Friday 14 October 2011

सामाजिक आर्थिक सर्वेक्षणाचे महत्व... !


विशेष लेख                     जिल्हा माहिती कार्यालय,वर्धा                                            दि.14 ऑक्टोंबर 2011

                               सामाजिक आर्थिक सर्वेक्षणाचे महत्व... !

      जनगणनेचे काम पूर्ण झाले आहे. यानंतर आता आर्थिक ,सामाजिक व जात सर्वेक्षण सुरु झाले आहे. भारताच्या भावी काळातील विकासात या सर्वेक्षणाचे महत्व विषद करणारा हा लेख.
                                       -प्रशांत दैठणकर
     सध्या जनगणनेनंतरचा टप्पा अर्थात आर्थिक, सामाजिक व जात सर्वेक्षण याचे काम सर्वत्र सुरु आहे. प्रथमच हे काम विनापेपर होत आहे हे  या कामाचे वैशिष्टय आहे असे सांगता येईल. हे काम अत्यंत महत्वाचे असून, यातून तयार होणारी माहिती आगामी काळात विविध कामांसाठी वापरली जाणार आहे.
     आतापर्यंत झालेल्या जनगणनांमध्ये केवळ मोजणी होणे आणि त्यातील आकडेवारी आधारभूत आकडेवारी म्हणून वापरली जाणे असे होत होते. मात्र यामध्ये बराच बदल करण्याचे यंदा ठरविण्यात आले आणि जनगणनेच्या कामात प्रथमच जात सर्वेक्षण होत आहे. त्यादृष्टीने हे काम ऐतिहासिकच म्हणावे लागते.
     समाज नेमका कोणत्या पातळीवर आहे हे जाणणे नियोजनाच्या दृष्टीने आवश्यक असते. आपला देश अठरापगड जातींचा बनलेला आहे आणि सामाजिक स्तरावर आर्थिक विषमता मोठ्या प्रमाणावर आहे असं म्हटलं जातं की या देशाचा 97 टक्के पैसा अर्थात संपत्ती फक्त 3 टक्के लोकांकडे आहे. भारतात मध्यमवर्गीयांचे प्रमाण अधिक आहे.           खेडेगावाचा देश अशी आपल्या भारताची दुसरी ओळख आहे. आजही 65 टक्के जनता खेडेगावात राहते आणि यापैकी बहुतांश लोक हे शेतीवर आपली उपजिविका करतात. ही शेती मुख्यत: लहरी अशा मौसमी पावसावर अवलंबून आहे. काही प्रमाणात सिंचन सुविधा निर्माण झालेला असल्या तरी शेतीवरच्या जीवनाला स्थैर्य आणि समृध्दी फारशी आलेली नाही. त्यात ज्यांच्याकडे कमी शेती अर्थात अल्पभूधारक आहेत अशांना उत्पन्न कमी असल्याने त्यापैकी अनेकजण गरीबीच्या रेषेखाली आहे.
     समाजाची नेमकी आर्थिक स्थिती जाणून घेतल्यानंतरच विविध समाज घटकांसाठी कल्याणकारी योजना राबविणे शक्य होणार आहे. याच उद्देशातून हे आर्थिक आणि सामाजिक सर्वेक्षण महत्वाचे आहे.
     देशाच्या भौगोलिक स्थितीनेही विकास प्रक्रियेसमोर आव्हाने निर्माण केलेली आहेत. या पार्श्वभूमीवर कोणत्या भागात कोणत्या सुविधा उपलब्ध आहेत आणि कोणत्या भागात आणखी सुविधा देण्याची गरज आहे याची माहिती या सर्वेक्षणातून अधोरेखीत करता येणार असल्यानेही या प्रक्रियेचे महत्व वाढते.
     लोककल्याणकारी संकल्पनेवर आधारित असलेल्या आपल्या या देशात येणा-या काळात समाजाचा आर्थिक स्तर उंचावण्यासाठी ही सुरुवात आहे असंच म्हणावं लागेल.
                                     प्रशांत दैठणकर
 00000
     

No comments:

Post a Comment