Friday 1 April 2016

आठवडी बाजाराचा इ-लिलाव 4 एप्रिल रोजी
        वर्धा, दिनांक 31 – वर्धा जिल्‍हा परिषदेंतर्गत आठवडी बाजार इ लिलावा करीता ग्रामपंचायत आंजी (मोठी), मांडगांव, कोरा बाजारांची इ-निविदा दिनांक 29 मार्च ते 4 एप्रिल 2016 रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत मागविण्‍यात येत आहे. बाजारांचा तपशील निविदेतील अटी व निविदा सूचना http:eauction.gov.inwww.zpwardha.in या वेबसाईटवर सविस्‍तर पाहावयास मिळेल.
           वर्धा जिल्‍हा परिषद, वर्धा मालकीचे आठवडी बाजार जाहीर (हर्रास) लिलाव दिनांक 1 एप्रिल 2016 ते 31 मार्च 2017 या कालावधी करिता ठेक्‍याने देण्‍याकरिता जाहीर लिलाव घेण्‍यात येणार आहे. आठवडी बाजार लिलावाच्‍या अटी व शर्ती तसेच सविस्‍तर माहिती जिल्‍हा परिषद, वर्धा तसेच संबंधित पंचायत समिती कार्यालयात कार्यालयीन वेळेमध्‍ये व जिल्हा परिषदेच्या www.zpwardha.in या संकेतस्थळावर पाहावयास मिळू शकेल. तरी ज्‍यांना बाजाराचा लिलाव घ्‍यावयाचा असेल त्‍यांनी आठवडी बाजार जाहीर (हर्रास) लिलाव सोमवार, दिनांक 4 एप्रिल 2016 रोजी  सकाळी 11.30 वाजता, जिल्‍हा परिषदेच्या सभागृहात होणार आहे.
          पंचायत समिती समुद्रपूर अंतर्गत, वायगाव (हळद्या) कांढली रोडवरील आंबा फळबहार, पंचायत समिती आर्वी अंतर्गत, दहेगाव (मुस्‍तफा) रोडवरील आंबा फळबहार, पंचायत समिती वर्धा अंतर्गत, सालोड (हिरापूर), तरोडा, मदनी, पंचायत समिती, देवळी अंतर्गत, सोनोरा, सांवगी (येंडे), शिरपूर (होरे), नागझरी, पंचायत समिती हिंगणघाट अंतर्गत, खानगाव, पोहणा, शिरसगाव ही आठवडी बाजारांची नावे आहेत.  लिलावात भाग  घेण्‍या-यांनी लिलावाच्या दिवशी सोबत फोटो असलेले ओळखपत्राची (आधार कार्ड) मूळ प्रत व झेरॉक्‍स आणावी, असेही मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी कळविले आहे.
                                                                                0000000

आरटीईअंतर्गत 25 टक्‍के ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया
वर्धा, दिनांक 31 – बालकांना मोफत व सक्‍तीच्‍या शिक्षणाचा अधिकार अधिनियम 2009 नुसार 25 टक्‍के प्रवेश प्रक्रिया यावर्षी सन 2016-17 मध्‍ये ऑनलाईन पद्धतीने राबविण्‍यात येत आहे. 31 मार्चपर्यंत जिल्‍ह्यातील 25 टक्‍के प्रवेश देणा-या शाळांची नोंदणी करण्‍यात येत आहे. शाळांची नोंदणी झाल्‍यावर 1 ते 2 दिवसांत प्रवेश प्रकिया सुरु होणार आहे.

पालकांनी 25 टक्‍के प्रवेशाकरीता नेट कॅफेला जाऊन ऑनलाईन फॉर्म भरुन घ्‍यावा फॉर्म भरताना काही अडचण आल्‍यास गट शिक्षणाधिकारी कार्यालयात मदत केंद्र सुरु करण्‍यात आलेले आहे,  त्‍याचा लाभ घ्‍यावा. पालकांनी 25 टक्‍के प्रवेशाकरीता सोबत मूळ कागदपत्राच्‍या प्रती सोबत घेऊन याव्‍यात. तसेच अनुसूचित जाती व जमातीकरीता जातीचे प्रमाणपत्र व अपंगाकरीता अपंगत्‍वाचे प्रमाणपत्र सोबत असावे. तसेच इतर मागासवर्गीय, विमुक्‍त व भटक्‍या जाती विशेष मागासवर्गीय जाती व अल्‍पसंख्‍याकाकरीता रु. 1 लक्षा पेक्षा कमी उत्‍पन्‍नाचा दाखला व जातीचे प्रमाणपत्र सोबत आणावेत आणि पालकांनी पाल्‍यांचे आरटीई 25 टक्‍के अंतर्गत फॉर्म भरुन घ्‍यावेत, असे प्राथमिक शिक्षणाधिकारी यांनी कळविले आहे.  
मार्च महिन्याचे निवृत्तवेतन 7 एप्रिलपर्यंत होणार
            वर्धा,दि.29 - कोषागार कार्यालयाकडून निवृत्‍ती वेतन, कुटुंब निवृत्‍तीवेतन घेणा-या निवृत्‍तीवेतनधारकांनी  दिनंक 31 मार्च 2016 आर्थिक वर्षाचा शेवटचा दिवस असल्‍याने संबधित बॅंकांना निवृत्‍ती वेतन पाठविण्‍यास विलंब होण्‍याची शक्‍यता नाकारता येत नाही. तरी मार्च महिन्‍याचे निवृत्‍तीवेतन दिनांक 7 एप्रिल 2016 पर्यंत होईल याबाबत नोंद घ्‍यावी, असे जिल्हा कोषागार अधिकारी यांनी कळविले आहे.
            तसेच जीवनप्रमाण (Digital life certificate)  कार्यपद्धतीचा वापर सुरु होणार असल्‍याने ज्‍या निवृत्‍तीवेतनधारकांनी आधार कार्ड, मोबाईल क्रमांक,  पॅन कार्ड, इ-मेल  आयडी पूर्ण नियुक्‍ती (अनुकंपा तत्‍वावर शासकीय सेवा) व पूर्णविवाह इत्‍यादी बाबतची माहिती या कार्यालयास पुरविलेली नसल्‍यास त्‍यांनी सदरील माहिती झेरॉक्‍स प्रतीसह दिनांक 11 एप्रिल पासून दुपारी 4 ते 5.30 या वेळेत घेऊन संबंधित लिपिकाशी संपर्क साधावा, असेही त्यांनी कळविले आहे.

‘                        जल-जागृती सप्‍ताह’ निमित्त
                पाटबंधारे विभागाचे जनजागृतीपर उपक्रम
वर्धा दि.22- ‘निम्‍न वर्धा कालवे उपविभाग क्र. 1 पुलगाव’ च्या वतीने जल जागृती सप्ताहांतर्गत विविध कार्यक्रमांचे आयेाजन करून जलजागृती करण्यात आली. यामध्ये पढेगांव येथील उच्‍च प्रा. शाळा येथे ‘पाण्‍याची बचत-काळाची गरज व सिंचनाचे महत्‍व’ या विषयावर चित्रकला स्‍पर्धा व लाभधारकांचे चर्चा सत्राचे आयोजन करण्‍यात आले होते.
यावेळी विद्यार्थ्‍यांनी चित्रकला स्‍पर्धा, वक्‍तृव स्‍पर्धेत उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. लाभधारक शेतक-यांना उपविभागीय अभियंता अशोकराव पावडे यांनी सिंचनाचे महत्‍व, पाण्‍याची बचत का, कशी व कुठे? पाण्‍याची बचत करुन, जास्‍तीत जास्‍त शेती उत्‍पादन कसे घेता येईल? याविषयी मार्गदर्शन केले. शाखा अभियंता श्री. खोकले यांनी शेतक-यां मध्‍ये जल-जागृती, सिंचनाची आवश्‍यकता व त्‍याकरिता उपलब्‍ध पाणीसाठ्याचा वापर, अपव्‍यय टाळणे, व ‘पाण्‍याची बचत-काळजी,आवश्‍यकता’ त्‍यामधील अडचणी, लाभधारकांचा सहभागाची आवश्‍यकता आदी विषयावर चर्चा व महत्‍व विषद करण्‍यात आले.
 कार्यक्रमाच्या यशस्‍वीतेसाठी पढेगावचे उपसरपंच नरेंद्र पहाडे, गणेश हिंगे, मुख्‍याध्‍यापक श्री. ताकसांडे, श्री. शेळके, जलसंपदा विभागाचे उपविभागीय अधिकारी अशोकराव पावडे, श्री. खोकले, श्री. बुरडे, श्री. पोहाने यांनी  पुढाकार घेतला.
000000


‘पाटबंधारे’च्यावतीने श्रमदानाने केली जल-जागृती
              वर्धा, दिनांक 22-  ‘निम्‍न वर्धा कालवे उपविभाग क्र. 1 पुलगावच्यावतीने जलजागृती सप्ताहानिमित्त  मौजा-टाकळी (खोडे) येथील लघु कालव्‍यातील गाळ काढणे, कालवा साफ-सफाई करणे आदी कामे श्रमदानाद्वारे लाभधारकांच्या उत्स्फूर्त सहभागाने करण्यात आली.
          श्रमदानात, कालवास्‍थळी-उपस्थित लाभधारक शेतक-यांना उपविभागीय अभियंता अशोकराव पावडे यांनी सिंचनामध्‍ये पाण्‍याचे प्रमाण व पाण्‍याची बचत करुन जास्‍तीत जास्‍त उत्‍पादन कसे घेता येईल? याबाबत मार्गदर्शन केले. उपस्थित शाखा अभियंता श्री. बुरडे, श्री. दातीर, श्री. पोहाने, श्री. खोकले यांनीही मार्गदर्शन केले.                        
         शेतक-यांमध्‍ये पाटचारीची कामाची आवश्‍यकता, त्‍यामधील अडचणी, पाणी वापर संस्‍था निर्मीती, लाभधारकांचा सहभाग व व्‍यवस्‍थापनाची कामे आदी विषयावर चर्चा व महत्‍व विषद करण्‍यात आले.
          या कार्यक्रमाला यशस्‍वीतेसाठी लाभधारक शेतकरी अरुण लाहोरे, महादेवराव बोबडे, एकनाथ राऊत, संजय आजनकर, नामदेवराव आजनकर, पोलिस पाटील सुभाष बोबडे, श्रीधर रोकडे यांनी पुढाकार घेतला.  
                                                                    0000000

                          वर्धा येथे क्रीडा नैपुण्‍य चाचण्‍यांचे आयोजन
वर्धा, दिनांक 22- क्रीडा व युवक सेवा संचालनालय, पुणेद्वारा संचालित शिव छत्रपती क्रीडापीठांतर्गत प्रतिवर्षी विविध क्रीडा प्रबोधिनीत प्रवेशासाठी 8 ते 14 वर्षे वयोगटातील मुला-मुलींसाठी क्रीडा नैपुण्‍य चाचण्‍यांचे आयोजन करण्‍यात येते. 17 वर्षा आतील राष्‍ट्रीय पातळीवरील पदक विजेत्‍या खेळाडूंसाठी सरळ प्रवेश प्रक्रिया राबविली जाते. त्‍यानुसार वर्धा जिल्‍ह्यातील खेळाडू विद्यार्थ्‍यांसाठी दिनांक 30 मार्च 2016 रोजी सकाळी 11 वाजता जिल्‍हा क्रीडा संकुल, वर्धा येथे जिल्‍हास्‍तरीय क्रीडा नैपुण्‍य चाचण्‍यांचे आयोजन करण्‍यात आले आहे. तरी सर्व इच्‍छुकांनी दिनांक 30 मार्च, 2016 रोजी क्रीडा संकुल येथे तयारीनिशी उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयातर्फे करण्यात आले आहे.  
क्रीडा नैपुण्‍य चाचण्‍यांमध्‍ये वजन, उंची, लचचिकता, 6 बाय 10 मी. शटलरन, 30 मी. डॅश, मेडिसीन बॉल पुट, उभी उंच उडी, उभी लांब उडी, 800 मी. दौड प्रत्‍येक चाचणीस 3 गुण असतील. 17 गुण प्राप्‍त करणारे खेळाडू राज्यस्तरीय चाचणीसाठी पात्र ठरतील, असेही जिल्‍हा क्रीडा अधिकारी यांनी कळविले आहे.
                                                      000000


Monday 28 March 2016

जल स्वावलंबनासाठी सर्वांनी पुढाकार घ्यावा
-    रामदास तडस
Ø जलजागृती सप्ताहाचा थाटात समारोप
Ø विद्यार्थ्यांसह विविध स्पर्धकांना बक्षीसाचे वितरण
Ø निसर्ग सेवा समितीच्यावतीने हुतात्मा स्मारकात कार्यक्रम
 वर्धा, दिनांक 22 – पाणी हेच जीवन असून प्रत्येकाने पाणी वाचविण्याचा संकल्प करून कर्तव्य पार पाडावे. पाणी टंचाई सदृश परिस्थिती लक्षात घेता सर्वांच्याच उज्ज्व्ल भवितव्यासाठी प्रत्येकाने जल स्वावलंबनासाठी सर्वांनी पुढाकार घ्यावा. पाण्याचे स्त्रोत बळकटीकरणासाठी जलयुक्त शिवार अभियानाच्या माध्यमातून पाणी बचतीसाठीही सर्वांनी पुढे येणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन खासदार रामदास तडस यांनी केले.
           विकास भवन येथे जलजागृती सप्ताहाच्या समारोप कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी आशुतोष सलिल, जलसंपदा विभागाचे अधीक्षक अभियंता जयंत दळवी, जिल्हा माहिती अधिकारी अनिल गडेकर, कार्यकारी अभियंता शंकर मंडवार, श्री. ढवळे, अमित मेश्राम, दत्तात्रय रब्बेवार, जिल्हा परिषद सदस्य अविनाश देव उपस्थित होते.
           खासदार रामदास तडस म्हणाले, जिल्ह्यातील अपूर्ण सिंचन प्रकल्पांना पूर्ण करण्यास प्राधान्य देण्यात येणार असून निम्न वर्धा प्रकल्पास पंतप्रधान सिंचन विकास कार्यक्रमांतर्गत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दत्तक घेतले आहे. या प्रकल्पापासून 66 हजार हेक्टर शेती पाण्याखाली आल्याने या भागातील शेतकरी सुजलाम्, सुफलाम् होण्यास मदत होणार आहे. हा प्रकल्प केंद्र राज्य सरकारच्या मदतीने 2017 पर्यंत पूर्णत्वास येईल,अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
जल स्वावलंबनासाठी सर्वांनी पुढाकार घ्यावा (पान एकवरून)
 जलसंपदा विभागातील अधिका-यांनीही हा प्रकल्प लवकर पूर्णत्वास नेऊन शेतक-यांना दिलासा देण्याचे कार्य करावे, असे आवाहन ही त्यांनी यावेळी केली. या प्रकल्पामुळे शेतक-यांचे आर्थिक उत्पादन वाढवून  तो स्वयंपूर्ण होईल, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
          जिल्हाधिकारी आशुतोष सलिल यांनी जलजागृती सप्ताहानिमित्त राबविण्यात आलेल्या विविध उपक्रमांचे कौतूक केले. तसेच या पुढेही लोकांमध्ये पाणी बचतीचा संदेश देण्यासाठी जलसमृद्धीसाठी सर्वांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन त्यांनी यावेळी केले. या सप्ताहाच्या माध्यमातूनही जागृती निर्माण झाली आहे. पाण्याची बचत काळाची गरज असून प्रत्येकाने पाण्याच्या संवर्धनासाठी  सर्वांनीच एकत्रित येऊन पाण्याची बचत करावी, असे आवाहनही त्यांनी केले.
           यावेळी विभागाच्यावतीने जिल्हाभरात राबविण्यात आलेल्या विविध स्पर्धकांना मान्यवरांच्याहस्ते प्रशस्तीपत्र,स्मृतीचिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले. यामध्ये चित्रकला स्पर्धेत प्रज्वल साटोने, अपेक्षा तडस, प्रवेश गोंडाने, वक्तृत्व स्पर्धेत संजिवनी बकाने, अवंतिका लुंगे, आरती बाळबुधे, निखील डफरे, निबंध स्पर्धेत संकेत इंगोले, मानवी काकडे, प्रचिती महल्ले यांचा समावेश होता. तसेच सप्ताहात सर्वोत्तम कामगिरी करणा-या अधिकारी, कर्मचा-यांचाही यावेळी मान्यवरांच्याहस्ते सत्कार करण्यात आला. विद्यार्थी निखील डफरे याने यावेळी मनोगत व्यक्त केले.
          पाटबंधारे विभागाच्या वरिष्ठ लिपिक लता डोंगरे यांनी तयार केलेल्या सिंचनगंगा चित्रकथेचे उपस्थितांसमोर सादरीकरण करण्यात आले. तसेच श्री. बोडेकर यांनी सप्ताहांतर्गत राबविण्यात आलेल्या कार्यक्रमांचे पॉवरपॉइंटद्वारे सादरीकरण करण्यात आले. कार्यक्रमाची सांगता पसायदानाने झाली.
 ‘हुतात्मा स्मारकाचा परिसर दत्तक घेणार
         जागतिक जल दिनाचे औचित्य साधून सेवाग्राम परिसरातील हुतात्मा स्मारकात सकाळी 9.30 वाजता खासदार रामदास तडस यांच्याहस्ते जलजागृती सप्ताहाचा समारोप व बा-कस्तुरबा गांधी व महादेवभाई देसाई स्मृती हुतात्मा स्मारकाच्या संरक्षक भिंतीचे लोकार्पण खासदार रामदास तडस, जिल्हाधिकारी आशुतोष सलिल यांच्याहस्ते करण्यात आले.
         यावेळी सेवाग्राम आश्रमाचे सचिव श्रीराम जाधव, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता शरद चौधरी, सेवाग्रामच्या सरपंच रोशनाताई जामलेकर, मुरूडचे सरपंच वासुदेव देवडे यांच्या उपस्थितीत जलजागृती सप्ताहाचा समारोप व बा-कस्तुरबा गांधी व महादेवभाई देसाई स्मृती हुतात्मा स्मारकाच्या संरक्षक भिंतीचा लोकार्पण सोहळा पार पडला.         
खासदार रामदास तडस यांनी प्रत्येकाने निसर्ग संवर्धनासाठी पुढे यावे, असे आवाहन केले. तसेच हुतात्मा स्मारकात लवकरच बोअरवेल, मोटार व संरक्षण भिंत, हायमास्ट या सुविधा देण्यात येऊन हा परिसरच दत्तक घेणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. जिल्हाधिकारी आशुतोष सलिल यांनी मराठवाड्याची पाणी परिस्थिती दयनीय आहे. अशी परिस्थिती आपल्याकडे ओढवू नये याकरीता वृक्षारोपण, पाण्याची बचत ही काळाची गरज आहे. निसर्ग सेवा समितीचे कार्य कौतुकास्पद आहे. निसर्ग संवर्धनासाठी सर्वांनीच पुढाकार घ्यावा, असेही ते यावेळी म्हणाले. मान्यवरांचे स्वागत सन्मानचिन्ह, वृक्ष देऊन करण्यात आले.  यावेळी जिल्हा नियोजन अधिकारी प्रकाश डायरे यांचाही सत्कार करण्यात आला.
सरपंच श्रीमती जामलेकर यांनीही विचार व्यक्त केले.
            प्रारंभी मान्यवरांच्याहस्ते जलसंस्कृतीचे प्रतीक म्हणून कलशाचे पूजन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक निसर्ग सेवा समितीचे अध्यक्ष मुरलीधर बेलखोडे यांनी केले. यावेळी जलप्रतिज्ञा म्हणण्यात आलीराष्ट्रवंदनने कार्यक्रमांची सांगता झाली.
           कार्यक्रमास जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक श्री. जांगडा, उप वनसंरक्षक दिगंबर पगारसामाजिक वनीकरण विभागाचे उपसंचालक प्रवीणकुमार बडगे, प्रा. मोहन गुजरकर, पीपल्स फॉर ॲनिमलचे आशीष गोस्वामी, पंतजली योग समितीचे दामोदर राऊत, ग्रामोपयोगी विज्ञान केंद्राचे सोहम् पंड्या, इमरान राही, डॉ. सोमवंशी, रमेश केला, श्री. हांडे, श्री. येंडे, रवी गुप्ता, हेमचंद्र वैद्य, आशीष पोहाने, उपअभियंता श्री. मून, श्री. जाधव आदींची उपस्थिती होती.
00000