Tuesday 5 April 2016

शेतपिकांचे संपूर्ण संरक्षणासाठी पंतप्रधान पीक विमा
योजनेत सहभागी व्हा- रामदास तडस
·        पीक विमा योजना जनजागृतीचा शुभारंभ
·        खरीपसाठी तर रब्बीसाठी दीड टक्क्यात संपूर्ण संरक्षण
·        खरीप हंगामापासून पीक संरक्षण
·        अवकाळी पावसापासूनच्या नुकसानीचाही समावेश
                 वर्धा,दिनांक 05 – अवेळी पडणारा पाऊस नैसर्गिक आपत्तीमुळे होणा-या शेतपिकांचे नुकसान तसेच कृषीमालाच्या बाजारपेठेतील किमतीत चढ-उतार यापासून शेतक-यांना संरक्षण मिळावे यासाठी पंतप्रधान पीक विमा योजनेत शेतक-यांनी सहभागी होवून येत्या खरीप हंगामापासून पीक विमा योजनेचे संरक्षण कवच द्यावे, असे आवाहन खासदार रामदास तडस यांनी केले.
                 सेलसुरा येथील कृषी विज्ञान केंद्राच्या परिसरात पंतप्रधान पीक विमा योजना जनजागृती अभियान तसेच शेतकरी मेळाव्याचे उद्घाटन खासदार रामदास तडस यांच्याहस्ते झाले, त्याप्रसंगी शेतक-यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नाबार्डच्या जिल्हा समन्वयक श्रीमती स्नेहल बनसोड, तर प्रमुख वक्ते कृषी व्यवस्थापन यंत्रणेचे प्रमुख दीपक पटेल, कृषी विज्ञान केंद्राचे कार्यक्रम समन्वयक डॉ. सुरेश नेमाडे, स्वामीनाथन फाऊंडेशनचे अविनाश पाटणकर, रिलायन्स कृषी समुहाचे विजय बारापात्रे, जिल्हा माहिती अधिकारी अनिल गडेकर, जानकीदेवी बजाज संस्थेचे विनीश काकडे, कृषी विभागाचे डॉ. नाडे आदी व्यासपीठावर होते.
            निसर्गावर अवलंबून असलेल्या कोरडावाहू शेतीसाठी पंतप्रधान पीक विमा योजनेमुळे पिकांना संरक्षण मिळणार असल्याचे सांगताना खासदार रामदास तडस म्हणाले की शेतक-यांना पिकांच्या संरक्षणासोबतच सिंचनाच्या सुविधा, विजेची उपलब्धता शेतीसाठी आवश्यक असलेल्या कर्जाची उपलब्धता होणे आवश्यक आहे. केंद्र राज्य शासनाचा निधी शेतक-यांसाठी विविध योजना राबविण्यात येत असल्या तरी शेतक-यांपर्यंत या योजना पोहचत नसल्यामुळे त्यांना या योजनेचा लाभ
घेता येत नाही, प्रत्येक योजना शेतक-यांपर्यंत पोहोचविण्यासाठी ग्रामपंचायत भवनामध्ये योजनांची माहिती ठळकपणे लावल्यास लाभार्थ्यांना लाभ घेणे सुलभ होणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
             पंतप्रधान जीवन विमा योजनेंतर्गत वर्धा जिल्ह्यातील 10 हजार शेतक-यांना विम्याचे संरक्षण दिले असल्याचे सांगताना ते पुढे म्हणाले की दरवर्षी दहा शेतक-यांना दत्तक घेऊन त्यांना कर्जमुक्त करण्यात येणार आहे सोबतच शेती पुरक व्यवसायाला मदत देऊन शेतक-यांना सक्षम करण्याचा मनोदय खासदार रामदास तडस यांनी व्यक्त केला. दहा शेतक-यांना दत्त्क घेऊन खासदार म्हणून मिळणा-या मानधनामधून या शेतक-यांना मदत करणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
पंतप्रधान पीक विमा योजनेबद्दल माहिती देताना उपविभागीय कृषी अधिकारी डॉ. उल्हास नाडे यांनी शेतक-यांना केवळ दीड ते दोन टक्के विम्याचा हफता भरून संपूर्ण पिकांचे संरक्षण होत असल्यामुळे खरीप हंगामासाठी येत्या 1 एप्रिल ते 30 ऑगस्टपर्यंत पिकांचा विम्याचे संरक्षण करून घ्यावे, असे आवाहन करताना रब्बी हंगामासाठी 1 ऑक्टोबरपासून विमा संरक्षण करून घेणे आवश्यक आहे. पीक विम्यावर शासनाने सर्वाधिक अर्थसाहाय्य दिले असून शेतक-यांसाठी विम्याचा दर अत्यंत अल्प ठेवण्यात आला आहे. जिल्हानिहाय पीकनिहाय विम्यासाठी वेगवेगळ्या दराची आवश्यकता नसून यापुढे केवळ दोन टक्के विमा रक्कम भरावी लागेल. विम्याच्या रक्कमेवर कोणतीही सिमा नसल्यामुळे या रकमेत कोणतीही कपात होणार नाही पूरपरिस्थितीत जलसंचय यामुळे पिकांच्या होणा-या नुकसानीलाही विम्याचे कवच राहणार आहे. विम्याचे दावे निकाली काढण्यासाठी मोबाईल आणि उपग्रह तंत्रज्ञानाचा वापर होणार आहे.
             यावेळी आत्म्याचे प्रकल्प संचालक दीपक पटेल यांनी परंपरागत कृषी विकास आणि सेंद्रिय शेती यावर मार्गदर्शन केले. जमीन आरोग्य अभियान राष्ट्रीय फलोत्पादन अभियान, पिकावरील कीड रोग व्यवस्थापन तसेच पशुसंवर्धनाबाबत विविध तज्ञांनी शेतक-यांना मार्गदर्शन केले.
               प्रारंभी कृषी विज्ञान केंद्राचे कार्यक्रम समन्वयक डॉ. सुरेश नेमाडे यांनी पंतप्रधान पीक विमा योजना जनजागृती अभियान तसेच पिकांच्या संरक्षणासाठी उत्पादन वाढीसाठी घ्यावयाच्या उपाययोजनांसंदर्भात प्रास्ताविकात माहिती दिली.
            कमी किमतीत जास्त फायदा पंतप्रधान पीक विमा योजना या माहिती पुस्तिकेचे प्रकाशन खासदार रामदास तडस यांच्याहस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे संचलन उज्वल सिरसाट यांनी तर आभार प्रदर्शन डॉ. प्रदीप दवणे यांनी केले. यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
*******