Friday 14 October 2011

कापूस पिकावरील लाल्याचे व्यवस्थापन


     महाराष्ट्र शासन
प्रसिध्दी पत्रक     जिल्हा माहिती कार्यालय,वर्धा   दि.14 ऑक्टोंबर 2011
------------------------------------------------------------------------------  
            
वर्धा,दि.14- कापुस पिकावरील लाल्याचा प्रश्न प्रासंगिक किंवा उदभवणारा नसुन त्याची तिव्रता विशिष्ठ प्रकारच्या मातीच्या अवस्थेशी व भोवतालच्या हवामानाशी निगडीत आहे. लाल्या होण्याची मुलभुत कारणे व ज्यामुळे लाल्याचा प्रसार सहज होतो अशा निकषांची माहिती संकलीत केली असुन, काळजीपुर्वक व बारकाईने पिकाची देखरेख केल्यास लाल्या नियंत्रणात आणता येतो. कापसावरील लाल झालेली पाने पुन्हा हिरवी करता येणे शक्य नसले तरी सतत बारकाईने देखरेख (सर्व्हेलंस) हाती घेतल्यास झाडांची पाने लाल होण्यापासुन बचाव करण्यास मदत होते. अशा रीतीने लाल्याचा प्रादुर्भाव वेळीच रोखता येणे शक्य आहे.
पुढे दिलेल्या पैकी स्थानिक परिस्थितीनुसार आवश्यक त्या उपाययोजनेचा अवलंब करण्यात यावा.
जमिनीतील नत्राची स्थिती योग्य प्रमाणात ठेवण्यासाठी आवश्यकतेनुसार नत्र स्फुरद पालाश शिफारसीप्रमाणे मात्रा जमिनीतून देणे अथवा बोंडे वाढीच्या अवस्थेत डी.ए.पी. (2 टक्के) किंवा युरीया ( 2 टक्के) याची आठवड्याच्या अंतराने दोन वेळा फवारणी करणे.
पेरणीच्या नियत वेळेचे योग्य पालन केल्यास रात्रीचे निचांकी तापमानाचे (21 अंशा खाली ठेवल्यास) दुष्परिणाम टाळता येतात.
पाण्याचा योग्य निचरा होईल याची दक्षता घेतल्यास पाणी साठवून राहत नाही व यामुळे मॅग्नेशियम या सुक्ष्ममुलद्रव्याच्या उपलब्धतेचे प्रमाण वाढते.
पाण्याची उपलब्धता कमी होवून पिकावर ताण पडल्यास, पाण्याची पातळी 75 ते 80 टक्के स्थित ठेवण्यासाठी बोंडे लागण्याच्या वेळी संरक्षक पाण्याची पाळी देणे आवश्यक आहे.
पाने लाल पडण्याची लक्षणे दिसताच मॅग्नेशियम सल्फेट 20 ते 25 किलो प्रती हेक्टर झाडाच्या मुळाशी देणे किंवा 0.5ते 1 टक्के मॅग्नेशियम सल्फेट अधिक 1 टक्का युरीयाची फवारणी पानांवर केल्यामुळे पाने लाल पडण्याचे प्रमाण कमी करता येते.
       कापुस पिक फुलोरा अवस्था ते बोंड लागण्याच्या अवस्थेत असतांना युरीया ( 1 ते 2 टक्के ) त्याच बरोबर 15 ते 20 पी.पी.एम.क्लोरमेक्वॅट क्लोराईड व 0.10 टक्के सायट्रीक सिडची फवारणी दोन ते तीन वेळा आठवड्याच्या फरकाने करावी.
     मातीमध्ये आद्रतेचे प्रमाण स्थीर राखण्यासाठी मृद संधारणा बरोबर पावसाच्या पाण्याचे योग्य व्यवस्थापन करावे, जेणे करुन बोंड व फुल धारणेच्या वेळी पाण्याचा ताण कमी करण्यास मदत होते. केंन्द्रीय कपास अनुसंधान संस्थान, नागपूर (ICAR) यांनी कळविलेल्या शिफरशीप्रमाणे उपाययोजनेचा शेतक-यांनी अवलंब करावा. असे उपविभागीय कृषि अधिकारी, वर्धा चे संतोष डाबरे यांनी कळविले आहे.
                      00000

No comments:

Post a Comment