Tuesday 5 April 2016

जंगलाशेजारील गावांचा सर्वांगीण
विकासासाठी निधी देणार
                                      - एम.एस.रेड्डी
Ø 15 गावांसाठी 4 कोटी 20 लक्ष रुपये
Ø जंगलावरील अवलंबित्‍व कमी करणार
Ø डॉ. श्‍यामाप्रसाद मुखर्जी जनवन योजनेचा आढावा
Ø पिकांच्‍या संरक्षणासाठी सौर कुंपन
             वर्धा, दि.5 – मध्‍यभारतातील समृद्ध जैवविविधता व वन्‍य प्राण्‍यांचा अधिवास असलेले बोर व्‍याघ्र प्रकल्पाच्‍या संरक्षण व संवर्धनासाठी स्‍थानिक जनतेचा सहभाग महत्‍वाचा आहे. व्‍याघ्र प्रकल्पा शेजारील पंधरा गावांचा सर्वांगिण विकास करण्‍यासाठी आवश्‍यक निधी उपलब्‍ध असल्‍याची माहिती मुख्‍य वन संरक्षक व क्षेत्र संचालक एम. एस. रेड्डी यांनी दिली.
            बोर व्‍याघ्र प्रकल्‍पाच्‍या प्रशासकीय परिसरात नव्‍याने बांधलेल्‍या व्‍याघ्र दर्शन सभागृहाचे उद्घाटन व ग्राम परिस्थितीकीय विकास समिती, डॉ. श्‍यामाप्रसाद मुखर्जी जनवन योजनेअंतर्गत राबविण्‍यात आलेल्‍या पंधरा गावातील कामांचा आढावा योग संचालक एम. एस. रेड्डी यांनी घेतला त्‍याप्रसंगी मागदर्शन करतांना ते बोलत होते.
            यावेळी विभागीय वन अधिकारी एस. बी. भलावी, बीएनएसचे विदर्भ प्रमुख डॉ. संजय करकरे, जिल्‍हा माहिती अधिकारी अनिल गडेकर, सहा वनसंरक्षक उत्‍तम सावंत, महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय विश्व विद्यालयाचे जनसंपर्क अधिकारी बी. एस. मिरगे, प्राध्यापक राजेश लेहकपुरे, कमलनयन बजाज संस्थेचे श्री.पवार, जानकीदेवी बजाज ग्रामविकास संस्थेचे विनेश काकडे उपस्थित होते.
            बोर व्‍याघ्र प्रकल्‍पाला लागून असलेल्‍या पंधरा गावातील जंगलावरील असलेले अवलंबित्‍व कमी करुन त्‍यांना गावातच गॅस कनेक्‍शन, सोलर दिवे, सोलर बॅटरीवरील शेतासाठी सौर कुंपन, सिमेंट बंधारे, नाला खोलीकरणाचे कामे घेण्‍यात आले असून यासाठी 4 कोटी 19 लक्ष 56 हजार रुपयांचा निधी उपलब्‍ध करुन दिला आहे.
            जंगल परिसरात राहणा-या नागरिकांना गावात आवश्‍यक सुविधा देताना त्‍यांना जंगलाच्‍या संरक्षणामध्‍ये सहकार्य वाढावे यासाठी प्रत्‍येक गावात समितीची स्‍थापना करण्‍यात  आली असल्‍याचे सांगताना एम. एस. रेड्डी म्‍हणाले की, गावात राहणा-या शेतक-यांचे जीवनमान उंचावावे व रोजगाराच्‍या संधी उपलब्‍ध होण्‍यासाठी आवश्‍यक प्रशिक्षण देण्‍यात येत आहे.
            शेतक-यांच्‍या पिकाचे वन्‍यप्राण्‍या पासून संरक्षण व्‍हावे यासाठी 294 लाभार्थ्‍यांना सौर कुंपन दिले आहे. वन्‍यप्राण्‍याचे मोकळया विहीरी पासून संरक्षणासाठी 145 विहीरीना संरक्षण कुंपण बसविण्‍यात आले आहे.
            वन परिसरातील गावाचा विकास करतांना गावातील महिलांचे नेतृत्‍व विकसित व्‍हावे यासाठी प्रशिक्षणासोबत समितीमध्‍ये सर्वानुमते गॅस कनेक्‍शन, गाव परिसरातील नाला खोलीकरण, सिमेंट नाला बांध दुरुस्‍ती, गुरांसाठी पाण्‍याचे हौद याचासाठी विविध प्रजातीची         दुध उत्‍पादन वाढीसाठी आवश्‍यक उपाययोजना राबवित येत असल्‍याचे श्री. रेड्डी यांनी सांगितले.
            ग्राम समित्‍यांनी गावातील विकास आराखड्यानुसार केलेल्‍या उपाययोजना व त्‍यावरील खर्चाबाबतचे सादरीकरण यावेळी केले.  गावातील महिलांना शिवण कलेचे प्रशिक्षण, मधु मक्षीकापालन, संगणक प्रशिक्षण यासारखे कौशल्‍य विकासाचे प्रशिक्षण देण्‍यात येत आहे.
            प्रारंभी क्षेत्र संचालक एम.एस.रेड्डी यांनी बोर सोविनिएर शॉपीचे उद्घाटन केले. गाव समितीत तयार केलेल्‍या विविध वस्‍तू पर्यटकांना उपलब्‍ध होणार आहे. गरमसुद, नवरगाव, बोरी  येथील ग्राम समितीच्‍या महिलांनी या शॉपीचे विधिवत उद्घाटनासाठी पुढाकार घेतला.
            यावेळी राजेंद्र गायनेर, श्रीमती आर.टी. भिंगारे-सावंत तसेच वनरक्षक, वनपाल यांनी गावांच्‍या विकास आराखडाचे सादरीकरण केले.          कार्यक्रमाचे संचालन व प्रास्‍ताविक उत्‍तम सावंत यांनी केले. यावेळी ग्राम समितीचे प्रमुख व सरपंच तसेच ग्राम समितीचे सदस्‍य उपस्थित होते.
00000



No comments:

Post a Comment