Saturday 2 December 2017



                       बंदीजनांच्या जीवनात प्रकाशदिवे
        वर्धा दि 29 जिमाका :-गुन्हा करत असताना रागाच्या भरात त्या गुन्ह्याची गंभीरता लक्षात येत नाही. पण  राग शांत झाल्यावर केलेल्या कृतीचा  पश्चाताप होतो. मात्र तोपर्यंत पुलाखालून बरेच पाणी वाहून गेलेले असते. अशाच  गुन्ह्याची शिक्षा अनेक कैदी कारागृहात भोगत असतात. मात्र कारागृहातून बाहेर पडल्यावर त्यांना सहज रोजगार मिळत नाही. समाजाचा दृष्टिकोनही बदललेला असतो. . अशावेळी एखादे अंगभूत कौशल्य हाताशी असले तर पुढील आयुष्य जगण्यासाठी संधी मिळते. हाच विचार करून कारागृह प्रशासनाने कैद्यांना एल ई डी दिवे बनविण्याचे प्रशिक्षण देऊन त्यांच्या सुप्तगुणांना वाव देण्यासोबतच बंदीजनांच्या  भविष्यातील प्रकाशाची तरतूद केली आहे.
        वर्धा कारागृहातील बंदिस्त 12 कैद्यांना महात्मा गांधी ग्रामीण औदयोगिक संस्थेच्या वतीने 15 दिवसांचे एल इ डी दिवे बनविण्याचे प्रशिक्षण देण्यात आले. यासाठी जिल्हा वार्षिक योजना नाविन्यपूर्ण योजनेमधून कौशल्यं विकाससाठी निधी उपलब्ध करून देण्यात आला. 2 लक्ष 93 हजार रूपयांमधून यासाठीचा कच्चा माल व साहित्य खरेदी करून कैद्यानी  150 विविध वॅट चे दिवे बनविले.
          बाजारात उपलब्ध दिव्यांमध्ये प्लास्टिकचे वेष्टन असलेले दिवे आहेत. कैद्यानी बनवलेले दिवे हे अल्युमिनिअम वेष्टनात बनविले असल्यामुळे त्याची किंमत जास्त आहे मात्र हे दिवे 5 वर्ष टिकणारे असून 50 हजार तास अविरत चालू शकतात. तसेच  बिघडलेले किंवा मर्यादा संपलेले दिवे सुद्धा कैदी दुरुस्त करून देऊ शकतात. यामध्ये 5 वॅट 12 वॅट 40 वॅट एल ई डी दिवे, स्ट्रीट लाईट,सोलर दिवे, यांचा समावेश आहे.
         बाजारपेठेत असलेल्या कमी किमतीच्या दिव्यांशी स्पर्धा करण्याकरिता प्लास्टिक वेष्टन असलेले कमी किमतीचे दिवे सुद्धा तयार करावेत. तसेच आता बनविलेले दिवे सुद्धा विक्रीसाठी ठेवावेत. ग्राहकांना स्वताच दोन्ही दिव्यांची चाचणी घेतल्यानंतर ग्राहकांना जास्त दिवस चालणार्या दिव्यांविषयी खात्री पटून याला जास्त ग्राहक मिळतील अशी अपेक्षा जिल्हाधिकारी यांनी यावेळी व्यक्त केली.  कैद्यानी 5 किलो वॅट चे सोलर पंप बनवावे. यामुळे शेतक-यांना कमी दरात सोलर पंप उपलब्ध होतील. आशा प्रकल्पामुळे कैद्यांच्या सुप्त गुणांना वाव मिळून त्यांची शिक्षा पूर्ण झाल्यावर या प्रशिक्षणामुळे रोजगाराची संधी उपलब्ध होईल अशी आशा जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी यावेळी व्यक्त केली.
आज त्यांनी कारागृहात भेट देऊन  प्रशिक्षण प्रकल्पाची पाहणी करून मी बंदीजनांशी संवाद साधला. यावेळी एमगिरीचे व्यवस्थापक प्रफुल काळे, जिल्हा कारागृह अधीक्षक अनिल खामकर, एमगिरीचे अधिकारी राविकुमार, एस पी वाघाडे, कारागहाचे अधिकारी  उपस्थित होते.
                                        0000




चित्ररथाव्दारे जलयुक्त्‍ शिवारबाबत जनजागृती
Ø 2017-18 मधील 138 गावांमध्ये फिरतोय चित्ररथ
          वर्धा ,दि.29-ग्रामीण भागात पाण्याचे महत्व समजावून सांगणे, पाणी बचत, कमी पाण्याचा जास्तीत जास्त चांगला उपयोग तसेच पाणी अडवा पाणी जीरवा याची माहिती पटवून देण्यासाठी जलयुक्त शिवार अभियानाअंतर्गत  चित्ररथाच्या माध्यमातून जनजागृती  करण्यात येत असुन याला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.
          जलसंधारणमंत्री प्रा.राम शिंदे यांच्या हस्ते 9 नोव्हेंबर रोजी हिरवी झेंडी दाखवून विकास भवन येथुन चित्ररथ मार्गस्थ करण्यात आला होता. सदर चित्ररथ आठही तालुक्यातील 138 गावांमध्ये फिरणार असुन गावक-यांना शासनाच्या विविध योजनांची माहिती आणि शौचालयाच्या वापराबाबत सुध्दा जनजागृती करण्यात येत आहे. 8X6  फुट आकाराच्या एल.ई.डी. स्क्रीनवर विविध लघुचित्रफीती आणि माहितीपटाच्याव्दारे नागरिकांना माहिती देण्यात येत आहे. आतापर्यंत 47 गावांमध्ये चित्ररथ फिरविण्यात आला आहे. या चित्ररथासोबत त्या-त्या क्षेत्रातील कृषी सहाय्यक राहत असुन तो गावातील लोकांना जलयुक्त  शिवार मधील कामांबाबत माहिती देत असुन योजनांची माहिती सुध्दा देतो. त्यामुळे उर्वरित गावातील नागरिकांनी या चित्ररथाच्या माध्यमातून योजनांची माहिती करुन घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी यांनी केले आहे.
                                                0000



                 प्रलंबीत कृषी पंप वीज जोडणीसाठी 80 कोटीची मागणी
वर्धा, दि.30(जिमाका), वर्धा जिल्हयात कृषि पंप वीज जोडणीसाठी आतापर्यंत 106 कोटी 75 लक्ष रुपये खर्च करण्यात आले असुन प्रलंबीत कृषि  पंपासाठी 80 कोटीची मागणी शासनाकडे केली आहे. कृषिपंप वीज जोडणीसाठी राज्यस्तरावर ई-निविदा प्रक्रियेचा उपयोग करुन कत्रांटदारांची नेमणुक करण्यात येत असुन ई.आर.पी या अद्यावत संगणक प्रणाली मार्फत कामांबाबत पडताळणी प्रक्रिया पूर्ण होत असल्यामुळे कामा पारदर्शकता आली असल्याची  माहिती महावितरणचे अधिक्षक अभियंता सुनील देशपांडे यांनी दिली.
          मार्च 2015 पर्यंत प्रलंबीत कृषीपंपाची संख्या 4 हजार 471 होती. यासर्व कृषी पंपाना वीज जोडणी देण्यात आली. एप्रिल 2015 ते मार्च 2016 पर्यंत प्रलंबीत कृषी पंपाची संख्या 2 हजार 484  होती त्यापैकी 2 हजार 383 कृषी पंपाना वीज जोडणी देण्यात आली. तसेच  प्रलंबीत 109 कृषी पंपाचे काम प्रगतीपथावर आहे. एप्रिल 2016 ते मार्च 2017 पर्यंत प्रलंबीत कृषी पंप 2 हजार 718 होते. त्यापैकी 667 कृषी पंपाना वीज जोडणी देण्यात आली. उर्वरीत पैकी 1 हजार 500 कृषी पंपाची कामे प्रगतीपथावर आहेत. हे काम डिसेंबरपर्यंत पूर्ण होवून कृषी पंप कार्यान्वित होतील. उर्वरित 752 कृषीपंप  आणि ऑक्टोंबर 2017 पर्यंतचे 1 हजार 590  प्रलंबीत  कृषी पंपासाठी 80 कोटी रुपयांचा निधीची मागणी शासनाकडे केली असुन निधी प्राप्त होताच कामे पूर्ण करण्यात येतील, असे श्री. देशपांडे यांनी सांगितले.
          वर्धा जिल्हयातील महावितरणतर्फे विविध कामासाठी वरिष्ठ कार्यालयाकडून पुर्वमान्यता घेवून ई-टेडरींग प्रणालीमार्फत निविदा काढण्यात येतात. कामे पूर्ण झाल्यावर कामांची  मोजणी, साहित्य तपासणी तसेच देयकांबाबतची संपूर्ण प्रक्रिया ई-आर-पी या अद्यावत संगणक प्रणाली मार्फत पार पाडली जाते. त्यामुळे देयकाचे मुल्यमापन होऊन त्याची माहिती ई-आर-पी सिस्टिममध्ये  पडताळणी होते. यामुळे कामात पारदर्शकता आली असुन  कंत्राटदाराने केलेल्या कामाची तपासणी व अंकेक्ष्‍ण करुनच कंत्राटदारास  देयके अदा होत असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच कोणत्याही कंत्राटदारास आगाऊ रक्कम देण्याचा अधिकार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे.
          2017-18 मध्ये 1 हजार 380 शेतक-यांच्या कृषी पंपाना विद्युत पुरवठा देण्यात आला आहे. डिमांड भरलेल्या आणि प्रलंबीत असलेल्या कृषीपंप वीज जोडणीसाठी शासनाकडे पाठपुरावा करण्यात येत असल्याचेही त्यांनी सांगितले.
                            

Sunday 26 November 2017



            वाचनातून मनुष्याचे जीवन घडत असते
                                             -सुनिता कावळे
वर्धा, दि. 25 : वाचनामुळे माणसाच्याच्या मेंदूवर चांगला परिणाम होऊन यातून मनुष्याचे जीवन घडत असते. यामुळे माणुस संवेदनशील होऊन  समाजाकडे पाहण्याचा त्याचा दृष्टिकोन बदलतो. यासाठी प्रत्येकाने वाचन केले पाहिजे. असे मनोगत सुप्रसिध्द साहित्यिक डॉ. सुनिता कावळे यांनी व्यक्त केले.
 ग्रंथोत्सवाच्या दुस-या दिवशीय प्रथम सत्रात बाल साहित्य संमेलनात त्या बोलत होत्या.
यावेळी यशवंत विद्यालयाच्या मुख्याद्यापिका रंजना दाते, मीनल रोहणकर, श्रीमती कोट्टेवार, विनोद तांबे उपस्थित होते.
प्रत्येक विद्यार्थ्यांनी बाल साहित्याचा इतिहास जाणून घेतला पाहिजे यासाठी जेष्ठ बाल साहित्यकार यांचे मार्गदर्शन घेतले पाहिजे. विद्यार्थ्यांनी बाल साहित्य वाचन केल्यास  बाल साहित्य संस्कृती जपली जाऊन  त्यांची कथा कथन शैली विकसित  होईल, असे त्या म्हणाल्या.  निर्मळ मनातून निर्माण होणारे साहित्य हे खरे साहित्य असते. विचार मंथनातून खरा  बुध्दीचा विकास होतेा. विद्यार्थ्यांनी चांगले काय व वाईट काय हा सारासार विवेक जागृत करुन ठेवला पाहिजे. स्वत:ला स्वत: घडवावे यातून साहित्य निर्माण करावे. असे विचार सुनिता कावळे यांनी व्यक्त केले.
विनोद तांबे म्हणाले, आजच्या सोशन मिडियाच्या युगात बाल साहित्य हरविले आहे. यासाठी मुलांनी बाल साहित्याची आवड निर्माण करावी. मुलांमध्ये वाचन करण्याची गरज आहे. विज्ञानाच्या युगामध्ये मुलांचे बालपण हरविले आहे. बालपणापासुन साहित्याची आवड निर्माण होणे गरजेचे आहे.
यावेळी बाल साहित्यकारांनी स्वरचीत कथा, कवितेचे कथन केले.  कार्यक्रमाचे प्रास्ताविक रंजना दाते यांनी तर संचालन साक्षी रामटेके या विद्यार्थींनीने केले.



वाचनाचे संस्कार बालपणीच होणे आवश्यक
                                                                                  
- प्रदीप दाते.
-
ग्रंथोत्सवाचा समारोप
    वर्धा दि 25 (जिमाका ):- संस्कारक्षम पिढी घडविण्यासाठी ग्रंथोत्सवाचे आयोजन महत्वाचे  आहे. वाचनाची आवड निर्माण करण्यासाठी वाचनाचे संस्कार बालपणीच व्हावे लागतात, ते संस्कार करण्याची जबाबदारी ग्रंथालयासोबतच शिक्षकांची सुद्धा आहे असे प्रतिपादन  प्रदीप दाते यांनी केले.
ग्रंथोत्सव 2017 चा समारोप आज झाला .यावेळी अध्यक्षस्थानावरून श्री   दाते बोलत होते. या कार्यक्रमाला विदर्भ साहित्य संघाचे अध्यक्ष संजय इंगळे तिगावकार, डॉ गजानन कोटेवार, जिल्हा माहिती अधिकारी मनीषा सावळे, डॉ यू पी नाल्हे, जिल्हा ग्रंथपाल  अस्मिता मंडपे, सुधीर गवळी उपस्थित होते.
पुढे बोलताना दाते म्हणाले, प्रत्येकाने आपले काम आवडीने आणि झोकून देऊन केले तर चांगली पिढी तयार होईल. वाचनाची आवड आज विद्यार्थ्यांना मध्ये राहिलीच नाही. परीक्षा पद्धती ही बहूपर्यायी झाली असल्यामुळे विद्यार्थी सखोल वाचन करत नाहीत. त्यामुळे   त्यांच्यामध्ये वाचनाची आवड निर्माण करणे गरजेचे आहे. अशा विद्यार्थ्यांसाठी हा कार्यक्रम होता पण तरुण वर्गाचं योगदान यात दिसत नसल्याची  खंत त्यांनी व्यक्त केली.
या कार्यक्रमासाठी निधी वाढवून द्यावा अशी मागणी करून
  वर्धेत साहित्य आणि सांस्कृतिक क्षेत्रात काम करणारे कार्यकर्ते कायम  सहकार्य  देतील अशी हमी श्री दाते यांनी  दिली. 
समाजाला जोडण्यासाठी, प्रकाशक,लेखक विक्रेते आणि वाचक यांना एकत्र करण्याचे काम  शासन ग्रंथोत्सवाच्या माध्यमातून करत आहे.  महाविद्यालयाच्या ग्रंथपालांची स्थिती चांगली आहे. मात्र सार्वजनिक वाचनालयाची परिस्थिती चिंताजनक आहे. वाचनाची भूक भागवणारी माणस आज उपाशी आहेत.  वाचनालयात अल्पशा मानधनावर काम करायला  कुणी  तयार होत नाही अशी व्यथा श्री नाल्हे यांनी मांडली .सार्वजनिक ग्रंथालयाला  शासनाने जागा उपलब्ध करून द्यावी. वाचनालये ही गावाची सांस्कृतिक ठेव आहे. त्यामुळे  सार्वजनिक ग्रंथालये आणि शालेय ग्रंथालयांची स्थिती ही महाविद्यालयीन ग्रंथालयांसारखी व्हावी, अशी आशा श्री यू पी नाल्हे  यांनी व्यक्त केली.
यावेळी मनोगत व्यक्त करताना गजानन कोटेवार यांनी ग्रंथालयांच्या परिस्थितीवर मार्मिक भाष्य केले. ग्रंथालयांचे  अनुदान दुप्पट करण्यासाठी आपली पत, काम आणि दर्जा  दिसला पाहिजे. ग्रंथालयांच्या अवस्थेसाठी  ग्रंथालये स्वताच जबाबदार आहेत. 50 %  वाचनालये उघडलीच जात नाहीत,अशी परिस्थिती आहे. आपणही जरा ग्रंथालयांच्या कामकाजासाठी आपले योगदानाचे परीक्षण करण्याची गरज आहे.  त्यामुळे ग्रंथालयांचा गुणात्मक दर्जा वाढला पाहीजे, अशी अपेक्षा कोटेवार यांनी व्यक्त केली.
यावेळी ग्रंथोत्सवात सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांना,
  आणि वाचनलयाना  प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले
कार्यक्रमामाचे संचालन श्रीमती बेलखोडे यांनी तर आभार अस्मिता मंडपे  यांनी व्यक्त केले.