Thursday 18 October 2012

रासायनीक खत नियंत्रण प्रणाली पायलट प्रोजेक्‍टसाठी देशात वर्धेची निवड


           
                                                 
                       *  खतावरील सबसीडी थेट शेतक-यांच्‍या बँक खात्‍यात
                *  किसान क्रेडीट कार्ड आधारशी जोडणार
                       
            वर्धा,दि. 18 - रासायनीक खतांवर दिले जाणारे अनुदान शेतक-यांना  थेट त्‍यांच्‍या बँकेत जमा करण्‍यासाठी  रासायनीक खत नियंत्रण प्रणाली मोबाईल हा पायलट प्रकल्‍प देशातील 10 जिल्‍ह्यामध्‍ये  राबविण्‍यात येत असून, यामध्‍ये राज्‍यातून  वर्धा जिल्‍ह्याची  निवड  करण्‍यात आली  असल्‍याची माहिती  जिल्‍हाधिकारी श्रीमती जयश्री भोज यांनी दिली.
      रासायनिक खत नियंत्रण प्रणालीमध्‍ये  रासायनीक खतांवर दिले जाणारे अनुदान सरळरित्‍या  प्रथम  घाऊक व किरकोळ विक्रेत्‍यांना व त्‍यानंतर  थेट शेतक-यांना अदा केले जाणार आहे. त्‍यामुळे जिल्‍ह्यातील  सर्व  कृषी केन्‍द्र धारकांनी  रासायनीक खतांची माहिती  एमएफएमएस या वेबसाईडवर ऑनलाईन भरायची  आहे. या प्रणालीमुळे जिल्‍ह्यामध्‍ये प्राप्‍त होणा-या खतांची माहितीसुध्‍दा ऑनलाईन उपलब्‍ध  होणार आहे.
       रासायनीक खत नियंत्रण प्रणालीची सुरुवात जिल्‍ह्यात सुरु झाली असून, सर्व कृषी केन्‍द्र धारकांची  नोंदणी  करुन घेण्‍यात आली असून त्‍यांना पासवर्ड सुध्‍दा देण्‍यात आलेला आहे.
         केरोसीन व गॅसला मिळणारी  शासनाची सबसीडी  लाभार्थ्‍यांच्‍या  बँकेत जमा करण्‍यात येणार आहे. त्‍याचपध्‍दतीने  शेतक-यांना  दिल्‍या जाणा-या  खतांवरील अनुदानही  जमा होणार आहे. यासाठी  आरसीएफ ही खत कंपनी वर्धा जिल्‍ह्यात नोडल एजन्‍सी  म्‍हणून काम करणार आहे. रासायनीक खत नियंत्रण प्रणाली वर्धा जिल्‍ह्यात  100 टक्‍के राबविण्‍यासाठी  विभागीय कृषी सहसंचालक डॉ. जे.सी. भुतडा यांनी  आवाहन केले आहे. आरसीएफचे  हेमंत दाभट यांनी  या प्रणालीबाबत यावेळी  अधिका-यांना मार्गदर्शन केले.
         शेतक-यांना  किसान क्रेडीटकार्ड देण्‍यात येणार असून, आधार कार्डाशी संलग्‍न करण्‍यात येणार असल्‍यामुळे  शेतक-यांनी  आधारकार्ड  काढावे आणि या योजनेचा लाभ घ्‍यावा, असे आवाहनही यावेळी करण्‍यात आले.
       रासायनीक खत नियंत्रण प्रणालीमध्‍ये खतांवर मिळणारे अनुदान शेतक-यांच्‍या बँक खात्‍यामध्‍ये  जमा होणार आहे त्‍यामुळे जिल्‍ह्यातील सर्व शेतक-यांनी राष्‍ट्रीयकृत बँकेत खाते उघडावे व यासोबत  किसान  क्रेडीटकार्ड  काढावे. ज्‍या शेतक-यांनी किसानकार्ड व आधारकार्ड  तयार केले नाहीत त्‍यांना रासायनीक खत मिळण्‍यास अडचण होईल त्‍यामुळे शेतक-यांनी  प्राधान्‍याने आधारकार्ड व किसानकार्ड काढावे असे आवाहन जिल्‍हाधिकारी जयश्री भोज यांनी केले आहे.
     यावेळी  जिल्‍हा अधिक्षक कृषी  अधिकारी भाऊसाहेब ब-हाटे, अग्रणी बँकेचे व्‍यवस्‍थापक श्री. मशानकर, उपविभागीय कृषी अधिकारी श्री. डाबरे, सर्व खत कंपन्‍यांचे प्रतीनिधी, घाऊक व किरकोळ खत विक्रेते, पंचायत समितीचे पदाधिकारी व अधिकारी उपस्थित होते.
                                            0000000

सोनोग्राफी केन्‍द्रांच्‍या तपासणीसाठी विशेष पथक -डॉ. मिलींद सोनोने


                                     
             
             * भृणहत्‍या कायद्याची कडक अंमलबजावणी
            * आयएमए चे डॉक्‍टर व अधिका-यांचा थेट संबंध
          वर्धा, दि. 18 – मुलांचे ज्‍याप्रमाणे  कुटूंबात स्‍वागत होते त्‍याप्रमाणे मुलींचे होत नाही आणि त्‍याचा परिणाम गर्भलिंग तपासणी करण्‍यावर होतो. वास्‍तविक गर्भलिंग निदान करणे हा कायद्याने गुन्‍हा आहे. अशा प्रवृत्‍ती टाळण्‍यासाठी  राष्‍ट्रीय ग्रामीण अभियाना अंतर्गत सोनोग्राफी  केन्‍द्रधारक, प्राधीकरण व तज्ञ  अधिका-यांच्‍या   कार्यशाळेत  आयएमएच्‍या  डॉक्‍टरांनी  गर्भधारणापूर्व व प्रसवपूर्व  निदानतंत्र प्रतीबंधक  अधिनियमातील तरतुदीबाबत थेट संवाद साधला तसेच  बेटी बचाव अभियानाला संपूर्ण सहकार्याचे  अभिवचन दिले.
          बोरगाव मेघे येथील आयएमए सभागृहात आयोजीत प्रसवपूर्व  निदानतंत्र विनीमयन  आणि दुरुपयोग प्रतिबंधक अधिनियमातील  विविध तरतुदीची  डॉक्‍टरांसाठी  विशेष कार्यशाळा आयोजीत करण्‍यात आली होती.  कार्यशाळेचे उदघाटन अप्‍पर  जिल्‍हा पोलीस अधिक्षक टी.एस.गेडाम यांच्‍या हस्‍ते दीप प्रज्‍वलनाने झाले.
          कार्यशाळेत जिल्‍हा शल्‍य चिकित्‍सक डॉ. मिलींद सोनोने, तज्ञ मार्गदर्शक डॉ.गंभीर , सेवाग्राम वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्‍ठाता डॉ.बी.एस.गर्ग,जिल्‍हा आरोग्‍य अधिकारी डॉ.माने, आयएमएचे अध्‍यक्ष डॉ. सुनील महाजन आदी उपस्थित होते.
       प्रसवपूर्व  निदानतंत्र अधिनियमा अंतर्गतच्‍या  तरतूदींचे सर्व वैद्यकीय क्षेत्रातील तज्ञ डॉक्‍टरांनी  पालन करुन  कायद्याची  अंमलबजावणीला  सहकार्य करण्‍याचे आवाहन करताना जिल्‍हा शल्‍य चिकित्‍सक डॉ. मिलींद सोनोने म्‍हणाले की, गर्भलिंग तपासणी करणारे डॉक्‍टर्स, त्‍यांचे मदतनीस तसेच  गर्भवती स्त्रिसोबतच तीचा नवरा, सासू-सासरे यांनाही  अश्‍याप्रकारे लिंग निदान केल्‍यास शिक्षा होऊ शकते याची माहिती  तसेच जनजागृती साठी  सहकार्य करावे.
            वर्धा जिल्‍ह्यात  दरहजारी  पुरुषामागे 939 स्त्रियांचे प्रमाण आहे. ते 2001 मध्‍ये 936 तर 2011 मध्‍ये  946 झाले आहे. त्‍यानंतर आणखी  कमी होत असून, एप्रिल ते सप्‍टेंबर  या कलावधीत  यात मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. जिल्‍ह्यात मुलींचे प्रमाण  कमी असल्‍यामुळे  या कायद्याची  प्रभावी अंमलबजावणी  करण्‍यासाठी  सोनोग्राफी केन्‍द्राची  केव्‍हाही तपासणी होऊ शकते. त्‍यामुळे  या अधिनियमातील तरतुदी प्रमाणे आवश्‍यक असलेल्‍या  सर्व सुविधा तसेच ठळकपणे माहिती  सोनोग्राफी केन्‍द्राला प्रदर्शीत करावी  असे आवाहनही  जिल्‍हा शल्‍य चिकित्‍सकांनी यावेळी दिली.
           वर्धा जिल्‍ह्यात  लिंग निवडीस प्रतीबंधक कायद्यान्‍वये  जिल्‍हाधिकारी यांच्‍या अध्‍यक्षतेखाली दक्षता समिती तसेच दक्षता पथकाची नियुक्‍ती करण्‍यात आली आहे. दक्षता पथकातील 59 यंत्रणा सोनोग्राफी केन्‍द्रांना भेट देऊन केव्‍हाही  तपासणी करु शकतात. त्‍यामुळे सोनोग्राफी केन्‍द्र  धारकांनी तरतुदीनुसार संपूर्ण माहिती अद्ययावत ठेवावी. असेही यावेळी  सांगण्‍यात आले.
      मुलगी वाचविण्‍यासाठी  समाजाच्‍या  मानसिकतेत बदल आवश्‍यक असून, आयएमएसह  सर्व  स्‍वंयसेवी  संस्‍थांनी पुढाकार घेवून मुलीच्‍या जन्‍माचे  स्‍वागत करावे, असे आवाहन अप्‍पर जिल्‍हा पोलीस अधिक्षक श्री. गेडाम, जिल्‍हा आरोग्‍य अधिकारी डॉ. माने, डॉ. गंभीर, डॉ. गर्ग यांनी  आपल्‍या  सादरीकरणाव्‍दारे  केले.
          डॉ.गंभीर यांनी  वर्धा जिल्‍ह्यात मुलींचे कमी होत असलेले प्रमाण चिंताजनक असून, गर्भनिदान प्रतीबंधक  कायद्यातील तरतुदीचे सर्वांनी पालन करावे, असे आवाहन त्‍यांनी यावेळी केले.
          प्रास्‍ताविक डॉ. जे.एल.शर्मा यांनी केले. तर कार्यक्रमाचे संचालन कांचन बदवने यांनी केले. प्रभारी निवासी अधिकारी डॉ. धामट यांनी स्‍वागत केले.
          या कार्यशाळेत वर्धा येथील स्त्रि रोगतज्ञ, आयएमएचे  सर्व पदाधिकारी  डॉक्‍टर्स, सोनोग्राफी केन्‍द्रांचे प्रमुख, स्‍वंयसेवी  संस्‍थांचे प्रतीनिधी उपस्थित होते.
                                                00000000

Wednesday 17 October 2012

वाहनांच्‍या काचेवरील ब्‍लॅक फिल्‍म तपासणीची विशेष मोहीम सुरु -विजय चव्‍हाण


             

          वर्धा, दिनांक 17- वाहनांच्‍या विंडस्क्रिन व  खिडकीच्‍या काचांना ब्‍लॅक फिल्‍म बसविलेल्‍या  वाहनावर  कारवाई करण्‍यासाठी  विशेष मोहीम राबविण्‍यात येत असून, अशा वाहनाविरुध्‍द वायुवेग पथकामार्फत कडक कारवाई करण्‍यात येणार असल्‍याची  माहिती  प्रादेशिक परिवहन अधिकारी  विजय चव्‍हाण यांनी दिली.
        वाहनांच्‍या विंडस्क्रिन व खिडकांच्‍या काचेवर बसविण्‍यात येणा-या ब्‍लॅक फिल्‍मच्‍या वापरास  आळा बसविण्‍यासाठी  सर्वोच्‍च न्‍यायालयाने  दिलेल्‍या निर्देशानुसार  विशेष तपासणी मोहीम  जिल्‍ह्यात  राबविण्‍यात येणार आहे.
          वाहन उत्‍पादकाने  वाहनाचे उत्‍पादन करताना  केन्‍द्रीय  मोटार वाहन नियमानुसार विहित केल्‍याप्रमाणे  पारदर्शकता असणा-या काचा पुढील व मागील विंडस्क्रिन  व साईडच्‍या खिडक्‍यांना बसविणे आवश्‍यक आहे. तथापि  कोणतीही ब्‍लॅक फिल्‍म, पेन्‍ट अथवा इतर मटेरीयल चिकटविता येणार नाही.
        वाहनाची नोंदणी , योग्‍यता प्रमाणपत्राचे नुतनीकरण व परिवहनेतर संवर्गातील वाहनाच्‍या  नोंदणी प्रमाणपत्राचे नुतणीकरणाचे वेळेस काचांवर  फिल्‍म चिकटवली जाणार नाही  तसेच विक्री  करतानाही  काचांवर  फिल्‍म लावण्‍यात येणार नाही याची वितरकांनी  खबरदारी घ्‍यावी.
          अती महत्‍वाच्‍या  व्‍यक्‍तींच्‍या वाहनांच्‍या विंडस्क्रिन व खिडक्‍यांच्‍या  काचांवर ब्‍लॅक  फिल्‍मचा वापर करण्‍यासाठी  परवानगी देऊन केन्‍द्रीय मोटार वाहन नियम 1989 मधील  नियमात सुट देण्‍याच्‍या  अनुषंगाने  प्रमाणपत्र देण्‍यासाठी अप्‍पर मुख्‍य सचिव (गृह) यांच्‍या अध्‍यक्षतेखाली समिती गठीत करण्‍यात आली आहे. त्‍यानुसार प्रस्‍ताव  समितीसमोर  सादर करावयाचा असल्‍याची  माहितीही उपप्रादेशिक अधिकारी  विजय  चव्‍हाण यांनी दिली.
                                                000000

कारंजा तालुक्‍यातील पाच ग्रामपंचायतीसाठी



                           21 ऑक्‍टोंबरला मतदान
                     मतदानाच्‍या  दिवशी आठवडी बाजार बंद
          वर्धा, दिनांक 17 – कारंजा तालुक्‍यातील बोरगांव (गोंडी), सुसुंद, चोपन, बेलगाव व धर्ती  या ग्रामपंचायतीच्‍या सार्वत्रिक निवडणूका 21 ऑक्‍टोंबर रोजी  मतदान घेण्‍यात येणार आहे.
          मतदानाच्‍या  दिवशी  निवडणूक होत असलेल्‍या  गावातील आठवडी  बाजार बंद राहणार असल्‍याचे आदेश प्रभारी जिल्‍हाधिकारी  संजय भागवत यांनी दिली आहे.   
                                                00000

छायाचित्र मतदार यादीचे पुर्नरिक्षण


             
                 प्रादेशिक चौकशी अधिकारी पाहणी करणार
       वर्धा, दिनांक 17 – जिल्‍ह्यातील  छायाचित्र मतदार याद्यांचे विशेष संक्षिप्‍त पुर्नरिक्षण कार्यक्रमा अंतर्गत मतदार यादी  पुर्नरिक्षणाचे काम सुरु  आहे. यासंदर्भात पाहणी करण्‍यासाठी विभागीय आयुक्‍त  यांचे प्रतीनिधी म्‍हणून प्रादेशिक चौकशी अधिकारी  रविन्‍द्र  सावळकर  हे वर्धा जिल्‍ह्यातील चारही मतदार संघात शनिवार दिनांक  20 ऑक्‍टोंबर रोजी भेट देऊन पाहणी करणार आहेत.
                                                00000