Friday 14 October 2011

हात धुवा हात... !


विशेष लेख क्र.               जिल्हा माहिती कार्यालय,वर्धा 
दि.15 ऑक्टोंबर 2011                                                

     
वैयक्तिक स्वच्छतेत हातांची स्वच्छता राखण्याचे महत्व खूप आहे. याची जाणीव सर्वांना व्हावी यासाठी जागतिक स्तरावर हात धुण्याचा दिवस साजरा केला जातो या संदर्भात हा खास लेख

     आपला हात आरोग्याच्या दृष्टीने एक महत्वाचा अवयव आहे. आपण अन्न सेवन आपल्या हातांनी करीत असतो म्हणूनच या हातांची स्वच्छता ही महत्वाची ठरत असते आपल्या हातांच्या स्वच्छतेवर आपल्या पोटाचे आरोग्य अवलंबून आहे. नियमितपणे हात स्वच्छ ठेवणे यासाठीच आवश्यक आहे.
     पूर्वीच्या काळी बाहेरुन आल्यानंतर स्वच्छ हातपाय धुण्याची प्रथा होती. त्यासाठी अंगणात कायम पाण्याची एक बादली भरुन ठेवलेली असायची आता काळाच्या ओघात ही परंपरा मागे पडली आहे. शास्त्रोक्त पध्दतीने विचार केल्यास ती पध्दत योग्यच होती हे आपणास सांगता येईल
     आपण विविध ठिकाणी वेगवेगळया वस्तूंना कामानिमित्य स्पर्श करीत असतो. त्या पदार्थावर वातावरणातील धुळीसोबत जीव-जंतूंचा संसर्ग झालेला असतो त्यामुळे कुठेही आणि कधीही  अन्नसेवन करण्यापूर्वी हात स्वच्छ धूवून घेणे आवश्यक आहे. असे न केल्यास ते जीव जंतू हातांच्या माध्यमातून पोटात जातात. यातून अगदी विषबाधेपर्यंत धोका असतो.                      
शौचाला जाऊन आल्यानंतर तसेच लघवीहून आल्यानंतर हात धुणे अत्यंत आवश्यक आहे. लहान मुलांना आपण याची जाणीव करुन द्यायला हवी लहान मुले ब-याचदा मातीत खेळतात ही माती अनेक जीवजंतूचा साठा असू शकते त्यामुळे त्यांना वेळोवेळी नखे कापण्याची सवय आपण लावायला हवी या नखातील माती हात धुतल्याने निघत नाही मात्र जेवताना त्योचअंश पोटात जात असतात त्यातून आरोग्य हमखासपणे बिघडते म्हणूनच पालकांनी याबाबत जागरुक राहण्याची आवश्यकता आहे.
     नखे वाढविण्याची सवय मोठया व्यक्तींनाही असते. पाश्चात्य पध्दतीने अनुकरण करताना आपण असे करतो मात्र पाश्चात्य संस्कृतीत जेवण हे काटया-चमच्याने केले जाते हातांचा स्पर्शदेखील अन्नाला होत नाही हे आपण लक्षात ठेवायला हवे.
     आपल्या हातांची स्वच्छता राखणे म्हणजे आरोग्य संपन्न होण्याच्या दृष्टीने पहिले पाऊल टाकणे होय त्यासाठी आता निर्धार करा आणि आरोग्य संपन्न व्हा.
                               प्रशांत दैठणकर

कापूस पिकावरील लाल्याचे व्यवस्थापन


     महाराष्ट्र शासन
प्रसिध्दी पत्रक     जिल्हा माहिती कार्यालय,वर्धा   दि.14 ऑक्टोंबर 2011
------------------------------------------------------------------------------  
            
वर्धा,दि.14- कापुस पिकावरील लाल्याचा प्रश्न प्रासंगिक किंवा उदभवणारा नसुन त्याची तिव्रता विशिष्ठ प्रकारच्या मातीच्या अवस्थेशी व भोवतालच्या हवामानाशी निगडीत आहे. लाल्या होण्याची मुलभुत कारणे व ज्यामुळे लाल्याचा प्रसार सहज होतो अशा निकषांची माहिती संकलीत केली असुन, काळजीपुर्वक व बारकाईने पिकाची देखरेख केल्यास लाल्या नियंत्रणात आणता येतो. कापसावरील लाल झालेली पाने पुन्हा हिरवी करता येणे शक्य नसले तरी सतत बारकाईने देखरेख (सर्व्हेलंस) हाती घेतल्यास झाडांची पाने लाल होण्यापासुन बचाव करण्यास मदत होते. अशा रीतीने लाल्याचा प्रादुर्भाव वेळीच रोखता येणे शक्य आहे.
पुढे दिलेल्या पैकी स्थानिक परिस्थितीनुसार आवश्यक त्या उपाययोजनेचा अवलंब करण्यात यावा.
जमिनीतील नत्राची स्थिती योग्य प्रमाणात ठेवण्यासाठी आवश्यकतेनुसार नत्र स्फुरद पालाश शिफारसीप्रमाणे मात्रा जमिनीतून देणे अथवा बोंडे वाढीच्या अवस्थेत डी.ए.पी. (2 टक्के) किंवा युरीया ( 2 टक्के) याची आठवड्याच्या अंतराने दोन वेळा फवारणी करणे.
पेरणीच्या नियत वेळेचे योग्य पालन केल्यास रात्रीचे निचांकी तापमानाचे (21 अंशा खाली ठेवल्यास) दुष्परिणाम टाळता येतात.
पाण्याचा योग्य निचरा होईल याची दक्षता घेतल्यास पाणी साठवून राहत नाही व यामुळे मॅग्नेशियम या सुक्ष्ममुलद्रव्याच्या उपलब्धतेचे प्रमाण वाढते.
पाण्याची उपलब्धता कमी होवून पिकावर ताण पडल्यास, पाण्याची पातळी 75 ते 80 टक्के स्थित ठेवण्यासाठी बोंडे लागण्याच्या वेळी संरक्षक पाण्याची पाळी देणे आवश्यक आहे.
पाने लाल पडण्याची लक्षणे दिसताच मॅग्नेशियम सल्फेट 20 ते 25 किलो प्रती हेक्टर झाडाच्या मुळाशी देणे किंवा 0.5ते 1 टक्के मॅग्नेशियम सल्फेट अधिक 1 टक्का युरीयाची फवारणी पानांवर केल्यामुळे पाने लाल पडण्याचे प्रमाण कमी करता येते.
       कापुस पिक फुलोरा अवस्था ते बोंड लागण्याच्या अवस्थेत असतांना युरीया ( 1 ते 2 टक्के ) त्याच बरोबर 15 ते 20 पी.पी.एम.क्लोरमेक्वॅट क्लोराईड व 0.10 टक्के सायट्रीक सिडची फवारणी दोन ते तीन वेळा आठवड्याच्या फरकाने करावी.
     मातीमध्ये आद्रतेचे प्रमाण स्थीर राखण्यासाठी मृद संधारणा बरोबर पावसाच्या पाण्याचे योग्य व्यवस्थापन करावे, जेणे करुन बोंड व फुल धारणेच्या वेळी पाण्याचा ताण कमी करण्यास मदत होते. केंन्द्रीय कपास अनुसंधान संस्थान, नागपूर (ICAR) यांनी कळविलेल्या शिफरशीप्रमाणे उपाययोजनेचा शेतक-यांनी अवलंब करावा. असे उपविभागीय कृषि अधिकारी, वर्धा चे संतोष डाबरे यांनी कळविले आहे.
                      00000

सामाजिक आर्थिक सर्वेक्षणाचे महत्व... !


विशेष लेख                     जिल्हा माहिती कार्यालय,वर्धा                                            दि.14 ऑक्टोंबर 2011

                               सामाजिक आर्थिक सर्वेक्षणाचे महत्व... !

      जनगणनेचे काम पूर्ण झाले आहे. यानंतर आता आर्थिक ,सामाजिक व जात सर्वेक्षण सुरु झाले आहे. भारताच्या भावी काळातील विकासात या सर्वेक्षणाचे महत्व विषद करणारा हा लेख.
                                       -प्रशांत दैठणकर
     सध्या जनगणनेनंतरचा टप्पा अर्थात आर्थिक, सामाजिक व जात सर्वेक्षण याचे काम सर्वत्र सुरु आहे. प्रथमच हे काम विनापेपर होत आहे हे  या कामाचे वैशिष्टय आहे असे सांगता येईल. हे काम अत्यंत महत्वाचे असून, यातून तयार होणारी माहिती आगामी काळात विविध कामांसाठी वापरली जाणार आहे.
     आतापर्यंत झालेल्या जनगणनांमध्ये केवळ मोजणी होणे आणि त्यातील आकडेवारी आधारभूत आकडेवारी म्हणून वापरली जाणे असे होत होते. मात्र यामध्ये बराच बदल करण्याचे यंदा ठरविण्यात आले आणि जनगणनेच्या कामात प्रथमच जात सर्वेक्षण होत आहे. त्यादृष्टीने हे काम ऐतिहासिकच म्हणावे लागते.
     समाज नेमका कोणत्या पातळीवर आहे हे जाणणे नियोजनाच्या दृष्टीने आवश्यक असते. आपला देश अठरापगड जातींचा बनलेला आहे आणि सामाजिक स्तरावर आर्थिक विषमता मोठ्या प्रमाणावर आहे असं म्हटलं जातं की या देशाचा 97 टक्के पैसा अर्थात संपत्ती फक्त 3 टक्के लोकांकडे आहे. भारतात मध्यमवर्गीयांचे प्रमाण अधिक आहे.           खेडेगावाचा देश अशी आपल्या भारताची दुसरी ओळख आहे. आजही 65 टक्के जनता खेडेगावात राहते आणि यापैकी बहुतांश लोक हे शेतीवर आपली उपजिविका करतात. ही शेती मुख्यत: लहरी अशा मौसमी पावसावर अवलंबून आहे. काही प्रमाणात सिंचन सुविधा निर्माण झालेला असल्या तरी शेतीवरच्या जीवनाला स्थैर्य आणि समृध्दी फारशी आलेली नाही. त्यात ज्यांच्याकडे कमी शेती अर्थात अल्पभूधारक आहेत अशांना उत्पन्न कमी असल्याने त्यापैकी अनेकजण गरीबीच्या रेषेखाली आहे.
     समाजाची नेमकी आर्थिक स्थिती जाणून घेतल्यानंतरच विविध समाज घटकांसाठी कल्याणकारी योजना राबविणे शक्य होणार आहे. याच उद्देशातून हे आर्थिक आणि सामाजिक सर्वेक्षण महत्वाचे आहे.
     देशाच्या भौगोलिक स्थितीनेही विकास प्रक्रियेसमोर आव्हाने निर्माण केलेली आहेत. या पार्श्वभूमीवर कोणत्या भागात कोणत्या सुविधा उपलब्ध आहेत आणि कोणत्या भागात आणखी सुविधा देण्याची गरज आहे याची माहिती या सर्वेक्षणातून अधोरेखीत करता येणार असल्यानेही या प्रक्रियेचे महत्व वाढते.
     लोककल्याणकारी संकल्पनेवर आधारित असलेल्या आपल्या या देशात येणा-या काळात समाजाचा आर्थिक स्तर उंचावण्यासाठी ही सुरुवात आहे असंच म्हणावं लागेल.
                                     प्रशांत दैठणकर
 00000
     

नोंद करा प्रत्येक जन्म-मृत्यूची... !


विशेष लेख             जिल्हा माहिती कार्यालय,वर्धा                                दि.14 ऑक्टोंबर 2011

नोंद करा प्रत्येक जन्म-मृत्यूची... !

      जन्म-मृत्यू नोंदणीचे काम गावात ग्रामपंचायतीतच केले जाते. मात्र प्रत्यक्षात जागरुकपणे अशी नोंदणी करुन प्रमाणपत्र घेणारे अद्यापही कमी आहेत. ही नोंदणी का आवश्यक आहे याचे विवेचन करणारा हा लेख.                                                   
                                                                     -प्रशांत दैठणकर
     जन्म आणि मृत्यू या संसारातील अटळ बाबी म्हणता येतील. त्यात आपण किमान जन्मावर नियंत्रण आणू शकतो. परंतु लोकसंख्या वाढतच आहे. यावरुन ती बाब पूर्णपणे नियंत्रणात आलेली नाही हे स्पष्ट आहे. मृत्यू मात्र टाळता येत नाही. वैद्यकीय शास्त्रानं केलेल्या प्रगतीमुळे आपण मृत्यूचा दर कमी करण्यात यश मिळवलं आहे हे मात्र खरं. आता होणा-या या प्रत्येक जन्म आणि मृत्यूची नोंदणी देखील आवश्यक आहे. मात्र ती नोंदणी केली जातेच असं घडत नाही.
      मृत्यू झाल्यावर वैद्यकीय प्रमाणपत्रासह किंवा वृध्दापकाळाने घरीच मृत्यू झाला तर प्रमाणपत्रा शिवाय अशी नोंदणी करता येते. शहरी भागात मृतांवर स्मशानात अंत्यसंस्कार करण्यात येतात. हा स्मशान वापरण्याचा परवाना देताना नोंद होत असते. मात्र नंतरही गरज पडल्याखेरीज कुणी मृत्यू नोंदणी प्रमाणपत्र मागत नाही.
     मृत्यूची नोंद नसल्याने मृतकाच्या नावे असलेली संपत्ती तसेच पेन्शन अथवा बँकेच्या खाती रोख रक्कम आदी नेमकेपणाने कोणत्या वारसाला द्यायचे याचा वाद होतो आणि वारसा हक्क मागणारे दावे केले जातात. यातही न्यायालयात प्रथम मृत्यू नोंदणी प्रमाणपत्र मागितले जाते.                                                                  
जन्म दाखला देखील महत्वाचा असतो. संस्थागत प्रसूतीमध्ये त्या-त्या रुग्णालयात जन्माची नोंद केली जाते आणि ही नोंद नंतर स्थानिक स्वराज्य संस्थाकडे दिली जाते. या माध्यमातून नोंद झाली तरी जागरुकपणे या नोंदणीचे प्रमाणपत्र घेतले पाहिजे. हे प्रमाणपत्र शाळेत प्रवेश घेताना तसेच परीक्षा आणि नोकरी यासाठी महत्वाचे असते.
     या जन्म-मृत्यूच्या नोंदणीचा उपयोग फक्त कुटुबियांना होतो असे नाही तर आपल्या खंडप्राय देशात विविध प्रकारच्या नियोजनात याची मदत होत असते. या नोंदीवरुनच जन्म दर आणि मृत्यू दर आपणास कळत असतो.
     मृत्यू दरासोबत मृत्यूच्या कारणांवरुनही विविध प्रकारची आकडेवारी आपणास कळत असते. नैसर्गिक मृत्यू आणि अनैसर्गिक मृत्यू असे वर्गीकरण करुन त्याच्या कारणांचा शोध घेणे व त्या अनुषंगाने प्रतिबंधात्मक उपाय करण्यासोबत आरोग्य सुविधांचा विचार केला जात असतो.
     देशाचा जबाबदार नागरिक या नात्याने आपण जागरुकपणे या राष्ट्रीय कार्यात सहभागी होवून प्रत्येक जन्म आणि मृत्यूची नोंद करायलाच हवी.
                                     प्रशांत दैठणकर
                     000000

कृषि यांत्रिकीकरणावर प्रात्यक्षिक व मिडो ऑर्चड पेरु क्षेत्रीय भेट


     महाराष्ट्र शासन
प्रसिध्दी पत्रक     जिल्हा माहिती कार्यालय,वर्धा   दि.14 ऑक्टोंबर 2011
------------------------------------------------------------------------------   
         
     वर्धा, दि.14- कृषि तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) व राष्ट्रीय फलोत्पादन अभियाना अंतर्गत नुकतेच कुटकी ता.जि.वर्धा येथील प्रमोद पाटील यांचे शेतावर कृषि यांत्रिकीकरणावर प्रात्यक्षिक व पेरु पिकाची लागवड (मिडो ऑर्चड) क्षेत्रीय भेट या विषयावर कार्यक्रम संपन्न झाला.
     कार्यक्रमाचे उदघाटक आदर्श गांव समिती महाराष्ट्र राज्याचे   अध्यक्ष पोपटराव पवार उपस्थित  होते.
     यावेळी पोपटराव पवार यांनी गाव हे कसे असावयास पाहिजे व गावाचा विकास कसा करावयाचा, हिवरे बाजार गावातील    शेतक-यांचे उत्पन्न कशा प्रकारे वाढले, गावातील शेतक-यांची प्रगती कशी होत गेली.
 मृद संधारण व जलसंधारण इत्यादी बाबीचे महत्व विषद केले. शेतक-यांच्या  प्रगतीसाठी पाण्याचे नियोजन करणे, फलोत्पादन, भाजीपाला, कुक्कुटपालन, पशुधन इत्यादी जोडधंदा शेती बरोबर करणे आवश्यक असल्याचे सांगितले.विदर्भामध्ये सरासरी 1200 मि.मी. पाऊस पडतो. सुपीक जमीनीचा नियोजनबध्द उपयोग करणे, गट शेतीवदारे शेतीच्या समसया सोडविणे आवश्यक आहे. शेत मालावर प्राथमिक प्रक्रिया करणे. महिला बचत गट निर्मीती करुन महिला सखमीकरण करणे आवश्यक असल्याचे तसेच शेती मधील मजुर समस्यावर कृषि यांत्रिकीकरण हा एकमेव पर्याय असुन गट पध्दतीने शेती करण्यावर कृषि विभागाचा वेळोवेळी सल्ला घेऊन शास्त्रीय पध्दतीने शेती करण्याचे आवाहन केले.            
मार्गदर्शन करताना पोपटराव पवार
प्रास्ताविकात जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी ब-हाटे यांनी कृषि योजनेमध्ये राष्ट्रीय फलोत्पादन अभियाना अंतर्गत जिल्ह्यासाठी 37 शेडनेट हाऊसचे 17 पॅकहाऊसचे तसेच रोजगार हमी योजने अंतर्गत फळझाड लागवडीचे 795 हेक्टर लक्षांक असल्याचे सांगितले. कडधान्य व गळीतधान्य यांचे उत्पादन व उत्पादकता वाढविणेसाठी कृषि यांत्रिकीकरणाची विशेष मोहीम सन 2010-11 अंतर्गत 37 गट , संस्थाचे लक्षांक असून ते पूर्ण झालेले आहे.
 गळीतधान्य कार्यक्रमा अंतर्गत 71 प्रकल्पाचे सधन कापूस योजने अंतर्गत 18 प्रकल्पाचे व राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान मध्ये 23 प्रकल्पाचे व तृणधान्य कार्यक्रमामध्ये 22 प्रकल्पाचे लक्षांक असल्याचे सांगितले. तसेच कृषि विभागा अंतर्गत राबविण्यात येणा-या विविध योजनांची माहिती दिली.
     प्रमोद पाटील यांनी आपल्या कृषि यांत्रिकीकरणामध्ये त्यांच्या शेतीमधील मजुरीवरील खर्च कमी कशा प्रकारे झाला. तसेच कृषि अवजाराचे प्रात्यक्षिक करुन दाखविले. नंतर पेरु पिकाची लागवड मिडो ऑर्चड याबाबत माहिती दिली.
     या कार्यक्रमास शेतकरी, गट प्रमुख उपस्थित होते.
                        000000

जिल्हाधिकारी कार्यालय पदभरती 30 ऑक्टोंबरला लेखी परीक्षा



महाराष्ट्र शासन
प्रसिध्दी पत्रक     जिल्हा माहिती कार्यालय,वर्धा   दि.14 ऑक्टोंबर 2011
-------------------------------------------------------------------------------  
     
      वर्धा, दि. 14- वर्धा जिल्हाधिकारी कार्यालयाच्या लिपीक-टंकलेखक आणि लघु-टंकलेखक या पदांसाठी लेखी परीक्षा रविवार 30 ऑक्टोंबर 2011 रोजी घेण्यात येणार आहे. यासाठी पात्र उमेदवारांची यादी www.wardha.nic.in या संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. पात्र उमेदवारांना टपालव्दारे प्रवेशपत्रे पाठविण्यात येत आहेत. ज्यांना ती प्राप्त होणार नाहीत अशा उमेदवारांनी 29 ऑक्टोंबर रोजी कार्यालयीन वेळेत जिल्हाधिकारी कार्यालयातून प्राप्त करुन घ्यावीत, असे आवाहन जिल्हाधिकारी वर्धा यांनी केले आहे.

                     000000

राज्य पोलिस भरतीमध्ये माजी सैनिकांना संधी


महाराष्ट्र शासन
प्रसिध्दी पत्रक    जिल्हा माहिती कार्यालय,वर्धा   दि.14 ऑक्टोंबर 2011
------------------------------------------------------------------------------  
        वर्धा, दि. 14- राज्य पोलिस शिपाई भरती अंतर्गत माजी सैनिकांना संधी उपलब्ध आहे. पात्र उमेदवारांनी ऑनलाईन नोंदणी करावी. ही नोंदणी 1 नोव्हेंबर पर्यंत करता येईल. यासाठी www.mahapoliceonline.org  या संकेत स्थळास भेट द्यावी, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, वर्धा यांनी केले आहे.
                   0000000

Thursday 13 October 2011

जिल्हा परिषद / पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूका 2012


जिल्हा परिषद / पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूका 2012
     सन 2012 करीता सर्वसाधारण राहणारे गट खालील प्रमाणे
1) 1-साहूर - सर्वसाधारण महिला
2) 2- आष्टी - सर्वसाधारण महिला
3) 5- कारंजा - सर्वसाधारण महिला
4) 8- कन्नमवारग्राम - सर्वसाधारण
5) 9- सिंदी विहीरी - सर्वसाधारण
6) 12 - वाठोडा - सर्वसाधारण
7) 14 - रोहणा - सर्वसाधारण
8) 16 - झडशी - सर्वसाधारण महिला
9) 17- हिंगणी - सर्वसाधारण महिला
10)20-येळाकेळी- सर्वसाधारण
11)23-नालावाडी - सर्वसाधारण महिला
12) 25- पिंपरी मेघे - सर्वसाधारण
13) 26- सिंदी मेघे- सर्वसाधारण महिला
14) 27- सेवाग्राम - सर्वसाधारण महिला
15) 28- सावंगी मेघे - सर्वसाधारण
16) 30- वायगाव निपाणी - सर्वसाधारण महिला
17) 32- तळेगाव टा.- सर्वसाधारण
18) 33- कांढळी - सर्वसाधारण महिला
19) 32-कोरा- सर्वसाधारण
20) 40- गैळ - सर्वसाधारण
21) 47- अल्लीपूर - सर्वसाधारण
22) 49- काणगाव - सर्वसाधारण महिला
23) 24- वायफळ - सर्वसाधारण
24) 41- नाचणगाव - सर्वसाधारण महिला
------------------------------
एकूण 22 + 2 = 24
-----------------------------------

जिल्हा परिषद /  पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूका 2012
सन 2012 करीता ना.मा.प्र. करीता ईश्वर चिठ्ठी साठी उपलब्ध असलेले गट

1) 7- पारडी - नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला
2) 13 - मोरांगणा - नागरिकांचा मागास प्रवर्ग
3) 15-विरुळ - नागरिकांचा मागास प्रवर्ग
4) 18- सेलू - नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला
5) 19- केळझर - नागरिकांचा मागास प्रवर्ग
6) 31- तरोडा- नागरिकांचा मागास प्रवर्ग
7) 34- गिरड - नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला
8) 36- समुद्रपूर - नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला
9) 39- गुंजखेडा- नागरिकांचा मागास प्रवर्ग
10) 42- अंदोरी - नागरिकांचा मागास प्रवर्ग
11) 44- भिडी - नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला
12) 48- शेकापूर (बाई) - नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला
13) 50 वडनेर - नागरिकांचा मागास प्रवर्ग
14) 51- पोहणा - नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला
---------------------------------------------------
एकूण 16 पैकी 14     7 महिला
--------------------------------------------------

 जिल्हा परिषद / पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूका 2012

     मा. राज्य निवडणूक आयुक्त, यांचे आदेश क्रमांक रानिआ / जिपपंस-2011/प्र.क्र.13/ का-07 दिनांक 4/10/2011 अन्वये मा. आयुक्त, नागपूर व्दारा मान्य करण्यात आलेले अनुसूचित जाती आरक्षणसंबंधी गट खालील प्रमाणे आहेत.

1) 4-तळेगांव (शा.पंत) - अनु जाती महिला
2) 6- ठाणेगांव - अनु.जाती महिला
3) 10- जळगांव - अनु. जाती
4) 29- बोरगांव (मेघे) - अनु. जाती महिला
5) 37- नंदोरी - अनु. जाती
6) 46- सावली - अनु. जाती
--------------------------
एकूण 6 गट
---------------------------
जिल्हा परिषद / पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूका 2012
मा. राज्य निवडणूक आयुक्त, यांचे आदेश क्रमांक रानिआ / जिपपंस-2011/प्र.क्र.13/ का-07 दिनांक 4/10/2011 अन्वये मा. आयुक्त, नागपूर व्दारा मान्य करण्यात आलेले अनुसूचित जमाती आरक्षणसंबंधी गट खालील प्रमाणे आहेत.
1) 3- लहान आर्वी अनु. जमाती
2) 11- वाढोणा - अनु. जमाती महिला
3)  21- हमदापूर - अनु. जमाती महिला
4) 22- आंजी (मोठी) अनु. जमाती
5) 35- मांडगांव - अनु. जमाती महिला
6) 43- इंझाळा - अनु. जमाती
7) 45-वाघोली - अनु. जमाती महिला
------------------------------------
एकूण - 7 गट
----------------------------------

अनिल देशमुख यांचा दौरा कार्यक्रम


    महाराष्ट्र शासन
प्रसिध्दी पत्रक     जिल्हा माहिती कार्यालय,वर्धा   दि.13 ऑक्टोंबर 2011
-------------------------------------------------------------------------------
            
वर्धा, दि.13- राज्याचे अन्न , नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री अनिल देशमुख हे वर्धा जिल्ह्याच्या दौ-यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे आहे.
     शुक्रवार 14 ऑक्टोंबर 2011 रोजी दुपारी 12 वाजता नागपूर वरुन मोटरीने बोरधरण, वर्धा  कडे प्रयाण करतील. त्यानंतर दुपारी 1.30 वाजता महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ विश्रामगृह बोरधरण येथे आगमन व राखीव. दुपारी 4 वाजता वर्धा कडे प्रयाण. दुपारी 5 वाजता शासकीय विश्रामगृह, वर्धा येथे आगमन. सायंकाळी 5 ते 6 वाजतापर्यंत  अभ्यांगताकरीता राखीव (शासकीय विश्रामगृह,वर्धा). 6 वाजता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी वर्धा जिल्हा यांनी आयोजीत केलेल्या अल्पसंख्याक मेळाव्यास उपस्थिती.(संदर्भ-आमदार सुरेश देशमुख). सोयीनुसार नागपूर कडे प्रयाण करतील.
                        000000

जवाहर नवोदय विद्यालयात प्रवेशासाठी अर्ज मागविले


   महाराष्ट्र शासन
प्रसिध्दी पत्रक     जिल्हा माहिती कार्यालय,वर्धा   दि.13 ऑक्टोंबर 2011
------------------------------------------------------------------------------
        वर्धा, दि.13- जवाहर नवोदय विद्यालय वर्धा येथे सहाव्या  इयत्‍तेसाठी शैक्षणिक वर्ष 2012-13 च्या प्रवेशासाठी निवड चाचणी परीक्षा घेण्यात येत असून यासाठी पात्र विद्यार्थ्यांचे अर्ज 31 ऑक्टोंबरपूर्वी मागविण्यात आले आहेत.
     ही निवड चाचणी परीक्षा 12 फेब्रुवारी 2012 रोजी जवाहर नवोदय विद्यालय सेलू काटे येथे घेतली जाणार आहे.  विद्यार्थी 1 मे 1999 ते 30 एप्रिल 2003 या कालावधीत जन्मलेला असावा व चालू शैक्षणिक वर्षात तो मान्यताप्राप्त शैक्षणिक संस्थेत पाचव्या वर्षात शिकणारा असावा.
     अर्जाचा नमुना व माहितीपत्रक विनामुलय आहे. पालकांनी यासाठी जिल्हा शिक्षणाधिकारी अथवा गटशिक्षणाधिकारी किंवा प्राचार्य जवाहर नवोदय विद्यालय यांच्याशी संपर्क साधावा. अर्ज शाळेच्या मुख्याध्यापकाकडून भरुन सही शिक्क्यासह गट शिक्षणाधिकारी यांना 31 ऑक्टोंबर 2011 पूर्वी सादर करायचा आहे.
     सहावी ते आठवी हे शिक्षण मोफत असेल तर 9 वी ते 12 वी साठी प्रतिमाह 200 रुपये शुल्क राहील. अनुसूचित जाती जमाती तसेच गरिबी रेषेखालील मुले आणि सर्व मुली यांना शिक्षण मोफत असेल असे जवाहर नवोदय विद्यालय सेलू काटे चे प्राचार्य यू. राजा रेड्डी यांनी कळविले आहे.
                          000000

आदर्शगाव योजनेचा शुभारंभ



 महाराष्ट्र शासन
प्रसिध्दी पत्रक    जिल्हा माहिती कार्यालय,वर्धा   दि.13 ऑक्टोंबर 2011
-------------------------------------------------------------------------------
             
वर्धा,दि.13-आदर्श गाव योजनेची वर्धा जिल्ह्याची सुरुवात सेलू तालूक्यातील दिडोंडा या गावातून आदर्श गाव योजनेचे कार्याध्यक्ष पोपटराव पवार यांच्या हस्ते करण्यात आले. यासाठी घेण्यात आलेल्या ग्रामसभेत पोपटराव पवार यांनी मार्गदर्शन केले.
     सेवाग्राम आणि पवनार ही वर्धा जिल्ह्यातील भूमी महात्मा गांधी आणि आचार्य विनोबा भावे यांची कर्मभूमी आहे. याच कर्मभूमीत स्वच्छता, व्यसनमुक्ती, भेदमुक्ती, दारिद्र निर्मुलन व आचारविचार मुक्त समाज निर्मीतीचे या दोन महापुरुषांचे कार्य सुरु झाले. नैसर्गिक साधन संपत्तीचे संवर्धन करुन देशातली खेडी स्वावलंबी व आदर्श बनावीत त्यातून भारताचे स्वराज्य ग्रामस्वराज्य बनावे असे त्यांचे स्वप्न होते. त्यांचा शुभारंभ आपण दिडोंडा (तालुका-सेलू,जि.वर्धा) या गावातून करु या. गावात वर्धेच्या मगन संग्रहालयाच्या विभा गुप्ता यांनी चांगले काम केले आहे.
     या गावात शंभर टक्के घरी शौचालये आहेत. सर्वजण शौचालयाचा वापर करतात. गावातले रस्ते स्वच्छ आहेत तशी माणसाची मनही स्वच्छ आहेत आता माती आणि पाणी अडविण्याचे काम आदर्शगांव योजनेव्दारे करुन या गावातील शेतक-यांचा आर्थिक उध्दार करण्याचे काम आपण करु या असे आदर्शगांव योजनेचे कार्याध्यक्ष पोपटराव पवार यांनी दिडोंडातील ग्रामसभेत सांगितले. दिडोंडाचा आदर्शगांव योजनेत समावेश करण्यासाठी ही ग्रामसभा आयोजित करण्यात आली होती. अध्यक्षांनी गावच्या सरपंच सुवर्ण चावके या उपस्थित होत्या.
पोपटराव पवार पुढे बोलतांना म्हणाले छत्रपती शिवाजी राजे, सिंदखेडचे राजे लखुजीराव जाधव, सिंदखेडराजा जिल्हा बुलडाणा, शाहू महाराज (कोल्हापूर), अहिल्याबाई होळकर, चांदवड, जिल्हा नाशिक, महात्मा फुले (कडगुंज) जिल्हा-सातारा, डॉ. बाबासाहेब आंबेडकर (आंबवडे) जिल्हा रायगड, संत गाडगेबाबा शेणगांव जिल्हा अमरावती, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी समाजातील विषमता दुर करुन समाज जागृतीचे मोठे काम केले आहे. त्यातील अनेकांनी पावसाचे पाणी अडवून पिण्यासाठी व शेतीसाठी पाण्याची सोय केली आहे. भारतीय कृषि क्रांतीचे जनक डॉ. पंजाबराव देशमुख यांचे पापळ (जिल्हा अमरावती) हे गांव आदर्शगांव योजनेतील एक आदर्श म्हणून पुढे येत आहे त्याच धर्तीवर या थोर पुरुषांची जन्मगांव मात्र अंधारात आहेत. या गावांचाही आदर्शगांव योजनेत समावेश करुन ही गावेही स्वावलंबी व आदर्श बणविण्यात येतील.
     दिडोंडाची गावफेरी करुन शेततळे, रस्ते, गटार व्यवस्था, शौचालये, गांधी ग्राम मंदीरे, शाळा, अंगणवाडी यांची पाहणी पोपटरावांनी केली. ग्रामसभेत पुरुष, महिला, युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. डॉ. गुप्ता, आदर्शगांवचे कृषि उपसंचालक सुनिल वाखेडे, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी वर्धा भाऊसाहेब ब-हाटे यांची भाषणे झाली. ग्रामसभेत आदर्शगांव मासिकांचे संपादक सुरेश्चंद्र वारघडे, रावसाहेब निर्मल (आदर्शगांव), कृषि अधिकारी चंद्रकांत गोरे, कृषि पर्यवेक्षक (आदर्शगांव) बी.डी.ओ. खाडे, तालुका कृषि अधिकारी पाटील इत्यादी उपस्थित होते.
     या ग्रामसभेत दिडोंडातील युवतींनी सुंदर गोफण नृत्य सादर केले. संस्थेचे प्रशांत गुजर यांनी प्रास्ताविक केले. महिला संघटक कमलाताई यांनी आभार मानले.
                         000000

अनुदानावर शेती अवजारे उपलब्ध


   महाराष्ट्र शासन
प्रसिध्दी पत्रक    जिल्हा माहिती कार्यालय,वर्धा   दि.13 ऑक्टोंबर 2011
-------------------------------------------------------------------------------
              
     वर्धा, दि.13- शेतीत काम करणा-या मजुरांची संख्या कमी होत असल्यामुळे शेतीची कामे वेळेवर होत नाहीत व त्यामुळे पिकाच्या उत्पन्नावर विपरीत परीणाम होत आहे. याकरीता शासनाचा भर शेतीचे यांत्रिकीकरणावर आहे. त्याकरीता शासनाच्या राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान, गळीतधान्य उत्पादन कार्यक्रम अंतर्गत 50 टक्के अनुदानावर विविध अवजारांचा पुरवठा करण्याच्या योजना राबविण्यात येत आहेत.
     सन 2011-12 या आर्थिक वर्षात राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानात 50 टक्के अनुदानावर इलेक्ट्रीक मोटारपंप संच, पेट्रोकेरोसीन पंपसंच, नॅपसॅक स्प्रेपंप, ट्रॅक्टर चीत पेरणी यंत्र बैलचचीत दोनचाडी तिफन, रोटरी टिलर, रोटोव्हेटर, एच.डी.पी.ई. पाईप पुरविण्याची तसेच गळीत धान्य कार्यक्रम ब्रश कटर व बहुपीकमळणीयंत्र पुरविण्याची योजना राबविण्यात येत आहे.
या अवजारांचा पुरवठा सन 2011-12 मध्ये प्रकल्पा अंतर्गत निवड झालेल्या गावातील लाभार्थींना वैयक्तीक व गट मार्फत करण्यात येईल. वैयक्तीक लाभात नॅपसॅक स्प्रेपंप, HDPE  पाईप, पेट्रोकेरोसीन पंपसंच व इलेक्ट्रीक मोटारपंप, दोनचाडी तिफन तर शेतकरी गटाला ब्रशकटर, रोटरी टिलर, रोटाव्हेटर व बहुपीक मळणी यंत्राचा लाभ घेता येईल. सदर योजनेत अवजारांवर 50 टक्के किंवा जास्तीत जास्त नॅपसॅक स्प्रेपंप रुपये 633, ईमोपंपसंच रुपये 7160, पेट्रोकेरोसीन 8426, दोनचाडी तिफन रुपये 1374, ब्रशकटर रु.12500, रोटरी टिलर 28000, रोटाव्हेटर रुपये 30000 व बहू पीक मळणी रुपये 24000 अनुदानावर उपलब्ध आहेत.
 शेतकरी व शेतकरी गटांनी शेती अवजारांची माहिती व लाभा करीता नजिकच्या तालुका कृषि अधिकारी यांचेशी संपर्क साधावा. असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी भाऊसाहेब ब-हाटे यांनी केले आहे.
                 000000       

बेरोजगार सेवा सहकारी संस्थांना सुचना


महाराष्ट्र शासन
प्रसिध्दी पत्रक    जिल्हा माहिती कार्यालय,वर्धा   दि.13 ऑक्टोंबर 2011
-------------------------------------------------------------------------------
                 
     वर्धा, दि.13- जिल्हा रोजगार व स्वयंरोजगार मार्गदर्शन केंद्र, वर्धा यांचे  अंतर्गत जिल्ह्यात सुशिक्षित बेरोजगारांच्या सहकारी सेवा संस्था स्थापन झालेल्या  सेवा संस्थां आहेत. या कार्यालयाचे अंतर्गत काम वाटप समितीकडे जिल्हा शल्य चिकित्सक, सामान्य रुग्णालय, वर्धा यांचेकडून आयपीएचएस अंतर्गत कंत्राटी पध्दतीने सुरक्षा सेवा तसेच उपजिल्हा रुग्णालयात आहार सेवा सुरु करावयाचे असल्याचे कामे उपलब्ध आहे.
     इच्छूक सेवा संस्थांनी काम वाटपाचे अटी व शर्ती पूर्ण करु शकतील अशा संस्थांनी जिल्हा रोजगार व स्वयंरोजगार मार्गदर्शन केंद्र वर्धा यांचेशी दि. 18 ऑक्टोंबर 2011 पर्यंत संपर्क साधून लेखी स्वरुपात अर्ज सादर करावा.कामाचे स्वरुप व तपशिल जिल्हा रोजगार व स्वयंरोजगार मार्गदर्शन केंद्र, वर्धा यांचेकडे उपलब्ध आहेत.
                       000000

जिल्हास्तरीय पायका क्रीडा स्पर्धा


महाराष्ट्र शासन
प्रसिध्दी पत्रक     जिल्हा माहिती कार्यालय,वर्धा   दि.13 ऑक्टोंबर 2011
-------------------------------------------------------------------------------
  
वर्धा,दि.13- क्रीडा व युवक सेवा संचालनालय तथा जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, वर्धा यांचे संयुक्त विद्यमाने जिल्हास्तरीय पायका क्रीडा स्पर्धाचे आयोजन दि. 14 ते 16 ऑक्टोंबर 2011 या कालावधीत जिल्हा क्रीडा संकुल, वर्धा येथे करण्यात येणार आहे.
 दि. 14 ऑक्टोंबर रोजी गट क्र. 1 मधील कुस्ती, वेटलिफ्टींग व तायक्वांदो या क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार आहे. दि. 15 ऑक्टोंबर रोजी गट क्र. 2 (कबड्डी, खो-खो,व्हॉलीबॉल,धनुर्विद्या व सायकलींग) या खेळाचे तसेच दि. 16 ऑक्टोंबर 2011 रोजी गट क्र. 1 मधील फुटबॉल व मैदानी क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार आहे. सदर स्पर्धा जिल्हा क्रीडा संकुल , वर्धा येथे 10 वाजता सुरु होणार आहे.
     अधिक माहितीसाठी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय,वर्धा येथे कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा.
                        0000

Monday 10 October 2011

सुबाभूळ शेती आणि कागद..!


सोमवार, १० ऑक्टोबर, २०११

यंत्राची जोरदार घरघर चालू आहे.. आमच्या आपसात बोलण्याचा आवाजही वाढलेला.. मशीनच्या दुस-या बाजूने पांढरा शुभ्र कागद रोल होत होता. थोडसं पुढे हाच रोल लावून दुसरं यंत्र अगदी सहजरित्या रोबोटच्या सहाय्यानं त्याच्या कटींगसह १ रिम मोजून त्याचे तयार गठ्ठे पॅकींग करित आहे आणि आलेल्या पॅकेटवर स्टीकर चिटकवण्यात येत आहे. हा शुभ्र गुळगुळीत पेपर बघितल्यावर कुणालाही चटकन लिहावं वाटेल.

हे चित्र आहे बल्लारपूर पेपर मिलचे. बैठकीसाठी चंद्रपूरला गेलो त्यावेळी मिटींगनंतर दुस-या दिवशी बल्लारपूरला जायचं ठरलं. आपण कागदावर लिहितो पण तो कागद नेमका कसा तयार होतो हे बघितलं नव्हतं त्यामळे उत्सुकता होती.

बल्लारपूर पेपर मिल हा येथील वनांवर अवलंबून सुरु केलेला कारखाना. बांबूपासून पेपर तयार करण्यासाठी सुरु झालेला हा प्रकल्प या भागात आर्थिक स्तर उंचावण्यास मदत करीत आहे.

कारखान्यात दाखल झाल्यावर तिथल्या पध्दतीप्रमाणं डोक्यावर हेल्मेट परिधान केले आणि प्रसिध्दीची ही सेवा ज्या कागदाच्या आधारे प्रसिध्दीचे प्रामुख्याने काम करतो त्या कागदाच्या कारखान्याच्या पाहणीस निघाली. कारखान्याच्या मागील बाजूस ट्रकची भली मोठी रांग त्यात काही ट्रक बांबूने भरलेले तर काही सुबाभूळीच्या लाकडांनी हेच कागदचं पहिलं रुप.

लाकडाची धुलाई करुन तो 'चिपर' मध्ये येतो येथील अजस्त्र यंत्र ताकदशील दातांनी त्या लाकडांचा एक इंच इतका छोटा चुरा करतात तो कन्व्हेअर बेल्टने पुढे चाळणीत जातो जिथे चुकीच्या आकाराचे तुकडे पुन्हा चिपिंगकडे परततात उर्वरित डायजेशन प्रक्रियेला जात असतात करखान्याचे अभियंता चौहान माहिती देत होते हा चुरा मग रसायनं आणि पाण्याच्या उच्च तापमानात शिजतो आणि त्याचा लगदा बनतो. हा काळा असतो. त्यानंतर त्याची स्वच्छता होते व अखेरच्या यंत्रातून स्वच्छ पांढरा लगदा पुढे सरकत राहतो.

कारखान्याच्या तीनमजली इमारतीत ही प्रक्रिया तेथे क्लोरिन व इतर गॅस आणि उष्णता हे बघताना घाम आलेला या कारखान्यात १८ वर्षाखालील व ५५ वर्षावरील व्यक्तींना प्रवेश दिला जात नाही हे विशेष कारखान्याची सध्याची क्षमता प्रतिदिन ४५० टन आहे आणि अल्पावधीत ६५० टन क्षमतेचे नवे युनिट येथे सुरु होत आहे.

पुढे हा कागद यांत्रिक पध्दतीने अखेरच्या टप्प्यात जातो. या ठिकाणी प्रक्रियेव्दारे त्यातली आर्द्रता काढून यंत्राव्दारे टनांचा दाब दिल्यावर लगदा शुभ्र आणि गुळगुळीत कागदाच्या रुपात बाहेर पडतो. इथ चर्चा करताना आमचे संचालक श्री.कौसल सर कागदाचा शोध चीन मध्ये लागला हे सांगत होते. यांत्रिक पध्दतीने हव्या त्या जाडीचा बनविण्यात येतो आणि त्यानुसार त्याचे दर ठरतात.

कागदाची मजबूती लाकडावर अवलंबून असते. आता बांबूचे क्षेत्र घटल्याने आसपासच्या राज्यातून शेतात सुबाभूळाची लागवड करुन त्याच्या फांद्या ट्रकव्दारे आणल्या जातात. सध्या मुख्य निर्मिती सुबाभळावरच होते. हे ऐकून आश्चर्य वाटले.

सुबाभूळ शेतात लावल्यास कीड अथवा इतर खर्च राहत नाही आणि विशिष्ट आकाराच्या फांद्या तोडूनच द्यायच्या त्यामुळे वारंवार खर्चाचा प्रश्न राहत नाही. आपल्याकडे ऊस मोठया प्रमाणावर आहे. याचा उत्पादन खर्च, निगा आणि तोडणी या प्रक्रियेतून टनाला २ हजार पर्यंत आधिकतम भाव आहे. तुलनेत सुबाभूळ हा कारखाना ४ हजार रुपये टन खरेदी करते हे विशेष.

मौसमी हवामान आणि यात असणारी रिस्क कमी आणि भाव जास्त आहे. आंध्रप्रदेशात अनेकजण सुबाभूळाच्या शेतीकडे वळले आहेत. आपल्याही राज्यात असं शक्य आहे आणि जोखीम कमी करुन शाश्वत उत्पन्न देणारी ही शेती शक्य आहे या विचारातच मी कारखान्यातून भोजनासाठी बाहेर पडलो. -


प्रशांत दैठणकर

'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.

शुक्रवारी हस्तप्रक्षालन दिन


   महाराष्ट्र शासन
प्र.प.क्र.   544      जिल्हा माहिती कार्यालय,वर्धा   दि.10 ऑक्टोंबर 2011
-------------------------------------------------------------------------------
वर्धा,दि.10- स्वच्छता उत्सवांतर्गत वर्धा जिल्ह्यात शुक्रवार 15 ऑक्टोंबर रोजी हस्तप्रक्षालन दिन साजरा करण्यात येणार आहे.
सन 2011-12 या वर्षात दिनांक 2 ऑक्टोंबर 2011 ते 4 नोव्हेंबर या कालावधीत स्वच्छता उत्सव कार्यक्रम राबविण्यात येत आहे या कालावधीत सर्व शाळांस्तरावर स्वच्छता कार्यक्रमांसंदर्भात जाणीव-जागृती निर्माण करणे या दृष्टीने दिनांक 15 ऑक्टोंबर 2011 हा दिवस जागतिक हस्त प्रक्षालन दिन म्हणून साजरा करावा असे ठरले आहे. या दिवशी सर्व शाळांस्तरावर हात धुवा माहिमेसंबधित कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. सर्व विद्यार्थ्यांना साबणाचा वापर करुन हात धुण्याचे महतव पटवून देणे, शालेय मुला-मुलीच्या आरोग्याच्या चांगल्या सवयीसाठी सातत्यपूर्ण कार्यक्रमांचे आयोजन करणे. शालेय विद्यार्थी, शाळा व्यवस्थापन समिती, शिक्षक-पालक संघ गावातील मंडळी इत्यादी व्यक्तीना यात सहभागी करणे तसेच प्रभात फेरीचे आयोजन करणे. परिपाठात स्वच्छतेचे महत्व सांगणे विशेषत: शालेय माध्यान्य भोजनाच्या अगोदर व शौचालय नंतर साबणाने हात धुण्याच्या प्रात्यक्षिक व्दारे स्वच्छतेचे महत्व पटवून देणे आदी उपक्रम हाती घेण्यात आले आहेत असे शिक्षणाधिकारी (प्राथ.) तथा, जिल्हा प्रकल्प आधिकारी (सशिअ) जिल्हा परिषद, वर्धा श्री. विवेक बोंदरे यांनी कळविले आहे.