Monday 18 October 2021

 


रेल्वे भूसंपादनाची कार्यवाही गतीने करावी - नितीन गडकरी

जिल्ह्यातील रेल्वे मार्गाच्या भूसंपादनाचा आढावा

        वर्धा, दि. 18 : वर्धा जिल्ह्यात चार वेगवेगळ्या रेल्वे मार्गाची कामे सुरु आहेत. या मार्गाच्या भूसंपादनाचे प्रस्ताव रेल्वेने सादर करावेत आणि संबंधित यंत्रणांनी भूसंपादनाची कार्यवाही गतीने करावी, असे निर्देश केंद्रीय परिवहन व राजमार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी दिले.

         श्री.गडकरी यांनी विश्राम भवन येथे रेल्वे मार्गांच्या भूसंपादनाचा आढावा घेतला, त्यावेळी त्यांनी सदर निर्देश दिले. बैठकीला खासदार रामदास तडस, आ.रामदास आंबटकर, आ.दादाराव केचे, आ.पंकज भोयर, जिल्हा परिषद अध्यक्षा सरिता गाखरे, उपाध्यक्षा वैशाली येरावार, जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार, उपजिल्हाधिकारी मनोज खैरनार आदी उपस्थित होते.

         जिल्ह्यात वर्धा-नांदेड, वर्धा-बल्लारशहा (3 री लाईन), वर्धा-नागपूर (3 री लाईन), वर्धा-नागपूर (4 थी लाईन) या रेल्वे मार्गासाठी भूसंपादन केले जात आहे. भूसंपादनासाठी रेल्वेकडून प्रस्ताव प्राप्त होणे आवश्यक आहे, सदर प्रस्ताव रेल्वे सादर करावे. त्यानंतर महसूल विभाग, वन विभाग आणि रेल्वेने संयुक्तपणे भूसंपादनाची कार्यवाही गतीने करावी, असे श्री.गडकरी यांनी सांगितले.

          रेल्वेच्या चारही प्रकल्पाच्या भूसंपादनाची माहिती जिल्हाधिकारी यांनी यावेळी दिली. रेल्वेकडून प्रस्ताव प्राप्त झाल्यानंतर त्यावर तातडीने कार्यवाही केली जातील, असे महसूल अधिका-यांनी बैठकीत सांगितले.

0000

 



राष्ट्रीय महामार्गावरील रेल्वे उड्डाणपुलाचे

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते लोकार्पण

वर्धा, दि 18 :-( जिमाका) शहरानजीक असलेल्या नागठाणा चौक येथील राष्ट्रीय महामार्गावरील रेल्वे उड्डाण पुलाचे केंद्रीय परिवहन व राजमार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते लोकार्पण झाले.

यावेळी खा. रामदास तडस, आ.पंकज भोयर, माजी खासदार सुरेश वाघमारे, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे तांत्रिक संल्लागार बी.डी. ठेंग,  मुख्य प्रबंधक नरेश वडेटवार, परियोजना संचालक प्रशांत पागृत, प्रकल्प अभियंता साहेबराव जुनघरे, वसंतराव नाल्हे, अशोक बनकर आदी उपस्थित होते.

आज लोकार्पण झालेल्या रेल्वे उड्डानपुलाची लांबी 1.63 किमी. इतकी आहे तर या उड्डानपुलाच्या बांधकामासाठी 66 कोटी 20 लाख इतका खर्च झाला आहे. या उड्डानपुलामुळे 7.40 किमीचा सालोड बायपास रहदारीसाठी पुर्णपणे सज्ज झाला आहे. यामुळे वाहनचालकांचा 15 ते 20 मिनिटाचा वेळ वाचणार आहे.

0000000000.

 





प्र.प.क्र -728                                                                                      दि.18.10.2021

जिल्ह्याचे सिंचन क्षेत्र वाढविण्यासाठी प्रयत्न करु

-पालकमंत्री सुनिल केदार

Ø  शेतकरी मेळाव्याचे पालकमंत्र्यांच्याहस्ते उद्घाटन

Ø  शेतक-यांसाठी विविध मार्गदर्शन सत्रांचे आयोजन

वर्धा, दि 18 :-( जिमाका) जिल्हयाची सिंचन क्षमता भरपूर आहे तिचा सुयोग्य वापर करणे आवश्यक आहे. येत्या काळात जिल्हयाचे प्रत्यक्ष सिंचन क्षेत्र कसे वाढविता येईल यासाठी प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे. याकरीता जिल्हयातील शासकीय यंत्रणा व शेतक-यांनी सहकार्य केल्यास सिंचन क्षेत्र वाढविण्याचे मोठे काम आपण करु शकू, असे पालकमंत्री सुनिल केदार यांनी सांगितले.

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त आत्माच्यावतीने चरखा सभागृह येथे तीन दिवसीय शाश्वत शेती तंत्राचे प्रदर्शन व शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असून त्याचे  उद्घाटन पालकमंत्री श्री केदार यांच्याहस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्षा सरिता गाखरे, आ.रणजित कांबळे, जिल्हा परिषदच्या उपाध्यक्षा वैशाली येरावार, कृषि सभापती माधव चंदनखेडे, जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सचिन ओम्बासे, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी अनिल इंगळे आदी उपस्थित होते.

आपण स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत आहोत. ज्यावेळी स्वातंत्र मिळाले त्यावेळी अन्न धान्याची कमतरता होती. अमेरिकेतून मिलो मागवून भूक भागवावी लागत होती. आता मात्र अन्नधान्याच्या बाबतीत आपण स्वयंपूर्ण झालो असून निर्यातही करु लागलो आहे. गेल्या काही वर्षात आधुनिक साधने, तंत्रज्ञान नसतांना केवळ परीश्रमाच्या बळावर शेतक-यांनी ही कामगिरी केली आहे.

जिल्हयात सिंचन क्षेत्र वाढल्यास शेतक-यांना त्याचा मोठा फायदा होईल. येत्या काळात यावर काम करायचे आहे. जिल्हा परिषदने आपले सर्व बंधारे पाणी अडविण्यासाठी तयार ठेवले पाहिजे. तलावातील गाळ काढून शेतक-यांच्या शेतात टाकला पाहिजे. यासाठी आतापासूनच नियोजन करा. तलावातील गाळ शेतात टाकल्याने खताची बचत होईल शिवाय सिंचन क्षेत्रही वाढेल असे पालकमंत्री पुढे बोलतांना म्हणाले.

शेतकरी मेळावा हा अतिशय चांगला उपक्रम आहे. या माध्यमातून आधुनिक शेती तंत्रज्ञान शेतक-यांपर्यंत पोहोचले पाहिजे. मेळाव्यातील चर्चासत्रात शेतक-यांनी स्वयंस्फूर्तीने सहभाग घेतला पाहिजे. जिल्हयात चांगल्या दर्जाची हळद निर्माण होते. या हळदीची निर्यात वाढविण्यासोबतच शेतक-यांना यातून समृध्द कसे करता येईल, यासाठी कृषि विभागाने प्रयत्न करावे. जिल्हयातील पांदन रस्त्याची कामे मार्गी लावू, असे पालकमंत्र्यांनी सांगितले.

यावेळी बोलतांना जिल्हा परिषद अध्यक्षा सरिता गाखरे यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत शेती करावी असे सांगितले. आ. कांबळे यांनी कमी खर्चात जास्त उत्पन्न मिळविण्याचे तंत्रज्ञान शेतक-यांनी आत्मसात केले पाहिजे तसेच मजूरी खर्च कमी झाला पाहिजे असे सांगितले. यावेळी जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. शेतक-यांना शेतीसाठी चांगला पर्याय उपलब्ध करुन देण्याचा प्रयत्न असून शेती तंत्रज्ञान शेतक-यापर्यंत पोहोचले पाहिजे, असे सांगितले.

सुरुवातीस पालकमंत्री व मान्यवरांनी फीत कापून कृषि प्रदर्शनाचे उद्घाटन केले व दालनांची पाहणी केली. कृषि विभागाच्या घडिपत्रिकेचे प्रकाशनही यावेळी करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक आत्माच्या प्रकल्प संचालक डॉ. विद्या मानकर यांनी केले तर आभार उपविभागीय कृषि अधिकारी अजय राऊत यांनी मानले. कार्यक्रमास शेतकरी मोठया संख्येने उपस्थित होते. उद्घाटनानंतर रब्बी हंगामपूर्व नियोजन व पिक लागवड, ग्राम बिजोत्पादन-जवस, गहू, हरबरा, रेशिम उद्योग व्यवसाय संधी या विषयाव चर्चासत्र पार पडले. चर्चासत्रास  शेतकरी मोठया संख्येने उपस्थित होते.

शेतकरी मेळाव्यात आज 19 ऑक्टोबर रोजी होणारे चर्चासत्र

सकाळी 11.30 वाजता दुग्धव्यवस्थापन व परसबागेतील कुक्कुटपालन, दुपारी 12.30 वाजता शेळीपालन व व्यवस्थापन, दुपारी 1.30 वाजता मधुमक्षिका पालन योजनेची माहिती व जिल्हयातील व्यवसाय संधी, दुपारी 3.30 वाजता पिकविमा-कृषि पायाभूत सुविधा निधी योजना या विषयांवर व्याख्याने होणार आहे.

                                                            000