Saturday 2 December 2017



                       बंदीजनांच्या जीवनात प्रकाशदिवे
        वर्धा दि 29 जिमाका :-गुन्हा करत असताना रागाच्या भरात त्या गुन्ह्याची गंभीरता लक्षात येत नाही. पण  राग शांत झाल्यावर केलेल्या कृतीचा  पश्चाताप होतो. मात्र तोपर्यंत पुलाखालून बरेच पाणी वाहून गेलेले असते. अशाच  गुन्ह्याची शिक्षा अनेक कैदी कारागृहात भोगत असतात. मात्र कारागृहातून बाहेर पडल्यावर त्यांना सहज रोजगार मिळत नाही. समाजाचा दृष्टिकोनही बदललेला असतो. . अशावेळी एखादे अंगभूत कौशल्य हाताशी असले तर पुढील आयुष्य जगण्यासाठी संधी मिळते. हाच विचार करून कारागृह प्रशासनाने कैद्यांना एल ई डी दिवे बनविण्याचे प्रशिक्षण देऊन त्यांच्या सुप्तगुणांना वाव देण्यासोबतच बंदीजनांच्या  भविष्यातील प्रकाशाची तरतूद केली आहे.
        वर्धा कारागृहातील बंदिस्त 12 कैद्यांना महात्मा गांधी ग्रामीण औदयोगिक संस्थेच्या वतीने 15 दिवसांचे एल इ डी दिवे बनविण्याचे प्रशिक्षण देण्यात आले. यासाठी जिल्हा वार्षिक योजना नाविन्यपूर्ण योजनेमधून कौशल्यं विकाससाठी निधी उपलब्ध करून देण्यात आला. 2 लक्ष 93 हजार रूपयांमधून यासाठीचा कच्चा माल व साहित्य खरेदी करून कैद्यानी  150 विविध वॅट चे दिवे बनविले.
          बाजारात उपलब्ध दिव्यांमध्ये प्लास्टिकचे वेष्टन असलेले दिवे आहेत. कैद्यानी बनवलेले दिवे हे अल्युमिनिअम वेष्टनात बनविले असल्यामुळे त्याची किंमत जास्त आहे मात्र हे दिवे 5 वर्ष टिकणारे असून 50 हजार तास अविरत चालू शकतात. तसेच  बिघडलेले किंवा मर्यादा संपलेले दिवे सुद्धा कैदी दुरुस्त करून देऊ शकतात. यामध्ये 5 वॅट 12 वॅट 40 वॅट एल ई डी दिवे, स्ट्रीट लाईट,सोलर दिवे, यांचा समावेश आहे.
         बाजारपेठेत असलेल्या कमी किमतीच्या दिव्यांशी स्पर्धा करण्याकरिता प्लास्टिक वेष्टन असलेले कमी किमतीचे दिवे सुद्धा तयार करावेत. तसेच आता बनविलेले दिवे सुद्धा विक्रीसाठी ठेवावेत. ग्राहकांना स्वताच दोन्ही दिव्यांची चाचणी घेतल्यानंतर ग्राहकांना जास्त दिवस चालणार्या दिव्यांविषयी खात्री पटून याला जास्त ग्राहक मिळतील अशी अपेक्षा जिल्हाधिकारी यांनी यावेळी व्यक्त केली.  कैद्यानी 5 किलो वॅट चे सोलर पंप बनवावे. यामुळे शेतक-यांना कमी दरात सोलर पंप उपलब्ध होतील. आशा प्रकल्पामुळे कैद्यांच्या सुप्त गुणांना वाव मिळून त्यांची शिक्षा पूर्ण झाल्यावर या प्रशिक्षणामुळे रोजगाराची संधी उपलब्ध होईल अशी आशा जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी यावेळी व्यक्त केली.
आज त्यांनी कारागृहात भेट देऊन  प्रशिक्षण प्रकल्पाची पाहणी करून मी बंदीजनांशी संवाद साधला. यावेळी एमगिरीचे व्यवस्थापक प्रफुल काळे, जिल्हा कारागृह अधीक्षक अनिल खामकर, एमगिरीचे अधिकारी राविकुमार, एस पी वाघाडे, कारागहाचे अधिकारी  उपस्थित होते.
                                        0000


No comments:

Post a Comment