Wednesday 20 March 2013

विधीमंडळातील यशवंतराव चव्हाण


विशेष लेख :                                                    दिनांक : 19 मार्च, 2013

विधीमंडळातील यशवंतराव चव्हाण

        महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या जन्मशताब्दी महोत्सवाचा सांगता सोहळा राष्ट्रपती श्री. प्रणव मुखर्जी यांच्या प्रमुख उपस्थितीत 23 मार्च 2013 रोजी मुंबई येथील एनसीपीए सभागृहात होणार आहे. त्यानिमित्ताने विशेष लेख. . .

 सध्या राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु आहे. राज्यासमोर दुष्काळासारखे नैसर्गिक संकट उभे ठाकले आहे. या संकटाला सामोरे जाताना विधानमंडळातील चर्चेला उत्तरे देताना नेत्यांचा क लागतो आहे. राज्यावर मानवनिर्मित किंवा निसर्गनिर्मित संकट येण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वीही अनेक संकटाना राज्याने व पर्यायाने राज्यातील नेत्यांनी खंबीरपणे तोंड दिले आहे. संकटाचा सामना करुन आणि त्यातून बाहेर पडून राज्य आजही देशात सर्व क्षेत्रात आघाडीवर आहे. या राज्याचा पाया घालणारे स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांनी विधान मंडळात केलेल्या भाषणांचा व त्यांच्या तत्कालीन कार्यपध्दतीचा आढावा या लेखात घेण्यात आला आहे.
प्रतापगडावरील छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचे अनावरण
          प्रतापगडावर पंडित जवाहरलाल नेहरु यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण होणार होते. त्यावेळी पंडितजीं समोर निदर्शने होणार होती. यशवंतराव चव्हाण तेव्हा मुख्यमंत्री होते. प्रतापगडावर पंडितजींच्या कार्यक्रमासाठी जे लोक जाणार होते त्यांना ट्रकने जाण्यासाठी परवानगी देण्यात आली आणि पंडितजींच्या विरोधी निदर्शने करणाऱ्या समितीच्या निदर्शकांना ट्रकने वाईला जाण्याची परवानगी नाकारली होती. मुंबई राज्याच्या त्या वेळच्या विधानसभेत सरकारच्या या परस्पर विसंगत भूमिकेवर वादळी चर्चा झाली. काँग्रेसने आयोजन केलेल्या कार्यक्रमाला ट्रकने माणसे नेण्याची परवानगी मिळते आणि शांततामय मार्गाने निदर्शने करु इच्छिणाऱ्या विरोधी पक्षाच्या नेत्यांना ट्रकने माणसे नेण्यास परवानगी दिली जात नाही, अशी सकृतदर्शनी यात विसंगती होतीच, त्यावेळी विधानमंडळाच्या चर्चा दर्जेदार असत, त्या चर्चेमधून बुध्दीचा कस प्रखरपणे व्यक्त होत होता. एस.एम.जोशी, आर.डी. भंडारे, आचार्य अत्रे, ए.बी.बर्धन, उध्दवराव पाटील, दत्ता ताम्हाणे, दत्ता देशमुख अशी दिग्गज मंडळी विरोधी पक्षाच्या बाकावर असतांना आणि मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण असताना हे बौध्दीक सामने अधिक रंगत असत.
          परवानगी द्यायची आणि परवानगी नाही द्यायची या दोन्ही निर्णयाची बरीच चिरफाड झाल्यानंतर यशवंतराव शांतपणे बोलायला उठले. त्यांनी स्पष्टपणे सांगितले, परवानगी द्यायची आणि नाही द्यायची हे दोन्ही  निर्णय माझेच आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण होत असतांना त्यांचा जय जयकार करायला जाणाऱ्या राज्यातील कोणत्याही माणसाला थोपवणे शक्य नव्हते, त्यामुळे ती परवानगी देणे आवश्यक होते. दुसरीकडे परवानगी नाकारली, कारण छत्रपतींच्या पुतळ्याचे अनावरण करायला देशाचे पंतप्रधान येत असतांना, पुतळ्याचे अनावरण करु नका असे सांगणाऱ्यांना एकत्र जमा होऊ द्यावयाचे नाही, हीच भूमिका सुसंगत होती. कायदा व सुव्यवस्था सरकारला पाळावयची असेल तर जमाव न जमवण्याची खबरदारी सरकारलाच घ्यावी लागेल. त्याची काळजी मी घेतली. निदर्शकांना ट्रकने माणसे नेण्याची परवानगी दिली असती आणि त्या जमावाने हिंसक कृत्य केले असते तर त्याचे उत्तर मलाच द्यावे लागले असते, आणि म्हणून माझा निर्णय योग्य आहे.                       
अभिभाषणावरील चर्चा
       16 फेब्रुवारी 1961 रोजी राज्यपालांनी केलेल्या अभिभाषणावरील चर्चेत यशवंतराव चव्हाण यांनी जे भाषण केले आणि यात शिक्षणासारख्या मूलभूत गोष्टींवर केलेली चर्चा आजही उदबोधक आहे हे आपल्याला लक्षात येईल. यशवंतराव म्हणतात. "शिक्षण आणि शेती हे महत्वाचे विषय आहेत. माध्यमिक किंवा प्राथमिक शिक्षक या दोन्ही प्रकारच्या शिक्षकांचा प्रश्न अत्यंत महत्वाचा आहे. लक्षावधी  मुलांना योग्य शिक्षण देवून त्यांना उत्तम नागरिक बनविण्याचे काम त्यांच्यावर अवलंबून असते. काही मॅनेजमेंटमध्ये अलीकडे जरी बिझनेसची वृत्ती आली असली तरी त्या संस्था ज्यांनी काढल्या ती ध्येयवादी माणसे होती. त्यापैकी काही थोडीशी बिझनेसवाली असली तरी पुष्कळशी मंडळी शिक्षणाचा प्रसार व्हावा या ध्येयाने पुढे आल्यामुळे महाराष्ट्रात अशा अनेक संस्था निघालेल्या आहेत. राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद हे राज्यात आले होते तेव्हा त्यांनी. महाराष्ट्रात खासगी शिक्षण संस्थांनी शिक्षण संस्था काढून शिक्षणाचा प्रसार केला आहे, देशात कोठेही इतक्या मोठ्या प्रमाणावर शिक्षणाचा प्रयत्न झालेला नाही. अशा शब्दात महाराष्ट्रातील शिक्षणाविषयी गौरवोद्‌गार काढले होते. राष्ट्रपतीचे हे उद्‌गार ऐकून आपल्या शिक्षण संस्थेमध्ये दोष दिसत असले तरी माझ्या अंगावर मुठभर मांस चढले.
            24 ऑगस्ट 1960 रोजी तिसऱ्या पंचवार्षिक योजनेच्या दृष्टीकोनासंबंधी चर्चा करताना शेती विषयी यशवंतरावजी म्हणतात. "दुष्काळी भागात शेकडो मैल लांबी आणि रुंदीचे पट्टे असून त्यात असलेल्या जमिनी लागवडी खाली आणण्याचा कितीही प्रयत्न केला तरी शेवटी कोरडवाहूच राहणार आहेत. यासाठी इरिगेशनच्या योजना हाती घ्याव्या की कोरडवाहू जमिनीवर सॉईल  कन्झर्वेशन व लॅंड डेव्हलप करण्याच्या दृष्टीने बंडिंग्ज, विहीरी सारखे मायनर इरिगेशनचे कार्यक्रम हाती घेऊन आपले सामर्थ्य खर्च करावे असा प्रश्न निर्माण होतो. इरिगेशनच्या ज्या मोठ्या योजना आहेत त्याची प्राथमिक तयारी, खर्च इत्यादी गोष्टी होऊन त्या पूर्ण झाल्यानंतर त्याचा प्रत्यक्ष फायदा हाती पडेपर्यंत सात ते दहा वर्षाचा कालावधी लागेल व त्या अवधीपर्यंत शेतकऱ्यांना वाट पहावी लागेल. तेव्हा मोठ मोठया इरिगेशनच्या योजनांना प्राधान्य द्यावे की मायनर इरिगेशनच्या कार्यक्रमाला महत्व द्यावे असा पेचाचा प्रश्न निर्माण होतो. अशा महत्वाचा प्रश्नांबाबत शासनास निश्चित धोरण करावे लागेल."
            अशा प्रतिनिधिक भाषणांचा अंशातून यशवंराव चव्हाणांचा अभ्यास, चाणाक्षवृत्ती आणि दूरदृष्टीचा आपल्याला प्रत्यय येतो. यशवंतरावाच्या जन्मशताब्दी निमित्ताने त्यांना विनम्र अभिवादन !
000
                                                                                                                        अर्चना शंभरकर
                                                                                                                वरिष्ठ सहाय्यक संचाल

स्मरणशक्तीला सलाम


विशेष लेख :                                                                  दिनांक : 19 मार्च, 2013

स्मरणशक्तीला सलाम

        महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या जन्मशताब्दी महोत्सवाचा सांगता समारोप राष्ट्रपती श्री. प्रणव मुखर्जी यांच्या प्रमुख उपस्थितीत 23 मार्च 2013 रोजी मुंबई येथील एनसीपीए सभागृहात होणार आहे. त्यानिमित्ताने विशेष लेख. . .

            यशवंतराव चव्हाण साहेबांची भाषणे ते मुख्यमंत्री झाल्यापासून मी ऐकत आलो आहे. साहेब हे शब्दांचे जादुगार होते. त्यांची भाषणे मी आवाजांच्या चढउतारासह व लकबींसह तल्लीनतेने ऐकत असे. ज्या ज्या वेळी मित्रमंडळी जमत त्या त्या वेळी मी त्यांच्या हावभावांची नक्कल करून दाखवी. यामुळे कार्यकर्ते मित्रही खूष अन मलाही प्रसिध्दी मिळे. मनात अनेक वेळा येत असे, या शब्दसम्राटाबरोबर आपली व्यक्तिगत ओळख झाली तर काय मजा येईल. हा शब्दांचा जादूगार खासगी मैफलीत कसा बोलत असेल, असे औत्सुक्य व त्या मैफलीत आपल्याला प्रवेश मिळावा अशी इच्छा मी अनेक वर्ष बाळगून होतो. हळूहळू जाणे वाढू लागले. बरोबर अनेक लोक असत त्यामुळे साचेबध्द बोलणे होई. मनातील ही सुप्त इच्छा मात्र शांत बसू देत नव्हती.
            चांगली गोष्ट घडण्यासाठी नेहमी वेळ लागतो पण ती अतिशय थेट असते यावर माझा विश्वास होता. त्यामुळे माझी ही इच्छा पूर्ण होणार याची खात्री होती. अन एक दिवस ही संधी आयतीच चालून आली. दिल्लीतील माझी कामे आटोपून परत निघण्यापूर्वी साहेबांना भेटण्यासाठी गेलो. दोन मिनिटे भेटण्यासाठी वेळ मिळाला होता. मी बैठकीच्या खोलीत उभा राहिलो. बोलायची संधी मिळाली होती पण काय बोलावे हे सुचेना. बसा विनायकराव या त्यांच्या वाक्याने बसलो.  नेहमीप्रमाणे जिल्ह्यात कोणाचे काय सुरू आहे, याबाबत विचारणा होईल अन पाचव्या मिनिटात आपली रवानगी होईल असा विचार मनात सुरू होताच; पण त्याचवेळी साहेब काय प्रश्न विचारताहेत याची वाट पहात होतो. साहेबांनी थेट विचारले "हं काय त्या अमुक माणसाची तुम्ही चांगली नक्कल करता हे ऐकलय मी !" या प्रश्नाने माझी मात्र भंबेरी उडाली.  कारण मी त्यावेळच्या एका महाराष्ट्राच्या मंत्रीमंडळातील  एका मंत्र्याच्या भाषणातील चुका  व त्यात माझी भर टाकून नक्कल करीत असे. माझे हे प्रयोग स्थळकाळाचे बंधन झुगारून मुक्तपणे चालले होते. माझ्या या प्रयोगांबाबत शरद पवारांनी त्यांना माहिती दिली हे कळायला वेळ लागला नाही कारण सर्वात जास्त या प्रयोगांचे ते साक्षीदार होते. आता जरा जपून बोलण्याचा सल्ला मिळणार याची वाटत पहात असतांनाच "साहेबांनी बघू या तुमचे प्रयोग! म्हणून अनपेक्षित धक्का दिला".  प्रथम या धक्क्यातून सावरलो अन घाम पुसला. सगळा उत्साह परत आणला उभा राहिलो. प्रयोगास सुरूवात केली. पहिल्या दोनतीन वाक्यातच साहेब खळाळून हसले. टोपी बाजूला काढून लक्षपूर्वक ऐकू लागले अन अगदी मुक्तपणाने हसत होते. अक्षरश: हसता हसता त्यांच्या डोळ्यात पाणी आले. वीस पंचवीस मिनिटे कशी गेली ते कळलेच नाही. अशाप्रकारे माझी इच्छा पूर्ण झाली होती. पहिल्याच बैठकीत औपचारिकतेची बंधने गळून पडली होती.  मी खूप आनंदी होतोच शिवाय दिल्लीत आलात की भेटत जा हे आमंत्रण होतेच. मीही जेव्हा संधी मिळेल तेव्हा भेटत होतो. मनमोकळेपणाने संवाद साधत होतो. अगदी शेरोशायरी, गझलांची देवाण घेवाण, प्रवासातील अनुभव, व्यक्तिचित्रे व किस्से एकमेकांना सांगत होतो. त्यांची विलक्षण स्मरणशक्ती, शब्दांचे वेड व संभाषण चातुर्य प्रत्येक भेटीत जाणवत होते.
            यशवंतराव चव्हाण साहेब हे अतिशय रसिक मनोवृत्तीचे होते. नवीन चांगले पुस्तक असो वा चांगला चित्रपट ते आर्वजून पहात असत. देशाचे संरक्षणमंत्री असणारा माणूस चित्रपटगृहात जावून चित्रपट पहाणे हे अतिशय  दुर्मिळ.  सुरक्षा  आणि  लोक  यामुळे  अनेकदा  इच्छा असूनही  ते शक्य नसते. पण एकदा मी आणि चव्हाण साहेब माधवराव आपटे यांच्याकडे गेलो होतो. तेव्हा माधवरावांनी रिगल चित्रपटगृहात सुरू असलेल्या एका इंग्रजी चित्रपटाचा उल्लेख केला आणि तो साहेबांनी आर्वजून पहावा असेही सुचविले. मुळातच रसिक असलेले साहेब ही संधी कशी दवडणार. त्या दिवशी ते जरा निवांतही  होते. त्यांनी  कुणालाही न सांगता आमच्या दोघांसाठी तिकीट मागविले तीन ते सहाच्या खेळाचे. मला पावणेतीनला सांगितले विनायकराव आपण एका खास मोहिमेवर जातो आहोत. सुरक्षा अधिकारी वा अन्य कुणालाही न सांगता चित्रपट सुरू झाल्यानंतर अंधारात आम्ही चित्रपटगृहात जावून बसलो . आपल्याला कुणीही ओळखू नये यासाठी साहेब टोपी काढून बसले होते. आम्ही दोघांनी त्या चित्रपटाचा आनंद घेतला. चित्रपट संपल्यावर लोकांच्या लक्षात आले की साहेब आहेत मग लोकांची गर्दी झाली पण चांगल्या कलाकृतीचा आस्वाद घेतलाच पाहिजे मग त्यासाठी ते आर्वजून वेळ राखून ठेवायचे. हा साहेबांचा मूळ स्वभाव होता.
            ते कलावंतांना आणि साहित्यिकांना नेहमी प्रोत्साहन देत. मला 1 जानेवारी 1977 चा तो दिवस  आजही आठवतो. साहेब संरक्षणमंत्री झाल्यानंतर त्यांनी मराठी तरूणांनी सैन्यात जावे असे आवाहन केले होते. त्यासाठी आम्ही गावोगावी जावून मेळावे घेतले होते अन तरूणांना आवाहन केले होते. त्यानुसार नांर्दुडी  गावचा कुंभार्डे  नावाचा तरूण सैन्यात दाखल झाला होता.  चीन युध्दात तो कामी आला. त्याच्या स्मरणार्थ त्या गावाच्या लोकांनी वाचनालय सुरू केले. हा अतिशय छोटा कार्यक्रम होता तरीही साहेब या वाचनालयाच्या उद्घाटनासाठी आले होते. त्यांच्या जेवणाचा कार्यक्रम आमच्या घरी होता. जेवण आणि कार्यक्रम यांमध्ये बराच वेळ होता. तेव्हा ना. धों. महानोर ही तेथे उपस्थित होते. मधल्या वेळात काय करायचे हा विचार माझ्या मनात सुरू होता. साहेबांनी आराम करावा असे मी सुचविणार होतो तेवढ्यात साहेबांनी महानोरांना "नामदेवराव, तुमच्या कविता ऐकवा! अशी फर्माइश केली. मग आमच्या हॉलचे रुपांतर काव्य संमेलनात झाले. त्यांच्या कवितांना साहेब अतिशय उत्स्फुर्तपणे दाद देत होते. साहेब कलावंतांचा नेहमी सन्मान करत असत. हे करणे केवळ साहेबांनाच शक्य होते, कारण त्यांच्या वागण्यात कृत्रिमता नव्हती सर्व कसं साध सरळ होते.त्यांना माणसं मनापासून आवडत व ही माणसं करीत असलेल्या कामावर त्यांची नितांत श्रध्दा होती.
            ते चांगल्या साहित्यकृतींना केवळ  दादच देत नसत पण त्या लेखनामागे काय कारण असेल याची  कारणमीमांसा करत. उपराकार लक्ष्मण माने यांच्या 'उपरा' या पुस्तकात एक वाक्य आहे  'ही सगळी अवस्था पाहिल्यानंतर वाटतं की जावून पार्लमेंटवर बॉम्ब टाकावा' तेव्हा साहेब म्हणाले माझ्या गावच्या एका मुलाला मी ज्या पार्लमेंटचा सदस्य आहे त्या पार्लमेंटवर समाजव्यवस्थेमुळे बॉम्ब टाकावासा वाटतो तेव्हा या मुलांच्या भावना समजावून घेतल्या पाहिजे. अन त्यानुसार समाजव्यवस्थेत बदल केले पाहिजे असे मला वाटते.  ते गप्पा मारतांना अनेकदा असे पुस्तकांचे दाखले देत आणि त्यासाठी काय करायला हवे याचीही चर्चा करीत असत. त्यांच्या खूप कविता तोंडपाठ होत्या. एकदा आमच्या गप्पा ऐन रंगात आल्या होत्या. बालपण आणि  शालेय जीवनातील आठवणी  सांगत असतांना साहेबांनी  झुक झुक झुक आगीनगाडी धुरांच्या रेषा हवेत सोडी पळती झाडे पाहूया मामाच्या गावाला जावू या हे गाणं गाता गाता साहेब एकदम मामा माझा तालेवार रेशीम घेईल हजारवार या ओळीवर येवून थांबले. मी विचारले काय झाले ते म्हणाले "विनायकराव, हे गाणे माझं गाणं आहे." या गाण्याचं व्यक्तिगत आयुष्यात खूप महत्व  आहे. लहानपणी बिकट आर्थिक परिस्थितीमुळे मामाच्या गावाला रहावे लागले होते मग मामांनी केलेली मदत आणि बालपणीच्या आठवणींना साहेबांनी उजाळा दिला होता.
            साहेबांची स्मरणशक्ती अतिशय तल्ल्ख आहे याची प्रचिती मला एका प्रसंगाने आली. ते मुंबईला आले आहेत असे समजल्याने मी भेटण्यास गेलो.ते बाहेर पडण्याच्या विचारात होते. मी नमस्कार करून बाजूला उभा राहिलो.  त्यांनी  चला  म्हटल्यावर  गाडीत  बसलो.  नंतर समजले की पुणे जिल्ह्यात तळेगाव येथे कार्यक्रमास
निघाले होते. हक्काचे तीन तास गप्पांसाठी मिळाले. प्रवासात अमीर खुश्रू यांची कविता तर काही शेर सांगितले. तळेगावला पोहचल्यावर सभा सुरू झाली. भाषणात एक संदर्भ देतांना त्यांनी अमीर खुश्रूंच्या काव्यपंक्ती जशाच्या तशा म्हणून दाखविल्या.एकदा सहज ऐकल्यानंतर या काव्यपंक्ती लक्षात ठेवणाऱ्या त्यांच्या स्मरणशक्तीला मी मनातल्या मनात सलाम केला.
            साहेबांचा व माझा अतिशय जिव्हाळ्याचा संबंध होता. मी त्यांच्या नातवासारखा असल्याने त्यांना काहीही विचारण्याचे मला स्वातंत्र्य  होते. जे प्रश्न पत्रकार विचारू शकत नाही ते प्रश्न मी त्यांना विचारण्याचे ठरविले. त्यानुसार मी बत्तीस प्रश्न विचारायचे ठरविले. बत्तीस प्रश्न विचारण्यामागे मुळ प्रेरणा होती सिंहासन बत्तीशीची. साहेबांनी ही त्याला परवानगी दिली होती. वेगवेगळया निमित्ताने हे प्रश्न विचारण्याचे ठरविले. असेच एकदा आम्ही त्यांच्या दिल्लीतील घरी गप्पा मारत बसलो होतो. तेवढ्यात त्यांचे स्वीय सहायक डोंगरे यांनी साहेबांना सांगितले कर्नाटकचे मुख्यमंत्री श्री देवराज अरस यांचे निधन झाले. तेव्हा पटकन उत्तरले 'अरेरे ,वाईट झाले'. अन मूळ विषयाकडे वळले. तेव्हा मी त्यांना मृत्यूविषयी त्यांना काय वाटते असे विचारले. त्यांनी ते जीवनाचे वास्तव आहे असे सांगितले. मृत्युशी  माझी पहिल्यांदा ओळख माझ्या वडीलांच्या मृत्युने झाली.  तेव्हा त्याची दाहकता जाणवत होती पण वाढत्या वयाबरोबर याबाबतचा दृष्टीकोन त्रयस्थ होत गेला. पण काही मृत्यु जीवाला चटका लावणारे असतात. माझा सहकारी किसन वीर याचा मृत्यु असाच मला चटका लावणारा होता. तेव्हा खूप काही गमावल्याची जाणीव झाली अन मी ओक्साबोक्शी रडलो ही अगदी वैयक्तिक बाबही साहेबांनी मला सांगितली होती.
            असेच एकदा मी त्यांना वेणुताई आणि साहेबांच्या नातेसंबंधाविषयी छेडले. तेव्हा एक made for each other अशी स्लोगन असलेली जाहिरात होती. मी त्यांना तुम्ही made for each other वाटतात असे म्हटले तेव्हा साहेबांनी त्याला दुजोरा दिला आणि एक अनुभवही सांगितला. मी गृहमंत्री असतांना संसदेत प्रश्नोत्तराचा तास सुरू होता. तेव्हाच बातमी आली की कऱ्हाडमध्ये जातीय दंगल उसळली होती. तो तास संपवून घरी  आलो अन वेणूताईंना विचारले बातमी ऐकली का त्यावर त्या उत्तरल्या "हो बातमी ऐकली आणि तुमची बॅग भरून तयार आहे". अशाप्रकारे आम्हाला एकमेकांना काय हवे आहे याची चांगली जाणीव आहे.अनेकदा काहीही न बोलता मनातले भाव आम्ही ओळखतो.   विनायकराव तुमच्या म्हणण्याप्रमाणे आम्ही खरोखरच made for each other आहोत.
            या प्रश्नांना साहेबांकडून मिळणारा प्रतिसाद माझा उत्साह वाढविणारा होता. तेव्हा अशाच एका गप्पांमध्ये मी त्यांना भाषेविषयी विचारले. तुमचे काही सातारी आघात सोडले तर भाषा पुणेरी आहे पण बाकी सर्वांची भाषा टिपीकल सातारी आहे याचे कारण काय, असं विचारलं; यावर त्यांनी केवळ एकाच शब्दात उत्तर दिले. ते म्हणाले "मातृभाषा."
            साहेब एकदम स्पष्टवक्ते पण मनमिळावू होते.ते समोरच्या माणसाचा अहंकार न दुखवता एखादी गोष्ट अतिशय समर्पक शब्दात समजावून सांगत. बोलतांना व ऐकतांना त्यांचा चेहरा अतिशय बोलका असे.   आपण उच्चारलेल्या प्रत्येक वाक्यागणिक त्यांच्या चेहऱ्यावर सहमत असल्याच्या, नसल्याच्या रागाच्या, आनंदाच्या, मिश्किलपणाच्या प्रतिक्रिया व्यक्त होत असत. असेच एकदा मी माझ्या भाषणात ब्रम्हपुत्रा नदी असा उल्लेख केला त्या भाषणानंतर मला माझा तो उल्लेख कसा चुकला आहे हे समजावून सांगितले. ब्रमहपुत्रा ऐवजी ब्रम्हपुत्र असा उल्लेख असून तो नदी नद आहे हे सांगितले. त्यांनी माझी ही चूक सुधारलीच पण मला अगदी सविस्तर माहिती दिली. साहेबांनी असे नेहमीच मला मार्गदर्शन करीत त्यामुळे माझ्यातील उत्तम वक्ता घडत गेला. साहेबांची माया आणि मार्गदर्शन नेहमीच मला लाभले हे मी माझे भाग्यच मानतो.

                                                                                                                     - विनायकदादा पाटील
0 0 0 0 0

विशेष लेख :                                                       दिनांक : 19 मार्च, 2013

सुसंस्कारित मराठी नेता

        महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या जन्मशताब्दी महोत्सवाचा सांगता समारोप राष्ट्रपती श्री. प्रणव मुखर्जी यांच्या प्रमुख उपस्थितीत 23 मार्च 2013 रोजी मुंबई येथील एनसीपीए सभागृहात होणार आहे. त्यानिमित्ताने विशेष लेख. . .
         
          यशवंतरावांनी राजकारणात प्रवेश केला तो विशिष्ट संस्कार घेऊन, त्यांनी व्यासंगाने आपल्या मनाची मशागत केली. मॅट्रिक होण्यापूर्वी स्वातंत्र्य चळवळीने व सामाजिक जीवनाने ते आकर्षित झाले होते. म्हणून जतीनदासांनी उपोषण करून मृत्यू कवटाळला तेव्हा दु:खी होऊन ज्यांनी त्या वेळी उत्स्फूर्तपणे उपवास केला त्यात यशवंतराव होते. मॅट्रिकला असतानाच कराडात हरिजनांसाठी रात्रीची शाळा सुरु करण्यात पुढाकार घेणाऱ्या यशवंतरावांना महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांना उद्घाटनासाठी आमंत्रण देण्याचे सुचले. पुढे अनेक दशकांनंतर त्यांनी पुणे विद्यापीठात विठ्ठल रामजींवर मार्मिक भाषणही केले ते त्यांच्या वाचनाची फलश्रुती म्हणून, कारावासात मार्क्सवाद, इतिहास याबरोबरच टागोर आणि कालिदास यांच्या वाङ्मयाचे वाचन झाले. या कामी ह.रा. महाजनी, आचार्य भागवत, रावसाहेब पटवर्धन इत्यादींचे साहाय्य त्यांना मिळाले होते. महात्मा गांधींच्या नेतृत्वाने प्रभावित झालेल्या यशवंतरावांच्या मनावर वास्तविक वडील बंधूंचे सत्यशोधक समाजाच्या राजकारणाचे व सामाजिक विचारांचे परिणाम व्हावयाचे. पण ते त्यापासून दूर राहून राष्ट्रीय चळवळीत सामील झाले. तेथेही गांधींचा प्रभाव मान्य करूनसुद्धा त्यांच्यावर मार्क्सवादी विचारांचा पगडा बसला. तुरुंगातून बाहेर पडल्यावर ते जवळपास कम्युनिस्ट पक्षात जाणार होते! आणि तसे नसते तर रॉयिस्ट पंथ त्यांनी स्वीकारला असता, पण राष्ट्रीय चळवळीला अग्रकम असून ती महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली काँग्रेसच करू शकते ही यशवंतरावांची पक्की समजूत होती. आधुनिक, सामाजिक, राजकीय व आर्थिक विचारांचा मागोवा घेतल्यामुळे गांधीवादी कर्मकांडात यशवंतराव सापडले नाहीत आणि स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या क्रांतिकार्याचे महत्त्व त्यांना कमी वाटले नाही. म्हणून रत्नागिरीला जाऊन त्यांनी सावरकरांची भेट घेतली. पक्षाच्या व पंथाच्या भिंती स्वत:भावेती  उभ्या न केल्याने पुढे सत्तेवर असताना व नसताना यशवंतराव अनेकविध पक्षांच्या, मतपंथाच्या लोकांत, सहजपणे मिसळत. कारावासात असताना जशी वाचन व चर्चा याद्वारे यशवंतरावांनी आपल्या मनाची मशागत केली होती त्याचप्रमाणे महाविद्यालयातल्याप्रमाणेच अखेरपर्यंत त्यांचे ग्रंथप्रेम कमी झाले नाही. म्हणून मराठी व इंग्रजी पुस्तके ते आवडीने घेत व चोखंदळपणे वाचीत. परदेशात जात तेव्हाही पुस्तकाच्या दुकानात वेळ घालवून खरेदी केल्याशिवाय ते परत येत नसत.
       तरुणपणी कराडहून कोल्हापूरला जाऊन पिटात बसून त्यांनी नाटके पाहिली. म्हैसूरकर महाराज, भागवतबुवा, बाबा आळतेकर यांची संगीत भजने व औंधच्या दाजी गुरवाचा पखवाज ऐकण्यात अनेक रात्री घालविल्या. गडकऱ्यांच्या नाटकातले संवाद त्यांनी पाठ केले होते आणि ''राजसंन्यास'' हे तर त्यांचे आवडते नाटक होते. रशियाला गेल्यावर मॉस्कोपासून काही अंतरावर असलेल्या टॉलस्टॉय यांच्या यस्नापलाना या निवासस्थानाला भेट देण्यास यशवंतराव विसरले नव्हते. तेथील शांतता व घनदाट वृक्षराजी पाहिल्यावर सोन्याच्या पिंपळाखाली ज्ञानदेवांची ज्ञानसाधनेस बसावे असे ते ठिकाण असल्याची यशवंतरावांची भावना झाली. रॉय जेकिन्स हे एक काळ ब्रिटिश मजूर पक्षाच्या मंत्रिमंडळात मंत्री होते. आता ते सोशल डेमोक्रॅटिक पक्षात आहेत. जेकिन्स हे चांगले लेखक? त्यांनी स्क्विथ यांचे सुंदर चरित्र लिहिले आहे. ते यशवंतरावांनी वाचले होते व लंडनला गेल्यावर त्यांनी जेन्किन्स यांची मुद्दाम भेट घेतली. स्वत:च्या मनाची मशागत त्यांनी अशी केली होती. यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न होते त्याचप्रमाणे स्वाभाविक आवडही होती. यामुळे त्यांचे लेखन व भाषण मोजके व अनेकदा मार्मिक असे.
          स्वातंत्र्याबरोबर यशवंतरावांचा प्रवास दीर्घकाळ सत्ताधारी या नात्याने झाला. पूर्वीच्या मुंबई राज्यात पार्लमेंटरी सेक्रेटरी या पदापासून ते दिल्लीत निरनिराळ्या खात्याचे मंत्री झाले. द्विभाषिकाचे मुख्यमंत्रिपद, दिल्लीत संरक्षण व नंतर गृहमंत्रिपद ही पदे यशवंतरावांना मिळाली तेव्हा अगोदर त्या स्थानांवर असलेल्या व्यक्तींनी निर्माण केलेल्या परिस्थितीची पार्श्वभूमी मिळाली होती. त्यामुळे यशवंतरावांची कारकीर्द अधिकच उजळून निघाली. ते द्विभाषिकाचे मुख्यमंत्री झाले. तत्पूर्वी मोरारजीभाईंच्या एकांगी भूमिकेने लोकांची मने दुखावली होती. यशवंतरावांनी बंदुकीच्या जोरावर द्विभाषिक न राबविण्याचे ठरविले. त्यानंतरही ते चालणे शक्य नाही हे दाखवून त्यांनी संयुक्त महाराष्ट्राची मागणी मांडली. ती मान्य झाली. समितीच्या चळवळीचा रेटा, लोकमताचा दणका यांना यशवंतरावांच्या कारभाराची जोड मिळून महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली तेव्हा मराठी मनाला नव्या आशेची पालवी फुटली. यामुळेच कुसुमाग्रजांसारख्या कवीने घोषणा केली ---
नव्या जीवनाचा नाद
मला ऐकू येत आहे
लक्ष शून्यातून
काही श्रेय आकारत आहे
महाराष्ट्र राज्याची स्थापना झाल्यावर यशवंतरावांनी ग्रामीण व शहर या दोन्ही समाजांच्या मनाची पकड घेतली. सहकारी साखर कारखान्याचा प्रयोग पूर्वीच सुरु झाला होता, पण तो एकुलता एक होता. यशवंतरावांनी  सरकारी  धोरण  म्हणून  अशा  साखर कारखान्यांची योजना आखली व ती पार पाडण्यासाठी सरकारी यंत्रणेचे पाठबळ उभे केले. नंतर या क्षेत्रात काही अपप्रवृत्ती निर्माण झाल्या खऱ्या पण तसा विचार केला तर त्या अनेक क्षेत्रांत झाल्या व होऊ शकतात. तथापि सहकारी साखर कारखानदारीने राज्याच्या काही ग्रामीण भागात मोठा उत्पादक व्यवसाय सुरु झाला. नवे रचनात्मक कार्य झाले. नवे कार्यकर्ते व पुढारी तयार झाले आणि ते काही कोटींचा व्यवहार करू लागले. सहकारी बँका, उपसासिंचन इत्यादींची वाढ हीसुद्धा रचनात्मक होती. यातून शिक्षणाच्या प्रसारास वाव मिळाला. शाळा व महाविद्यालये यांची संख्यावाढ झाली. ज्या भागात व समाजात शिक्षणाचा वारा लागणे शक्य नव्हते तेथे तो पोहोचला. हे एक सामाजिक परिवर्तन होते, त्यास चालना देण्याचे कार्य यशवंतरावांच्या धोरणामुळे झाले. जिल्हा परिषदांमुळे विकेन्द्रीकरण झाले. तीही गरज होती. मराठवाडा व शिवाजी या दोन विद्यापीठांच्या स्थापनेच्या मागे यशवंतरावांची प्रेरणा होती. या सर्वांचा गुणात्मक दर्जा वाढावयास हवा हे मान्य असले तरी प्रारंभ होणे अत्यावश्यक होते. हे फार मोठे महत्त्वाचे काम यशवंतरावांमुळे झाले. साहित्य-संस्कृती मंडळाची स्थापना साहित्य व संस्कृतीला वाव मिळावा, नव्या शास्त्रीय विचारांचा प्रसार व्हावा यासाठी झाली. यशवंतराव मुख्यमंत्री असताना सर्व खात्यांचे सचिव मुख्यमंत्र्यांचे बोलावणे येताच यथायोग्य माहिती पुरविण्यासाठी तत्पर असत. त्यांच्या मुख्यमंत्र्यांबरोबर ठरावीक अंतराने भेटी होत.
          यशवंतरावांनी तात्यासाहेब केळकरांच्या संबंधात जे सुंदर भाषण केले होते त्यातील केळकरांच्या मध्यममार्गी धोरणाबद्दलचे विवेचन काही प्रमाणात यशवंतरावांनाही लागू होते. काही प्रमाणात म्हणण्याचे कारण असे की, तात्यासाहेब कधी सत्तास्थानावर होते पण सत्तेच्या राजकारणात त्यांच्या वृत्तीचा कल मध्यममार्गी होता. यशवंतराव तात्यासाहेबांबद्दल लिहितात, ''दुसऱ्यांच्या म्हणण्यातील तथ्य मे मान्य करीत ते एकांतिक विचाराचे नव्हते, व्यवहारी व मध्यममार्गी होते. केळकरांची मध्यममार्गावर जी श्रद्धा होती त्यामागे एक तर त्यांचे त्याला अनुकूल असे सौम्य व बुद्धिवादी व्यक्तिमत्त्व होते आणि दुसरे, अनुभवी व्यवहारवाद होता, केळकरांनी मध्यमक्रमासंबंधी जे विवेचन केले आहे त्यात म्हटले होते की, मध्यमक्रम, म्हणजे निखालस वाईटाशी समेट किंवा तडजोड असा नाही, तर जे सामान्यत: चांगले म्हणून समजले जाते त्याचीच मर्यादा शोधून तारतम्याने जे युक्त वाटेल, त्याचे आचरण म्हणजे मध्यमक्रम होय ''सदगुणाच्या आचरणातही तारतम्याने सुचविणारे मर्यादादर्शन'' असे त्याचे शास्त्रीय वर्णन केळकरांनी केले आहे. ''भावना जेव्हा उद्दीपित होतात तेव्हा अशा वृत्तीच्या लोकांची उपेक्षा होते, तशीच ती केळकरांची झाली.'' असे यशवंतरावांनी समर्पक रीतीने सांगितले.
          शेवटी मनाने व शरीराने यशवंतराव खचले होते. प्रथम डोंगरे, नंतर किसन वीर आणि अखेरीस वेणूताई यांच्या निधनाने, त्यांच्या मनावरील जखम अधिकाधिक खोल होत गेली. आपल्या सार्वजनिक जीवनात इतके सुसंस्कृत व्यक्तिमत्त्व असलेला नेता सहजासहजी भेटणार नाही.
-गोविंद तळवळकर

यशवंतराव चव्हाण : माणूसवेडा नेता


विशेष लेख :                                                  दिनांक : 19 मार्च, 2013

यशवंतराव चव्हाण : माणूसवेडा नेता

        महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या जन्मशताब्दी महोत्सवाचा सांगता समारोप राष्ट्रपती श्री. प्रणव मुखर्जी यांच्या प्रमुख उपस्थितीत 23 मार्च 2013 रोजी मुंबई येथील एनसीपीए सभागृहात होणार आहे. त्यानिमित्ताने विशेष लेख. . .

          यशवंतराव चव्हाण यांच्याबाबत बऱ्याच कार्यकर्त्यांकडून ऐकलं होतं वर्तमानपत्रातून त्यांची भाषणे, त्यांनी मांडलेले विविध विचार वाचत होतो. म्हणूनच की काय त्यांच्याबद्दलची एक ओढ माझ्या मनात सारखी वाटत होती. एकदा तरी आपला, आपणा सर्वांचा नेता डोळा भरून पहावा, त्यांच जवळून दर्शन घ्यावं, असं वाटत होतं.
          नुकतीच आणीबाणी उठविली होती. लोकसभा निवडणुका जाहीर झाल्या होत्या. सारा भारत देश निवडणुकामुळे घुसळून निघाला होता. महाराष्ट्राचे लोकनेते आणि देशाचे परराष्ट्र मंत्री यशवंतराव चव्हाण यांची त्यादिवशी शहागंज (औरंगाबाद) येथे जाहीर प्रचारसभा होती. त्यामुळे यशवंतरावांना जवळून पाहण्याची संधी मिळेल या विचाराने त्या सभेला हजर होतो. अपेक्षेप्रमाणे सभा यशस्वी झाली. सभेमध्ये विराट जनसमुदाय जमलेला होता. यशवंतराव चव्हाण उर्फ 'साहेब' यांना जवळून पाहायचं दुसरे त्यांचे प्रत्यक्ष विचार ऐकायचे.
          या सभेमध्ये माझे समाधान झाले असले तरी एक प्रश्न मनामध्ये निर्माण झाला होता. तो म्हणजे लोक या सुसंस्कृत नेत्याला, 'साहेब' का म्हणत असावेत 'साहेब' म्हटले की, गोऱ्या कातडीचा, घाऱ्या डोळ्यांचा, सुटबूटातला इंग्रज 'साहेब' माझ्या डोळ्यासमोर उभा राहतो. आणि यशवंतराव चव्हाण तर या साहेबी कल्पनेत कुठेच बसणारे नव्हते. मग त्यांना लोक 'साहेब' का म्हणत असावेत. साहेबा पेक्षाही मला यशवंतराव चव्हाणांच्या मध्ये एक प्रेमळ माणूस, सुसंस्कृत माणूसच अधिक प्रमाणात दिसत होता. जेव्हा जेव्हा त्यांना जवळून भेटण्याची बोलण्याची संधी मला मिळाली त्या त्या वेळी मला त्यांचे साहेबापेक्षा माणूसपणच अधिक जाणवले. म्हणूनच या लाडक्या नेत्यावर अख्खा मराठी माणुस जीवापाड प्रेम करीत होता.
          1974 साली सुवर्ण महोत्सवी मराठी साहित्य संमेलन इचलकरंजी येथे झाले. त्यावेळी पु. ल. देशपांडे हे संमेलनाचे अध्यक्ष होते. रणजीत देसाई हे संमेलनाचे स्वागताध्यक्ष होते. या संमेलनालाही आपल्या राजकीय घडामोडी बाजूला ठेऊन यशवंतराव चव्हाण मुद्दाम त्यावेळी हजर राहीले. इचलकरंजीत आणि संमेलनाच्या समारंभात जेव्हा यशवंतरावजीचे आगमन झाले त्यावेळी कोल्हापूरकरांनी त्यांच्या विरोधी घोषणा दिल्या. या घोषणांमुळे यशवंतराव थोडेसेही विचलित झाले नाहीत. या उलट त्यांनी थोडेसे भाषणही केले आणि रसिक साहित्यिकांच्या मेळाव्यात आपला काही वेळ त्यांनी दिलखुलासपणे घालवला.                                     
       त्यानंतरचे साहित्य संमेलन खुद्द यशवंतराव चव्हाणांच्या कऱ्हाड या गावीच झाले. त्याचे स्वागताध्यक्ष यशवंतराव चव्हाण स्वत: होते. संमेलनाच्या अध्यक्षा होत्या दुर्गा भागवत. काळ आणीबाणीचा. त्यामुळे संमेलन वेगळया अर्थाने गाजणार असे सर्वांना वाटत होते आणि झालेही तसेच. दुर्गाबाई भागवत यांनी त्या वेळेसच्या भारत सरकारवर ताशेरे ओढले. आणीबाणीचा अस्वीकार केला तरीही यशवंतराव चव्हाण सरकारचे प्रतिनिधी या नात्याने चिडले नाहीत. तर कऱ्हाडकर यजमान म्हणून त्यांनी ते प्रसन्न मनाने स्वीकारले. तीन दिवसाच्या सहवासात संमेलन यशस्वी केलं. असा हा एक दर्दी राजकारणी माणूस होता.
          यशवंतराव चव्हाण यांना भेटण्याची, जवळून पाहण्याची एक संधी मला मिळाली. मी मराठवाडा विद्यापीठात मराठी विभागात एम. ए. चा विद्यार्थी होतो. त्या वेळी मराठवाडा विद्यापीठाची पन्नास मुला-मुलींची एक ट्रीप आग्रा, दिल्ली येथे गेली होती. आग्य्राला काही दिवसांचा मुक्काम झाल्यावर आम्ही दिल्ली गाठली. त्या वेळी यशवंतराव चव्हाण बहुधा भारताचे गृहमंत्री असावेत. आमचा दिल्लीमध्ये खा. माणिकराव पालोदकर आणि खा. सयाजीराव पंडित यांचेकडे मुक्काम होता. दिल्ली मुक्कामात संसदेचे कामकाज पाहिले. पण यशवंतराव चव्हाण यांना जावून घरी भेटावे अशी सर्व विद्यार्थ्यांचीच इच्छा होती.
          चार-पाच दिवसाच्या दिल्ली मुक्कामात आम्ही एक-दोनच नेत्यांना भेटलो. एक भारताच्या तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी आणि दुसरे यशवंतराव चव्हाण. दिल्ली सोडतांना तत्कालीन राष्ट्रपती व्ही. व्ही. गिरी यांचीही भेट घेतली. सर्वात अगोदर म्हणजे सकाळी आठ वाजता पंतप्रधानाची भेटेची वेळ ठरली होती म्हणून दिल्लीच्या त्या गुलाबी थंडीच्या दिवसात आम्ही पंतप्रधानांना भेटण्यासाठी आमच्या सोबत इतर राज्यातील मंडळीही भेटण्यास आली होती. अत्यंत कडेकोट बंदोबस्तात आम्हाला पंतप्रधांनाच्या भेटीसाठी प्रवेश दिला. एवढयात सुरक्षा सैनिकांच्या सोबत पंतप्रधान इंदिरा गांधी आल्या. आम्ही सर्वांनी उठून नमस्कार करुन त्यांचे स्वागत केले. त्यांनी विचारपूस केली. आणि आमची ही क्षणिक भेट संपली. या भेटीनंतर घाईघाईने आम्ही सर्वजण यशवंतराव चव्हाण यांच्या भेटीला त्यांच्या रेसकोर्सवरील निवासस्थानी भेटायला गेलो. तेथेही बंगल्याच्या प्रवेशद्वारात आमची तपासणी झाली. पण बंगल्यात गेल्यावर मात्र आम्ही आमच्या घरी आला आहोत अशी जाणीव झाली. यशवंतराव चव्हाणांनी आमचे सर्वांचे मनापासून स्वागत केले. आत सौ. वेणूताई चव्हाण होत्या. त्यांना बोलावून घेतले. आमच्याशी परिचय करुन दिला. परिचयाच्या कार्यक्रमांनंतर चहा-फराळ झाला. चहा-फराळांच्या वेळी साहेबांनी महाराष्ट्रातल्या विविध प्रश्नांबाबत चर्चा केली. त्याचवेळी त्यांचे स्वत:चे ग्रंथालयही पाहता आले. त्यानंतर त्यांच्या सोबत फोटो काढला. या भेटीत त्यांच्याबद्दलचे माणूसपण अधिकच जाणवलं. ती एक कृत्रिम भेट राहता जीवनात अविस्मरणीय अशी जिव्हाळयाची भेट ठरली. त्यानंतर आम्ही सर्वांनी त्यांचा निरोप घेतला.
         जेव्हा चव्हाण साहेब महाराष्ट्रात दौऱ्यावर आले त्यावेळी मराठवाडयात अंबेजोगाई येथे संगीत संमेलनाच्या कार्यक्रमाला हजर राहण्यासाठी ते मुद्दाम दिल्लीहून आले. औरंगाबादहून बीडला जातांना वाटेत आमच्या पेंडगावी त्यांचा स्वागताचा कार्यक्रम आम्ही ठेवला होता. आमच्या गावांना सभोवतालची मंडळीही या कार्यक्रमाला हजर होती. या अगोदरही आमच्या या छोट्याशा गावी या नेत्याचे स्वागत कार्यक्रम अनेकदा झाले होते. पण आजचा कार्यक्रम सर्वस्वी वेगळा होता. साहेब आयुष्याच्या बऱ्याच राजकीय हालचालीनंतर येत होते. तसेच यावेळी ते कुठल्याच सत्तेवरही नव्हते. फक्त सत्ताधारी पक्षाचे खासदार होते. तरी देखील माणसाची गर्दी कमी नव्हती.
          आम्ही सर्व ग्रामस्थ हारतुरे घेऊन रस्त्यावर उभे होतो. रस्त्यावरील गर्दी पाहून यशवंतरावजीने आपल्या ड्रायव्हरला गाडी थांबवायला सांगितली. पांढऱ्या रंगाची ॲम्बेसिडर  कार होती. चव्हाण साहेबांच्या सोबत राज्याचे माजीमंत्री ना. माणिकरावजी दादा पालोदकर होते. कै. खा. रामरावजी होते. गाडी थांबताच रामरावजी गाडीखाली प्रथम आले. नंतर साहेब जागचे उठू लागले. पण त्यांना जागचे उठणे कठीण जावू लागले. उठतांना सर्वांग थरथरत होते. तरीसुद्धा उत्साह मात्र कायम होता. मी हे जवळून पाहत होतो. या उदंड उत्साहामुळे माणूसकीच्या प्रेमामुळे ते थरथरत का होईना गाडीबाहेर आले. लोकांचे स्वागत स्वीकारले आणि सर्वांना प्रेमाशीर्वाद देऊन गाडीत बसले. ते गाडीत बसल्यावर गाडी निघून गेली. आम्ही सर्वजण आमच्या लाडक्या नेत्यांचे अखेरचे दर्शन घेत आहोत हे कोणालाच वाटत नव्हते. काळ इतक्या लवकर त्यांना आमच्या मधून नेईल असे वाटले नव्हते. पण शेवटी घडले ते अघटितच आणि 26 नोव्हेंबर 1984 रोजी आमचा लाडका नेता आमच्यामधून निघून गेला.                     
                                                                                      - डॉ. सुदाम जाधव
00000