Thursday 14 January 2016

                            स्‍व.यशवंतराव चव्‍हाण राज्‍य वाङ्मय पुरस्‍कारासाठी
प्रवेशिका,पुस्‍तके 5 फेब्रुवारीपर्यंत पाठविण्याचे आवाहन
            वर्धा, दिनांक 14 -  मराठी भाषेतील उत्‍कृष्‍ट वाङ्मय निर्मितीसाठी प्रकाशन वर्ष 2015 करिता राज्‍य शासनाच्‍यावतीने देण्‍यात येणा-या स्‍व.यशवंतराव चव्‍हाण राज्‍य वाङ्मय पुरस्‍कारांसाठीच्‍या प्रवेशिका जिल्‍हाधिकारी कार्यालयात 5 फेब्रुवारीपर्यंत पाठविता येणार आहेत, असे निवासी उपजिल्‍हाधिकारी वैभव नावडकर यांनी सांगितले आहे.
            दिनांक 1 जानेवारी ते 31 डिसेंबर 2015 या कालावधीत प्रकाशित झालेली प्रथम आवृत्‍ती पुस्‍तके या स्‍पर्धेसाठी पात्र आहेत. या स्‍पर्धेची नियमावली व प्रवेशिका जिल्‍हाधिकारी कार्यालयाच्या सर्व साधारण शाखा अथवा करमणूक शाखा विनामुल्‍य उपलब्‍ध होतील. महाराष्‍ट्र शासनाच्‍या www.maharashtra.gov.in  या संकेतस्थळावर नवीन संदेश या शीर्षाखालीही व महाराष्‍ट्र राज्‍य साहित्‍य आणि संस्‍कृती मंडळाच्‍या http:msblc.maharashtra.gov.in या संकेतस्‍थळावर प्रवेशिका व नियमपुस्तिका उपलब्‍ध होतील. प्रवेशिका पूर्णतः भरुन आवश्‍यक साहित्‍यासह सचिव, महाराष्‍ट्र राज्‍य साहित्‍य आणि संस्‍कृती मंडळाच्‍या कार्यालयात दिनांक 5 फेब्रुवारीपर्यंत पोहचतील, अशा बेताने पाठवाव्‍यात. लेखक, प्रकाशक या स्‍पर्धेसाठी प्रवेशिका दाखल करु शकतात.
            संबंधित जिल्‍हाधिकारी कार्यालयामध्‍ये साहित्‍य 5 फेब्रुवारी 2016 पर्यंत पाठवावे, असे आवाहन सचिव, महाराष्‍ट्र राज्‍य साहित्‍य आणि संस्‍कृती मंडळ यांनीही केले आहे. लेखन, प्रकाशकांनी मंडळाकडे प्रवेशिका व पुस्‍तके पाठविताना सदर बंद लिफाफ्यावर, पाकीटावर ‘स्‍व.यशवंतराव चव्‍हाण राज्‍य वाडःय पुरस्‍कार 2015 साठी प्रवेशिका असा स्‍पष्‍ट उल्‍लेख करावा. विहित कालमर्यांदेनंतर येणा-या प्रवेशिका स्‍पर्धेसाठी स्वीकारल्‍या जाणार नाहीत, असेही त्‍यांनी कळविले आहे.
000000
प्र.प्र.क्र. 32                                                            दिनांक-  14 जानेवारी 2016
जिल्‍ह्यात कलम 36 जारी

              वर्धा, दि. 21 - जिल्‍ह्यात शांतता व सुव्‍यवस्‍था कायम राहण्‍यासाठी जिल्‍हा पोलिस अधीक्षक अंकित गोयल यांना प्रदान करण्‍यात आलेल्‍या अधिकारान्‍वये जिल्ह्यात कलम 36 दिनांक 18 जानेवारीपर्यंत जारी करण्यात आले आहे. आदेशान्वये मुंबई पोलिस अधिनियम 1951 चे कलम 36 पोटकलम अ ते फ पर्यंतचे कलम जारी करण्‍यात आले आहे. या आदेशाचा भंग करणा-या व्‍यक्‍तीविरुद्ध मुंबई पोलिस अधिनियम 1951 कलम 134 अन्‍ये कार्यवाहीस पात्र राहील, असेही आदेशात नमूद करण्‍यात आलेले आहे.     

Wednesday 13 January 2016

मिनी ट्रॅक्‍टरसाठी बचत गटांनी
15 जानेवारी पर्यंत अर्ज सादर करण्‍याचे आवाहन
                वर्धा,दि.13  - सामाजिक न्‍याय व विशेष सहाय्य विभागातर्फे अनुसूचित जाती व नवबौध्‍द घटकांच्‍या स्‍वयंसहाय्यता बचत गटांनी मिनी ट्रॅक्‍टर व त्‍याची उपसाधने यांचा पुरवठा करण्‍यात येणार आहे. अनुसूचित जाती व नवबौध्‍द घटकांच्‍या स्‍वयंसहाय्यता बचत गटांना 90 टक्‍के अनुदानावर 20 मिनी ट्रॅक्‍टर व त्‍याची उपसाधने जसे कल्‍टीवेटर किवा रोटावेटर व ट्रेलर यांचा पुरवठा करण्‍यात येणार असून स्‍वयंसहाय्यता बचत गटाकडून दिनांक 15 जानेवारी  2016 पर्यंतअर्ज  स्‍वीकारण्‍यात येणार असल्‍याची माहिती समाज कल्‍याण विभागाचे सहाय्यक आयुक्‍त बाबासाहेब देशमुख यांनी दिले.
             अनुसुचित जाती व नवबौध्‍द घटकाचा बचत गट शासकीय यंत्रणेकडून नोंदणीकृत असावा, तसेच बचत गटाचे नावे बँक खाते आवश्‍यक आहे. अनुसुचित जाती व नवबौध्‍द घटकाचे किमान 80 टक्‍के सदस्‍य बचत गटात असावेत व हे सर्व सदस्‍य राज्‍याचे रहीवासी असावे तसेच सर्व सदस्‍यांचे सक्षम प्राधिका-याचे जाती प्रमाणपत्र, तसेच सर्व सदस्‍याचे रहिवासी पुराव्‍याबाबत अधिवास प्रमाणपत्र, राशन कार्ड, आधार कार्ड निवडणूक कार्ड असावे.
              मिनी ट्रॅक्‍टर व त्‍याची उपसाधने याच्‍या खरेदीची कमाल मर्यादा रुपये 3 लक्ष 50 हजार आहे. स्‍वयंसहाय्यता बचत गटानी या कमाल मर्यादेच्‍या 10 टक्‍के स्‍वहीस्‍सा म्‍हणजेच रुपये 35 हजार भरावा लागेल. स्‍वहिस्‍साच्‍या रक्‍कमेचा धनाकर्ष डीडी स्‍वरुपात महाराष्‍ट्र कृषी उद्योग विकास महामंडळ वर्धा यांचे नावाने अर्जासोबत दयावा लागेल.या व्‍यतीरीक्‍त स्‍वयंसाहाय्यता बचत गटास ट्रेलर व ट्रॅक्‍टर यांच्‍या नावाने आर्जासोबत दयावा लागेल. या व्‍यतीरीक्‍त स्‍वयंसाहाय्यता बचत गटास ट्रेलर व ट्रक्‍टर यांच्‍या आरटीओ कार्यालयातील नोंदणीचा खर्च व तसेच स्‍थानिक जकात      (लागु झाल्‍यास) स्‍वतः बचत गटाला करावा लागेल .
           स्‍वयंसहाय्यता बचत गटांनी यादी समाज कल्‍याण आयुक्‍तालय, पुणे यांचे कडे सादर करण्‍यात येईल व जिल्‍ह्यातील दिलेल्‍या उदिष्‍टपेक्षा जादा अर्ज आल्‍यास लॉटरी पध्‍दतीने लाभर्थ्‍याची निवड केली जाईल.
        स्‍वयंसहाय्यता बचत गटातील सदस्‍यांची तपशिलवार यादी तसेच मिनीट्रक्‍टर खरेदीबाबतचा ठराव अर्जा सोबत सादर करावा.
          स्‍वयंसहाय्यता बचत गटातील इतर सदस्‍यांनी मिळणारा मिनीट्रॅक्‍टर आरटीओ कार्यालयातून ज्‍याचे नावे करावयाचे आहे. अशा प्राधिकृत केलेल्‍या व्‍यक्‍तीबाबत बचतगटातील ठराव व प्राधिकृत केलेल्‍या व्‍यक्‍तीचा रहीवासी दाखल,लाईट बील,मतदान ओळखपत्र, आधार कार्डची सांक्षाकित छायाप्रती सादर कराव्‍यात.
            तसेच महाराष्‍ट्र शासन सामाजिक न्‍याय व विशेष सहाय्यक आयुक्‍त समाज कल्‍याण  सेवाग्राम रोड, सीव्‍हील लाईन, वर्धा यांचेशी संपर्क साधावा, असे आवाहन सहाय्यक आयुक्‍त समाज कल्‍याण विभागाचे, बाबासाहेब देशमुख यांनी केले आहे

                                                                           000000
ग्रंथोत्‍सव व सांस्कृतिक महोत्सव 27 जानेवारीपासून
Ø एकाच ठिकाणी ग्रंथप्रेमींना विविध ग्रंथ होणार उपलब्‍ध
Ø तीन दिवस साहित्यिक कार्यक्रमांची रेलचेल
Ø दूर्मिळ ग्रंथाचीही वर्धेकरांना मेजवाणी  
             वर्धा, दिनांक 13  – मराठी भाषेची गोडी निर्माण व्‍हावी. मराठी भाषेचे संवर्धन व्‍हावे. ग्रामीण भागातील लोकांसह शहरी लोकांमध्‍ये वाचनाची आवड निर्माण होऊन वाचन संस्‍कृती वाढावी, या उद्देशाने ग्रंथोत्‍सवाचे आयोजन दिनांक 27,28 व 29 जानेवारी 2016 रोजी सत्यनारायण बजाज सार्वजनिक वाचनालयात करण्‍यात आले आहे.
         अपर जिल्हाधिकारी राजलक्ष्मी शाह यांच्या दालनात ग्रंथोत्सव 2016 च्या आयोजनाबाबत बैठक पार पडली. बैठकीस सत्यनारायण बजाज सार्वजनिक वाचनालयाचे गजानन कोटेवार, विदर्भ साहित्य संघाचे संजय इंगळे तिगावकर, जिल्हा नियोजन अधिकारी प्रकाश डायरे, जिल्हा माहिती अधिकारी अनिल गडेकर, जिल्हा ग्रंथालय अधिकारी अस्मिता मंडपे यांची उपस्थिती होती. 
            मराठी भाषा विभाग, महाराष्‍ट्र राज्‍य साहित्‍य आणि संस्‍कृती मंडळ, ग्रंथालय संचालनालय, जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय यांच्या संयुक्त विद्माने ग्रंथोत्‍सवाचे आयोजन करण्‍यात आलेले आहे. ग्रंथोत्‍सव दि. 27 ते 29 जानेवारी या कालावधीत प्रभावी वाचन माध्यमे, ग्रंथाने मला काय दिले?, वाचन संस्कृती, काव्यवाचन, कथाकथन, एकपात्री प्रयोग आदी कार्यक्रमांसह सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्‍यात आले आहेत. विविध कार्यक्रमांसह राज्‍यातील विविध दूर्मिळ पुस्‍तकांचे स्‍टॉल्‍स एकाच ठिकाणी उपलब्‍ध होणार आहेत.
            ग्रंथोत्‍सवाची सुरुवात दिनांक 27 जानेवारी रोजी ग्रंथदिडीने होणार असून ग्रंथदिडी जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयापासून निघणार आहे. तर ग्रंथदिंडीचा समारोप सत्यनारायण बजाज सार्वजनिक वाचानालयात होणार आहे. ग्रंथदिंडीत विविध शाळांचे विद्यार्थी व शिक्षक सहभागी होणार आहेत.  या ग्रंथोत्‍सवात नागरिकांसह ग्रंथ विक्रेत्‍यांनी मोठ्याप्रमाणात सहभागी होऊन ग्रंथ महोत्‍सवाचा लाभ घ्‍यावा. अधिक माहितीसाठी जिल्‍हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन अपरजिल्‍हाधिकारी राजलक्ष्मी शाह यांनी केले आहे.

 00000

Tuesday 12 January 2016

मानसिक, शारीरिक सक्षमतेनेच ध्येय गाठणे शक्य
बिमला नेगी- देऊस्कर
Ø परिसंवादात अधिकारी, कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन
 वर्धा, दिनांक 9-  धेय्य ठरविल्याशिवाय यश मिळत नाही. यशप्राप्तीसाठी सुक्ष्म नियोजन आवश्यक आहे. मानसिक आणि शारीरिक सक्षमता व इचछा शक्तीच्या जोरावरच आपण कठीणातील कठीण ध्येय गाठू शकतो, असा  आत्मविश्वास  गिर्यारोहक बिमल नेगी-देउस्कर यांनी आपल्या उत्तराखंडमधील गिर्यारोहनाच्या अनुभवन कथनातून अधिकारी आणि कर्मचा-यांमध्ये निर्माण केला.
विकास भवन  येथे  नैसर्गिक आपत्ती तसेच प्रतिकूल परिस्थितीत ध्येय गाठताना स्वीकारावयाच्या आव्हान या विषयावर त्या अनुभव कथन केले. यावेळी जिल्हाधिकारी आशुतोष सलिल, अपर पोलिस अधीक्षक स्मिता पाटील, निवासी उप जिल्हाधिकारी वैभव नावडकर, जिल्हा नियोजन अधिकारी प्रकाश डायरे, जिल्हा माहिती अधिकारी अनिल गडेकर, अविनाश देऊस्कर आदींसह सर्व विभागाचे प्रमुख आणि अधिकारी, कर्मचारी बहुसंख्येने उपस्थित होते.
             नेगी यांनी गिर्यारोहन करताना नियोजन, जोखीम, योग्य आणि वेळेत निर्णय, सहनशीलता आणि समाजसेवेचे भान यावर उत्तराखंडमध्ये झालेल्या हानी आणि केदारनाथ, हरसाल या ठिकाणी आलेला गिर्यारोहनाचा अनुभव यावेळी पॉवरपॉइंटच्या माध्यमातून आँखों देखा हाल सर्वांसमोर मांडला. जिल्ह्यातील आंजी येथे त्यांची  संस्था साहसी खेळ, गिर्यारोहन यावर मार्गदर्शन करून प्रशिक्षण देते, असेही त्यांनी यावेळी सांगितले. पर्वतच त्यांना जगण्याची आणि आयुष्यला उभारी देतात, त्यामुळे प्रत्येकाने हिमालय पहावा, अनुभवावा असेही सांगितले. केदारनाथ दुर्घटनेच्या प्रसंगी त्यांनी केलेल्या सक्षम नेतृत्त्व आणि सुक्ष्म नियेाजन, अचूक निर्णय यामुळे भाविकांना सुरक्षितपणे बाहेर पडण्यासही मदत झाली असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले
         जिल्हा माहिती अधिकारी अनिल गडेकर यांनी अर्जुन पुरस्कार प्राप्त बिमला नेगी यांच्या साहसी वाटचालीची माहिती उपस्थितांना दिली. यामध्ये त्यांनी  एव्हरेस्ट, पर्वतारोहण एक्सपिडिशनमध्ये केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल भारत सरकारतर्फे पहिला नॅशनल ॲडव्हेंचर अवॉर्ड 1994 मध्ये त्यांना देण्यात आला. ॲडव्हांचर स्पोर्टसमध्ये त्यांच्या कार्याची दखल घेऊन भारत सरकारतर्फे अर्जुन अवॉर्ड, गिर्यारोहण क्षेत्रासोबतच महिलांच्या सर्वांगीन विकासासाठी तसेच विविध क्षेत्रात महिलांना सन्मान मिळवून दिला आहे. समाजातील अतिमागास तसेच ग्रामीण भागातील महिलांसाठी त्यांचे अविरतपणे कार्य सुरू आहे. वर्धा जिल्ह्यातील 35 आदिवासी गावांमध्ये असलेल्या आर्थिकदृष्ट्या मागास तसेच दारिद्र्य रेषेखाली असलेल्यांसाठी त्यांच्या संस्थेच्या माध्यमातून सक्षमीकरणाचा कार्यक्रम राबविण्यात येत आहेत. त्यासोबतच अनाथ मुले तसेच दिव्यांगांसाठी बिमला नेगी विशेष कार्यक्रम राबवित आहेत.
              वूमेन ॲडव्हांचर नेटवर्कस ऑफ इंडियाच्या माध्यमातून श्रीमती बिमला नेगी यांनी गो ग्रीन गर्लस एक्सपीडीशन या 3 हजार किलोमीटरच्या कलकत्ता ते कन्याकुमारीपर्यंतच्या सायकल प्रवास तसेच लीन, ग्रीन, हेल्थी इंडियाच्या माध्यमातून कच्छ ते कोची अभियान राबविले आहे. कष्टकरी महिलांसाठीही त्यांनी विविध कार्यक्रमाच्या माध्यमातून विशेष कार्य केले आहे.
             गिर्यारोहन  क्षेत्रात बारा राष्ट्रीय स्तरावरील त्या एक्सपिडीशन मध्ये त्या सहभागी झाल्या असून त्यांनी या मोहिमेचे प्रतिनिधीत्व केले आहे. 2013 मध्येही त्या भागीरथी एक्सपीडिशनमध्ये सहभागी झाल्या.  तसेच भूटान येथे स्नो मॅन ट्रॅक आहे. तो ट्रॅक 400 किलोमीटर आहे, तो पार करण्यासाठी 11 खिंडी पार कराव्या लागतात. तो त्यांच्या चमूने यशस्वीरित्या पार केला असल्याचे यावेळी  सांगितले.
                  प्रारंभी जिल्हाधिकारी आशुतोष सलिल यांच्याहस्ते बिमला नेगी, श्रीमती भारती, अविनाश देऊस्कर यांचा पुष्पगुच्छ व पुस्तक भेट देऊन सत्कार करण्यात आला. प्रश्नोत्तराच्या माध्यमातून शंकांचे निरसनही यावेळी श्रीमती नेगी यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनिल गडेकर यांनी केले.
0000










सिंचनासाठी सौर कृषिपंपाचा वापर करा
                                                           - आशुतोष सलिल
Ø 920 शेतक-यांना मिळणार लाभ
Ø सौर कृषिपंपामुळे विजेच्‍या बिलापासून कायम सुटका
Ø केवळ पाच टक्‍के रक्‍कम भरा
Ø पाच वर्षापर्यंत कंपनी तर्फे संपूर्ण देखभाल
वर्धा,दि.12 – सौर कृषिपंपाच्‍या माध्‍यमातून पाच एकर पर्यंत शेतीअसणा-या        शेतक-यांना विजेच्‍या देयकापासून कायम मुक्‍तता होणार असल्‍यामुळे शेतक-यांनी सिंचनासाठी सौर कृषिपंप योजनेचा लाभ घ्‍यावा असे आवाहन जिल्‍हाधिकारी आशुतोष सलिल यांनी केले आहे.
विदर्भातील शेतकरी आत्‍महत्‍याग्रस्‍त जिल्‍हयासाठी सौर कृषिपंप योजना राबविण्‍यात येत असून पाच एकर पेक्षा कमी शेती असलेले व पाण्‍याची सुविधा असलेल्‍या 920 शेतक-यांना योजनेच्‍या माध्‍यमातून केवळ पाच टक्‍के शेतकरी लाभार्थी हिस्‍सा भरल्‍यास योजनेचा लाभ मिळणार आहे. महावितरण तर्फे ही योजना राबविण्‍यात येत असून शेतक-यांचा या योजनेस  चांगला प्रतिसाद मिळत आहे.
सौर कृषिपंप योजनेमध्‍ये शेतक-यांच्‍या मागणीनुसार तीन, पाच व साडेसात अश्‍वशक्‍तीचे सौर पंप उपलब्‍ध करुन देण्‍यात येणार असून केद्रशासनाने निश्चित केलेल्‍या किमतीच्‍या केवळ पाच टक्‍के हिस्‍सा शेतक-यांना भरावयाचा आहे. सौर कृषिपंप बसविल्‍यानंतर शेतक-यांना भविष्‍यात विजेच्‍या बिलापासून कायम सुटका होणार आहे. तसेच सबंधित कंपनी पाच वर्षापर्यंत देखभाल व दुरुस्‍तीची जबाबदारी स्‍वीकारणार आहे.
महावितरणच्‍या तालुका स्‍तरावरील उपविभागीय अधिका-याकडे या योजनेत सहभागी होण्‍यासाठी केवळ अर्ज करायचा असून अश्‍वशक्‍तीनुसार पाच टक्‍के सहभाग भरावयाचा आहे. विद्युत जोडणी पासून वंचित असलेल्‍या व पाच एकर पेक्षा कमी शेती असलेल्‍या शेतक-यांनी या योजनेचा लाभ घ्‍यावा असे आवाहन जिल्‍हाधिकारी आशुतोष सलिल यांनी केले आहे.
सौर कृषिपंपाचे प्रात्‍यक्षिक
जिल्‍हयातील शेतक-यांना सौर कृषिपंपाबाबत माहिती देण्‍यासाठी तसेच शेतक-यांना प्रत्‍यक्ष वापराबाबत मार्गदर्शन करण्‍यासाठी जैन सोलर सिस्‍टीम तर्फे जिल्‍हयात  प्रात्‍यक्षिका सुरु करण्‍यात आले आहे. जिल्‍हयातील प्रमुख गावात प्रात्‍यक्षिक वाहन भेट देणार आहे.
जिल्‍हाधिकारी कार्यालयात सौर कृषिपंपाचे प्रात्‍यक्षिक आज दाखविण्‍यात आले. यावेळी निवासी उपजिल्‍हाधिकारी वैभव नावडकर, भारतीय जनता पक्षाचे जिल्‍हा अध्‍यक्ष डॉ. शिरीष गोडे, नियोजन अधिकारी प्रकाश डायरे, महावितरणचे कार्यकारी अभियंता एल डब्‍ल्‍यू सदावर्ती, उपअभियंता एम. डी. राणे जैन एरिकेशनचे विभागीय व्‍यवस्‍थापक भागवत कुंभारे उपस्थित होते.
सौर कृषिपंपामुळे अखंडीत नविनीकरणीय उर्जा उपलब्‍ध  होत असून अत्‍यंत कमी खर्चात कायम स्‍वरुपी ठिबक सिंचनासह, पारंपारिक पध्‍दतीने ओलित करता येते. या पंपाला कोणत्‍याही प्रकारच्‍या वीज भारनियमाचा परिणाम नसल्‍याने दिवसभर अविरत चालणा-या सोलर पंपाद्वारे शेतीच्‍या सिंचनाचे पिकानुसार नियोजन करणे शक्‍य होणार आहे.  
सोलर पंप सूर्योदयापासून ते सूर्यास्‍ता पर्यंत कार्यरत असतो त्‍यामुळे शेतक-यांना आवश्‍यकतेनुसार ओलीत करणे शक्‍य आहे. यावेळी मोठया प्रमाण्‍यात शेतकरी उपस्थित होते.
वर्धा येथील आठवडी बाजारात सोलर कृषिपंपाचे प्रात्‍यक्षिक दाखविण्‍यात आले.
00000

Monday 11 January 2016

विद्युत सुरक्षा सप्‍ताहांतर्गत वर्धा येथे भव्‍य रॅली
              वर्धा,दि.11-    महाराष्‍ट्रात वाढत्‍या विद्युत अपघातामध्‍ये होणा-या जिवहानी व वित्‍तहानीमध्‍ये होणा-या नुकसानाला आळा घालण्‍याकरीता तसेच जनतेत विद्युत नियमांचे पालन करण्‍याची जाणीव निर्माण होण्‍याचा उद्देशाने उघोग, उर्जा व कामगार विभागाचे 17 जानेवारीपर्यंत विद्युत सुरक्षा सप्‍ताह आयोजित करण्‍यात आला आहे. सप्‍ताहाचा शुभारंभ विद्युत निरीक्षक विभाग व महावितरण कंपनीच्‍यावतीने विद्युत भवन येथून बोरगाव मेघे ते वंजारी चौक ते बजाज चौकामधून रॅली काढून करण्‍यात आला.
         रॅलीला पंचायत समिती सदस्‍य संतोष शेलोकर यांनी हिरवी झेंडी दाखवून केली. रॅलीत विद्युत निरीक्षक श्री.भोयर, अधीक्षक अभियंता श्री.देशपांडे, श्री. पैकीने, उप कार्यकारी अभियंता श्री. गावंडे, श्री. शाहू, उप कार्यकारी अभियंता, महावितरणचे अधिकारी श्री.कावळे, कर्मचारी उपस्थित होते. उद्योग उर्जा  व कामगार विभागाचे अभियंते श्री. चांडक, श्री. शहारे, श्री. मने, श्री. तायडे सहभागी होते.
                                                           0000                          
कै. वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनचे
किशोर तिवारी आज हिंगणघाटमध्ये
               वर्धा,दि.11-  कै. वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी  दिनांक 12 जानेवारी रोजी  हिंगणघाट दौ-यावर दुपारी 3 वाजता येत आहेत. शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी सुरू असलेल्या शेतकरी मिशनच्या कार्यक्रमाचा मागील चार महिन्याचा आढावा घेणार आहेत. 

                                                         0000
प्रदूषणमुक्त जिल्हा करण्यासाठी पुढाकार घ्या
-    आशुतोष सलिल
Ø रस्ता सुरक्षा अभियानाला सुरूवात
Ø नो व्हेकलडे मध्ये सहभागी होण्याचे आवाहन
Ø माहिती पुस्तिका, घडीपत्रिकेचे विमोचन
Ø विद्यार्थ्यांच्या प्रभात फेरीने वाहतुकीबाबत जनजागृती
     वर्धा, दिनांक 11 – रस्ता अपघात होऊ नये, यासाठी सर्वांनी वाहतुकीचे नियम पाळणे आवश्यक आहे. रस्ता वाहतुकीचे सर्व नियमांचे वाचन करून दैनंदिन जीवनात त्यांचे पालन करावे. तसेच प्रदूषणमुक्त जिल्हा व्हावा, या उद्देशाने जिल्ह्यात नो व्हेकल डे सारखा स्तुत्य उपक्रम राबविण्यात येत आहे. यामध्ये सर्वांनी सहभागी होऊन प्रदूषणमुक्त जिल्हा करण्यासाठी सर्वांनी पुढाकार घ्या, असे आवाहन जिल्हाधिकारी आशुतोष सलिल यांनी केले.
             रस्ता सुरक्षाआता कृतीची वेळ आहे हे ध्येय समोर ठेवून यावर्षीही 24 जानेवारीपर्यंत              उप-प्रादेशिक परिवहन कार्यालय वाहतूक नियंत्रण शाखेच्यावतीने रस्ता सुरक्षा अभियान राबविण्यात येते आहे. बजाज चौकातील वाहतूक नियंत्रण शाखेच्या प्रांगणात अभियानाचे उद्घाटन जिल्हाधिकारी आशुतोष सलिल यांच्याहस्ते झाले, यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमास जिल्हा पोलिस अधीक्षक अंकित गोयल, उप-प्रादेशिक परिवहन अधिकारी विनोद जिचकार, प्र.पोलिस अधीक्षक नीलोत्पल, जिल्हा पोलिस उपअधीक्षक आर.जी. किल्लेकर, पोलिस उपअधीक्षक विक्रम साळी, पोलिस उपविभागीय अधिकारी संतोष वानखेडे, पोलिस निरीक्षक चंद्रशेखर बहादूरे, लॉयन्स क्लबचे अनिल नरेडी यांची उपस्थिती होती.  
      जिल्हाधिकारी आशुतोष म्हणाले, जिल्हा प्रशासनामार्फत वाहतूक नियमांसंदर्भात माहितीपूर्ण पुस्तिका, घडी पुस्तिका तयार करण्यात आलेली आहे. सर्वांनी माहिती पुस्तिका, घडी पुस्तिकांचे वाचन करून वाहतुकीचे नियम माहिती करून घ्यावेत. दैनंदिन जीवनात त्यांची अंमलबजावणी करावी. पालकांनाही याबाबत माहिती द्यावी. प्रशासनामार्फतही जनजागृती करण्यात येणार आहे. त्याचबरोबर सर्वांनी प्रदूषणमुक्त जिल्हा करण्यासाठी दैनंदिन कामांसाठी सायकलचा वापर करावा, असे यावेळी सांगितले.                                                            
                                                                                                                 पान दोनवर

प्रदूषणमुक्त जिल्हा करण्यासाठी …  (पान एकवरून)
      जिल्हा पोलिस अधीक्षक अंकित गोयल म्हणाले, वाहतुकीचे सर्व नियम पाळण्यासाठी सर्वांनी पुढाकार घ्यावा. असुरक्षितपणे वाहन चालवून स्वत : बरोबरच इतरांनाही इजा होते, याचेही भान ठेवावे. सुरळीत वाहतुकीची जबाबदारी पोलिस विभागाबरोबरच नागरिकांचीही आहे. यासाठी नागरिकांनी वाहतुकीचे नियम पाळावेत, असे आवाहन केले.
      कार्यक्रमाची सुरूवात दीप प्रज्वलनाने झाली. त्यानंतर उप-प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्यावतीने काढण्यात आलेल्या वाहतुक नियमांसंदर्भातील माहिती पुस्तिका आणि घडीपुस्तिकेचे विमोचन जिल्हाधिकारी आशुतोष सलिल यांच्याहस्ते करण्यात आले. मान्यवरांचे स्वागत रोप देऊन करण्यात आले
       कार्यक्रमाचे प्रास्ताविक उप-प्रादेशिक परिवहन अधिकारी विनोद जिचकार यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इमरान राही यांनी केले. आभार वाहतूक शाखेचे पोलिस निरीक्षक चंद्रशेखर बहादूरे यांनी केले. यावेळी पोलिस विभागाचे महेश चाटे, सहायक उप-प्रादेशिक परिवहन अधिकारी पी.बी. झाडे, मोटार वाहन निरीक्षक .टी. मेश्राम, एम.डी. बोरडे, डी. पी. सुरडकर, जी.डी. चव्हाण, श्री. साळुंखे, श्री. पारसे, श्री. संघारे, श्री. इंगोले, श्री. सिरसाट, श्री. दडमन, श्री. कडू, श्री. कपडे, श्रीमती गि-हे, जवाहर नवोदय विद्यालय, भारत स्काऊट गाईड आणि विविध शाळांचे शिक्षक, विद्यार्थी  यांची बहुसंख्येने उपस्थिती होती.
    प्रभातफेरीने जनजागृती
      जवाहर नवोदय विद्यालय, भारत स्काऊट गाईड आणि हिंमत सिंग, विकास,आनंद मेघे, नेहरू आणि महर्षी शाळांच्या विद्यार्थ्यांनी सकाळपासूनच वाहतुकीचे नियम पाळा…. अपघात टाळा, नसेल वेगावर नियंत्रणमिळेल मृत्यूला आंमत्रण, हॉर्नचा वापर गरजेनुसार कराआदी घोषणा देऊन वाहतुकीबाबत शहरातून प्रभात फेरी काढून जनजागृती केली. जिल्हा क्रीडा संकुल येथून इतवारा चौकमार्गे वल्लभभाई पटेल पुतळमार्गे बजाज चौकातील वाहतूक शाखा येथे आली. यावेळी पोलिस विभागाचे बँडपथक, उप-प्रादेशिक परिवहन कार्यालयाचे सर्व अधिकारी, कर्मचारी यांची उपस्थिती होती.
        वाहतूक शाखेत चित्र प्रदर्शनी
            रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत वाहतुकीच्या नियम आणि घ्यावयाची काळजी याबाबत उप-प्रादेशिक परिवहन कार्यालय वाहतूक नियंत्रण शाखेच्यावतीने उत्कृष्ट अशा प्रकारचे चित्र प्रदर्शन वाहतूक शाखेच्या प्रांगणात भरवण्यात आले आहे. या प्रदर्शनाचे उद्घाटन जिल्हा पोलिस अधीक्षक अंकित गोयल यांच्याहस्ते फीत कापून करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी आशुतोष सलिल, उप-प्रादेशिक परिवहन अधिकारी विनोद जिचकार, पोलिस उपअधीक्षक विक्रम साळी, पोलिस उपविभागीय अधिकारी संतोष वानखेडे, पोलिस निरीक्षक चंद्रशेखर बहादूरे यांची उपस्थिती होती. संपूर्ण चित्रप्रदर्शनीची पाहणी करून जनतेने वाहतुकीचे नियम पाळावेत, असा संदेश जिल्हाधिकारी आशुतोष सलिल आणि जिल्हा पोलिस अधीक्षक अंकित गोयल यांनी जनतेला यावेळी दिला.

                                         0000