम आश्रमाला भेट देणार असून सुरक्षेच्‍या  दृष्‍टीने  सेवाग्राम आश्रम सकाळी  10 ते सायंकाळ पर्यंत अभ्‍यागतांसाठी  बंद राहील. परंतू  सकाळची प्रार्थना व त्‍यानंतर आश्रम परिसर अभ्‍यागतांना पाहता येईल. राष्‍ट्रपती महोदयांच्‍या आगमणाप्रसंगी केवळ सुरक्षेच्‍या कारणास्‍तव व अभ्‍यागतांना त्रास होवू नये म्‍हणून  बंद राहणार असल्‍याची  माहिती  आश्रम प्रतिष्‍ठाणचे  अध्‍यक्ष जयंत मटकर यांनी  यावेळी दिली.
                                                                00000000



                                               
                    राष्‍ट्रपती प्रणव मुखर्जी यांचे बुधवारी आगमण

                                    शिक्षा मंडळाचा शताब्‍दी समारोह
                             सेवाग्राम आश्रमाला भेट

वर्धा, दि. 24 – राष्‍ट्रपती प्रणव मुखर्जी यांचे बुधवार दिनांक 26 नोव्‍हेंबर रोजी दुपारी 2.15 वाजता  विशेष हेलीकॉप्‍टरने नागपूर येथून आगमण होत आहे.
राष्‍ट्रपती  दुपारी 14.30 वाजता बजाजवाडी येथे भेट देणार असून दुपारी 2.45 वाजता बजाज सायन्‍स सेंटर येथे आयोजीत प्रदर्शनाला भेट देवून पाहणी करणार आहेत. दुपारी 3.05 मिनीटानी जी.एस.कॉमर्स कॉलेजच्‍या प्रांगणावर आयोजीत वर्धा शिक्षण मंडळाच्‍या शताब्‍दी समारोह कार्यक्रमास उपस्थित राहून दुपारी 4.10 वाजता सेवाग्राम आश्रमाकडे प्रयाण करतील. दुपारी 4.10 ते 4.25 पर्यंत सेवाग्राम आश्रमाला भेट देतील तसेच सामुहिक प्रार्थनेत सहभागी होतील. राष्‍ट्रपतींच्‍या हस्‍ते वृक्षारोपण झाल्‍यानंतर  सेवाग्राम विकास आराखड्याची पाहणी करतील. दुपारी 4.25 वाजता सेवाग्राम आश्रम येथून हेलीपॅडकडे प्रयाण करतील व दुपारी 4.45 वाजता येथून विशेष हेलीकॉप्‍टरने नागपूरसाठी प्रयाण करतील.
                                                00000000
                           मुख्‍यमंत्री  देवेंद्र फडणवीस यांचे
        बुधवारी आगमण
        वर्धा, दिनांक 24 – मुख्‍यमंत्री देवेंद्र फडणवीस  यांचे बुधवार दिनांक 26 नोव्‍हेंबर रोजी  नागपूर येथून दुपारी  2.15 वाजता विशेष हेलीकॉप्‍टरने आगमण होईल.
          राष्‍ट्रपती  यांच्‍या  वर्धा येथील कार्यक्रमांना उपस्थित राहतील. दुपारी 3 वाजता बजाजवाडी येथे आगमण होईल. दुपारी 3.20 वाजता  बजाजवाडी येथून मा. राष्‍ट्रपती यांच्‍यासमवेत जी.एस.कॉमर्स कॉलेज येथील शिक्षा मंडळाच्‍या शताब्‍दी  समारोहास उपस्थित राहतील. दुपारी 4.15 वाजता सेवाग्राम आश्रम येथे भेट देतील व दुपारी 4.45 वाजता भारतीय हवाईदलाच्‍या विशेष हेलीकॉप्‍टरने राष्‍ट्रपती  महोदयांच्‍या  सोबत नागपूरसाठी प्रयाण करतील.
                                              0000000
                                     केन्‍द्रीय भुपृष्‍ठ परिवहन मंत्री
                         नितीन गडकरी यांचे आगमण
          वर्धा,दि. 24 – केन्‍द्रीय भुपृष्‍ठ  परिवहन मंत्री   नितीन गडकरी यांचे दुपारी 2.15 वाजता विशेष हेलीकॉप्‍टरने वर्धा येथे आगमण होत आहे. दुपारी  3 वाजता शिक्षा मंडळाच्‍या शताब्‍दी समारोहास उपस्थित राहतील. दुपारी  4.20 वाजता येथून हेलीकॉप्‍टरने नागपूरकडे प्रयाण करतील.

                                                  00000000