Thursday 5 May 2016

बालकांना मिळणार इंजेक्शनव्‍दारे पोलिओ लस
-         डॉ.पुरुषोत्‍तम मडावी
Ø जिल्‍हयात आयपीव्‍ही पोलिओ लसचा शुभारंभ

वर्धा, दि. 25 –  पोलिओची लस यापूर्वी पाच वर्षातील बालकाला पाजली जात. परंतु आता बालकांना इंजेक्शनद्वारे पोलिओ लस देण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. पुरूषोत्तम मडावी यांनी दिली.
             जिल्‍हा सामान्‍य रुग्‍णालय , वर्धा येथे डॉ. मडावी यांचे अध्‍यक्षतेखाली व अतिरिक्‍त जिल्‍हा आरोग्‍य अधिकारी डॉ. अजय डवले, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. नितीन निमोदिया, जिल्‍हा हिवताप अधिकारी डॉ. प्रविण धाकटे यांचे उपस्थितीतजिल्‍हास्‍तरीय आयपीव्‍ही पोलिओ लसीकरणाचा शुभारंभ करण्‍यात आला.
            दि.25 एप्रिलपासून नियमित लसीकरण कार्यक्रमात आयपीव्‍ही (इंजेक्‍शन व्‍दारे पोलिओ लस ) देण्‍याची सुरवात करण्‍यात आली आहे. तसेच ट्रायव्‍हंट पोलिओ लसीचे बॉयव्‍हॅलंट पोलिओ लसीमध्‍ये रुपांतर करण्‍यात आले आहे.  दि.24 एप्रिल पर्यंत नियमित लसीकरणामध्‍ये टायव्‍हॅलंट पोलिओ लसीचा वापर करण्‍यात येत होता. ज्‍यामध्‍ये टाईप 1, 2 व 3 प्रकारचे पोलिओ व्‍हॉयरस अस्‍तीत्‍वात होते. परंतु सन 1999 पासून जगातून टाईप 1 व टाईप 3 पोलिओ व्‍हॉयरस असलेले बायव्हॅलंट पोलिओ व्‍हॅक्‍सीन नियमित लसीकरणात समाविष्‍ठ करण्‍यात आले, असल्याचेही श्री. मडावी यांनी सांगितले. 
            तसेच जिल्‍हयात इंजेक्शनव्‍दारे पोलिओ लसीकरण करण्‍यात येणार असुन सदर लस बाळाच्‍या उजव्‍या खांद्यावर बॉयव्‍हॅलंट पोलिओ व पेंटाव्‍हॅलंट लसीच्‍या पहिल्या व तिस-या डोसबरोबर देण्‍यात येणार आहे, असेही ते म्हणाले.  जिल्‍हयात सदर लसीचा साठा सर्व आरोग्‍य केंद्रात उपलब्‍ध करुन देण्‍यात आला असून कर्मचा-यांनी गृहभेटीदरम्‍यान या लसबाबत कार्यक्षेत्रात जनजागृती करावी, असे आवाहन अतिरिक्‍त जिल्‍हा आरोग्‍य अधिकारी डॉ. अजय डवले यांनी  यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आशा नगराळे यांनी केले तर आभार रत्ना हिवरकर यांनी मानले.
                                                                        
                    
हिवताप निर्मूलनाकरिता सर्वंकष प्रयत्‍नांची गरज
                                         ---आंबटकर
              वर्धा, दि. 25 –जागतिक स्‍तरावर हिवताप रुग्‍णांची वाढती संख्‍या व या आजाराचे गंभीर स्‍वरुप लक्षातघेता संपूर्ण जगाने हिवताप निर्मूलनासाठी प्रयत्‍न करावे. यासाठी सोवियत संघातील देश पुढाकार घेणार आहे. जागतिक आरोग्‍य संघटनेने 25 एप्रिल हा दिवस जागतिक हिवताप दिन म्‍हणुन साजरा करण्‍याचे ठरविले आहे. जिल्‍हयात या दिवशी या आजाबाबत आरोग्‍य विभागाकडून मोठया प्रमाणावर जनजागृती करण्‍यात येणार आहे.
चांगल्‍याकरिता हिवताप समाप्‍त हे या वर्षीच्‍या हिवताप दिनाचे घोषवाक्‍य आहे. हिवताप आजाराचे दुष्‍परिणाम मानव जातीला भोगावे लागू नये, यासाठी हिवताप निर्मूलनासाठी सर्वाच्‍या सामूहिक प्रयत्‍नाची गरज आहे.
हिवताप निर्मूलन कार्यक्रमात मोठया प्रमाणात सहभाग नोंदवावा, असे आवाहन जिल्‍हा परिषेदेच्‍या आरोग्‍य समितीचे सभापती वसंत आंबटकर , जिल्‍हा आरोग्‍य अधिकारी डॉ. डी.जी.चव्‍हाण , जिल्‍हा हिवताप अधिकारी डॉ. प्रविण धाकटे यांनी केले आहे.
लक्षणे- हिवताप या आजारात अचानक थंडीपासुन ताप येतो, अंग दुखने ,डोके दुखने , उलटी होणे, घाम येऊन ताप कमी होणे, रोग्‍याला थकवा येणे व असा ताप एक दिवसाआड किंवा दोन दिवसाआड येणे अशा प्रकारचे लक्षणे दिसून येतात. मेंदूच्‍या हिवतापामध्‍ये हि लक्षणे तीव्र स्‍वरुपाची असतात. अशा प्रसंगी हिवतापाचा रोगी बेशुध्‍द होऊ शकतो व प्रसंगी मृत्‍युही होऊ शकतो.
हिवतापाचा प्रसार- हिवताप रोगाचा प्रसार अॅनालिलीस डासाची मादी चावल्‍यामुळे होतो. हिवताप दुषित रोग्‍यास अॅनालिलीस डासाची मादी चावल्‍याबरोबर हिवतापाचे जंतु डासाच्‍या शरीरात प्रवेश करतात आणि असा रोगजंतु लाळेबरोबर निरोगी व्‍यक्‍तीच्‍या शरीरात प्रवेश करतात. 8 ते 10 दिवसात हिवतापाचे जंतू माणसाच्‍या श्‍रीरात वाढतात व रक्‍तातील तांबडया पेशी फुटून रोग्‍यास थंडी ताप येते.
प्रतिबंधात्‍मक उपाययोजना व जनतेने घ्‍यावयाची काळजी
ताप आल्‍यास जवळच्‍या केंद्रात जावून औषधोपचार घ्‍यावा. रुग्‍ण बेशुध्‍द पडल्‍यास त्‍याला जवळच्‍या रुग्‍णालयात घेऊन जावे. आरोग्‍य कर्मचा-यांचे फीरतीच्‍या व गृहभेटीच्‍या वेळेस रक्‍त नमुने घेण्‍यास सहकार्य करावे. डॉक्‍टरांच्‍या व आरोग्‍य कर्मचा-यांच्‍या सल्‍ल्‍यानुसार औषधोपचार करावा. उपाशीपोटी उपचार घेऊ नये. हिवताप घोषित केलेल्‍या गावातील प्रत्‍येक घरातील खोल्‍या फवारणी केल्‍यानंतर किमान सहा आठवडे भिंती सारवू नये. परिसर स्‍वच्‍छ ठेवावा. पाणी साचू देवू नये.
                                                                        00000

समतादूत प्रकल्‍पामार्फत ग्रामपंचायतींना
 मोफत प्रबोधनात्मक पुस्‍तकांचे वाटप
              वर्धा, दि. 25 – भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्‍या 125 व्‍या जयंतीनिमित्‍ताने बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्थेच्या (बार्टी) समातादूत प्रकल्पामार्फत जिल्‍हयातील सर्व ग्रामपंचायतींना मोफत प्रबोधनात्मक पुस्‍तकांचे वाटप करण्यात आले असल्याची माहिती प्रकल्प संचालक प्रियदर्शनी डोंगरे यांनी दिली आहे. तसेच या उपक्रमांतर्गत समतादूत ग्राम उदय से भारत उदय या उपक्रमाला यशस्‍वी करत असल्याचेही  त्यांनी सांगितले आहे.
जिल्ह्यात प्रकल्प अधिकारी अनिता तेलंग यांच्या मागदर्शनाखाली समतादूत विशाखा पोराटे, प्रिया ठाकरे, रुपाली ठाकरे, अनिता दाढे,जरीन पठाण, नंदा प्रजापती, अर्चना भगत, स्‍वप्‍नील चोरे, शीतल मोरे, विक्‍की बिजवार, बंशी परतेती, विनायक भांगे  या समतादुतांनी ग्रामपंचायतींना भेटी देऊन संबंधित गावचे सरपंच, ग्रामसेवक यांची भेट घेतली. तसेच ग्रामसभेत सर्वोत्तम भूमिपूत्र गोतम बुद्ध, समाधीमार्ग, राजर्षी शाहू महाराज, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, भारतीय संविधान, संत गाडगेबाबा, अंधश्रद्ध निर्मुलन व जादूटोणाविरोधी कायदा या पुस्तकांबाबत मार्गदर्शन करून त्यांना पुस्तकांचे वाटप केले. तसेच प्रबोधनात्मक जाणीवजागृती निर्माण करण्याचा प्रयत्न केला असल्याचे श्रीमती डोंगरे यांनी सांगितले. 
                                                            000

                         महाराष्‍ट्र दिन समारंभ पूर्व तयारी बैठक
वर्धा, दि.25 - महाराष्‍ट्र राज्‍य स्‍थापनेचा 56 वा वर्धापन दिन आयोजनाबाबत सर्व संबंधित अधिका-यांची बैठक जिल्हाधिकारी आशुतोष सलिल यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. बैठकीत महाराष्‍ट्र दिनाच्‍या पूर्वतयारी करिता पोलीस विभागाकडे परेड संचलन सराव व रंगित तालीम, ध्‍वज लावणे व उतरवणे, तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाकडे मैदानाची व्‍यवस्‍था, आदींसह विद्युत व्‍यवस्‍था, रुग्‍णावाहिकाची व्यवस्था करण्याबाबत संबंधित अधिका-यांना सूचना देण्यात आल्या. तसेच कार्यालय प्रमुखांनी बक्षीस, गौरव प्राप्त पात्र धारकांची यादी दोन दिवसांमध्ये निवासी उपजिल्‍हाधिकारी यांचेकडे सुपूर्द करावी, अशा सूचनाही दिल्यात.                                                        0000

हिवताप निर्मूलनासाठी सर्वांनी मच्‍छरदानीचा वापर करावा
-         त्रिवेणी कुत्‍तरमारे
Ø सायकल व रॅलीला हिरवी झेंडी दाखवून केला शुभारंभ
   वर्धा, दि. 25-हिवताप निर्मूलनसाठी सर्वांनी पुढाकार घेणे आवश्‍यक आहे. हिवतापाची लक्षणे आढळल्‍यास तात्‍काळ रुग्‍णालयात जाऊन उपचार घ्‍यावा. तसेच या आजारापासुन बचावासाठी सर्वांनी मच्‍छरदानी वापरावी , असे आवाहन नगराध्‍यक्ष त्रिवेणी कुत्‍तरमारे यांनी केले.
जागतिक हिवताप दिनामित्‍त आज जिल्‍हा हिवताप अधिकारी, वर्धा कार्यालयाने सायकल व रॅलीचे आयोजन सामान्‍य रुग्‍णालय, वर्धा येथे केले होते.    यावेळी नगराध्‍यक्ष त्रिवेणी कुत्‍तरमारे यांनी रॅलीला हिरवी झेंडी दाखविली यावेळी त्या बोलत होत्या.  जिल्‍हा शल्‍य चिकित्‍सक डॉ. पुरुषोत्‍तम मडावी, अतिरिक्‍त जिल्‍हा आ‍रोग्‍य अधिकारी डॉ. अजय डवले, रमन लालवाणी, मुस्‍तफाभाई, अख्‌तर कुरेशी, डॉ. सिद्धार्थ बुटले, श्री. दुधाने, जिल्‍हा हिवताप अधिकारी डॉ. प्रवीण धाकटे यांची यावेळी उपस्थिती होती.
जिल्‍हयातील लॉयन्‍स क्‍लब गांधी सिटी व खासगी वैद्यकीय व्‍यावसायिक डॉ. सरोदे, डॉ.पावडे डॉ.वाडीभस्‍मे, डॉ.विश्‍वास, डॉ.आनंद गाढवकर, डॉ. ढगे, डॉ.ताम्‍हण, डॉ.महेंद्र भगत, डॉ. अजय निंबलवार व  वैद्यकीय जनजागृती मंच यांच्या संयुक्‍त विद्यमाने सायकल व रॅलीचा प्रारंभ करण्‍यात आला.
रॅलीमध्‍ये हिवताप जनजागृती त्‍यात विशेषतः हिवतापाची लक्षणे जसे थंडी वाजून ताप येणे, ताप हा सततचा असू शकतो किंवा एक दिवसाआड येवू शकतो. डोके दुखी ,मळमळ, घाम येवून अंग गार पडणे, व हिवताप कसा टाळवा, डासाची पैदास केंद्र  नियंत्रण व औषधापचार इत्‍यादी बाबत कशा दक्षता घ्‍यायच्‍या याबाबत संदेश जनतेस रॅलीच्‍या माध्‍यमातून देण्‍यात आला.
रॅलीच्‍या यशस्‍वीतेसाठी डॉ. पी.आर.धाकटे यांचे मार्गदर्शनात अरविंद लोंखडे, श्‍याम नंदनवार, सुरेश काळसर्पे , श्रीमती कुंभारे, जांगड, दिलीप रहाटे, अरविंद बोटकुले, सुधीर पोळ, राजेंद्र मुंढे, रवींद्र चंद्रे, वैभव तायवाडे, भारत पंडित, संजय चौधरी, संजय जाधव, प्रकाश मानकर, प्रशांत गावंडे, ज्ञानेश्वर ढगे, रंगराव कुमरे, श्री. लोखंडे, आकाश भेंडे आदींनी पुढाकार घेतला.
                                                            ०००
                                                       
विविध खेळांचे मे महिन्यात उन्‍हाळी प्रशिक्षण शिबिर
             वर्धा, दि.25 – स्‍थानिक जिल्‍हा क्रीडा अधिकारी कार्यालय, वर्धा तथा विविध संघटनाच्‍या संयुक्‍त विद्यमाने जिल्‍हा क्रीडा संकुल, वर्धा येथे दिनांक 1 मे ते 31 मे, 2016 या कालावधीत बॉक्सिंग, सॉफ्टबॉल, रायफल व पिस्‍तुल शुटींग, फुटबॉल, बॅडमिंटन या खेळांचे उन्‍हाळी प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्‍यात येत आहे, असे जिल्हा क्रीडा अधिकारी सुभाष रेवतकर यांनी सांगितले आहे. 
            जिल्‍ह्यात प्रथमच रायफल व पिस्‍तुल शुटींग प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्‍यात येत असून, यासाठी 25 मीटरची शुटींगरेंज तयार करण्‍यात आलेली आहे. तसेच सैन्‍य दलातील निवृत प्रशिक्षक विद्यार्थ्‍यांना नियमित प्रशिक्षण व फिजीकल फिटनेसकरीता शिस्‍तबध्‍द पध्‍दतीने सराव घेणार आहे. जिल्‍हा क्रीडा संकुल येथे बांधण्‍यात आलेल्‍या बॉक्सिंग रिंगवर बॉक्सिंग या खेळाचे प्रशिक्षण होणार आहे. तसेच फुटबॉल, सॉफ्टबाल आणि बॅडमींटन या खेळाचे प्रशिक्षणही आयोजित करण्‍यात येत आहे.
            अधिक माहिती करीता  बॉक्सिंग क्रीडा मार्गदर्शक विजय डोबाळे  (9545858975),  सॉफ्टबॉल क्रीडा मार्गदर्शक मंगेश गुडधे  (9403866755), रायफल व पिस्‍तुल शुटींग क्रीडा मार्गदर्शक विवेक ठाकरे(8856961096), व्‍यवस्‍थापक रविंद्र काकडे(8007900867), बॅडमिंटन संघटनेचे मोहन शहा  (9421237742), श्री. भाईजान(982223789) यांचेशी संपर्क साधावा, असे आवाहनही श्री. रेवतकर यांनी केले आहे.
*****



No comments:

Post a Comment