Friday 14 October 2011

नोंद करा प्रत्येक जन्म-मृत्यूची... !


विशेष लेख             जिल्हा माहिती कार्यालय,वर्धा                                दि.14 ऑक्टोंबर 2011

नोंद करा प्रत्येक जन्म-मृत्यूची... !

      जन्म-मृत्यू नोंदणीचे काम गावात ग्रामपंचायतीतच केले जाते. मात्र प्रत्यक्षात जागरुकपणे अशी नोंदणी करुन प्रमाणपत्र घेणारे अद्यापही कमी आहेत. ही नोंदणी का आवश्यक आहे याचे विवेचन करणारा हा लेख.                                                   
                                                                     -प्रशांत दैठणकर
     जन्म आणि मृत्यू या संसारातील अटळ बाबी म्हणता येतील. त्यात आपण किमान जन्मावर नियंत्रण आणू शकतो. परंतु लोकसंख्या वाढतच आहे. यावरुन ती बाब पूर्णपणे नियंत्रणात आलेली नाही हे स्पष्ट आहे. मृत्यू मात्र टाळता येत नाही. वैद्यकीय शास्त्रानं केलेल्या प्रगतीमुळे आपण मृत्यूचा दर कमी करण्यात यश मिळवलं आहे हे मात्र खरं. आता होणा-या या प्रत्येक जन्म आणि मृत्यूची नोंदणी देखील आवश्यक आहे. मात्र ती नोंदणी केली जातेच असं घडत नाही.
      मृत्यू झाल्यावर वैद्यकीय प्रमाणपत्रासह किंवा वृध्दापकाळाने घरीच मृत्यू झाला तर प्रमाणपत्रा शिवाय अशी नोंदणी करता येते. शहरी भागात मृतांवर स्मशानात अंत्यसंस्कार करण्यात येतात. हा स्मशान वापरण्याचा परवाना देताना नोंद होत असते. मात्र नंतरही गरज पडल्याखेरीज कुणी मृत्यू नोंदणी प्रमाणपत्र मागत नाही.
     मृत्यूची नोंद नसल्याने मृतकाच्या नावे असलेली संपत्ती तसेच पेन्शन अथवा बँकेच्या खाती रोख रक्कम आदी नेमकेपणाने कोणत्या वारसाला द्यायचे याचा वाद होतो आणि वारसा हक्क मागणारे दावे केले जातात. यातही न्यायालयात प्रथम मृत्यू नोंदणी प्रमाणपत्र मागितले जाते.                                                                  
जन्म दाखला देखील महत्वाचा असतो. संस्थागत प्रसूतीमध्ये त्या-त्या रुग्णालयात जन्माची नोंद केली जाते आणि ही नोंद नंतर स्थानिक स्वराज्य संस्थाकडे दिली जाते. या माध्यमातून नोंद झाली तरी जागरुकपणे या नोंदणीचे प्रमाणपत्र घेतले पाहिजे. हे प्रमाणपत्र शाळेत प्रवेश घेताना तसेच परीक्षा आणि नोकरी यासाठी महत्वाचे असते.
     या जन्म-मृत्यूच्या नोंदणीचा उपयोग फक्त कुटुबियांना होतो असे नाही तर आपल्या खंडप्राय देशात विविध प्रकारच्या नियोजनात याची मदत होत असते. या नोंदीवरुनच जन्म दर आणि मृत्यू दर आपणास कळत असतो.
     मृत्यू दरासोबत मृत्यूच्या कारणांवरुनही विविध प्रकारची आकडेवारी आपणास कळत असते. नैसर्गिक मृत्यू आणि अनैसर्गिक मृत्यू असे वर्गीकरण करुन त्याच्या कारणांचा शोध घेणे व त्या अनुषंगाने प्रतिबंधात्मक उपाय करण्यासोबत आरोग्य सुविधांचा विचार केला जात असतो.
     देशाचा जबाबदार नागरिक या नात्याने आपण जागरुकपणे या राष्ट्रीय कार्यात सहभागी होवून प्रत्येक जन्म आणि मृत्यूची नोंद करायलाच हवी.
                                     प्रशांत दैठणकर
                     000000

No comments:

Post a Comment