Tuesday 19 March 2013

कीर्तीवंत यशवंत - वसंत वासुदेव देशपांडे


विशेष लेख :                                                                           दिनांक : 18 मार्च, 2013

कीर्तीवंत यशवंत
                                                - वसंत वासुदेव देशपांडे
        महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या जन्मशताब्दी महोत्सवाचा सांगता सोहळा राष्ट्रपती श्री. प्रणव मुखर्जी यांच्या प्रमुख उपस्थितीत 23 मार्च 2013 रोजी मुंबई येथील एनसीपीए सभागृहात होणार आहे. त्यानिमित्ताने विशेष लेख. . .
        यशवंत चव्हाण यांच्या कराड शहरातच माझा जन्म झाला आणि एसएससी पर्यंतचे माझे शिक्षण यशवंतराव कराडच्या ज्या टिळक हायस्कूलमध्ये शिकले त्याच शाळेत झाले. माझ्या वडिलांचे वास्तव्य 1920 पासून शिक्षकांच्या नोकरीनिमित्त कराड येथे होते. पुण्या-मुंबईच्या काही दैनिकांचे कराड येथील वार्ताहर म्हणूनही ते 1940 नंतर काम करीत होते. त्यामुळे त्यांचा यशवंतरावाशी परिचय होता. देशपांडे गुरुजी या नावाने ते ओळखले जात. वडील वार्ताहर असल्याने शालेय जीवनातच यशवंतरावांच्या राजकीय प्रवासाबद्दल, कॉग्रेसची असलेल्या त्यांच्या बांधीलकी बद्दल मला माहिती मिळत गेली. 1954 मध्ये पदवीधर झाल्यानंतर मी मुंबईत येऊन पत्रकारितेत प्रवेश केला. आचार्य अत्रे यानी स्थापन केलेल्या 'मराठा' दैनिकात आणि त्यानंतर 1960 पासून मुंबई आकाशवाणीच्या वृत्त विभागात वार्ताहर म्हणून काम करीत असताना मंत्री, मुख्यमंत्री आणि केंद्रिय मंत्री यशवंतराव चव्हाण यांची कारकीर्द मला पाहता आली. हाराष्ट्र राज्याच्या जडणघडणीत त्यांचा सिंहाचा वाटा आहे. त्याच बरोबर लोकप्रतिनिधी, नोकरशाही, उद्योजक, व्यापारी, साहित्यिक, कलाकार, कार्यकर्ते यासारखा विविध समाजघटकाला आपुलकी निर्माण करण्याची हातोटी त्यांनी आत्मासात केली होती. केंद्रीयमंत्री, उपपंतप्रधान, आठव्या वित्त आयोगाचे अध्यक्ष, खासदार या नात्याने दिल्लीतच, नोव्हेंबर 1962 नंतर त्यांचा मुक्काम झाला तरी महाराष्ट्राच्या राजकारणावरील आणि सार्वजनिक जीवनावरील त्यांची पकड कायम राहिली. 1946 च्या विधानसभा निवडणूकीत दक्षिण सातारा जिल्ह्यातून यशवंतराव चव्हाण, व्यकंटराव पवार, पुरुषोत्तम पांडुरंग ऊर्फ बाबूराव गोखले आणि के.डी. पाटील हे चारही काँग्रेस उमेदवार मुंबई विधानसभेवर निवडून आले. त्यावेळी एक सदस्य मतदार संघ नव्हते. के.डी. पाटील वगळता हे तिघे कराडचे होते. निवडणुकीची मतमोजणी सातारा येथे झाली होती. निवडणूक निकालाचे वृत्त कराड शहरात ठिकठिकाणी फलक लावून प्रस्तृत करण्याच्या कामात माझा खारीचा वाटा होता. आम्ही रहात असलेल्या सोमवार पेठेत कॉग्रेस उमेदवारांच्या या विजयाचा एक फलक मी लिहून लावला होता.          
          1946 च्या निवडणूकीनंतर यशवंतरावांची खेर मंत्रीमंडळात पार्लमेंटरी सेक्रेटरी म्हणून नियुक्ती झाली. 30 जानेवारी 1948 रोजी महात्मा गांधीची हत्या झाल्यानंतर दक्षिण महाराष्ट्रात अनेक ठिकाणी जाळपोळ होऊन ब्राम्हणांचे नुकसान झाले. तथापि कराड शहरात जाळपोळीचा एकही प्रकार घडला नाही याचे श्रेय कराडमध्ये यशवंतरावानी आणि अन्य कॉग्रेस पुढाऱ्यांनी जे सौहार्दाचे वातावरण निर्माण केले त्याला जाते. यशवंतरावाप्रमाणे पांडुअण्णा शिराळकर, गणपतराव आळतेकर, बाबुराव गोखले या कॉग्रेस पुढाऱ्यांनी कराडमध्ये विचारसरणी रुजविली असल्याने कराड शहर दंग्याधोप्यापासून अलिप्त राहिले. विद्यार्थी दशेत कराडमध्ये यशवंतरावांची भाषणे ऐकण्याची संधी मला मिळाली. जुन्या मोटार स्टँड मैदानावर तेव्हा कराडमधील जाहीरसभा होत. स्वातंत्र्योत्तर काळातील अशाच एका सभेत बोलताना ज्या मार्गानी स्वातंत्र्य मिळविले त्याच मार्गानी विकास घडवून आणण्याचा काँग्रेसचा संकल्प असल्याचे सांगून विधायक कार्याचे महत्त्व त्यांनी विशद केले होते. संघर्ष टाळून समन्वयाचा मार्ग चोखाळण्याची त्यांची भावी आयुष्यातील यशाची गुरुकिल्लीच त्यानी जनतेपुढे त्यावेळी उघड केली.                                     . . 2


कीर्तीवंत यशवंत . . 2

          1952 च्या  निवडणुकीनंतर मोरारजी देसाई मंत्रिमंडळात यशवंतराव कॅबिनेट मंत्री झाले. 1952 मध्ये राज्यात मोठा दुष्काळ पडला होता. अन्नधान्याची तीव्र टंचाई होती आयात आणि लेव्ही अन्नधान्यावर अवलंबून धान्य पुरवठा करण्याची अत्यंत अवघड जबाबदारी पुरवठा मंत्री या नात्याने यशवंतरावानी पार पाडली दुष्काळग्रस्त जनतेला दिलासा देण्यासाठी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु यांनी तेव्हा राज्याचा दौरा केला होता. केंद्राकडून राज्याला अन्नधान्याचा पुरेसा कोटा मिळविण्यासाठी आपणाला किती खटाटोप करावा लागत आहे ते यशवंतरावानी त्यावेळी पत्नी वेणूताई यांना पाठविलेली जी पत्रे प्रसिद्ध झाली आहेत त्यावरून समजते.
          मोरारजी देसाई यांच्या मंत्रिमंडळात मंत्री असतानाच त्यांच्या कर्तृत्वामुळे मुख्यमंत्री आणि सत्तेतील त्यानंतरही उच्च पदे ते निश्चितपणे गातील असे जाणवू लागले होते. 28 सप्टेंबर 1953 रोजी झालेल्या नागपूर करारावर त्यांची सही आहे. महाराष्ट्रातील अग्रगण्य नेत्यात त्यांची गणना तेव्हाच होऊ लागली होती. मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र आंदोलनाच्या वेळी त्यांचा भूमिका कॉग्रेस श्रेष्ठींशी संघर्ष करता मागणी मान्य करुन घ्यावी अशी होती. त्यामुळे त्याना संयुक्त महाराष्ट्र समितीच्या नेत्यांची टीका सहन करावी लागली त्यातही आचार्य अत्रे यांचा तोफखाना जोरदार होता. समन्वयवादी भूमिकेमुळे 1 नोव्हेबर 1956 विशाल द्विभाषिक मुंबई राज्याचे मुख्यमंत्रीपद त्यांच्याकडे आले. वेगळ्या मराठी भाषिक राज्यामुळे जे लाभ मिळतील ते विशाल द्विभाषिक मुंबई राज्यात देऊन मराठी जनता संतुष्ट नसून वेगळ्या राज्याचे स्वप्न साकार करण्यासाठी मराठी भाषिक आग्रही आहेत हे त्यांना समजून आले. याच सुमारास म्हणजे नोव्हेबर 1957 मध्ये प्रतापगडावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या अनावरणाचा कार्यक्रम ठरला. पंडित नेहरुंच्या हस्ते अनावरण होणार असल्याने त्यावेळी संयुक्त महाराष्ट्र समितीने जाहिर केले. ``अनावरणाचा हा कार्यक्रम आम्ही होऊ देणार नाही. समिती कार्यकर्त्याच्या प्रेतावरुन पंडित नेहरुंना अनावरणासाठी जावे लागेल`` असे वक्तव्य आचार्य अत्रे यांनी केले मराठा दैनिकातून तसा प्रचारही सुरु झाला. त्यामुळे वातावरण प्रक्षुब्ध होऊ लागले. काँग्रेसनांचा आणि सरकारचा हा कार्यक्रम पार पाडण्याचा निर्धार होता. समितीच्या नेत्यांनी प्रचार करुन संयुक्त महाराष्ट्रवादी स्त्री-पुरुष कार्यकर्ते नागरिक सातारा-वाई मार्गे तसेच पोलादपूर मार्गे प्रतापगडावर आणण्याची जय्यत तयारी केली. काँग्रेसजनांचा जमाव आणि समिती कार्यकर्त्यांच्या जमाव समोरासमोर भिडल्यास शांतता भंग होऊन पोलिसी बळाचा वापर करण्याचा प्रसंग टाळण्याकडे यशवंतरावांनी लक्ष केंद्रित केले. त्यानी अनावरण सोहळ्याचा आदल्या दिवशी समिती नेत्यांना पाचारण करुन समितीच्या कार्यकर्त्यांनी शांततापूर्ण निदर्शने केल्यास त्याला सरकारची हरकत असणार नाही असे स्पष्ट केले. मोर्चासाठी आलेल्या समितीच्या लोकांनी पंडित नेहरुंच्या मोटारीचा ताफा ज्या रस्त्याने जाणार आहे त्या रस्त्याच्या दोन्ही बाजूला उभे राहून शांततेत निदर्शने करावीत, मोटारीपुढे आडवे पडण्याचा प्रयत्न कोणी करु नये असे यशवंतरावांनी सुचविले. यशवंतरावांचा हा प्रस्ताव एम.एम. जोशी, दत्ता देशमुख आदि समिती नेत्यांनी मान्य केला. त्यानुसार वाईपासून प्रतापगडापर्यंतच्या रस्त्याच्या दोन्ही बाजूला उभे राहून समितिच्या कार्यकर्त्यांनी निदर्शने केली. प्रतापगडावर जाताना पंडित नेहरुना मोठ्या संख्येने उभे असलेले हे निदर्शक दिसले. त्यानी यशवंतरावाकडे हे लोक शासाठी येथे जमा झाले आहेत याची वाटेतच चौकशी केली. तेव्हा यशवंतरावानी मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र हे मराठी भाषिकांचे वेगळे राज्य व्हावे या मागणीसाठी हा जनसुमदाय आला असल्याचे पंडितजींना सांगितले. त्या आधी मराठी भाषिकांचे अलग राज्याचे आंदोलन म्हणजे हिंसाचार, दगडफेक अशी काँग्रेस श्रेष्ठींची समजूत होती. परंतु प्रतापगडच्या पायथ्याशी जमलेला हा शांततापूर्ण निदर्शकांचा जमाव पाहून पंडित नेहरुनाही मराठी भाषिकांच्या मागणीची तीव्रता जाणवली असावी. प्रतापगड निदर्शनापासून पंडित नेहरुंच्या विचारात बदल होत गेले आणि महाराष्ट्र राज्य निर्मितीस अनुकूल वातावरण निर्माण झाले.                                                                                                   

          मोरारजी देसाई मुंबई राज्याचे मुख्यमंत्री असताना गोळीबाराच्या अनेक घटना झाल्या. परंतु यशवंतरावानी गोळीबार आणि पोलिसी बळाचा निदर्शकाविरुद्ध वापर यासारखे प्रसंग कसे टाळता येतील ते पाहिले महाराष्ट्र राज्य निर्मितीनंतर ही मुंबईत फ्लोरा फाऊंटन येथे संयुक्त महाराष्ट्र आंदोलनातील हुतात्म्यांच्या संदर्भात समन्वयाची भूमिका घेतली त्यामुळे मराठी भाषिकातील काँग्रेस आणि राज्य सरकारबद्दलचा राग निवळला. 1962 च्या विधानसभा निवडणूकीत याचा प्रत्यय कॉग्रेसला मिळालेल्या प्रचं बहुमताद्वारे आला. निवडणूकीनंतर यशवंतराव पुन्हा मुख्यमंत्री झाले. समितीला 1962 च्या निवडणूकीत हार पत्करावी लागली तरी समितीचे आचार्य अत्रे मुंबईतील दादर, मतदार संघातून विधानसभेवर निवडून आले. आता आचार्य अत्रे यांचा यशवंतरावावरील राग बराचसा कमी झाला होता एवढेच नव्हे तर संरक्षण मंत्री म्हणून अधिकारसुत्रे स्वीकारण्यासाठी दिल्लीला जाण्यापूर्वी  यशवंतरावाना विधानसभेने 19 नोव्हेंबर 1962 रोजी शुभेच्छा दिल्या तेव्हा आचार्य अत्रे यानी यशवंतरावांची कामगिरीबाबत स्तुतीसुमने उधळली. ``यशवंतराव आपले आहेत. परममित्र आहेत. त्यांच्यात काही अलौकिक गुण आहेत. त्यांचा स्वभाव, त्यांचे बोलणे-चालणे-वागण हे सारेच असे आहे की, त्यांचे शुभत्व करु इच्छिणाऱ्या माणसाला सुद्धा फार काळ शत्रुत्व करणे शक्य होत नाही असे मी माझ्या अनुभवावरच सांगू शकतोअशा प्रांजळ भाषेत आचार्य अत्रे यानी यशवंतरावांची प्रशंसा केली. यशवंतरावानीही त्याआधी चिनी आक्रमण निषेधाच्या ठरावावरील आचार्य अत्रे यांची उपसूचना स्वीकारून मनाचे औदार्य दाखविले. अत्रे यांच्या उपसूचनेसह ठराव मंजूर झाला. विरोधी बाजूची उपसूचना सरकार सहसा स्वीकारत नाही परंतु चिनी आक्रमणाचा निषेध आणि भारतीय सैन्यदलावरील विश्वास याबाबत संपूर्ण सभागृहाची एकच भावना आहे हा संदेश बाहेर जावा म्हणून आचार्य अत्रे यांची उपसूचना आपण स्वीकारता आपण असल्याचे यशवंतरावानी स्पष्ट केले.
          यशवंतराव मुख्यमंत्री असताना आकाशवाणीचा प्रतिनिधी या नात्याने मी इतर पत्रकारासह त्यांना भेटत असे. त्यामुळे एक पत्रकार म्हणून ते मला ओळखत होते. पंरतु मी कराडचा असून देशपांडे गुरुजींचा मुलगा आहे हे त्यांना माहित नव्हते. मीसुद्धा त्यांना हे सांगितले नव्हते. परंतु एका भेटीत आजूबाजूला तीनचार पत्रकार असताना मी ही ओळख करून दिली. क्षणार्धात यशवंतरावांच्या बोलण्यात फरक पडला. आधीची अहोची भाषा जाऊन घनिष्ठ मित्राच्या मुलाशी जसे बोलावे, तशा भाषेत त्यांचा माझ्याशी संवाद सुरू झाला. या घटनेनंतर काही वर्षांनी माझे वडील पुण्याच्या एका यात्रा कंपनीबरोबर उत्तर भारताच्या यात्रेसाठी गेले असता नवी दिल्ली हे त्यांचे या प्रवासातील एक ठिकाण होते. नवी दिल्लीत यात्रा कंपनीची बस संसद भवनाच्या मार्गाने जात असताना बसमधील काही व्यक्तींनी केंद्रीय मंत्री यशवंतराव चव्हाण यांची भेट घेऊया असा प्रस्ताव मांडून या भेटीसाठी पुढाकार घेण्याची माझ्या वडीलांना विनंती केली. त्याप्रमाणे बस संसद भवनाजवळ थांबली. माझ्या वडीलांच्याबरोबर यात्रा कंपनीचे चालक संसद भवनातील यशवंतरावांच्या कार्यालयात गेले. कार्यालयात यशवंतरावांच्या खासगी सचिवास वडीलांनी आपली ओळख करून दिली आणि यशवंतरावांना भेटण्याची यात्रा कंपनीतील लोकांची इच्छा असल्याचे सांगितले. खासगी सचिवाने आता संसदेचे कामकाज चालू आहे. मधल्या सुट्टीच्या वेळी मी साहेबांच्या कानावर तुमची विनंती घालतो असे सांगितले त्याप्रमाणे मधल्या सुट्टीत यशवंतरावांना ही हकिगत सांगितली. यशवंतरावांनी तात्काळ या सर्व मंडळींना भेट दिली. एवढेच नव्हे तर त्यांच्याबरोबर छायाचित्रही काढू दिले. आपल्या गावातील एक ज्येष्ठ नागरिकांची विनंती यशवंतरावांनी संसदीय कामकाजाच्या घाईगर्दीतही मान्य केली. यावरून त्यांच्या संवेदनशीलतेची कल्पना करता येईल.
                                                                                       . . 4

कीर्तीवंत यशवंत . . 4
      यशवंतराव मंत्री आणि मुख्यमंत्री असताना मंत्रालय विधिमंडळ वार्ताहर संघाची स्थापना
झालेली नव्हती. तथापि मंत्रालयातील तेव्हाच्या सचिवालयातील वार्ताहर आणि मुख्यमंत्री यांचा वार्षिक स्नेहभोजनाचा कार्यक्रम होत असे. तेव्हा पत्रकारही मुख्यमंत्र्यांसमवेत स्नेहभोजन आयोजित करीत.
          यशवंतराव मुख्यमंत्री असताना वेगळे मुख्यमंत्री कार्यालय किंवा मुख्यमंत्र्यांसाठी वेगळा जनसंपर्क अधिकारी अशी व्यवस्था नव्हती. कन्नमवार मुख्यमंत्री झाल्यानंतर मुख्यमंत्र्यांसाठी जनसंपर्क अधिकारी ही प्रथा सुरु झाली. माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयाला तेव्हा प्रसिद्धी विभाग असे संबोधत होते आणि प्रसिद्धी विभागाच्या प्रमुखास संचालक असे पदनाम होते. मंत्रिमंडळ बैठकीनंतर मुख्यमंत्र्यांची पत्रकार परिषद ही व्यवस्था तेव्हा नव्हती. तथापि आवश्यकतेनुसार यशवंतराव पत्रकार परिषद बोलावित.
          मुंबईच्या सार्वजनिक जीवनात मुख्यमंत्री असताना यशवंतरावांचा जो सहभाग होता तो त्यांच्या दिल्लीतील वास्तव्यानंतरही कायम राहिला. मुख्यमंत्री असताना त्यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या मार्मिक साप्ताहिकाचे उद्घाटन केले होते. शिवसेनेची स्थापना तेव्हा झालेली नव्हती. प्रबोधनकार ठाकरे यांचे चिरंजीव आणि व्यंगचित्रकार अशी त्यावेळी बाळासाहेबांची ओळख होती मराठीतील पहिले व्यंगचित्र साप्ताहिक म्हणून मार्मिकला त्यांनी आपल्या भाषणात मन:पूर्वक शुभेच्छा दिल्या. शिवाजी पार्क दादर येथील बालमोहन विद्यालयाच्या सभागृहात हा कार्यक्रम झाला होता.
          यशवंतरावांचा समयोचित भाषण करण्यात हातखंडा होता. प्रसिद्ध कादंबरीकार ना.सी. फडके यांच्या भाषणात जसे नादमाधुर्य होते तसे त्यांच्या भाषणात होते. आकाशवाणीसाठी त्यांचा आवाज अत्यंत अनुरूप होता. आकाशवाणीतील तंत्रज्ञ अधिकाऱ्यांनीच हे सांगितले होते. साहित्यिक कलाकार, पत्रकार यांच्या मेळाव्यातील त्यांची भाषणे त्यांच्या विस्तृत आणि अभिरूचीपूर्ण वाचनाची चुणूक देणारी असत. पुणे येथे साहित्य सम्राट तात्यासाहेब केळकर यांच्यासंबंधी त्यांनी केलेल्या भाषणातून त्यांचा साहित्याचा अभ्यास किती गाढा आहे. हे उपस्थित वाङ्मयसेवकाना समजून आले.
          1932 च्या चिनी आक्रमणांनतर पंतप्रधान पंडित नेहरुंनी संरक्षणमंत्रीपदाची जबाबदारी यशवंतरावांवर सोपविली. संरक्षण खाते यशस्वीपणे सांभाळल्यानंतर केंद्रात अर्थ, विदेश व्यवहार आणि गृह या खात्याचे मंत्री म्हणूनही त्यांनी काम केले. मुंबई महाराष्ट्र राज्याचे मंत्री आणि मुख्यमंत्री असताना यशवंतरावांचे मुंबईतील पत्रकाराशी जे संबंध निर्माण झाले त्यातील औपचारिकपणा नंतर हळूहळू कमी होत गेला त्यामुळे दिल्लीहून मुंबईत आल्यानंतर अनेकदा ते वेळ काढून मुंबईतील पत्रकारांना अनौपचारिक बातचीत करण्यासाठी मरीन ड्राईव्हवरील त्यांच्या निवासस्थानी बोलावीत. त्यावेळी टी.व्ही. वृत्तवाहिन्या नव्हत्या त्यांना भेटणाऱ्या पत्रकारांची संख्या दहा पंधरापर्यंत मर्यादित होती राष्ट्रीय राजकारणातील बारकावे या चर्चेतून आम्हा मुंबईकर पत्रकारांना समजत. वृत्तपत्रीय प्रसिद्धीसाठी ही चर्चा नसल्याने मोकळेपणाने संभाषण होत असे. तथापि ते मुरब्बी मुत्सद्दी आणि राजकारणी असल्याने एखादा खट्याळ पत्रकार या चर्चेतून बातमी देण्याची शक्यता विचारात घेऊन यशवंतरावांचा संवाद होत असे. जी माहिती प्रसिद्ध झाल्याने गोपनीयतेचा भंग होऊ शकेल अशी कोणतीही माहिती उघड होणार नाही याची दक्षता यशवंतराव घेत. त्यामुळे या अनौपचारिक चर्चेनंतर प्रसिद्ध झालेल्या बातमीसंबंधात इन्कार करण्याचा किंवा खुलासा करण्याचा प्रसंग सरकारी यंत्रणावर आला नाही.
          ब्रिटीश सरकारच्या राजवटीत त्यांनी तुरुंगवास भोगला होता. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर ते दीर्घकाळ सत्तारूढ पक्षात होते. तथापि केंद्रात 1977 च्या निवडणूकीनंतर जनता पक्षाचे सरकार सत्तेवर आल्यानंतर लोकसभेत विरोधी पक्षनेतेपद त्यांच्याकडे आले. काँग्रेस पक्षाच्या विभाजनानंतर    देवराज अरस आणि ब्रह्मानंद रेड्डी यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेस पक्षात त्यांनी काम केले. 1980 च्या विधानसभा निवडणूकीनंतर राज्यात . आर. अंतुले यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस (आय) चे मंत्रिमंडळ सत्तेवर आले. 1980 च्या नागपूर हिवाळी अधिवेशनाच्या वेळी विरोधी पक्षानी शेतकरी दिंडी आयोजित केली होती. तेव्हा यशवंतराव चव्हाण या शेतकरी दिंडीत सहभागी झाले होते. दिंडी नागपूरच्या मार्गावर असताना यशवंतरावांसह दिंडीतील अनेकांना पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर यशवंतरावांना बसमधून अन्यत्र नेऊन सोडण्यात आले. स्वातंत्र्यानंतर कित्येक वर्षांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नावर झालेल्या आंदोलनात सहभागी होऊन स्वातंत्र्यपूर्व काळातील जिद्द आपल्यात कायम असल्याचे त्यांनी दाखवून दिले. त्यांच्या जीवनातील हा एक आगळा अनुभव होता.
          यशवंतरावांनी माणसांची अचूक पारख करून त्यांच्या गुणांचा लाभ समाजाला आणि प्रशासनाला दिला. तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांची महाराष्ट्र साहित्य संस्कृती आणि विश्वकोश मंडळाचे प्रमुख म्हणून नियुक्ती, ग.बा. उर्फ भाऊसाहेब तेवाळकर यांची महाराष्ट्र लघु उद्योग, विकास महामंडळाच्या अध्यक्षपदी नियुक्ती ही दोन उदाहरणे यासंबंधात अगदी बोलकी आहेत. विधान परिषदेवर साहित्यिक, पत्रकार, सामजिक कार्यकर्ते यांचा राज्यपाल नियुक्त सभासदात अंतर्भाव करण्याचा पायंडा त्यांनी पाडला. ग.दि.माडगूळकर यांचा विधान परिषदेवरील नियुक्तीने या चांगल्या प्रथेचा आरंभ झाला. विधान परिषदेवरील अशा नियुक्तीत पक्षीय अभिनिवेश बाजूला ठेवून त्यांनी त्या व्यक्तीचे कार्य आणि अनुभव याला प्राधान्य दिले. कुटुंबनियोजन क्षेत्रात शकुंतला परांजपे यांचे कार्य अजोड असल्याने त्यांची विधान परिषदेवर नियुक्ती व्हावी म्हणुन राज्यपालांना त्यांनी शिफारस केली राज्यपालनियुक्त सदस्य सर्वसाधारणत: सत्तारूढ पक्षाचे सदस्य म्हणून सभागृहात काम करतात. शकुंतला परांजपे यांनी मात्र सभागृहात प्रजा समाजवादी पक्षाचे सभासदत्व स्वीकारले. परंतु यशवंतरावांनी त्याबद्दल तक्रार केली नाही. ज्येष्ठ सनदी अधिकारी स.गो.बर्वे यांनी 1961 मधील पानशेत पूर आपत्तीच्या वेळी पुणे शहरात मदतीची पुनर्वसनाची जबाबदारी यशस्वीपणे पार पाडली. 1962 च्या निवडणूकीत त्यांना पुणे शहरात विधानसभेसाठी यशवंतरावांनी उमेदवारी दिली. निवडणूकीतील विजयानंतर त्यांच्याकडे अर्थखात्यासारख्या महत्त्वाच्या खात्याचे मंत्रीपदही यशवंतरावांनी सोपविले. बर्वे आणि यार्दी या सचिव जोडीने विशाल द्विभाजिक मुंबई राज्याच्या विभाजनाच्या वेळी वित्तीय विभाजनाची अवघड कामगिरी पूर्ण केली होती. अर्थखाते बर्वे यांच्याकडे सोपविताना यशवंतरावांनी ही बाब विचारात घेतली सेना दलातील ज्येष्ठ निवृत्त अधिकारी एसपीपी थोरात यांची महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे अध्यक्षपदी त्यांनी केलेली नियुक्ती सर्वांनाच पसंत पडली. शिवसेना-भाजप युती शासनाच्या राजवटीत दरसाल महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्याचा निर्णय झाला. तथापि यशवंतरावांनी महाराष्ट्र राज्य स्थापनेनंतर लगेचच वी यशवंत यांना महाराष्ट्र वी हा पुरस्कार देऊन राज्य सरकारची गुणग्राहकता दाखविली. वी यशवंत हे त्या आधी बडोदा संस्थानचे राजकवी होते तथापि संस्थानांच्या विलीनीकरणानंतर त्यांचे हे राजकवी पदही संपुष्टात आले होते.
          यशवंतरावांच्या कर्तृत्वाची ओळख बेरजेच राजकारण या दोन शब्दातून व्हावी एवढी ही संकल्पना जनमानसात रूजली आहे. यशवंतरावांनी मुख्यमंत्री असताना आपण कराड शहराचे म्हणून इतर गावांची उपेक्षा करून सर्व योजना कराडकडे असा प्रकार केला नाही. आठव्या वित्त आयोगाचे अध्यक्ष म्हणूनही त्यांनी देशातील अन्य राज्यांकडे दुर्लक्ष आणि मुंबई महाराष्ट्रासाठी अनुदानाचा महापूर असे केले नाही. यासंबंधात त्यांचा नि:स्पृहपणा अतुलनीय म्हणता येईल.
00000

No comments:

Post a Comment