Wednesday 17 January 2018



लोकराज्यने रिअल हिरोची दखल घेतली
                                    -निर्मलादेवी एस.
वर्धा दि 17 :-  महाराष्ट्राच्या अदयावत पोलीस दलाचा आढावा घेणारा आणि पोलीस जवानांच्या उमेदीला उभारी देणारा लोकराज्यचा जानेवारीचा अंक  माहिती आणि जनसंपर्क विभागाने प्रकाशित केला आहे. याव्दारे सर्वसामान्यांच्या सुरक्षेसाठी रात्रंदिन तत्पर असणा-या रिअल हिरोची दखल घेतली असून हा लोकराज्य अंक पोलीस विभागासाठी सन्मानाची बाब आहे. असे प्रतिपादन जिल्हा पोलीस अधिक्षक निर्मलादेवी एस. यांनी केले.
माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाने जानेवारी 2018 चा लेाकराज्य अंक स्मार्ट, समर्थ, संवेदनशिल ‘आपले पोलीस  आपली अस्मिता’ या विषयावर काढला आहे. या अंकाचे प्रकाशन जिल्हा पोलीस अधिक्षक निर्मला देवी एस. यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी जिल्हा माहिती अधिकारी मनिषा सावळे व इतर कर्मचारी उपस्थित होते.
लोकराज्यच्या या अंकात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर , महिला व बाल सुरक्षा, सायबर गुन्हे, सुरक्षित वाहतुक, दहशतवाद व नक्षलवादाचा बिमोड, या विषयी अतिशय उपयुक्त माहिती असून ती सर्वसामान्य नागरिकांना सुध्दा उपयोगाची आहे. पोलिस विभागासाठी असलेल्या योजना , पोलिसांना उच्च शिक्षणाची संधी, सायबर क्राईम म्हणजे नक्की काय? सायबर गुन्हयाचा पाठलाग, सायबर युगाची आव्हाने, गुन्हे सिध्दीचे शास्त्रीय तंत्र, या बाबतची माहिती हे या अंकाचे वैशिष्टय असल्याचे त्या यावेळी म्हणाल्या.
पोलीसांसाठीच नव्हेतर सर्वासामान्य नागरिकांसाठी हा अंक संग्राहय ठेवण्यासारखा आहे. यामध्ये महाराष्ट्र पोलीस सिटिजन  पोर्टल ॲप  बाबत माहिती दिली असून हे ॲप डाऊन लोड करुन आता नागरिकांना घरूनच पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविता येऊ शकते. या ई- तक्रारीवर झालेल्या चौकशीची माहितीसुध्दा एस.एम.एस. व्दारे तक्रारदारास प्राप्त होते. त्यामुळे नागरिकांनी हे ॲप डाऊनलोड करुन घ्यावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. तसेच सर्व पोलिस कर्मचा-यांनी लोकराज्यचा हा  अंक वाचावा. असेही त्या यावेळी म्हणाल्या.
लोकराज्यचा हा अंक सर्व बुक स्टॉल तसेच जिल्हा माहिती कार्यालय येथे विक्रीस उपलब्ध आहे.
                                      0000





165 कोटी 75 लक्ष रूपयांचा जिल्हा विकास आराखड्यास मंजुरी
Ø जिल्हा नियोजन समितीची बैठक संपन्न
वर्धा दि 17 :-  जिल्ह्याच्या विकासासाठी महत्वपूर्ण असणाऱ्या जिल्हा नियोजन समितीची बैठक आज आमदार समीर कुणावर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यामध्ये 165 कोटी 75 लक्ष रुपयांच्या जिल्हा वार्षिक योजना  प्रारूप आराखड्यास  जिल्हा नियोजन समितीने मान्यता दिली. या आराखड्यात  जिल्हा वार्षिक योजना सर्वसाधारण 102 कोटी 4 लक्ष, अनुसूचित जाती उपयोजना 40 कोटी 48 लक्ष तर आदिवासी उपयोजना 23 कोटी 23 लक्ष रुपयांच्या  आराखड्याचा समावेश आहे.
येथील विकास भवन येथे आज झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकिला जिल्हा परिषद अध्यक्ष नितीन मडावी,  आमदार सर्वश्री रणजित कांबळे, डॉ पंकज भोयर, अमर काळे, जिल्हाधिकारी शैलेश नवाल, विदर्भ वैधानिक विकास मंडळाचे तज्ञ सदस्य कपील चंद्रायन, मुख्य कार्यकारी अधिकारी नयना गुंडे, आदिवासी उपयुक्त श्री. सावरकर, जिल्हा नियोजन अधिकारी अरविंद टेंभुरणे उपस्थित होते. यावेळी जिल्हा नियोजन समितीच्या नव निर्वाचित सदस्यांचे स्वागत करण्यात आले.
जिल्हा वार्षिक योजनेमधून करण्यात येणारी कामे वेळेत पूर्ण करावीत. तसेच सर्व कामे दर्जेदार करावीत. या बैठकीत दिलेल्या सर्व सूचनांचे अनुपालन अहवाल पुढील बैठकीत देण्यात यावा अशा सूचना बैठकीचे अध्यक्ष आमदार समीर कुणावार यांनी दिल्यात.
2018- 19  च्या प्रारूप आराखड्यात  सर्वसाधारण योजनेमध्ये  कृषि व संलग्न सेवा यासाठी 22 कोटी 46 लक्ष 27 हजार रुपये, ग्रामीण विकास कार्यक्रम 13 कोटी 64 लक्ष 11 हजार, पाटबंधारे व पूर नियंत्रण, 3 कोटी 76 लक्ष, सामाजिक व सामूहिक सेवा 28 कोटी 16 लक्ष, ऊर्जा 1 कोटी 59 लक्ष उद्योग व खाणकाम 55 लक्ष, वाहतूक व दळणवळण 18 कोटी 30 लक्ष, सार्वजनिक बांधकाम 7 कोटी 85 लक्ष आणि इतर बाबींसाठी 5 कोटी 71 लक्ष रुपयांचा समावेश आराखड्यात करण्यात आला आहे.
2017-  18 या आर्थिक वर्षातील डिसेंबर 2017 पर्यंत 55 टक्के खर्च झाल्याची माहिती जिल्हाधिकारी यांनी दिली. तसेच यावेळी 30 टक्के कपात असल्यामुळे तिन्ही योजना मिळून  210 कोटीं रुपयांचा मंजूर आराखडा 140 कोटी रुपये करण्यात आला आहे. हा सर्व निधी मार्च पूर्वी खर्च करण्यात येईल असेही त्यांनी यावेळी सांगितले.
या बैठकीत शेतकऱयांच्या पीक विम्याची रक्कम बँकेने कपात केली  मात्र बँकेने ती संबंधित पीक विमा कंपनीकडे जमा केली नाही,  अशी प्रकरणे आढळून आल्यास संबंधित बँक अधिका-यांवर कारवाई करण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला. आदिवासी समाजासाठी आदिवासी सांस्कृतिक सभागृह बांधण्याचा प्रस्ताव जागेसह आदिवासी प्रकल्प अधिकारी कार्यालयाने शासनाकडे सादर करावा, अशा सूचना आमदार समीर कुणावार यांनी दिल्यात. ग्रामपंचायत भवन आणि यात्रास्थळे विकास कामांसाठी जिल्हा परिषदेला दिलेला निधी अद्याप खर्च केला नसल्याची बाब आमदार पंकज भोयर आणि रणजित कांबळे यांनी निदर्शनास आणून दिली.  यावेळी 31 मार्च पर्यंत सर्व कामे पूर्ण करण्यात यावीत अशा सूचना मुख्य कार्यकारी अधिकारी यांना देण्यात आल्यात.
झुडपी जंगल जागेवरील  अतिक्रमण काढून तिथे वृक्ष लागवड कार्यक्रमांतर्गत वृक्ष लागवड करण्याच्या सूचना श्री. कुणावर यांनी दिल्यात.  धाम नदी पात्रात मोठ्या प्रमाणात बेशरम झाडे वाढली आहेत. याच नदीपात्रात पाणीपुरवठा योजनांचे स्रोत असल्यामुळे प्रदूषित पाण्याचा पुरवठा होत आहे. यावर नदी पात्राची सफाई  कंपनी सामाजिक दायित्व  निधीतून करण्यात येईल, असे जिल्हाधिकारी यांनी सांगितले. सोंडी गावांसाठी तातडीने पिण्याचे पाणी पुरवठा योजना प्रस्तावित करून पुर्ण करावी अशा सूचना अध्यक्ष समीर कुणावर यांनी दिल्यात.
यावेळी जिल्हाधिकारी यांनी जिल्ह्यात आजपर्यंत 50 किलोमीटरचे पांदण रस्ते झाल्याची माहिती दिली. तसेच यासाठी 125 किलोमीटरसाठी मागणी नोंदवण्यात आली आहे. 15 फेब्रुवारीनंतर आणखी मागणी नोंदवल्यास पावसाळ्यापूर्वी सर्व कामे पूर्ण करण्याचे नियोजन करण्यात येईल. यावेळी 20 बँक सखींना मिनी ए टी एम. मशीनचे वाटप मान्यवरांचे हस्ते करण्यात आले. या बैठकीला नव निर्वाचित सदस्य सर्व विभाग प्रमुख उपस्थित होते