Tuesday 19 March 2013

सुसंस्कृत नेता - यशवंतराव गडाख


विशेष लेख :                                                          
                                                                                                                                                                                                 सुसंस्कृत  नेता
                                                            -  यशवंतराव  गडाख

        महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या जन्मशताब्दी महोत्सवाचा सांगता सोहळा राष्ट्रपती श्री. प्रणव मुखर्जी यांच्या प्रमुख उपस्थितीत 23 मार्च 2013 रोजी मुंबई येथील एनसीपीए सभागृहात होणार आहे. त्यानिमित्ताने विशेष लेख. . .

          स्वातंत्र्यप्राप्तीनंतरचा काळ भारावलेला होता. धकाधकीचा होता. स्वराज्य मिळाले. त्याचे सुराज्यात रुपांतर करायचे कसे? हा राज्यकर्त्यांपुढे त्या काळात प्रश्न होता. त्यात महाराष्ट्रात द्विभाषिक राज्य.  संयुक्त  महाराष्ट्राची चळवळ जोमात होती. प्रचंड जनक्षोभ होता. केंद्र राज्यातील भाषिक जनता, असाच तो संघर्ष होता. या संघर्षात राज्यातील काँग्रेसचे नेतृत्व यशवंतराव चव्हाणांसारख्या धुरिणांकडे होते. यात त्यांना अनेक यातना सहन कराव्या लागल्या. यशवंतरावांनी कुशलतेने ही चळवळ हाताळली. त्यातून  तावूनसुलाखून त्यांचे नेतृत्व  पुढे आले. 1962 च्या चिनी युध्दानंतर पंडित जवाहरलाल नेहरु यांनी त्यांना केंद्रात बोलावून घेतले. " हिमालयाच्या मदतीला सह्याद्री धावला "असा वाक्यप्रचार तेव्हा रुढ झाला. त्यानंतर त्यांच्या नेतृत्वाला झळाळीच येत गेली. मागे वळून त्यांनी कधी पाहिलेच नाही.  महाराष्ट्राची मान अभिमानाने उंचवावी असेच नेतृत्व स्वातंत्र्यानंतर देशाला दिले. लोकमान्य टिळकानंतर नेतृत्वाची पोकळी त्यांनी भरुन काढली.
                माझ्यासारखी नवी पिढी त्या काळात महाविद्यालयीन शिक्षण घेत होती. राजकारणात, समाजकरणात रस असल्याने या गोष्टी जवळून पाहात होतो. साठ सत्तरच्या दशकात तरुण त्यांच्याकडे आकर्षित झाले. त्यातूनच पुढे राज्यात नवनिर्माण झाल्याचे दिसते. यशवंतरावाच्या कार्यकर्तृत्वाबद्दल बरेच काही लिहून आले आहे. अनेक ग्रंथही प्रकाशित झाले आहेत.  प्रस्तुत ठिकाणी त्यांच्या चारित्राचे सिंहावलोकन  करण्यापेक्षा त्यांच्या सहवासात आल्यावर  त्यांचे मोठेपण, त्यांची सहिष्णुता, विजिगिषु वृत्ती , सह्दयता  सांगण्याचा प्रामाणिक प्रयत्न  करीत आहे. त्यांच्या जपलेल्या आठवणीतून या गोष्टी उलगडत जातील.
                अहमदनगरमधील प्रसिध्द कुस्तीगीर पैलवान छबुराव लांडगे यांच्या संबंधातील  एक मजेशीर  आठवण  आहे.  यातून यशवंतरावांचे मोठेपणच सिध्द होते. लहानातल्या  लहान उपकारकर्त्याला विसरायचे नाही.  ही साधी शिकवण त्यांनी दिली. त्याचं काय झाले, संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनाचा तो काळ होता. नगरच्या गांधी मैदानात कॉ. श्री. . डांगे, बाळासाहेब भारदे, यशवंतराव चव्हाण अशा नेत्यांची भाषणे व्हायची. लोक खूप गर्दी करायचे. विचारांची ती मेजवानी वाटायची. भविष्याची स्वप्ने त्यात दिसायची. चव्हाणांसारख्या  राज्यकर्त्याचे विचार ऐकण्यासही लोक उत्सुक असायचे. आंदोलनाच्या काळात त्यांची सभा नगरला होऊ द्यायची नाही, असा आंदोलकांनी पवित्रा घेतला. त्यांना विरोध समजल्यावर साहेबही म्हणाले, " नगरमध्ये  मी येणार, सभा घेणार, त्यात विचारही मांडणार " ते इरेस पडल्यावर कॉग्रेसजनांना हुरुप आला. नगरमध्ये सभा घेण्यास चव्हाणसाहेब आल्यावर जुन्या बसस्थानकापासून मैदानापर्यंत त्यांची उघड्या जीपमधून मिरवणूक काढण्यात आली. या जीपच्या  बोनेटवर प्रसिध्द पैलवान छबुराव लांडगे मांडी घालून बसले. त्या काळात त्यांचा दबदबाच तसा होता. सभा निर्विघ्नपणे पार पडली. त्यानंतर केंद्रात मंत्री असतांना चव्हाणसाहेब एकदा नगरला आले. विश्रामगृहात कार्यकर्त्यांशी गप्पा मारत बसले होते. तेथे छबुराव लांडगे आले आणि त्यांनी  साहेबांना 'चहाला घरी चला'  असा आग्रह धरला. कॉग्रेस अंतर्गत विरोधी गट साहेबांनी छबुरावांकडे जाऊ नये, यास्तव विरोध करीत होता.  त्यांनी सगळ्यांचे ऐकून घेतले, काही बोलले नाहीत . जिल्हाधिकाऱ्यांना म्हणाले, "गाडी काढा, आपल्याला छबुरावकडे जायचं आहे". गाडी पैलवानांच्या घराकडे वळाली. गाडीत साहेबांसमवेत  मी आणि आबासाहेब निंबाळकर असे दोघे होतो. ते म्हणाले , " काय हे मनाचे कोतेपण, त्यांच्या घरी जायला विरोध. नगरमध्ये माझी सभा होत नव्हती तेव्हा छबुराव जीपच्या बोनेटवर जाऊन बसले. सभास्थानी त्यांनी नेलं. सभा झाली. हे मी आयुष्यभर विसरणार नाही". कार्यकर्त्याच्या भावनेचा विचार, त्याने पक्षासाठी खाल्लेल्या खस्ता त्याच्या त्यागाचा कुणी विचारच करीत नाही. आजच्या राज्यकर्त्यात हे प्रकर्षाने जाणवते. मागची पिढी अपवाद असू शकेल. छबुरावसारख्या सामान्य कार्यकर्त्याने मदतच केली होती. त्यातून उतराई म्हणण्यापेक्षा त्याचा सन्मान कसा वाढेल , हेच साहेबांनी पाहिले. या साध्या घटनेतून त्यांचे मोठेपण, कार्यकर्त्याना जपण्याची कलाच सिध्द होते.  आताचा विचार केलेलाच बरा!
                दुसरे असे की, मुळा सहकारी साखर कारखान्याचा पहिलाच गळीत हंगाम होता. 14 जानेवारी 1979 हा तो मकरसंक्रांतीचा दिवस. गव्हाणीत मोळी टाकण्यासाठी यशवंतराव चव्हाण, शरद पवार अण्णासाहेब शिंदे दी नेते आले होते. या कार्यक्रमानंतर मळ्यात भोजनानंतर जिल्ह्यातील पुढाऱ्यांची बैठक झाली.  विधानसभा निवडणुका जवळ आल्या होत्या. बैठकीस आबासाहेब निंबाळकर , मारुतराव घुले, कि.बा. म्हस्के आदी उपस्थित होते. मतदारसंघाच्या निवडीबाबत चर्चा चालू होती. निंबाळकर यांचा कर्जत विधानसभा मतदारसंघ राखीव झाला होता. आबासाहेब साहेबांचे विश्वासू सहकारी, चर्चा झाल्यावर चव्हाणसाहेब एकच वाक्य बोलले
"
आबासाहेबांशिवाय तुमची टीम राज्यात कशी दिसेल. " जीवाला जीव देणारा हा नेता, संघटना भी करणा-याला  वा-यावर सोडत नसे.
                हे झालं आबासाहेबाबद्दल. आजचे राष्ट्रीय नेते शरद पवार यांच्याबद्दलही असाच गंमतीशीर प्रकार सांगावासा वाटतो. चव्हाणसाहेब आबासाहेबांचे खूपच सख्य ! आबासाहेब काटेवाडीला पवार  यांच्या घरी गेले असतांना त्यांच्या मातोश्रीना  आमच्या पक्ष  कार्यासाठी आपला पुत्र देण्याबाबतची विनंती केली. त्याचवेळी 1967 च्या निवडणुका जाहीर झाल्या होत्या. प्रत्येक जिल्ह्याच्या संसदिय मंडळाच्या बैठका मुंबईत  होत होत्या. पुण्याच्या बैठकीत तेथील पक्ष श्रेष्ठीत विधानसभेच्या संभाव्य उमेदवाराबाबत चर्चा झाली. शरद पवार यांचे नाव यावेळी बारामतीतून सुचविण्यात आले. पुण्यातील पक्षाच्या ज्येष्ठ मंडळीनी त्यास विरोध  केला. ते निवडून येतील का, इथूनच शंका उपस्थित केली. या चर्चेत मध्येच चव्हाणसाहेबांनी भाग घेत सांगितले. " पक्ष राज्यातील सर्व 288  जागा लढविते. त्या सर्वच जागी विजयी होत नाही. त्यातील काही जागा जातात. मग पवार यांना तिकीट दिल्यावर आणखी एखादी जागा गेली तर काय बिघडेल. युवा कार्यकर्त्याला उमेदवारी देवून बघायला काय हरकत आहे.
"
मग मंडळीचा विरोध मावळला पवार यांची उमेदवारी निश्चित झाली. चव्हाणसाहेबांनी आग्रह धरल्याने शक्य झाले. पण युवा  कार्यकर्त्यांना प्रोत्साहन दिले पाहिजे, उत्तेजन दिले पाहिजे, हाच त्यांचा दृष्टिकोन ?त्यामागे होता. त्यानंतर पवार यांनी मागे पाहिलेच नाही. निवड सार्थच होती ना ?
                पंचायत राज व्यवस्थेचे जे नेटवर्क आज राज्यात उभे आहे. त्यामागे चव्हाणसाहेबांचीच दूरदृष्टी होती. कार्यकर्त्यांना प्रशासकीय अनुभव  मिळण्याचा ग्रामीण भागातील या राजकीय शाळाच आहेत, असे त्यांना वाटे. या व्यवस्थेतून कार्यकर्ते पुढे सभापती, संस्थेचे अध्यक्ष , मंत्री  झालेले दिसतात. एखादं दुसरं राज्य सोडलं तर महाराष्ट्राला त्यांची ही मोठी देण आहे. जिल्हा  परिषदा स्थापन झाल्यावर ग्रामीण भागातून फार मोठे बळ निर्माण झाले. यात पुढे थोडासा अहंचा प्रश्न निर्माण झाला. तोही साहेबांनी खुबीने सोडविला. जिल्हा परिषदेचा अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी यांत श्रेष्ठ कोण कुणी कुणाच्या दालनात जायचे ? प्रश्न साधा होता. मुंबईला अधिकारी पदाधिका-यांची परिषद भरली होती.  चव्हाणसाहेब  या परिषदेला मार्गदर्शन करीत होते. तेथे हा मुद्दा उपस्थित झाला. साहेब म्हणाले, " मला या तक्रारीत अर्थ वाटत नाही. विकासाच्या प्रश्नांवर दोघांनी आपली कार्यक्षमता गुंतवावी. हा प्रयोग राबवितांना अडचणी येतीलच. दोघेही खुर्चीत किती तास बसतात. शेवटी अधिकारी हाही माणूसच असतो. कार्यालयात अपमान वाटत असेल तर अध्यक्षांनी मुख्य कार्यकारी अधिकारी आजारी पडल्यावर त्यांच्या घरी भेटायला जावे. अध्यक्ष आजारी पडला तर अधिकाऱ्यांनी त्यांच्या घरी जावे. एवढ्या पातळीपर्यंत दोघे येऊ शकतात.  प्रश्न सुटायलाही मदत होईल. " मग हे प्रश्न कमी झाले. राज्यकर्ता असूनही त्यांची पाहण्याची दृष्टी  किती सखोल होती. माणुसकी सुसंस्कृतपणा हा गुण त्यांच्यात मुळातच होता. तो ठायीठायी दिसायचा.                                         
सार्वजनिक कार्यक्रमात कार्यकर्त्यांना ते सन्मानाने वागवायचे. नवीन कार्यकर्त्यातील गुण हेरुन ते कसे विकसित करता येतील, याची काळजी घेत. सार्वजनिक कार्यक्रमासाठी राज्यभर ते दौरे करायचे. या दौऱ्या कार्यकर्त्यांप्रती असणारा त्यांचा भाव लक्षात येई. ते त्यांना फार जपत असत. त्यांचा अनुभव मी ऱ्याचदा घेतला आहे. यातूनच आम्ही पुढे आलो. व्यासपीठावर युवक  कॉग्रेसची  मंडळी भाषण करायला लागली की ते एकाग्रचित्ताने भाषण ऐकत. लोकांनी दिलेल्या निवेदनाचे कागद घेत. त्यांचे बारकाईने निरीक्षण करीत. कार्यक्रम चालू असतांना शेजारी बसलेल्या पुढाऱ्यांशी बोलत नसत. हात बांधून कोण काय बोलतो हे काळजीपूर्वक मनन करीत.  आजची स्थिती उलट आहे.  मोठे पुढारी लहान कार्यकर्त्यांकडे पाहात नाहीत. प्रश्न काय मांडले, याकडे लक्ष देत नाहीत. व्यासपीठावर दुसऱ्यांचे भाषण चालू असतांना आपसात गप्पा मारतात, हास्यविनोद करतात. घेतलेली निवेदने कुठे तरी टाकून देतात. या लहान लहान गोष्टी राज्यकर्त्यांनी पाळायच्या असतात.तरुण पिढीचा आत्मविश्वास वाढवायचा असतो. विचारपूर्वक बोलले पाहिजे ही भावना कार्यकर्त्यात तयार व्हायची , ही त्यांची शिकवण आजचे राज्यकर्ते विसरले आहेत.
                चव्हाणसाहेबांनी ऱ्या अर्थाने या राज्यातील लोकांच्या मनावर राज्य केले. त्यांनी उच्चारलेल्या शब्दास केवढी किंमत होती. 1967 ची घटना आहे. मी सभापती असतांना नेवाशात महाविद्यालय काढायचे ठरले. यासंदर्भात नेवाशाला ज्ञानेश्वर मंदिरातच बैठक होती. बैठकीला साहेब, अणासाहेब शिंदे आदी उपस्थित होते.        " कुणीही कितीही पैसे दिले तरी थं ज्ञानेश्वरांच्या नावाने कॉलेज निघाले पाहिजे. "असे साहेबांनी जाहीर करुन व्यक्तिगत एक हजाराची देणगीही महाविद्यालयासाठी दिली. या घटनेने जिल्ह्यातील पुढारी काय समजायचे ते समजले. चव्हाणसाहेबांचा नंतरचा कार्यक्रम श्रीरामपूरला होता. तेथे अण्णासाहेब शिंदे यांनी डाकले यांना महाविद्यालयास एक लाख रुपयाची देणगी देण्याची गळ घातली. नाव देता येणार नाही, हे ही स्पष्ट केले. नेवाशातील बैठकीचा वृत्तांतही दिला. डाकले यांनी लाखाचा निधी दिला. तेव्हा कुठे आमचे नेवाशाचे कॉलेज निघाले आहे. यामागे साहेबांचीच प्रेरणा होती. हे  निश्चित.
                जीवनातील सर्व क्षेत्रात त्यांना रस होता. राज्यकर्ता कसा असावा हे त्यांच्याकडे पाहिल्यावरच कळते. साहित्य, संस्कृती या क्षेत्रातही त्यांना गती होती. केवळ  बहुजन समाजातील पुढाऱ्यांशी त्यांचे हितसंबध होते असे नाही. सर्वच समाजात  त्यांची ऊठबस होती. तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी,  वि..पागे, दादासाहेब गायकवाड आदी काही ठळक नांव सांगता येतील. सर्व समाजातील उच्चपदस्थांचा सहभाग घेऊनच  त्यांनी महाराष्ट्र घडविला. पुरोगामी राज्य म्हणून पुढे त्यास नावलौकिक प्राप्त झाला तो त्यांच्या अपार कष्टाने. समाजाचे दीर्घकाळ नेतृत्व करायचे तर त्या राज्यकर्त्याच्या अंगी हे सर्व गुण असले पाहिजेत. राज्य आज प्रगत गणले जाते. विकास झाला म्हटले जाते. उद्योगधंदेही वाढले. पण महाराष्ट्राची एक शोकांतिका आहे. चव्हाणसाहेबांनी जी उंची त्या काळात सर्व क्षेत्रात गाठली ती उंची नतंरच्या राज्यकर्त्यांना गाठता आली नाही. उलट हा ग्राफ कमी कमी होत गेला. राज्यकर्ता बहुजन समाज विकास प्रक्रियेत लागला. दुसऱ्या बाजूकडे तो जाऊच शकला नाही. क्षमता नव्हती की,  ती समजली नाही. काही कळत नाही. एका पातळीपर्यत ते राजकारण एके राजकारण करीत बसले. सातत्याने निवडणुका खरेदी विक्री संघ, बाजार समिती, ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद, विधानसभा, लोकसभा, कुठली ना कुठली निवडणूक चालूच.  या चक्रातून तो डोकं वर काढतच नाही. सारी एनर्जी त्यातच खर्च होते. त्यात घरातली भाऊबंदकी, गावातली भांडणं, गटतट या पलीकडे काही आहे हे त्याला उमगलेच नाही. यात दोन तीन पिढ्या बिघडल्या इतर क्षेत्रात त्या जाऊच शकल्या नाहीत. राजकारणाव्यतिरिक्त अनेक क्षेत्र अशी आहेत. ती पदाक्रांत केलीच नाहीत. ही समाजाच्या दृष्टीने हानीच झाली.  याला आम्ही राज्यकर्तेच जबाबदार आहोत. इतर समाजाला काही क्षेत्र बंद झाली तर त्याने शिक्षण, संरक्षण, व्यापार, उद्योग या क्षेत्रात पदार्पण केले. तसा बहुजन समाज गेला नाही.
                 चव्हाणसाहेबांची आणखी एक आठवण आवर्जून सांगाविशी वाटते. साहित्यिक रणजित देसाई त्यांच्या कोवाड या गावी आम्ही मुक्कामाला होतो. त्याच्या पत्नीच्या पुस्तकाचे प्रकाशन त्या दिवशी होते. वाड्यात साहेब, मी, शिवाजी सावंत, आनंद यादव, अरुण शेवते बसलो होतो. साहेब खुर्चीवर, आम्ही सतरंजीवर बसून गप्पा रंगल्या होत्या. दोन तीन तास साहित्याच्या वेगवेगळ्या प्रवाहावर मनमुराद गप्पा झाल्या. ती एक बौध्दिक मेजवनी होती. दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यावर चव्हाणसाहेब रणजित देसाई यांना म्हणाले, ' तुम्ही  "स्वामी" कांदबरी जेथे बसून लिहिली ती जागा दाखवा.' देसाईनी त्याना जीना चढून वरच्या खोलीत नेले. ज्या खुर्चीत बसून त्यांनी लिहिले. त्या खुर्चीत साहेबांनी बसून पाहिले. साहित्याची त्यांना आवड होती. साहित्यिकात ते रमत. स्वत:ही  त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.
                चव्हाणसाहेब उपपंतप्रधानापर्यंत पोहोचले, पण पंतप्रधानपदाची संधी चालून आली असताही  ती त्यांनी नाकारली, याची खंत मराठी माणसाच्या मनात आहे. याबाबत त्यांचे अंतर्मन कुणी जाणून घेत नाही. हल्लीच्या भाषेत त्यांचा आतला आवाज वेगळाच होता. एकतर ते भावनिक होते. सुसंस्कृत होते. त्यांना पदाची , सत्तेची हाव अशी नव्हती. पद मिळण्यासाठी त्यांना धडपड करावी लागली नाही. ती त्यांच्या स्वकर्तृत्वाने  आपोआप मिळत गेली, ते इतरांसारखे  श्रूड राजकारणी नव्हते. पंतप्रधानपदाबाबत विचारणा झाल्यावर त्यांनी मला इंदिराजींना भेटावे लागेल, असा निरोप दिला. आणि ते भेटलेही . शेवटी जे व्हायचे तेच झाले.
                त्यांच्या काळात विरोधक मजबूत होते. राजकारण तसं सोप नव्हतं. पण गावपातळीपर्यंत कार्यकर्त्याची फळी त्यांनी निर्माण केली, त्यांना एक वैचारिक बैठक दिली. ते अनेकांना कौटुंबिक आधार वाटायचे, आपली या माणसाकडून फसवणूक होणार नाही, योग्य मार्गदर्शन होईल. आत एक बाहेर एक, असं काही नाही. नेत्याच्या अंगी जी विश्वासार्हता असावी लागते, ती त्यांच्या ठायी होती. त्यामुळे लोक कुठलाही प्रश्न त्यांच्याकडे बिनधास्त नेत. येणाऱ्या माणसाची तक्रार, प्रश्न समजून घेऊन  त्यांचे समाधान ते करीत असत. ऐशी टक्के समाजकारण, वीस टक्के राजकारण अशा फुकटच्या गप्पा नव्हत्या, समाजमनाची नाडी त्यांनी ओळखली होती.
                सहकार क्षेत्रात कार्यक्रमांना गेल्यावर साहेब त्या क्षेत्रातील चुकांवर भाष्य करायचे. आजच्या इतके अवमूल्यन त्या काळात सहकाराचे झाले नव्हते. प्रवरा इंग्लिश मिडियम स्कूलच्या उदघाटनास आले.  ग्रामीण भागात इंग्रजी माध्यमांची शाळा निघते  म्हटल्यावर मातृभाषेतील शिक्षणच चांगले, असा विचार तेथे  मांडला. चुका दिसल्यातर कुणाचा मुलाहिजा ठेवत नसत. या स्पर्धेच्या युगात सहकारी संस्था कशा टिकवता येतील हाच प्रश्न आहे. खासगीकरणाचे पीक आले आहे. सहकाराचे केडर राहिले नाही. परिणामी पुढच्या दहा वीस वर्षात सहकार क्षेत्र आकुंचित होत जाईल. वास्तविक रशियातील साम्यवाद कसा  मोडकळीस आला यूरोपात भांडवलशाहीचे काय चालले आहे. हे पाहिल्यावर सहकार हाच मधला मार्ग तरणोपाय होता, त्याकडे लक्ष द्यायला कोणी तयार नाही. कृषी औद्योगिक क्रांतीचा पाया चव्हाणसाहेबांनी घातला, तोच ठिसूळ झाल्यासारखे वाटत आहे.
            चव्हाणसाहेबासारखा आदर्श सुसंस्कृत राज्यकर्ता होणे नाही. त्यांचे पर्वताएवढे त्तुं काम लक्षात घेऊन  अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बैंकेच्या सभागृहास "यशवंतराव चव्हाण सहकार सभागृह " असे नाव दिले. मुळा एज्युकेशनच्या डेंटल कॉलेजलाही त्यांचे नांव दिले. त्यांनी खूप काही आदर्श या राज्यास घालून दिले. पण या राज्याची शोकांतिका आहे, एकीकडे प्रगती होत असतांना दुसरीकडे राज्यकर्त्यांमधील संवेदनशीलता संपत चालली आहे. सामाजिक प्रगतीचा डोलाराही दिसतो. कायदा सुव्यवस्थेचे काय? ती कुठे आहे? शहरात, गावात गावठी कट्टे मिळू लागले आहेत. शाळेत मुलींचे अपहरण होते. गरीब, मध्यम वर्गीयांना जीवन सुरक्षित वाटत नाही. मग या प्रगतीला अर्थ काय?  संवेदनशीलता जपली असती तर अशी वेळ राज्यावर आली नसती.
                25 नोव्हेंबर 1984 हा दिवस विसरता येणार नाही. त्या दिवशी साहेबांनी इहलोकीची यात्रा  संपविली. शेवटी शेवटी ते आजारीच होते. इस्पितळात त्याच्यावर उपचार  सुश्रषा चालू होती. त्यावेळी आम्ही तेथेच त्याच्या सान्निध्यात होतो. त्यांच्या अखेरच्या सेवेची संधी मलाही मिळाली. त्याचे अंत्यदर्शन  तर झालेच, कदाचित नियतीनेच तेथे पाठविले असावे. ललामभूत अशा या अद्वितीय  व्यक्तिमत्वाची सेवा करण्याची संधी मिळाली, हे मी माझे भाग्य समजतो.

                                                                                                                - शब्दांकन महादेव  कुलकर्णी
                                                                                                                                   अहमदनगर

No comments:

Post a Comment