Thursday 13 October 2011

आदर्शगाव योजनेचा शुभारंभ



 महाराष्ट्र शासन
प्रसिध्दी पत्रक    जिल्हा माहिती कार्यालय,वर्धा   दि.13 ऑक्टोंबर 2011
-------------------------------------------------------------------------------
             
वर्धा,दि.13-आदर्श गाव योजनेची वर्धा जिल्ह्याची सुरुवात सेलू तालूक्यातील दिडोंडा या गावातून आदर्श गाव योजनेचे कार्याध्यक्ष पोपटराव पवार यांच्या हस्ते करण्यात आले. यासाठी घेण्यात आलेल्या ग्रामसभेत पोपटराव पवार यांनी मार्गदर्शन केले.
     सेवाग्राम आणि पवनार ही वर्धा जिल्ह्यातील भूमी महात्मा गांधी आणि आचार्य विनोबा भावे यांची कर्मभूमी आहे. याच कर्मभूमीत स्वच्छता, व्यसनमुक्ती, भेदमुक्ती, दारिद्र निर्मुलन व आचारविचार मुक्त समाज निर्मीतीचे या दोन महापुरुषांचे कार्य सुरु झाले. नैसर्गिक साधन संपत्तीचे संवर्धन करुन देशातली खेडी स्वावलंबी व आदर्श बनावीत त्यातून भारताचे स्वराज्य ग्रामस्वराज्य बनावे असे त्यांचे स्वप्न होते. त्यांचा शुभारंभ आपण दिडोंडा (तालुका-सेलू,जि.वर्धा) या गावातून करु या. गावात वर्धेच्या मगन संग्रहालयाच्या विभा गुप्ता यांनी चांगले काम केले आहे.
     या गावात शंभर टक्के घरी शौचालये आहेत. सर्वजण शौचालयाचा वापर करतात. गावातले रस्ते स्वच्छ आहेत तशी माणसाची मनही स्वच्छ आहेत आता माती आणि पाणी अडविण्याचे काम आदर्शगांव योजनेव्दारे करुन या गावातील शेतक-यांचा आर्थिक उध्दार करण्याचे काम आपण करु या असे आदर्शगांव योजनेचे कार्याध्यक्ष पोपटराव पवार यांनी दिडोंडातील ग्रामसभेत सांगितले. दिडोंडाचा आदर्शगांव योजनेत समावेश करण्यासाठी ही ग्रामसभा आयोजित करण्यात आली होती. अध्यक्षांनी गावच्या सरपंच सुवर्ण चावके या उपस्थित होत्या.
पोपटराव पवार पुढे बोलतांना म्हणाले छत्रपती शिवाजी राजे, सिंदखेडचे राजे लखुजीराव जाधव, सिंदखेडराजा जिल्हा बुलडाणा, शाहू महाराज (कोल्हापूर), अहिल्याबाई होळकर, चांदवड, जिल्हा नाशिक, महात्मा फुले (कडगुंज) जिल्हा-सातारा, डॉ. बाबासाहेब आंबेडकर (आंबवडे) जिल्हा रायगड, संत गाडगेबाबा शेणगांव जिल्हा अमरावती, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी समाजातील विषमता दुर करुन समाज जागृतीचे मोठे काम केले आहे. त्यातील अनेकांनी पावसाचे पाणी अडवून पिण्यासाठी व शेतीसाठी पाण्याची सोय केली आहे. भारतीय कृषि क्रांतीचे जनक डॉ. पंजाबराव देशमुख यांचे पापळ (जिल्हा अमरावती) हे गांव आदर्शगांव योजनेतील एक आदर्श म्हणून पुढे येत आहे त्याच धर्तीवर या थोर पुरुषांची जन्मगांव मात्र अंधारात आहेत. या गावांचाही आदर्शगांव योजनेत समावेश करुन ही गावेही स्वावलंबी व आदर्श बणविण्यात येतील.
     दिडोंडाची गावफेरी करुन शेततळे, रस्ते, गटार व्यवस्था, शौचालये, गांधी ग्राम मंदीरे, शाळा, अंगणवाडी यांची पाहणी पोपटरावांनी केली. ग्रामसभेत पुरुष, महिला, युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. डॉ. गुप्ता, आदर्शगांवचे कृषि उपसंचालक सुनिल वाखेडे, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी वर्धा भाऊसाहेब ब-हाटे यांची भाषणे झाली. ग्रामसभेत आदर्शगांव मासिकांचे संपादक सुरेश्चंद्र वारघडे, रावसाहेब निर्मल (आदर्शगांव), कृषि अधिकारी चंद्रकांत गोरे, कृषि पर्यवेक्षक (आदर्शगांव) बी.डी.ओ. खाडे, तालुका कृषि अधिकारी पाटील इत्यादी उपस्थित होते.
     या ग्रामसभेत दिडोंडातील युवतींनी सुंदर गोफण नृत्य सादर केले. संस्थेचे प्रशांत गुजर यांनी प्रास्ताविक केले. महिला संघटक कमलाताई यांनी आभार मानले.
                         000000

No comments:

Post a Comment