Monday 21 May 2018



       जिल्हयाचा माता व बालमृत्युदर शुन्यावर आणणार - जिल्हाधिकारी
Ø  टास्क फोर्स समिती बैठक
      वर्धा दि 21 (जिमाका):-जिल्हयाचा माता मृत्युदर व बाल मृत्युदर शुन्यावर आनण्याकरिता 28 मे ते 9 जुन या कालावधित 0 ते 5 वयोगटातील बालकांचे अतिसारामुळे होणारे मृत्यु टाळण्यासाठी विशेष अतिसार नियंत्रण पंधरवाडा राबविण्यात येणार आहे. या कालावधित कार्यक्षेत्रातील 0 ते 5 व वर्ष वयोगटातील बालकांचे आशा कार्यकर्तीमार्फत सर्वेक्षण करुन अतिसाराने आजारी असलेल्या बालकांना ओआरएस व झिंक गोळया देऊन उपचार करण्यात येणार आहे. अशी माहिती जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी दिली.
मातांना ओआरएस द्रावण तयार करण्याचे प्रात्याक्षिक करुन दाखविण्यात येणार आहे. तसेच ग्राम स्वराज्य अभियान अंतर्गत निवड केलेल्या जिल्हयातील हिवरा व कवठा (झोपडी) या गावामध्ये विशेष मिशन इंद्रधनुष्य मोहिम राबविण्यात येणार आहे. या मोहिमे अंतर्गत लसीकरणापासुन वंचित राहिलेल्या गरोदर माता व बालके तसेच अर्धवट लसीकरण झालेली गरोदर माता व बालके यांचे सर्वेक्षण करुन त्यांचे संपूर्ण लसीकरण करण्याच्या सुचना जिल्हाधिकारी यांनी  जिल्हा टास्क फोर्स समितीच्या बैठकित केल्यात.
            यावेळी बैठकिला मुख्यकार्यकारी अधिकारी अजय गुल्हाणे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अजय डवले, माता व बाल संगोपन अधिकारी डॉ. आर.पी.गहलोत, निवासी वैद्यकिय अधिकारी डॉ. विनोद वाघमारे, वैद्यकिय अधिकारी डॉ. मंगेश रेवतकर, फॉक्झी प्रतिनिधी डॉ. शुभदा जाजु, आय.एम.ए.चे सचिव डॉ. शंतनु चव्हाण, डॉ. सुरेखा तायडे यांची उपस्थिती होती.
            बैठकित जिल्हा आरोग्य अधिकारी श्री. डवले यांनी सांगितले कि, प्रत्येक महिन्याच्या 9 तारखेला प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व  योजनेअंतर्गत प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये खाजगी प्रसुती तज्ञ यांच्या सेवा विनामुल्य उपलब्ध करुन दिल्या आहेत. त्यामुळे सर्व गरोदर मातांची प्रसुतीपुर्व तपासणी तज्ञ डॉक्टर कडून केल्या जाते. त्यामुळे माता मृत्यु  निरंक आणण्याचे प्रयत्न आरोग्य विभागाच्या वतीने करण्यात येत आहे. तसेच आजारी बालकांना बालरोगतज्ञा व्दारे तपासणी करुन अर्भकमृत्यु शुन्यावर आनण्याचे प्रयत्न करण्यात येत असल्याचे सांगितले. प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामिण रुग्णालय व उपजिल्हा रुग्णालयामध्ये गरोदर मातांना आवश्यक असणारी सर्व औषधी उपलब्ध करुन देण्यात आली आहे. तसेच नियमित लसीकरण कार्यक्रम अंतर्गत प्रत्येक गावात लसीकरण सत्र आयोजित करुन सर्व गरोदर माता व बालकांना पूर्ण संरक्षित करण्याबाबत, नियोजन करण्यात आले,  असल्याचेही श्री. डवले यांनी यावेळी सांगितले.

No comments:

Post a Comment