Thursday 5 May 2016

नैसर्गिक आपत्ती निवारणासाठी यंत्रणा सज्ज
v जिल्हा तालुकास्तरावर 1 जूनपासून नियंत्रण कक्ष
v आपत्ती निवारण आराखडा वेबसाईटवर
v नदी काठावरील 88 पुराची धोका असणारी गावे
v नगर पालिका क्षेत्रातील धोकादायक इमारतींचे सर्वेक्षण
            वर्धा, दिनांक 30 – नैसर्गिक आपत्ती तसेच अतिवृष्टी पुरामुळे उद्भवलेल्या परिस्थितीवर मात करण्यासाठी करावयाच्या उपाययोजनांबाबत जिल्हा व्यवस्थापन आराखडा तयार करण्यात आला असून कोणतीही आपत्ती उद्भवल्यास जिल्हास्तरीय यंत्रणा सज्ज ठेवावी, अशी सूचना जिल्हाधिकारी दीपक नलवडे यांनी दिल्यात.
            जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात नैसर्गिक आपत्ती तसेच मॉन्सून पूर्व तयारीचा आढावा जिल्हाधिकारी दीपक नलवडे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आला. यावेळी जिल्ह्यातील सर्व विभाग प्रमुख उपस्थित होते.
               नैसर्गिक आपत्ती, अतिवृष्टी पूरपरिस्थिती करावयाच्या उपाययोजनांसदंर्भात विभागनिहाय जिल्हा व्यवस्थापन आराखडा तयार करण्यात आला असून जिल्ह्याच्या वेबसाईटवर उपलब्ध आहे. यामध्ये नैसर्गिक आपत्ती निवारणासाठी विभागनिहाय अधिका-यांचे दूरध्वनी क्रमांक तसेच विभागांच्या कार्यप्रणालीबाबत माहिती देण्यात आली आहे.
                        तालुकास्तरावर मान्सूनपूर्व आढावा बैठकीतून नदी नाल्यांमुळे बाधित होणा-या गावांची माहिती घेऊन पूर्व परिस्थिती उद्भवल्यास करावयाच्या उपाययोजनांसंदर्भात आराखडा तयार करावा. अशा सूचना करतानाच जिल्हाधिकारी श्री, नलवडे म्हणाले की  या आराखड्यात ग्रामपंचायत स्तरावरील ग्रामसेवक प्रमुख व्यक्तींची नावे असलेली दूरध्वनीसह यादी तयार करावी. नगर परिषदा ग्रामपंचायत क्षेत्रातील गावांमधून धोकादायक इमारतींच्या मालकांना सूचना देण्यात यावी. तसेच नदी नाल्यातील कचरा गाळ काढण्याची मोहीम राबवावी, असे यावेळी त्यांनी सांगितले.
             जिल्ह्यात असणा-या आरोग्य सुविधा त्याअंतर्गत असणा-या गावांची माहिती मोठे मध्यम प्रकल्पांमध्ये असलेल्या पाणी साठ्यांसंदर्भात तसेच पूरनियंत्रणांसदंर्भात आपत्तकालीन कृती आराखडा तयार करून जलाशयाची पातळी दररोज जिल्हा नियंत्रण कक्षाकडे उपलब्ध करून देण्यात यावी, अशी सूचना करण्यात आली. पोलिस विभाग, जिल्हा दूरसंचार यंत्रणा, साबांवि, प्रादेशिक परिवहन विभाग होमगार्ड, जिल्हा परिषद, गटशिक्षणाधिकारी, महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी, महामंडळ, यांच्यातर्फे मान्सूनपूर्व तयारी संदर्भात केलेल्या कार्यवाहीचा आढावा घेण्यात आला.
निवासी उपजिल्हाधिकारी वैभव नावडकर यांनी नैसर्गिक आपत्ती निवारणार्थ करावयाच्या उपाययोजनांसंदर्भात सादरीकरण केले.

******

No comments:

Post a Comment