Monday 10 October 2011

सुबाभूळ शेती आणि कागद..!


सोमवार, १० ऑक्टोबर, २०११

यंत्राची जोरदार घरघर चालू आहे.. आमच्या आपसात बोलण्याचा आवाजही वाढलेला.. मशीनच्या दुस-या बाजूने पांढरा शुभ्र कागद रोल होत होता. थोडसं पुढे हाच रोल लावून दुसरं यंत्र अगदी सहजरित्या रोबोटच्या सहाय्यानं त्याच्या कटींगसह १ रिम मोजून त्याचे तयार गठ्ठे पॅकींग करित आहे आणि आलेल्या पॅकेटवर स्टीकर चिटकवण्यात येत आहे. हा शुभ्र गुळगुळीत पेपर बघितल्यावर कुणालाही चटकन लिहावं वाटेल.

हे चित्र आहे बल्लारपूर पेपर मिलचे. बैठकीसाठी चंद्रपूरला गेलो त्यावेळी मिटींगनंतर दुस-या दिवशी बल्लारपूरला जायचं ठरलं. आपण कागदावर लिहितो पण तो कागद नेमका कसा तयार होतो हे बघितलं नव्हतं त्यामळे उत्सुकता होती.

बल्लारपूर पेपर मिल हा येथील वनांवर अवलंबून सुरु केलेला कारखाना. बांबूपासून पेपर तयार करण्यासाठी सुरु झालेला हा प्रकल्प या भागात आर्थिक स्तर उंचावण्यास मदत करीत आहे.

कारखान्यात दाखल झाल्यावर तिथल्या पध्दतीप्रमाणं डोक्यावर हेल्मेट परिधान केले आणि प्रसिध्दीची ही सेवा ज्या कागदाच्या आधारे प्रसिध्दीचे प्रामुख्याने काम करतो त्या कागदाच्या कारखान्याच्या पाहणीस निघाली. कारखान्याच्या मागील बाजूस ट्रकची भली मोठी रांग त्यात काही ट्रक बांबूने भरलेले तर काही सुबाभूळीच्या लाकडांनी हेच कागदचं पहिलं रुप.

लाकडाची धुलाई करुन तो 'चिपर' मध्ये येतो येथील अजस्त्र यंत्र ताकदशील दातांनी त्या लाकडांचा एक इंच इतका छोटा चुरा करतात तो कन्व्हेअर बेल्टने पुढे चाळणीत जातो जिथे चुकीच्या आकाराचे तुकडे पुन्हा चिपिंगकडे परततात उर्वरित डायजेशन प्रक्रियेला जात असतात करखान्याचे अभियंता चौहान माहिती देत होते हा चुरा मग रसायनं आणि पाण्याच्या उच्च तापमानात शिजतो आणि त्याचा लगदा बनतो. हा काळा असतो. त्यानंतर त्याची स्वच्छता होते व अखेरच्या यंत्रातून स्वच्छ पांढरा लगदा पुढे सरकत राहतो.

कारखान्याच्या तीनमजली इमारतीत ही प्रक्रिया तेथे क्लोरिन व इतर गॅस आणि उष्णता हे बघताना घाम आलेला या कारखान्यात १८ वर्षाखालील व ५५ वर्षावरील व्यक्तींना प्रवेश दिला जात नाही हे विशेष कारखान्याची सध्याची क्षमता प्रतिदिन ४५० टन आहे आणि अल्पावधीत ६५० टन क्षमतेचे नवे युनिट येथे सुरु होत आहे.

पुढे हा कागद यांत्रिक पध्दतीने अखेरच्या टप्प्यात जातो. या ठिकाणी प्रक्रियेव्दारे त्यातली आर्द्रता काढून यंत्राव्दारे टनांचा दाब दिल्यावर लगदा शुभ्र आणि गुळगुळीत कागदाच्या रुपात बाहेर पडतो. इथ चर्चा करताना आमचे संचालक श्री.कौसल सर कागदाचा शोध चीन मध्ये लागला हे सांगत होते. यांत्रिक पध्दतीने हव्या त्या जाडीचा बनविण्यात येतो आणि त्यानुसार त्याचे दर ठरतात.

कागदाची मजबूती लाकडावर अवलंबून असते. आता बांबूचे क्षेत्र घटल्याने आसपासच्या राज्यातून शेतात सुबाभूळाची लागवड करुन त्याच्या फांद्या ट्रकव्दारे आणल्या जातात. सध्या मुख्य निर्मिती सुबाभळावरच होते. हे ऐकून आश्चर्य वाटले.

सुबाभूळ शेतात लावल्यास कीड अथवा इतर खर्च राहत नाही आणि विशिष्ट आकाराच्या फांद्या तोडूनच द्यायच्या त्यामुळे वारंवार खर्चाचा प्रश्न राहत नाही. आपल्याकडे ऊस मोठया प्रमाणावर आहे. याचा उत्पादन खर्च, निगा आणि तोडणी या प्रक्रियेतून टनाला २ हजार पर्यंत आधिकतम भाव आहे. तुलनेत सुबाभूळ हा कारखाना ४ हजार रुपये टन खरेदी करते हे विशेष.

मौसमी हवामान आणि यात असणारी रिस्क कमी आणि भाव जास्त आहे. आंध्रप्रदेशात अनेकजण सुबाभूळाच्या शेतीकडे वळले आहेत. आपल्याही राज्यात असं शक्य आहे आणि जोखीम कमी करुन शाश्वत उत्पन्न देणारी ही शेती शक्य आहे या विचारातच मी कारखान्यातून भोजनासाठी बाहेर पडलो. -


प्रशांत दैठणकर

'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.

No comments:

Post a Comment