Tuesday 5 April 2016

डॉक्टरांनी गरीब रुग्णाच्या सेवेकरीता सदैव तत्पर रहावे
-         जे.पी.नड़्डा  
      वर्धा, दिनांक 1 - आपल्या देशातील सार्वजनिक वैद्यकीय सेवा बहुतांशी शहरी क्षेत्रात केंद्रीत झाल्या असून वैद्यकीय तज्ज्ञांचा विस्तार ग्रामीण क्षेत्रापर्यंत व्हावा. डॉक्टरांनी आपल्या व्यावसायिक प्रशिक्षणाचा लाभ गरीब जनतेला मिळावा या उद्देशाने रुग्ण-सेवेसाठी तत्पर व कटिबद्ध राहावे, असे आवाहन वर्धा येथील दत्ता मेघे आयुर्विज्ञान संस्थेच्या 7 व्या दीक्षांत समारंभाला प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित केंद्रीय आरोग्य व कुटुंब-कल्याण मंत्री जे.पी.नड़्डा यांनी केले. 
              समारंभाच्या अ‍ध्यक्षस्थानी दत्ता मेघे आयुर्विज्ञान संस्थेचे कुलपती श्री. दत्ता मेघे उपस्थित होते.  कराड येथील कृष्णा आयुर्विज्ञान संस्थेचे कुलपती डॉ. वेदप्रकाश मिश्रा, दत्ता मेघे आयुर्विज्ञान संस्थेचे कुलगुरु डॉ. गोडे सुद्धा यावेळी उपस्थित होते.
दीक्षांत समारोहप्रसंगी भावी डॉक्टरांना संबोधित करताना श्री. नड्डा यांनी डॉक्टरांना रुग्णांच्या वैद्यकीय समस्या सोडवण्यासोबतच त्यांच्याशी आपुलकीच्या नात्याने वागण्याचा सल्ला दिला. वैद्यकीय क्षेत्रात  डॉक्टरांची  तसेच गुणवत्तापूर्ण मानव संसाधनाची उणीव भरुन काढण्यासाठी देशभरात 11 अखिल भारतीय वैद्यकशास्त्र संस्था (एम्स) स्थापन करण्यात येणार आहे. त्यापैकी 6 संस्था कार्यरत झाल्या असून नागपुरातील एम्स येत्या 2 वर्षात पूर्णत्वास नेण्याचा आपल्या मंत्रालयाचा प्रयत्न असेल, असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.
या समारंभात विद्यार्थ्यांना आचार्य पदवी तसेच स्नातक व स्नातकोत्तर पदवीदान मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. डॉ. श्रुती, मेडीसीन या विद्याशाखेच्या तब्बल 11 सुवर्ण-पदकांच्या मानकरी ठरल्या.
डॉ.  वेदप्रकाश मिश्रा यांनी विद्यार्थ्यांना मोठे कार्य करण्याची जिद्द  मनाशी बांधून ते पूर्ण करण्याचा निर्धार आपल्या भाषणातून व्यक्त केला. समारंभास विविध विद्याशाखेचे विद्यार्थी, त्यांचे पालक, शिक्षकवृंद मोठ्या संख्येने उपस्थित होते.

000


No comments:

Post a Comment