Tuesday 12 January 2016

सिंचनासाठी सौर कृषिपंपाचा वापर करा
                                                           - आशुतोष सलिल
Ø 920 शेतक-यांना मिळणार लाभ
Ø सौर कृषिपंपामुळे विजेच्‍या बिलापासून कायम सुटका
Ø केवळ पाच टक्‍के रक्‍कम भरा
Ø पाच वर्षापर्यंत कंपनी तर्फे संपूर्ण देखभाल
वर्धा,दि.12 – सौर कृषिपंपाच्‍या माध्‍यमातून पाच एकर पर्यंत शेतीअसणा-या        शेतक-यांना विजेच्‍या देयकापासून कायम मुक्‍तता होणार असल्‍यामुळे शेतक-यांनी सिंचनासाठी सौर कृषिपंप योजनेचा लाभ घ्‍यावा असे आवाहन जिल्‍हाधिकारी आशुतोष सलिल यांनी केले आहे.
विदर्भातील शेतकरी आत्‍महत्‍याग्रस्‍त जिल्‍हयासाठी सौर कृषिपंप योजना राबविण्‍यात येत असून पाच एकर पेक्षा कमी शेती असलेले व पाण्‍याची सुविधा असलेल्‍या 920 शेतक-यांना योजनेच्‍या माध्‍यमातून केवळ पाच टक्‍के शेतकरी लाभार्थी हिस्‍सा भरल्‍यास योजनेचा लाभ मिळणार आहे. महावितरण तर्फे ही योजना राबविण्‍यात येत असून शेतक-यांचा या योजनेस  चांगला प्रतिसाद मिळत आहे.
सौर कृषिपंप योजनेमध्‍ये शेतक-यांच्‍या मागणीनुसार तीन, पाच व साडेसात अश्‍वशक्‍तीचे सौर पंप उपलब्‍ध करुन देण्‍यात येणार असून केद्रशासनाने निश्चित केलेल्‍या किमतीच्‍या केवळ पाच टक्‍के हिस्‍सा शेतक-यांना भरावयाचा आहे. सौर कृषिपंप बसविल्‍यानंतर शेतक-यांना भविष्‍यात विजेच्‍या बिलापासून कायम सुटका होणार आहे. तसेच सबंधित कंपनी पाच वर्षापर्यंत देखभाल व दुरुस्‍तीची जबाबदारी स्‍वीकारणार आहे.
महावितरणच्‍या तालुका स्‍तरावरील उपविभागीय अधिका-याकडे या योजनेत सहभागी होण्‍यासाठी केवळ अर्ज करायचा असून अश्‍वशक्‍तीनुसार पाच टक्‍के सहभाग भरावयाचा आहे. विद्युत जोडणी पासून वंचित असलेल्‍या व पाच एकर पेक्षा कमी शेती असलेल्‍या शेतक-यांनी या योजनेचा लाभ घ्‍यावा असे आवाहन जिल्‍हाधिकारी आशुतोष सलिल यांनी केले आहे.
सौर कृषिपंपाचे प्रात्‍यक्षिक
जिल्‍हयातील शेतक-यांना सौर कृषिपंपाबाबत माहिती देण्‍यासाठी तसेच शेतक-यांना प्रत्‍यक्ष वापराबाबत मार्गदर्शन करण्‍यासाठी जैन सोलर सिस्‍टीम तर्फे जिल्‍हयात  प्रात्‍यक्षिका सुरु करण्‍यात आले आहे. जिल्‍हयातील प्रमुख गावात प्रात्‍यक्षिक वाहन भेट देणार आहे.
जिल्‍हाधिकारी कार्यालयात सौर कृषिपंपाचे प्रात्‍यक्षिक आज दाखविण्‍यात आले. यावेळी निवासी उपजिल्‍हाधिकारी वैभव नावडकर, भारतीय जनता पक्षाचे जिल्‍हा अध्‍यक्ष डॉ. शिरीष गोडे, नियोजन अधिकारी प्रकाश डायरे, महावितरणचे कार्यकारी अभियंता एल डब्‍ल्‍यू सदावर्ती, उपअभियंता एम. डी. राणे जैन एरिकेशनचे विभागीय व्‍यवस्‍थापक भागवत कुंभारे उपस्थित होते.
सौर कृषिपंपामुळे अखंडीत नविनीकरणीय उर्जा उपलब्‍ध  होत असून अत्‍यंत कमी खर्चात कायम स्‍वरुपी ठिबक सिंचनासह, पारंपारिक पध्‍दतीने ओलित करता येते. या पंपाला कोणत्‍याही प्रकारच्‍या वीज भारनियमाचा परिणाम नसल्‍याने दिवसभर अविरत चालणा-या सोलर पंपाद्वारे शेतीच्‍या सिंचनाचे पिकानुसार नियोजन करणे शक्‍य होणार आहे.  
सोलर पंप सूर्योदयापासून ते सूर्यास्‍ता पर्यंत कार्यरत असतो त्‍यामुळे शेतक-यांना आवश्‍यकतेनुसार ओलीत करणे शक्‍य आहे. यावेळी मोठया प्रमाण्‍यात शेतकरी उपस्थित होते.
वर्धा येथील आठवडी बाजारात सोलर कृषिपंपाचे प्रात्‍यक्षिक दाखविण्‍यात आले.
00000

No comments:

Post a Comment