Thursday 5 May 2016

जिल्‍ह्यात दोन कोटी वृक्ष लागवड
                                             - आशुतोष सलिल
Ø वृक्षारोपण मोहिमेत सहभागी व्‍हा
Ø 1 जुलैपासून वृक्षारोपण मोहीम
            वर्धा, दि.2 – पावसाळ्यापूर्वी जिल्‍ह्यात वृक्षारोपण मोहिमेच्‍या माध्‍यमातून दोन लक्ष वृक्षलागवड करण्‍यात येणार असून वृक्षारोपण मोहिमेत सर्वांनी सहभागी होण्‍याचे आवाहन जिल्‍हाधिकारी आशुतोष सलिल यांनी केले आहे.
            हवामानातील बदल तसेच उष्‍णतेमध्‍ये होणारी वाढ याची तीव्रता व परिणामकारकता कमी करण्‍यासाठी वृक्षारोपण व वृक्षसंवर्धन अत्‍यंत आवश्‍क आहे. पावसाळयापूर्वी जिल्‍हयात दोन कोटी वृक्ष लावून त्‍याचे संवर्धन करण्‍याचा संकल्‍प जिल्‍हास्‍तरावर घेण्‍यात आला आहे.
            वनमहोत्‍सवाचे आयोजन 1 जुलै रोजी करण्‍यात येणार असून एकाच दिवशी 2 कोटी वृक्ष लागवड करण्‍यात येणार आहे. मुख्‍यमंत्री  देवेंद्र फडणवीस व वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी जिल्‍हास्‍तरावर वनमहोत्‍सव आयोजित करुन मोठयाप्रमाणात वृक्षारोपण करण्‍याचे आवाहन केले आहे. सामाजिक वनीकरण विभागातून वृक्षारोपनासाठी दोन कोटी वृक्ष उपलब्‍ध करुन देण्‍यात येणार आहेत.
            वृक्षारोपण मोहिमेसाठी सर्व विभागप्रमुखांना उद्दिष्‍ट निश्चित करुन देण्‍यात आले असून त्‍यानुसार वृक्षारोपणाचा आराखडा तसेच पूर्व तयारी करावयाची आहे. यासाठी सामाजिक व शैक्षणिक संस्‍थांचा सहभाग घेण्‍यात येणार आहे. वर्धेत निसर्ग सेवा समितीतर्फे वृक्षारोपण करण्‍यासाठी तालुकास्‍तरावर सुद्धा  नियोजन करुन दोन कोटी वृक्ष लागवडीचे उद्दिष्‍टाचे  पूर्ण करण्‍यात येणार आहे.
            एकाच दिवशी दोन कोटी वृक्ष लावण्‍यासाठी सार्वजनिक बांधकाम, जलसंपदा, वनविभाग, जिल्‍हा परिषद, महसूल, महात्‍मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजना, आरोग्‍य विभाग, सामाजिक वनीकरण, कृषी व फलोत्‍पादन विभाग सहकार, पणन आदी विभागांची जबाबदारी असून महिला बचतगट व विद्यार्थ्‍यांयाही  यासाठी सहभाग घेण्‍यात येणार आहे. 1 कोटी 50 हजाऱ वृक्ष वनविभाग व सामाजिक वनीकरण विभागातर्फे लावण्‍यात येणार आहेत. 50 लक्ष वृक्ष लावण्‍याची जबाबदारी खाजगी संस्‍था, उद्योजक, लोक प्रतिनिधी यांच्‍या सहकार्याने पूर्ण होणार आहे. सामाजिक वनीकरण विभागाकडे 1 लक्ष 20 हजार 639 रोपे विविध रोपवाटिकेमध्‍ये उपलब्‍ध आहेत. तसेच जिल्‍ह्यातील खाजगी रोपवाटिकेत 4 लक्ष रोपे उपलब्‍ध आहेत.
            वन विभागाच्‍या नर्सरीत विविध प्रजातीची रोपे मोठयाप्रमाणात उपलब्‍ध आहेत. 1 जुलै रोजी 2 कोटी वृक्ष लागवड करण्‍यासाठी सर्वांनी आपला सहभाग नोंदवून ही मोहीम यशस्‍वी करावी, असे आवाहन जिल्‍हाधिकारी आशुतोष सलिल यांनी केले आहे.
0000000


No comments:

Post a Comment