Wednesday 17 January 2018



लोकराज्यने रिअल हिरोची दखल घेतली
                                    -निर्मलादेवी एस.
वर्धा दि 17 :-  महाराष्ट्राच्या अदयावत पोलीस दलाचा आढावा घेणारा आणि पोलीस जवानांच्या उमेदीला उभारी देणारा लोकराज्यचा जानेवारीचा अंक  माहिती आणि जनसंपर्क विभागाने प्रकाशित केला आहे. याव्दारे सर्वसामान्यांच्या सुरक्षेसाठी रात्रंदिन तत्पर असणा-या रिअल हिरोची दखल घेतली असून हा लोकराज्य अंक पोलीस विभागासाठी सन्मानाची बाब आहे. असे प्रतिपादन जिल्हा पोलीस अधिक्षक निर्मलादेवी एस. यांनी केले.
माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाने जानेवारी 2018 चा लेाकराज्य अंक स्मार्ट, समर्थ, संवेदनशिल ‘आपले पोलीस  आपली अस्मिता’ या विषयावर काढला आहे. या अंकाचे प्रकाशन जिल्हा पोलीस अधिक्षक निर्मला देवी एस. यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी जिल्हा माहिती अधिकारी मनिषा सावळे व इतर कर्मचारी उपस्थित होते.
लोकराज्यच्या या अंकात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर , महिला व बाल सुरक्षा, सायबर गुन्हे, सुरक्षित वाहतुक, दहशतवाद व नक्षलवादाचा बिमोड, या विषयी अतिशय उपयुक्त माहिती असून ती सर्वसामान्य नागरिकांना सुध्दा उपयोगाची आहे. पोलिस विभागासाठी असलेल्या योजना , पोलिसांना उच्च शिक्षणाची संधी, सायबर क्राईम म्हणजे नक्की काय? सायबर गुन्हयाचा पाठलाग, सायबर युगाची आव्हाने, गुन्हे सिध्दीचे शास्त्रीय तंत्र, या बाबतची माहिती हे या अंकाचे वैशिष्टय असल्याचे त्या यावेळी म्हणाल्या.
पोलीसांसाठीच नव्हेतर सर्वासामान्य नागरिकांसाठी हा अंक संग्राहय ठेवण्यासारखा आहे. यामध्ये महाराष्ट्र पोलीस सिटिजन  पोर्टल ॲप  बाबत माहिती दिली असून हे ॲप डाऊन लोड करुन आता नागरिकांना घरूनच पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविता येऊ शकते. या ई- तक्रारीवर झालेल्या चौकशीची माहितीसुध्दा एस.एम.एस. व्दारे तक्रारदारास प्राप्त होते. त्यामुळे नागरिकांनी हे ॲप डाऊनलोड करुन घ्यावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. तसेच सर्व पोलिस कर्मचा-यांनी लोकराज्यचा हा  अंक वाचावा. असेही त्या यावेळी म्हणाल्या.
लोकराज्यचा हा अंक सर्व बुक स्टॉल तसेच जिल्हा माहिती कार्यालय येथे विक्रीस उपलब्ध आहे.
                                      0000



No comments:

Post a Comment