Monday 21 May 2018





वर्धा-चंद्रपूर-गडचिरोली स्थानिक प्राधिकारी मतदार संघात
Ø 99.72 टक्के मतदान; चार उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत
Ø वर्धा  जिल्ह्यात 99.35 टक्के मतदान.

        वर्धा दि21 :- – महाराष्ट्र विधान परिषदेच्या वर्धा-चंद्रपूर-गडचिरोली या स्थानिक प्राधिकारी मतदार संघाच्या निवडणुकीसाठी आज 21 मे रोजी दुपारी 4 पर्यंत 99.72 टक्के मतदान झाले. आजच्या मतदानासोबतच चार उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद झाले असून 24 मे रोजी मतमोजणी होणार आहे.
सकाळी आठ ते सायंकाळी चार पर्यंत आज मतदान झाले असून सायंकाळी 4 पर्यंत एकूण 1059 मतदारांपैकी 1056 मतदारांनी मतदान केले.  वर्धा-चंद्रपूर-गडचिरोली या मतदार संघात अंतिम चार उमेदवार रिंगणात आहेत. यामध्ये जगदीश अचलदास टावरी-अपक्ष, सौरभ राजू तिमांडे-अपक्ष, रामदास भगवानजी आंबटकर-भाजपा,  इंद्रकुमार सराफ-भाराकॉ यांचा समावेश आहे. आजच्या निवडणुकीत आर्वी, हिंगणघाट, चामोर्शी या मतदान केंद्रावर प्रत्येकी एक मतदाराने आपला हक्क बजावला नाही.  अन्य 17 पैकी 14 मतदान केंद्रावर 100 टक्के मतदान झाले.
      या स्थानिक प्राधिकारी मतदार संघासाठी वर्धा जिल्हयातील 308, चंद्रपूर येथील 469 व गडचिरोली जिल्हयातील 282 असे एकूण 1059 मतदार आहेत.  या मतदानासाठी 17 मतदान केंद्र तयार करण्यात आले होते. वर्धा जिल्हयात तहसिल कार्यालय आर्वी-(98.75 टक्के), वर्धा-(100 टक्के) व हिंगणघाट-(98.70 टक्के), चंद्रपूर जिल्हयात तहसिल कार्यालय चिमूर, ब्रम्हपूरी, वरोरा, मूल, चंद्रपूर, बल्लारपूर, गोंडपिपरी, राजूरा- (सर्व ठिकाणी 100 टक्के) व गडचिरोली जिल्हयात तहसिल कार्यालय कुरखेडा-(100 टक्के), देसाईगंज-(100 टक्के), गडचिरोली-(100 टक्के), चार्मोशी-(98.08 टक्के), अहेरी-(100 टक्के) व एटापल्ली-(100 टक्के) मतदान झाले. चंद्रपूरमध्ये जिल्हा परिषदेचे अध्यक्ष देवराव भोंगळे यांनी गोंडपिपरी येथे तर महापौर अंजली घोटेकर यांनी चंद्रपूर येथे मतदान केले.
वर्धा  जिल्ह्यात 99.35 टक्के मतदान.
       महाराष्ट्र विधान परिषदेच्या वर्धा -चंद्रपूर- गडचिरोली स्थानिक प्राधिकारी मतदार संघाची निवडणूक आज जिल्ह्यात शांततेत पार पडली. आर्वी, वर्धा, हिंगणघाट हे तीन मतदान केंद्र मिळून एकूण 99. 35 टक्के मतदान झाले. यामध्ये जिल्ह्यातील 308 मतदारांपैकी 306 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. यामध्ये 154 पुरुष मतदारांपैकी 153 पुरुषांनी मतदान केले. तर 154 महिला मतदारांपैकी 153 महिलांनी मतदान केले.
         या निवडणुकीसाठी आर्वी, वर्धा आणि हिंगणघाट येथील तहसील कार्यालयात मतदान केंद्र स्थापन करण्यात आले होते. संबंधित तालुक्याच्या तहसीलदारांनी मतदान केंद्राध्यक्ष म्हणून काम पाहिले.  आर्वीमध्ये 80 मतदारांपैकी 79 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. यात 39 पुरुष तर 41 महिला मतदारांचा समावेश आहे. वर्धा केंद्रावर 151 पैकी 151 म्हणजे 100 टक्के मतदान झाले. यामध्ये 74 पुरुष आणि 77 महिला मतदारांनी मतदान केले. हिंगणघाट केंद्रावर 77 पैकी 76 मतदारांनी मतदान केले. यात 42 पुरुषांपैकी 41 पुरुष तर 35 महिलांनी मतदानाचा हक्क बजावला.
या मतदार संघासाठी मतमोजणी 24 मे रोजी चंद्रपूर येथे होणार आहे. या निवडणुकीची मतमोजणी दिनांक 24 मे 2018रोजी चंद्रपूर येथे होणार असल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी वैभव नावडकर यांनी दिली आहे.


       जिल्हयाचा माता व बालमृत्युदर शुन्यावर आणणार - जिल्हाधिकारी
Ø  टास्क फोर्स समिती बैठक
      वर्धा दि 21 (जिमाका):-जिल्हयाचा माता मृत्युदर व बाल मृत्युदर शुन्यावर आनण्याकरिता 28 मे ते 9 जुन या कालावधित 0 ते 5 वयोगटातील बालकांचे अतिसारामुळे होणारे मृत्यु टाळण्यासाठी विशेष अतिसार नियंत्रण पंधरवाडा राबविण्यात येणार आहे. या कालावधित कार्यक्षेत्रातील 0 ते 5 व वर्ष वयोगटातील बालकांचे आशा कार्यकर्तीमार्फत सर्वेक्षण करुन अतिसाराने आजारी असलेल्या बालकांना ओआरएस व झिंक गोळया देऊन उपचार करण्यात येणार आहे. अशी माहिती जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी दिली.
मातांना ओआरएस द्रावण तयार करण्याचे प्रात्याक्षिक करुन दाखविण्यात येणार आहे. तसेच ग्राम स्वराज्य अभियान अंतर्गत निवड केलेल्या जिल्हयातील हिवरा व कवठा (झोपडी) या गावामध्ये विशेष मिशन इंद्रधनुष्य मोहिम राबविण्यात येणार आहे. या मोहिमे अंतर्गत लसीकरणापासुन वंचित राहिलेल्या गरोदर माता व बालके तसेच अर्धवट लसीकरण झालेली गरोदर माता व बालके यांचे सर्वेक्षण करुन त्यांचे संपूर्ण लसीकरण करण्याच्या सुचना जिल्हाधिकारी यांनी  जिल्हा टास्क फोर्स समितीच्या बैठकित केल्यात.
            यावेळी बैठकिला मुख्यकार्यकारी अधिकारी अजय गुल्हाणे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अजय डवले, माता व बाल संगोपन अधिकारी डॉ. आर.पी.गहलोत, निवासी वैद्यकिय अधिकारी डॉ. विनोद वाघमारे, वैद्यकिय अधिकारी डॉ. मंगेश रेवतकर, फॉक्झी प्रतिनिधी डॉ. शुभदा जाजु, आय.एम.ए.चे सचिव डॉ. शंतनु चव्हाण, डॉ. सुरेखा तायडे यांची उपस्थिती होती.
            बैठकित जिल्हा आरोग्य अधिकारी श्री. डवले यांनी सांगितले कि, प्रत्येक महिन्याच्या 9 तारखेला प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व  योजनेअंतर्गत प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये खाजगी प्रसुती तज्ञ यांच्या सेवा विनामुल्य उपलब्ध करुन दिल्या आहेत. त्यामुळे सर्व गरोदर मातांची प्रसुतीपुर्व तपासणी तज्ञ डॉक्टर कडून केल्या जाते. त्यामुळे माता मृत्यु  निरंक आणण्याचे प्रयत्न आरोग्य विभागाच्या वतीने करण्यात येत आहे. तसेच आजारी बालकांना बालरोगतज्ञा व्दारे तपासणी करुन अर्भकमृत्यु शुन्यावर आनण्याचे प्रयत्न करण्यात येत असल्याचे सांगितले. प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामिण रुग्णालय व उपजिल्हा रुग्णालयामध्ये गरोदर मातांना आवश्यक असणारी सर्व औषधी उपलब्ध करुन देण्यात आली आहे. तसेच नियमित लसीकरण कार्यक्रम अंतर्गत प्रत्येक गावात लसीकरण सत्र आयोजित करुन सर्व गरोदर माता व बालकांना पूर्ण संरक्षित करण्याबाबत, नियोजन करण्यात आले,  असल्याचेही श्री. डवले यांनी यावेळी सांगितले.


नैसर्गिक आपत्तीचा सामना करण्यास प्रशासनाने सज्ज राहावे. - जिल्हाधिकारी
•जिल्हाधिका-यांनी घेतला मान्सूनपूर्व आढावा
          वर्धा दि 21 (जिमाका):- जीर्ण झालेल्या अति धोकादायक शासकीय इमारती पावसाळा सुरू होण्यापूर्वी पाडून टाकाव्यात . तसेच नैसर्गिक आपत्तीत जीव वाचवणारी आवश्यक साधने जसे बोट, लाईफ जॅकेट्स,दोर, या साधनांची पुरेशी व्यवस्था करण्यासोबतच, ग्रामीण आणि उपजिल्हा रुग्णालयात  औषधांचा पुरेसा साठा करून ठेवावा. कोणत्याही नैसर्गिक आपत्तीचा सामना करण्यासाठी प्रशासनाने सज्ज राहावे,  अशा सूचना जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी दिल्यात. मान्सूनपूर्व आढावा बैठक घेताना ते बोलत होते.
          यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी अजय गुल्हाणे, अप्पर जिल्हाधिकारी संजय दैने, निवासी उपजिल्हाधिकारी राजलक्षमी शहा,  अतिरिक्त कार्यकारी अधिकारी करुणा जुईकर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. पुरुषोत्तम मडावी, सर्व उपविभागीय अधिकारी, सर्व तहसीलदार, गटविकास अधिकारी आणि विभाग प्रमुख आणि आपत्ती व्यवस्थापन अधिकारी किशोर सोनटक्के उपस्थित होते.
          नैसर्गिक आपत्तीच्या काळात कार्यालयात  वीज पुरवठा खंडित झाल्यास कार्यालयाचे काम बंद पडू नये यासाठी  नादुरुस्त डिझेल इंजिन कार्यालयाने तातडीने दुरुस्त करून घ्यावे. त्यासाठी निधी आवश्यक असल्यास त्याची मागणी करावी.  उपजिल्हा आणि ग्रामीण रुग्णालयात औषधी, डॉक्टरांची चमू, वीज पुरवठा, इमर्जन्सी ऑपरेशन थिएटर, तयार ठेवावे.  तसेच रुग्णालयाची तात्पुरती डागडुजी करून घ्यावी. यासाठी रुग्णकल्याण समितीला 5 लक्ष रुपये देण्यात येतील. हे काम रुग्ण कल्याण समितीने करावे. या सर्व रुग्णालयांची  तहसीलदार आणि गटविकास अधिकारी यांनी पाहणी करून खातरजामा करावी.
          ग्रामीण भागात अवैध दारू व्यवसायांवर लक्ष ठेवण्यासाठी तसेच आपत्ती काळात तत्पर कार्य करण्यासाठी प्रत्येक गावात ग्रामसुरक्षा दलाची स्थापना करावी. मे अखेर पर्यंत ग्राम सुरक्षा दल स्थापन करून जून च्या पहिल्या आठवड्यात तहसीलदारांनी त्यांची बैठक घ्यावी. सर्व विभाग प्रमुखानी नैसर्गिक आपत्तीच्या काळात जबाबदारीने काम करावे. हलगर्जीपणा करणा-या अधिक-यावर आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत कारवाई करण्यात येईल असेही त्यांनी यावेळी सांगितले.