Thursday 18 October 2012

सोनोग्राफी केन्‍द्रांच्‍या तपासणीसाठी विशेष पथक -डॉ. मिलींद सोनोने


                                     
             
             * भृणहत्‍या कायद्याची कडक अंमलबजावणी
            * आयएमए चे डॉक्‍टर व अधिका-यांचा थेट संबंध
          वर्धा, दि. 18 – मुलांचे ज्‍याप्रमाणे  कुटूंबात स्‍वागत होते त्‍याप्रमाणे मुलींचे होत नाही आणि त्‍याचा परिणाम गर्भलिंग तपासणी करण्‍यावर होतो. वास्‍तविक गर्भलिंग निदान करणे हा कायद्याने गुन्‍हा आहे. अशा प्रवृत्‍ती टाळण्‍यासाठी  राष्‍ट्रीय ग्रामीण अभियाना अंतर्गत सोनोग्राफी  केन्‍द्रधारक, प्राधीकरण व तज्ञ  अधिका-यांच्‍या   कार्यशाळेत  आयएमएच्‍या  डॉक्‍टरांनी  गर्भधारणापूर्व व प्रसवपूर्व  निदानतंत्र प्रतीबंधक  अधिनियमातील तरतुदीबाबत थेट संवाद साधला तसेच  बेटी बचाव अभियानाला संपूर्ण सहकार्याचे  अभिवचन दिले.
          बोरगाव मेघे येथील आयएमए सभागृहात आयोजीत प्रसवपूर्व  निदानतंत्र विनीमयन  आणि दुरुपयोग प्रतिबंधक अधिनियमातील  विविध तरतुदीची  डॉक्‍टरांसाठी  विशेष कार्यशाळा आयोजीत करण्‍यात आली होती.  कार्यशाळेचे उदघाटन अप्‍पर  जिल्‍हा पोलीस अधिक्षक टी.एस.गेडाम यांच्‍या हस्‍ते दीप प्रज्‍वलनाने झाले.
          कार्यशाळेत जिल्‍हा शल्‍य चिकित्‍सक डॉ. मिलींद सोनोने, तज्ञ मार्गदर्शक डॉ.गंभीर , सेवाग्राम वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्‍ठाता डॉ.बी.एस.गर्ग,जिल्‍हा आरोग्‍य अधिकारी डॉ.माने, आयएमएचे अध्‍यक्ष डॉ. सुनील महाजन आदी उपस्थित होते.
       प्रसवपूर्व  निदानतंत्र अधिनियमा अंतर्गतच्‍या  तरतूदींचे सर्व वैद्यकीय क्षेत्रातील तज्ञ डॉक्‍टरांनी  पालन करुन  कायद्याची  अंमलबजावणीला  सहकार्य करण्‍याचे आवाहन करताना जिल्‍हा शल्‍य चिकित्‍सक डॉ. मिलींद सोनोने म्‍हणाले की, गर्भलिंग तपासणी करणारे डॉक्‍टर्स, त्‍यांचे मदतनीस तसेच  गर्भवती स्त्रिसोबतच तीचा नवरा, सासू-सासरे यांनाही  अश्‍याप्रकारे लिंग निदान केल्‍यास शिक्षा होऊ शकते याची माहिती  तसेच जनजागृती साठी  सहकार्य करावे.
            वर्धा जिल्‍ह्यात  दरहजारी  पुरुषामागे 939 स्त्रियांचे प्रमाण आहे. ते 2001 मध्‍ये 936 तर 2011 मध्‍ये  946 झाले आहे. त्‍यानंतर आणखी  कमी होत असून, एप्रिल ते सप्‍टेंबर  या कलावधीत  यात मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. जिल्‍ह्यात मुलींचे प्रमाण  कमी असल्‍यामुळे  या कायद्याची  प्रभावी अंमलबजावणी  करण्‍यासाठी  सोनोग्राफी केन्‍द्राची  केव्‍हाही तपासणी होऊ शकते. त्‍यामुळे  या अधिनियमातील तरतुदी प्रमाणे आवश्‍यक असलेल्‍या  सर्व सुविधा तसेच ठळकपणे माहिती  सोनोग्राफी केन्‍द्राला प्रदर्शीत करावी  असे आवाहनही  जिल्‍हा शल्‍य चिकित्‍सकांनी यावेळी दिली.
           वर्धा जिल्‍ह्यात  लिंग निवडीस प्रतीबंधक कायद्यान्‍वये  जिल्‍हाधिकारी यांच्‍या अध्‍यक्षतेखाली दक्षता समिती तसेच दक्षता पथकाची नियुक्‍ती करण्‍यात आली आहे. दक्षता पथकातील 59 यंत्रणा सोनोग्राफी केन्‍द्रांना भेट देऊन केव्‍हाही  तपासणी करु शकतात. त्‍यामुळे सोनोग्राफी केन्‍द्र  धारकांनी तरतुदीनुसार संपूर्ण माहिती अद्ययावत ठेवावी. असेही यावेळी  सांगण्‍यात आले.
      मुलगी वाचविण्‍यासाठी  समाजाच्‍या  मानसिकतेत बदल आवश्‍यक असून, आयएमएसह  सर्व  स्‍वंयसेवी  संस्‍थांनी पुढाकार घेवून मुलीच्‍या जन्‍माचे  स्‍वागत करावे, असे आवाहन अप्‍पर जिल्‍हा पोलीस अधिक्षक श्री. गेडाम, जिल्‍हा आरोग्‍य अधिकारी डॉ. माने, डॉ. गंभीर, डॉ. गर्ग यांनी  आपल्‍या  सादरीकरणाव्‍दारे  केले.
          डॉ.गंभीर यांनी  वर्धा जिल्‍ह्यात मुलींचे कमी होत असलेले प्रमाण चिंताजनक असून, गर्भनिदान प्रतीबंधक  कायद्यातील तरतुदीचे सर्वांनी पालन करावे, असे आवाहन त्‍यांनी यावेळी केले.
          प्रास्‍ताविक डॉ. जे.एल.शर्मा यांनी केले. तर कार्यक्रमाचे संचालन कांचन बदवने यांनी केले. प्रभारी निवासी अधिकारी डॉ. धामट यांनी स्‍वागत केले.
          या कार्यशाळेत वर्धा येथील स्त्रि रोगतज्ञ, आयएमएचे  सर्व पदाधिकारी  डॉक्‍टर्स, सोनोग्राफी केन्‍द्रांचे प्रमुख, स्‍वंयसेवी  संस्‍थांचे प्रतीनिधी उपस्थित होते.
                                                00000000

No comments:

Post a Comment