Monday 12 January 2015

       रस्‍ता सुरक्षा अभियानांतर्गत खासगी बसची तपासणी करा  
-         एन.नवीन सोना
Ø अॅटो स्‍टॅन्‍ड, पार्किंग, हॉकर्स झोनचा आढावा घेऊन कार्यवाहीचे आदेश
Ø वाहतुकीला अडथळा आणणा-यांवर कारवाई करण्‍याचे निर्देश
Ø अभियान प्रभावीपणे राबवून अपघात टाळण्‍यावर अधिक भर द्या 
वर्धा दि. 11-   प्रवाशांच्‍या हिताकरीता खासगी बसमध्‍ये आवश्‍यक असलेल्‍या प्रथमोपचार पेटी, अग्नीशमन यंत्र आदींबाबतची तपासणी संबंधित यंत्रणांनी करावी. तसेच अभियान प्रभावीपणे राबवून अपघात टाळण्‍यासंदर्भात योग्य कार्यवाही करण्‍यात यावी, अशा सूचना जिल्‍हाधिकारी एन.नवीन सोना यांनी दिल्‍यात.
         जिल्‍हाधिकारी कार्यालयाच्‍या सभागृहात जिल्‍हास्‍तरीय रस्‍ता सुरक्षा समितीची बैठक आयोजित करण्‍यात आली होती. बैठकीच्‍या अध्‍यक्षस्‍थानी जिल्‍हाधिकारी एन.नवीन सोना होते. यावेळी ते बोलत होते.
 बैठकीस अतिरिक्‍त जिल्‍हाधिकारी संजय भागवत, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विलास माजरीकर, सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी राजीव गायकवाड, जिल्‍हा पोलिस उप‍अधीक्षक आर.जी. किल्‍लेकर, वाहतूक शाखेचे पोलिस निरीक्षक विलास काळे,  नगर परिषद, राज्‍य परिवहन महामंडळ, जिल्‍हा सामान्‍य रूग्णालय, जिल्‍हा परिषदेचे अधिकारी –कर्मचारी  उपस्थित होते.
बैठकीमध्‍ये जिल्‍ह्यातील अॅटो स्‍टँड,पार्किंग सुविधा, हॉकर्स झोनचा आढावा घेऊन तत्‍काळ याबाबत कार्यवाही करण्‍यात यावी, असे जिल्‍हाधिकारी एन.नवीन सोना यांनी सांगितले. तसेच नगरपरिषद, वाहतूक नियंत्रण शाखा आणि संबधित यंत्रणांनी पादचारी, वाहनचालक यांना वाहतुकीस अडथळा होणार नाही याची खबरदारी घ्‍यावी. तसेच अनधिकृत बांधकामांसह सर्वसमावेशक अशी कारवाई टप्प्याटप्पयाने करून अहवाल सादर करावा. उचित ठिकाणी पे आणि पार्किंग, नो पार्किंग, येलो पार्किंग करावी. तसेच शासकीय जमीन, अनधिकृत स्‍पीड ब्रेकर, नोंदणीकृत स्‍कूल बस आदींबाबतचा अहवाल सादर करून नियमांचे उल्‍लंघन करण्‍यांवर कारवाई करावी, अशा सूचनाही त्‍यांनी यावेळी केल्‍या. बैठकीचे प्रास्‍ताविक विलास माजरीकर यांनी करून बैठकीच्‍या शेवटी आभार मानले.
रस्‍त्‍याच्‍या बाजूचा परिसरही स्‍वच्‍छ ठेवा
रस्‍ता सुरक्षा अभियानांतर्गत रस्‍त्‍याच्‍या बाजूचा परिसरही स्‍वच्‍छ करावा. जेणे करून पाळीव प्राण्‍यांपासून वाहनचालकांना अडथळा होऊन अपघात होणार नाही, याची दक्षता संबंधित यंत्रणांनी घ्‍यावी. वाहतुकीच्‍या नियमांबाबत सर्वस्‍तरावर जनजागृती करावी, असेही जिल्‍हाधिकारी एन.नवीन सोना यांनी यावेळी सांगितले.
                                                         0000