Thursday 5 May 2016

निम्‍न वर्धा प्रकल्‍पाचे काम तत्‍काळ पूर्ण करा
                                  - गिरीष महाजन
Ø   जमीन अधिग्रहणासोबत शेतक-यांना मोबदला द्या
Ø   शेतापर्यंत पाणी पोह‍चविण्‍यासाठी पाटचा-याची कामे
Ø   प्रकल्‍प पूर्ण करण्‍यासाठी 500 कोटी रुपये
Ø   पहिल्‍या टप्‍प्‍यात 140 द.घ.मी.पाणी साठविणार
Ø   मार्च 18 पर्यंत पूर्ण क्षमतेने जलसाठा
               वर्धा. दि 5 - निम्‍न वर्धा प्रकल्‍प पूर्ण करण्‍यासाठी यावर्षी पाचशे कोटी रुपयांची तरतूद करण्‍यात आली असून जमिनीचे अधिग्रहण व शेतक-यांना मोबदला तसेच पाटचा-याची कामे प्राधान्‍याने पूर्ण करा, अशा सूचना राज्‍याचे जलसंपदा मंत्री गिरीष महाजन यांनी आज निम्‍न वर्धा प्रकल्‍पाला भेट देऊन पाहणी केली त्‍याप्रसंगी दिल्‍यात.
              यावेळी आमदार रणजित कांबळे, जलसंपदा विभागाचे प्रधान सचिव आय. एस. चहल मुख्‍य अभियंता संजय सुर्वे, अधीक्षक अभियंता श्री. गवळी , दत्‍तात्रय रब्‍बेवार, श्री. मंडवार आदी अधिकारी उपस्थित होते.
              निम्‍न वर्धा प्रकल्‍पांतर्गत पाणयाखाली येणारे क्षेत्रातील जमीन अधिग्रहणाचे काम जलद गतीने पूर्ण करुन त्‍यांना तत्‍काळ मोबदला देण्‍याच्‍या सूचना देताना जलसंपदा मंत्री गिरीष महाजन म्‍हणाले की, पहिल्‍या टप्‍प्‍यात यावर्षी 140 द.ल.घ.मी. पाणी व मार्च 18 पर्यंत 217  द.ल.घ.मी. जलसाठा निर्माण करा, यासाठी कालबद्ध कार्यक्रम तयार करा, अशाही सूचना यावेळी  दिल्‍या.
            शेतक-यांच्‍या शेतापर्यंत पाणी पोहचवून त्‍यांना प्रत्‍यक्ष लाभ देण्‍यासाठी  पाटचा-याची कामे पूर्ण करतानाच पाण्‍याचा अपव्‍यय टाळण्‍यासाठी बंद पाईपलाईनचा वापर तसेच ठिबक सिंचन पद्धतीचा जास्‍तीत जास्‍त वापर करण्‍यासंदर्भात प्रायोगिक प्रकल्‍प राबवा, असेही जलसंपदा मंत्री गिरीष महाजन यांनी  सांगितले.
          
           प्रकल्‍पासाठी तसेच पाणी वितरिका पूर्ण करण्‍यासाठी जमिनीचे अधिग्रहण करतानाच थेट खरेदी पद्धतीचा अवलंब करताना शेतक-यांना विश्‍वासात घेऊन सिंचनामुळे होणा-या लाभाबाबतही माहिती द्या, असेही जलसंपदा मंत्र्यांनी सांगितले.
           पुलगाव बॅरेजचे काम सुरु
           वर्धा नदीवर जलसाठा निर्माण करुन सिंचनासाठी उपयुक्‍त ठरणा-या पुलगाव बॅरेजच्‍या कामांना मान्यता मिळाली असून कामाला सुरुवात झाली आहे. खर्डा बॅरेज तसेच आर्वी उपसा योजनेच्‍या कामासाठी निधी उपलब्ध करुन देण्‍यात येणार असल्‍याचे यावेळी सांगितले.
          आमदार रणजित कांबळे यांनी निम्‍न वर्धा प्रकल्‍पातील मुख्‍य कालवा तसेच पाटचा-या प्राधान्‍याने पूर्ण करण्‍यासाठी जमिनीचे अधिग्रहण कामाला गती द्यावी. तसेच शेतक-यांना प्राधान्‍यांना योग्‍य मोबदला देण्‍याची सूचना केली. शेतक-यांना सिंचनासाठी पाणी उपलब्‍ध करुन देण्‍यासाठी पाटचा-याचे कामे आवश्‍यक असल्‍याचे त्‍यांनी सांगितले. जलसंपदा विभागाचे प्रधान सचिव श्री. चहल यांनी प्रकल्‍पाचे काम, मुख्‍य पाणी वितरिका तसेच पुलगाव खर्डा बॅरेज व आर्वी उपसा योजनेच्‍या कामाचे प्रस्‍ताव तयार करा, यासाठी आवश्‍यक निधीची मागणी करण्‍यात येईल, असे सांगितले. मुख्‍य अभियंता संजय सुर्वे यांनी प्रकल्‍पाच्‍या कामाबद्दल माहिती दिली. मान्‍यवरांचे स्‍वागत अधीक्षक अभियंता श्री. गवळी , दत्‍तात्रय रब्‍बेवार, श्री. मंडवार यांनी केले. सहायक कार्यकारी अभियंता श्री. हासे, गणेश गोडे, इरफान शेख, इमरान राही, विजय नाखले, सुहास पाटील, रमण लायचा, पंकज लोखंडे आदी अभियंता उपस्थित होते.

*****
जिल्ह्यात 17 कृषी रथांद्वारे
कृषी योजनांची जागृती
Ø  कृषी जागृती सप्‍ताहाचा उत्‍साहात प्रारंभ
            वर्धा, दि. 4 : खरीप हंगामात पीक उत्‍पादन वाढीसाठी करावयाच्‍या उपाययोजना, पंतप्रधान पीक विमा योजना, गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना, जलयुक्‍त शिवार व मागेल त्‍याला शेततळे या योजनांची माहिती जिल्‍हयातील सर्वसामान्‍य शेतक-यांपर्यंत पोहचविण्‍यासाठी 17 कृषी रथ तयार करण्‍यात आले आहेत. जिल्‍हयातील सर्व गावातून फिरणार असल्‍याने शेतक-यांनी त्‍याचा फायदा घ्‍यावा, असे आवाहन जिल्‍हा अधीक्षक कृषी अधिकारी ज्ञानेश्‍वर भारती यांनी केले आहे.
            खरीप हंगामाच्‍या पूर्व तयारीसाठी दिनांक 7 मेपर्यंत कालावधीत जिल्‍हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयामार्फत कृषी जागृती सप्‍ताहाचे आयोजन करण्‍यात आलेले आहे. दि. 1 मे 2016 या महाराष्‍ट्र दिनाचे औचित्‍य साधून वर्धा जिल्‍हयातील आठही तालुक्‍याच्या ठिकाणाहून कृषी जागृती सप्‍ताह उत्‍साहात सुरुवात झाली.
            वर्धा येथे खासदार रामदास तडस यांनी कृषी रथाला हिरवी झेंडी दाखविली व कृषी सप्‍ताहाचे उद्घाटन केले. यावेळी आमदार डॉ.पंकज भोयर व इतर मान्‍यवर उपस्थित होते. सेलू येथे आमदार  डॉ. पंकज भोयर यांनी,आर्वीत आमदार अमर काळे ,हिंगणघाट येथे आमदार समीर कुणावार यांनी कृषी रथास हिरवी झेंडी दाखवून कृषी जागृती सप्‍ताहाचे उद्घाटन केले.  देवळीत सभापती गुलाबराव डफरे, समुद्रपूर येथे उपसभापती श्री. वांदिले, कारंजा येथे  सभापती श्रीमती खोडे तर आष्‍टी येथे नगरसेवक सुरेश काळबांडे यांनी सप्‍ताहाचे उद्घाटन केले. सप्‍ताहांतर्गत सर्व गावांमधील कृषी विभागाच्‍या योजनेचा रथ फिरणार आहे. तरी जास्‍तीत जास्‍त शेतक-यांनी कृषी विभागाच्‍या योजनांचा लाभ घ्‍यावा, असे आवाहन जिल्‍हा अ‍धीक्षक कृषी अधिकारी ज्ञानेश्‍वर भारती यांनी केले आहे.
                        समाधान शिबिरात कृषी जागृती रथाला हिरवी झेंडी
          कृषी विभागाच्‍या विविध योजनांची प्रसिध्‍दी चित्ररथाच्‍या माध्‍यमातून सर्वदूर व्‍हावी सामान्‍यांना योजनेची माहिती होऊन योजनेचा लाभ व्‍हावा, या उद्देशाने तालुका कृषी अधिकारी कार्यालयामार्फत कृषी जागृती चित्ररथाव्‍दारे करण्यात आला आहे. या जागृती चित्ररथाचा शुभारंभ खासदार रामदास तडस, आमदार पंकज भोयर यांच्‍याहस्‍ते वर्धा येथील समाधान शिबिरात हिरवी झेंडी दाखवून करण्‍यात आला.

*****
जिल्‍ह्यात दोन कोटी वृक्ष लागवड
                                             - आशुतोष सलिल
Ø वृक्षारोपण मोहिमेत सहभागी व्‍हा
Ø 1 जुलैपासून वृक्षारोपण मोहीम
            वर्धा, दि.2 – पावसाळ्यापूर्वी जिल्‍ह्यात वृक्षारोपण मोहिमेच्‍या माध्‍यमातून दोन लक्ष वृक्षलागवड करण्‍यात येणार असून वृक्षारोपण मोहिमेत सर्वांनी सहभागी होण्‍याचे आवाहन जिल्‍हाधिकारी आशुतोष सलिल यांनी केले आहे.
            हवामानातील बदल तसेच उष्‍णतेमध्‍ये होणारी वाढ याची तीव्रता व परिणामकारकता कमी करण्‍यासाठी वृक्षारोपण व वृक्षसंवर्धन अत्‍यंत आवश्‍क आहे. पावसाळयापूर्वी जिल्‍हयात दोन कोटी वृक्ष लावून त्‍याचे संवर्धन करण्‍याचा संकल्‍प जिल्‍हास्‍तरावर घेण्‍यात आला आहे.
            वनमहोत्‍सवाचे आयोजन 1 जुलै रोजी करण्‍यात येणार असून एकाच दिवशी 2 कोटी वृक्ष लागवड करण्‍यात येणार आहे. मुख्‍यमंत्री  देवेंद्र फडणवीस व वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी जिल्‍हास्‍तरावर वनमहोत्‍सव आयोजित करुन मोठयाप्रमाणात वृक्षारोपण करण्‍याचे आवाहन केले आहे. सामाजिक वनीकरण विभागातून वृक्षारोपनासाठी दोन कोटी वृक्ष उपलब्‍ध करुन देण्‍यात येणार आहेत.
            वृक्षारोपण मोहिमेसाठी सर्व विभागप्रमुखांना उद्दिष्‍ट निश्चित करुन देण्‍यात आले असून त्‍यानुसार वृक्षारोपणाचा आराखडा तसेच पूर्व तयारी करावयाची आहे. यासाठी सामाजिक व शैक्षणिक संस्‍थांचा सहभाग घेण्‍यात येणार आहे. वर्धेत निसर्ग सेवा समितीतर्फे वृक्षारोपण करण्‍यासाठी तालुकास्‍तरावर सुद्धा  नियोजन करुन दोन कोटी वृक्ष लागवडीचे उद्दिष्‍टाचे  पूर्ण करण्‍यात येणार आहे.
            एकाच दिवशी दोन कोटी वृक्ष लावण्‍यासाठी सार्वजनिक बांधकाम, जलसंपदा, वनविभाग, जिल्‍हा परिषद, महसूल, महात्‍मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजना, आरोग्‍य विभाग, सामाजिक वनीकरण, कृषी व फलोत्‍पादन विभाग सहकार, पणन आदी विभागांची जबाबदारी असून महिला बचतगट व विद्यार्थ्‍यांयाही  यासाठी सहभाग घेण्‍यात येणार आहे. 1 कोटी 50 हजाऱ वृक्ष वनविभाग व सामाजिक वनीकरण विभागातर्फे लावण्‍यात येणार आहेत. 50 लक्ष वृक्ष लावण्‍याची जबाबदारी खाजगी संस्‍था, उद्योजक, लोक प्रतिनिधी यांच्‍या सहकार्याने पूर्ण होणार आहे. सामाजिक वनीकरण विभागाकडे 1 लक्ष 20 हजार 639 रोपे विविध रोपवाटिकेमध्‍ये उपलब्‍ध आहेत. तसेच जिल्‍ह्यातील खाजगी रोपवाटिकेत 4 लक्ष रोपे उपलब्‍ध आहेत.
            वन विभागाच्‍या नर्सरीत विविध प्रजातीची रोपे मोठयाप्रमाणात उपलब्‍ध आहेत. 1 जुलै रोजी 2 कोटी वृक्ष लागवड करण्‍यासाठी सर्वांनी आपला सहभाग नोंदवून ही मोहीम यशस्‍वी करावी, असे आवाहन जिल्‍हाधिकारी आशुतोष सलिल यांनी केले आहे.
0000000


समन्वयातूनच जिल्ह्याचा सर्वांगीण विकास
-            आशुतोष सलील
Ø  सीईओ संजय मीना यांना प्रशासनातर्फे भावपूर्ण निरोप
वर्धा, दि. 3 : शासनाच्या विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी जिल्हा प्रशासनासोबत जिल्हा परिषद तसेच जिल्हा पोलिस अधीक्षक यांच्यामध्ये समन्वय असल्यास जिल्ह्याचा सर्वांगीण विकास सहजपणे होऊ शकतो. मुख्य कार्यपालन अधिकारी संजय मीना यांनी ग्रामीण विकासात विविध योजना प्रभावीपणे राबविल्यामुळे राज्यस्तरावर जिल्ह्याचा गौरव झाला असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी  आशुतोष सलील यांनी केले.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात मुख्य कार्यपालन अधिकारी संजय मीना यांची अकोला येथील महाबीज येथे बदली  झाल्याबद्दल जिल्हा प्रशासनाच्या वतीने भावपूर्ण निरोप देण्यात आला. त्याप्रसंगी  श्री. सलील बोलत होते. यावेळी जिल्हा पोलिस अधीक्षक अंकित गोयल, प्रभारी मुख्य कार्यपालन अधिकारी प्रमोद पवार, निवासी उपजिल्हाधिकारी वैभव नावडकर, उप मुख्य कार्यपालन अधिकारी श्री. इलमे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी ज्ञानेश्वर भारती तसेच जिल्हा माहिती अधिकारी अनिल गडेकर, जिल्हा नियोजन अधिकारी प्रकाश डायरे, उप वनसंरक्षक श्री. पगार आदी उपस्थित होते.
संजय मीना यांनी वर्धा येथे यशवंत समृद्ध ग्राम योजना तसेच निर्मल ग्राम योजना उत्कृष्ट काम केल्याने जिल्ह्याचा राज्यस्तरावर गौरव झाला आहे. जलयुक्त शिवार अभियानातही केलेल्या कामामुळे वर्धा जिल्ह्याचे राज्यात उत्कृष्ट योगदान राहिले आहे. संजय मीना यांनी जिल्हा प्रशासनासोबत सातत्याने समन्वय साधून केलेल्या कामाबद्दल जिल्हाधिकारी आशुतोष सलील यांनी गौरोवद् गार काढून नवीन पदावरील कार्यकाळाशी यशस्वी राहण्याबद्दल शुभेच्छा दिल्या.
संजय मीना यांना जिल्हा प्रशासनातर्फे शाल, श्रीफळ व भेट वस्तू देऊन जिल्हाधिकारी आशुतोष सलील व जिल्हा पोलिस अधीक्षक अंकित गोयल यांनी सत्कार केला.
जिल्हा पोलिस अधीक्षक अंकित गोयल यांनी  प्रशासनासोबत कायम समन्वय ठेवून येणाऱ्या अडचणी सोडविण्यासाठी सातत्याने सहकार्य केले आहे. जिल्ह्याच्या विकासासाठी त्यांचे योगदान महत्त्वाचे असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
यावेळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी ज्ञानेश्वर भारती, जिल्हा नियोजन अधिकारी प्रकाश डायरे, जिल्हा माहिती अधिकारी अनिल गडेकर, निवासी उप जिल्हाधिकारी वैभव नवाडकर उप वनसंरक्षक श्री. पगार यांनी  संजय मीना यांच्या कार्याचा गौरव करुन शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाचे संचालन उप मुख्य कार्यपालन अधिकारी  श्री. इलमे यांनी तर आभार प्रदर्शन महिला व बाल कल्याण विभागाचे उप मुख्य कार्यपालन अधिकारी श्री. मेसरे यांनी मानले. यावेळी विविध विभागांचे विभाग प्रमुख, जिल्हा परिषदेचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

*****
शेतक-यांना पीककर्जासाठी अकराशे कोटी रूपये वाटपाचे ध्येय ठरवा
-         किशोर तिवारी
Ø 80 टक्के शेतक-यांना 31 मेपूर्वी कर्ज वाटप प्रक्रिया पूर्ण करा
Ø मागेल त्याला पीक कर्ज, तालुकास्तरावर कर्ज मेळावे
Ø शेतक-यांना सातबारा आठ घरपोच मिळणार
Ø कर्जाचे पुनर्गठन करून सर्व शेतक-यांना पीककर्ज द्या
             वर्धा, दिनांक 30 – अडचणीत सापडलेल्या शेतक-यांना खरीप हंगामासाठी सर्व बँकांनी 80 टक्के शेतक-यांना 31 मेपूर्वी कर्ज उपलब्ध करून देण्याचे नियोजन करावे, यासाठी तहसील कार्यालयातर्फे शेतक-यांच्या याद्या, तसेच सातबारा आठ कागदपत्रे उपलब्ध करून देण्यात येतील, शेतक-यांना अकराशे कोटी रुपये पीक कर्ज उपलब्ध करून देण्याचा सर्व बँकांनी संकल्प करावा, असे प्रतिपादन वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी केले.
           विकास भवन येथे राष्ट्रीयकृत खासगी बँकेच्या 138 बँक व्यवस्थापक, तालुकास्तरावरील महसूल, कृषी, सहकार आदी अधिका-यांची खरीप हंगामासाठी पीक कर्ज वाटपासंदर्भात संयुक्त बैठक आयोजित करण्यात आली होती. त्याप्रसंगी मार्गदर्शन करताना किशोर तिवारी बोलत होते. यावेळी आमदार कुणावार, प्र.जिल्हाधिकारी दीपक नलवडे, जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक विजय जांगडा, माजी खासदार सुरेश वाघमारे, प्रशांत इंगळे तिगावकर, निवासी उपजिल्हाधिकारी वैभव नावडकर, नाबार्डच्या श्रीमती स्नेहल बन्सोड यावेळी उपस्थित होत्या.
शेतक-यांना खरीप हंगामासाठी मागील वर्षी केवळ 40 टक्के शेतक-यांना पीककर्ज उपलब्ध करून देण्यात आले होते. परंतु यावर्षी 80 टक्के शेतक-यांना खरीपासाठी पीक कर्ज उपलब्ध करून देण्याचे नियोजन करावे, अशी सूचना करताना किशोर तिवारी म्हणाले, की शासनाने पीककर्जाचे पुनर्गठन करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय्घेतला असल्यामुळे राष्ट्रीयकृत बँकांनी 31 मेपूर्वी प्रत्येक शेतक-याला कर्ज पुरवठा होईल, यादृष्टीने सकारात्मक भूमिका घ्यावी, असेही त्यांनी सांगितले.
                वर्धा जिल्ह्यासाठी 700 कोटी रुपये कर्जाचे उद्दीष्ट ठरविण्यात आले आहे,परंतु 1 लाख 96 हजार शेतक-यांपर्यंत पीक कर्ज उपलब्ध करून द्यायचे असेल तर 1100 कोटी रुपयांपर्यंत कर्ज पुरवठा करणे आवश्यक आहे. यासाठी तहसीलदारांकडून गावनिहाय शेतक-यांची यादी तसेच त्यासोबत सातबारा आठ हा नमुना बँकांना उपलब्ध करून द्यावा, अशी सूचनाही यावेळी त्यांनी केली.
                शेतक-यांना कर्जपुरवठ्यासाठी तालुकानिहाय कर्ज मेळावा घेण्याची सूचना करताना तहसीलदार, गटविकास अधिकारी, तलाठी कृषी सहायक यांनी तालुकानिहाय यादी करून शेतक-यांना आवश्यक असलेले कागदपत्रे तयार करून बँकांना उपलब्ध करून द्यावेत. कर्ज मिळण्यासाठी विलंब होणार नाही, यादृष्टीने महसूल यंत्रणा बँकेच्या शाखा प्रमुखांमध्ये समन्वय ठेवावा, कोरडवाहू शेतकरी, अल्पभूधारक, सिलिंगमध्ये मिळालेले जमीनधारक तसेच पंतप्रधान पीक विमा योजनेत सहभागी झालेल्या शेतक-यांना प्राधान्य द्यावे असेही यावेळी किशोर तिवारी यांनी सांगितले.
             शेतक-यांना पीक कर्जाचे पुनर्गठन झाल्यानंतर पूर्ण कर्ज मिळेल, याची हमी घेण्याची सूचना आमदार समीर कुणावार यांनी केली. तसेच बँकांनी मागेल त्याला पीककर्ज यानुसार जास्तीत जास्त शेतकरी खातेदारांपर्यंत पोहचवून कर्ज पुरवठा करावा. शेतक-यांना 1 लाखापेक्षा जास्त कर्ज घेताना कर्जासाठी मॉडगेज करावे लागते, त्यासाठी येणारा खर्च शेतक-यांना भूर्दंड असल्यामुळे ही मर्यादा 10 लाखांपर्यंत वाढवावी,यासाठी मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांना भेटून शेतक-यांसाठी सुलभ धोरण ठेवण्याचा आग्रह करण्यात येणार असल्याचे आमदार समीर कुणावार यांनी सांगितले.
             प्र.जिल्हाधिकारी श्री.नलवडे यांनी 80 टक्के शेतक-यांना पीक कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी बँकांनी पूर्वतयारी करावी, यासाठी तालुकास्तरावर 7 मेपासून कर्ज मेळावे घेण्यात येणार आहेत, 1 मे रोजी होणा-या ग्रामसभेमध्ये पीककर्जाचे पुनर्गठन दुष्काळी परिस्थितीत राबविण्यात येणा-या विविध योजनांची माहिती ग्रामस्थ शेतक-यांना द्यावी, अशी सूचना केली. लीड बँकेचे मॅनेजन विजय जांगडा यांनी शेतक-यांना कर्ज पुरवठा करण्यासाठी सर्व बँकांनी पूर्वनियोजन केले असून 80 टक्के शेतक-यांना कर्जपुरवठा करण्याची तयारी आहे. आतापर्यंत 17 कोटी रुपयांचे वाटप पूर्ण झाले असल्याचेही त्यांनी सांगितले.
             पीक कर्जाचे प्रमाण 80 टक्क्यांपर्यंत वाढविण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार कर्ज घेतलेल्या शेतक-यांच्या तालुकानिहाय याद्या तयार करण्यात आल्या आहेत. जिल्ह्याला 700 कोटी रुपये कर्ज वाटपाचे उद्दीष्ट असले तरी शेतक-यांना पीक कर्जासाठी पुनर्गठन झाल्यानंतर कर्ज उपलब्ध करून देण्यात येईल. जिल्ह्यात 53 हजार 837 शेतकरी खरीप पीककर्जाचे पुनर्गठन करण्यास पात्र शेतकरी असून 47 लाख 437 रुपयांचे पुनर्गठन होणार आहे.
              प्रारंभी प्र. जिल्हाधिकारी दीपक नलवडे यांनी स्वागत केले. तर निवासी उपजिल्हाधिकारी वैभव नावडकर यांनी जिल्ह्यातील खरीप हंगामासंदर्भातील पीककर्जाबाबत केलेल्या नियोजनाची माहिती दिली.

**********