Monday 16 May 2016

शंभर वर्ष जुने सागाचे विशाल वृक्ष
ग्‍लोरी ऑफ वर्धाचे संवर्धन
Ø    14.20 मीटर लांबी, 3.20 मीटर गोलाई
Ø    वर्धा वन विभागाचे प्रतिनिधीत्‍व करणारे सागवान
Ø    ढग्‍याच्‍या राखिव जंगलात पूर्ण वाढ 
Ø    वर्धा वनविभागाच्‍या ‘राम’आता वन संग्राहलयात
वर्धा,दि.6 - वन विभागाच्‍या ढगाच्या राखीव वनक्षेत्रात वादळामुळे उन्‍मळून पडलेल्‍या आणि शंभर वर्षाचे आयुष्‍य असलेल्‍या विशाल सागवान वृक्षाचे संवर्धन करुन वनसंग्रहालयात ठेवण्‍यात येणार आहे. ग्‍लोरी ऑफ वर्धा म्‍हणून ओळख असलेल्‍या सागवान वृक्षाची लांबी 14.20 मीटर असून छाती उंचीवर 3.20 मीटर गोलाई आहे. सध्‍या सागवान वृक्ष बांगडापूर येथील वन विभागाच्‍या परिसरात ठेवण्‍यात आले आहे.
अत्‍यंत दूर्मिळ अशा सागवान वृक्ष 214 क्रमांकाच्‍या ढगा बीटच्‍या नाल्‍याच्‍या काठावर मागील वादळी पावसात पडले होते. या महाकाय वृक्षाचे संवर्धन करुन अभ्यासकांसाठी वनसंग्रहालयात ठेवण्‍यात येणार असल्‍याची माहिती उपवनसंरक्षक दिगंबर पगार यांनी दिली.
वर्धा वनक्षेत्रात मोठ्याप्रमाणात सागवान प्रजातीचे वृक्ष असून वर्धेच्‍या सागवानासंदर्भात बोलताना उपवनसंरक्षक श्री. पगार म्‍हणाले की, खरांगना , ढगा हे समृध्‍द क्षेत्र आहे. येथील सागवानाच्‍या लाकडाच्‍या बुंधा हा पोकळ असतो. वादळात पडलेल्‍या सागवान वृक्षासह बुंधासुध्‍दा खोदून काढून मुळासह काढण्‍यात आले आहे. ढगा येथून बांगडापूर येथील वन डेपोपर्यंत वाहतुकीसाठी 20 वन कामगार, 20 अधिकारी व कर्मचारी यांच्‍या तब्‍बल 12 ते 13  तासाच्‍या प्रयत्‍नाने लांब 18 चाकाच्‍या ट्रक ,ट्रॅक्‍टर व क्रेनच्‍या सहाय्याने रात्री 11 वाजता बांगडापूर शेडमध्‍ये ठेवण्‍यात यश आले. या महाकाय वृक्षाचा बुंधासुद्धा वन निरीक्षण कुटीत ठेवण्‍यात आला आहे. या सागवानाची किंमत पाच लाखापेक्षा जास्‍त असून वाहतुकीसाठी 42 हजार रुपये खर्च आला आहे.
                                   
जिल्‍हयात पाच जैवविविधता पार्क
वर्धा जिल्‍हयातील समृध्‍द वनसंपदेची माहिती व्‍हावी तसेच वनसंवर्धन व संगोपनासाठी लोकसहभाग वाढावा यासाठी पाच जैवविविधता पार्क तयार करण्‍यात येणार आहेत. जैवविविधता पार्क सेलूकाटे, ढगा, सारंगपूरी, बोरधरण व पवनार येथे होणार आहेत. प्राईड ऑफ वर्धा हे सागवनाचे वृक्ष जैवविविधता पार्कात ठेवण्‍यात येणार आहे.
वर्धा वनक्षेत्रात सागवानाचे वृक्ष मोठ्याप्रमाणात असले तरी शंभर वर्ष आयुष्‍य व लांबी आणि रुंदी असलेले हे महाकाय वृक्ष एकमेव आहे. त्‍यामुळे याचे वनसंग्रहालयात संवर्धन करण्‍यात येणार आहे. प्राईड ऑफ वर्धाचे ढगा ते बांगडापूर ऑपरेशनसाठी वनक्षेत्र अधिकारी व्‍ही. व्‍ही. तळणीकर, एस.बी.तळवतकर, श्री.बोबडे यांच्‍या मार्गदर्शनाखाली यशस्‍वी करण्‍यात आले.
                                                            00000



No comments:

Post a Comment