Thursday 5 May 2016

जिल्ह्यात 17 कृषी रथांद्वारे
कृषी योजनांची जागृती
Ø  कृषी जागृती सप्‍ताहाचा उत्‍साहात प्रारंभ
            वर्धा, दि. 4 : खरीप हंगामात पीक उत्‍पादन वाढीसाठी करावयाच्‍या उपाययोजना, पंतप्रधान पीक विमा योजना, गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना, जलयुक्‍त शिवार व मागेल त्‍याला शेततळे या योजनांची माहिती जिल्‍हयातील सर्वसामान्‍य शेतक-यांपर्यंत पोहचविण्‍यासाठी 17 कृषी रथ तयार करण्‍यात आले आहेत. जिल्‍हयातील सर्व गावातून फिरणार असल्‍याने शेतक-यांनी त्‍याचा फायदा घ्‍यावा, असे आवाहन जिल्‍हा अधीक्षक कृषी अधिकारी ज्ञानेश्‍वर भारती यांनी केले आहे.
            खरीप हंगामाच्‍या पूर्व तयारीसाठी दिनांक 7 मेपर्यंत कालावधीत जिल्‍हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयामार्फत कृषी जागृती सप्‍ताहाचे आयोजन करण्‍यात आलेले आहे. दि. 1 मे 2016 या महाराष्‍ट्र दिनाचे औचित्‍य साधून वर्धा जिल्‍हयातील आठही तालुक्‍याच्या ठिकाणाहून कृषी जागृती सप्‍ताह उत्‍साहात सुरुवात झाली.
            वर्धा येथे खासदार रामदास तडस यांनी कृषी रथाला हिरवी झेंडी दाखविली व कृषी सप्‍ताहाचे उद्घाटन केले. यावेळी आमदार डॉ.पंकज भोयर व इतर मान्‍यवर उपस्थित होते. सेलू येथे आमदार  डॉ. पंकज भोयर यांनी,आर्वीत आमदार अमर काळे ,हिंगणघाट येथे आमदार समीर कुणावार यांनी कृषी रथास हिरवी झेंडी दाखवून कृषी जागृती सप्‍ताहाचे उद्घाटन केले.  देवळीत सभापती गुलाबराव डफरे, समुद्रपूर येथे उपसभापती श्री. वांदिले, कारंजा येथे  सभापती श्रीमती खोडे तर आष्‍टी येथे नगरसेवक सुरेश काळबांडे यांनी सप्‍ताहाचे उद्घाटन केले. सप्‍ताहांतर्गत सर्व गावांमधील कृषी विभागाच्‍या योजनेचा रथ फिरणार आहे. तरी जास्‍तीत जास्‍त शेतक-यांनी कृषी विभागाच्‍या योजनांचा लाभ घ्‍यावा, असे आवाहन जिल्‍हा अ‍धीक्षक कृषी अधिकारी ज्ञानेश्‍वर भारती यांनी केले आहे.
                        समाधान शिबिरात कृषी जागृती रथाला हिरवी झेंडी
          कृषी विभागाच्‍या विविध योजनांची प्रसिध्‍दी चित्ररथाच्‍या माध्‍यमातून सर्वदूर व्‍हावी सामान्‍यांना योजनेची माहिती होऊन योजनेचा लाभ व्‍हावा, या उद्देशाने तालुका कृषी अधिकारी कार्यालयामार्फत कृषी जागृती चित्ररथाव्‍दारे करण्यात आला आहे. या जागृती चित्ररथाचा शुभारंभ खासदार रामदास तडस, आमदार पंकज भोयर यांच्‍याहस्‍ते वर्धा येथील समाधान शिबिरात हिरवी झेंडी दाखवून करण्‍यात आला.

*****

No comments:

Post a Comment