Thursday 3 November 2011

ई-गव्हर्नन्सचं पाऊल ...!

 शासनाने ई-गव्हर्नन्स धोरण जाहीर केलं आणि त्याची अंमलबजावणी सुरु झाली आहे. नागरिकांना गतिमान आणि पारदर्शी सेवा देणं या उद्देशाने हे पाऊल टाकलय त्याला नागरिकांनी प्रतिसाद देण्याची आता वेळ आली आहे. याबाबत माहिती देणारा लेख.
-प्रशांत दैठणकर


जग झपाट्याने बदलत आहे त्याला कारण अर्थातच झपाट्याने बदलत असलेलं तंत्रज्ञान हेच आहे. तंत्रज्ञान बदलण्याचा झपाटा इतका प्रचंड आहे की आपण त्यांच्या वेगासोबत वेग राखणं अवघड बनलं आहे. मात्र आपण हा वेग राखला नाही तर निश्चितपणाने आपण लगेच आऊटडेटेड ठरण्याची शक्यता देखील वाढली आहे.
दळणवळण क्षेत्रात गेल्या दोन दशकात मोठ्या प्रमाणात क्रांती झाली. यात सुरुवात अर्थात उपग्रहाच्या आधाराने संपर्क साधणं शक्य झाल्यानंतर टेलिफोनचं रुप बदललं. घरात दिवाणखान्यात असणारा हा डबा खिशात मिरवायला लागला त्यात झपाट्याने संशोधन आणि विकास झाल्यामुळे आता हा मोबाईल फोनने थेट इंटरनेट सर्फींगचा पल्ला गाठत आहे.
सध्या भारतात थ्री जी तंत्राची चर्चा सुरु आहे काही कंपन्यांनी ही सेवा उपलब्ध करुन दिली असली तरी व्हिडिओ कॉलिंगला मर्यादीत ठेवण्यात आलं आहे. याच सुमारास विकसित देशांमध्ये त्याच्याही पुढचं पाऊल असलेल्या 4–जी तंत्रज्ञानाचा वापर सुरु झाला आहे हे उल्लेखनीय आहे.
इंटरनेटच्या माध्यमातून जग जवळ आलं आहे या नव्या माध्यमानं प्रत्येक व्यक्तीला अभिव्यक्तीचं नवं दालन खुलं करुन दिलेलं आहे मात्र आजही या तंत्राचा प्रचार-प्रसार मोठ्या प्रमाणात झालेला नाही तीच बाब थ्री – जी तंत्रज्ञानाची आहे. या दोन्ही बाबी अद्याप सामान्यांच्या आर्थिक क्षमतेत बसणा-या नाहीत त्यामुळे याच्या प्रसारावर मर्यादा आहेत.
 हे युग संगणक युग आहे त्यामुळे प्रत्येकाने संगणकाचा वापर आता शिकलाच पाहिजे. येणा-या काळात गतिमानता आणण्यासाठी ई-गव्हर्नन्स ची अंमलबजावणी होणार आहे. शासनाने त्याबाबतचं धोरण देखील नक्की केलेलं आहे आणि त्या दृष्टीकोनातून काम सुरु झालेलं आहे.
नागरिकांना गतिमान आणि पारदर्शी सेवा देण्याचा प्रयत्न सर्वच स्थरात सुरु झालेला आहे. टाळी एका हातानं वाजत नाही या उक्तीप्रमाणे शासनोन एक पाऊल उचललं आहे. आता नागरिकांनाही आपलं कर्तव्य म्हणून पुढचं पाऊल उचलावं लागणार आहे.
शासनाच्या सा-या सेवा येणा-या काळात ऑनलाईन होवू घातल्या आहेत. सध्या नोकरभरती याच पध्दतीने होत आहे. इतकेच नव्हे तर विविध अभ्यासक्रमांचे प्रवेश देखील याच पध्दतीने होताना आपणास दिसतील. त्यामुळे येणा-या काळात होणा-या बदलांची दखल सर्वांनी घेतली तर गतिमान पध्दतीने कामे शक्य होणार आहेत.
- प्रशांत दैठणकर    

No comments:

Post a Comment