Thursday 5 May 2016

निम्‍न वर्धा प्रकल्‍पाचे काम तत्‍काळ पूर्ण करा
                                  - गिरीष महाजन
Ø   जमीन अधिग्रहणासोबत शेतक-यांना मोबदला द्या
Ø   शेतापर्यंत पाणी पोह‍चविण्‍यासाठी पाटचा-याची कामे
Ø   प्रकल्‍प पूर्ण करण्‍यासाठी 500 कोटी रुपये
Ø   पहिल्‍या टप्‍प्‍यात 140 द.घ.मी.पाणी साठविणार
Ø   मार्च 18 पर्यंत पूर्ण क्षमतेने जलसाठा
               वर्धा. दि 5 - निम्‍न वर्धा प्रकल्‍प पूर्ण करण्‍यासाठी यावर्षी पाचशे कोटी रुपयांची तरतूद करण्‍यात आली असून जमिनीचे अधिग्रहण व शेतक-यांना मोबदला तसेच पाटचा-याची कामे प्राधान्‍याने पूर्ण करा, अशा सूचना राज्‍याचे जलसंपदा मंत्री गिरीष महाजन यांनी आज निम्‍न वर्धा प्रकल्‍पाला भेट देऊन पाहणी केली त्‍याप्रसंगी दिल्‍यात.
              यावेळी आमदार रणजित कांबळे, जलसंपदा विभागाचे प्रधान सचिव आय. एस. चहल मुख्‍य अभियंता संजय सुर्वे, अधीक्षक अभियंता श्री. गवळी , दत्‍तात्रय रब्‍बेवार, श्री. मंडवार आदी अधिकारी उपस्थित होते.
              निम्‍न वर्धा प्रकल्‍पांतर्गत पाणयाखाली येणारे क्षेत्रातील जमीन अधिग्रहणाचे काम जलद गतीने पूर्ण करुन त्‍यांना तत्‍काळ मोबदला देण्‍याच्‍या सूचना देताना जलसंपदा मंत्री गिरीष महाजन म्‍हणाले की, पहिल्‍या टप्‍प्‍यात यावर्षी 140 द.ल.घ.मी. पाणी व मार्च 18 पर्यंत 217  द.ल.घ.मी. जलसाठा निर्माण करा, यासाठी कालबद्ध कार्यक्रम तयार करा, अशाही सूचना यावेळी  दिल्‍या.
            शेतक-यांच्‍या शेतापर्यंत पाणी पोहचवून त्‍यांना प्रत्‍यक्ष लाभ देण्‍यासाठी  पाटचा-याची कामे पूर्ण करतानाच पाण्‍याचा अपव्‍यय टाळण्‍यासाठी बंद पाईपलाईनचा वापर तसेच ठिबक सिंचन पद्धतीचा जास्‍तीत जास्‍त वापर करण्‍यासंदर्भात प्रायोगिक प्रकल्‍प राबवा, असेही जलसंपदा मंत्री गिरीष महाजन यांनी  सांगितले.
          
           प्रकल्‍पासाठी तसेच पाणी वितरिका पूर्ण करण्‍यासाठी जमिनीचे अधिग्रहण करतानाच थेट खरेदी पद्धतीचा अवलंब करताना शेतक-यांना विश्‍वासात घेऊन सिंचनामुळे होणा-या लाभाबाबतही माहिती द्या, असेही जलसंपदा मंत्र्यांनी सांगितले.
           पुलगाव बॅरेजचे काम सुरु
           वर्धा नदीवर जलसाठा निर्माण करुन सिंचनासाठी उपयुक्‍त ठरणा-या पुलगाव बॅरेजच्‍या कामांना मान्यता मिळाली असून कामाला सुरुवात झाली आहे. खर्डा बॅरेज तसेच आर्वी उपसा योजनेच्‍या कामासाठी निधी उपलब्ध करुन देण्‍यात येणार असल्‍याचे यावेळी सांगितले.
          आमदार रणजित कांबळे यांनी निम्‍न वर्धा प्रकल्‍पातील मुख्‍य कालवा तसेच पाटचा-या प्राधान्‍याने पूर्ण करण्‍यासाठी जमिनीचे अधिग्रहण कामाला गती द्यावी. तसेच शेतक-यांना प्राधान्‍यांना योग्‍य मोबदला देण्‍याची सूचना केली. शेतक-यांना सिंचनासाठी पाणी उपलब्‍ध करुन देण्‍यासाठी पाटचा-याचे कामे आवश्‍यक असल्‍याचे त्‍यांनी सांगितले. जलसंपदा विभागाचे प्रधान सचिव श्री. चहल यांनी प्रकल्‍पाचे काम, मुख्‍य पाणी वितरिका तसेच पुलगाव खर्डा बॅरेज व आर्वी उपसा योजनेच्‍या कामाचे प्रस्‍ताव तयार करा, यासाठी आवश्‍यक निधीची मागणी करण्‍यात येईल, असे सांगितले. मुख्‍य अभियंता संजय सुर्वे यांनी प्रकल्‍पाच्‍या कामाबद्दल माहिती दिली. मान्‍यवरांचे स्‍वागत अधीक्षक अभियंता श्री. गवळी , दत्‍तात्रय रब्‍बेवार, श्री. मंडवार यांनी केले. सहायक कार्यकारी अभियंता श्री. हासे, गणेश गोडे, इरफान शेख, इमरान राही, विजय नाखले, सुहास पाटील, रमण लायचा, पंकज लोखंडे आदी अभियंता उपस्थित होते.

*****

No comments:

Post a Comment