Monday 16 May 2016

आदिवासींच्या सामाजिक शैक्षणिक विकासासाठी
आवश्यक निधी उपलब्ध करून देणार   सुधीर मुनगंटीवार
Ø  आदिवासी सहायक प्रकल्प कार्यालयाचे उद्घाटन
Ø  6 हजार अंगणवाड्या डिजीटल करणार
Ø  आदिवासी भवन ग्रंथालयासाठी 50 लाख रुपये
Ø  तालुकास्तरावर आदिवासी विद्यार्थ्यांसाठी शाळा वस्तीगृहे
Ø  आदिवासी शेतक-यांच्या समूह विकासाला प्राधान्य
      वर्धा, दिनांक 6 – आदिवासी समाजाच्या सामाजिक, सांस्कृतिक शैक्षणिक विकासासाठी शासनाने विविध योजनांची अमलबजावणी सुरू केली असून आदिवासी विद्यार्थ्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी जंगलातील आश्रम शाळा ऐवजी तालुकास्तरावरील नामांकित शाळांमध्ये प्रवेश देण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यातील 25 हजार विद्यार्थी शिक्षण घेत असल्याचे प्रतिपादन राज्याचे अर्थ नियोजन मंत्री तथा पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले.
       एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पांतर्गत वर्धा येथे नव्याने सुरू करण्यात आलेल्या सहायक प्रकल्प अधिकारी कार्यालयाचे उद्घाटन तसेच आदिवासी कला महोत्सव प्रबोधन मेळाव्याचे उद्घाटन पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याहस्ते झाले. त्याप्रसंगी मार्गदर्शन करताना ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खासदार रामदास तडस होते. तर प्रमुख अतिथी म्हणून आमदार डॉ. पंकज भोयर उपस्थित होते. यावेळी आमदार राजूभाऊ तोडाम, भाजपा जिल्हाध्यक्ष राजेश बकाने, बाबूराव उईके-पाटील, बाळाभाऊ जगताप, राजू मडावी, अशोक कलोडे, आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी हरीराम मडावी आदी आदिवासी नेते यावेळी उपस्थित होते.
        आदिवासी समाजाच्या सर्वांगीन विकासासाठी विविध योजनांची अमलबजावणी करताना त्यांच्या जीवनात बदल घडविण्याचे धोरण असल्याचे सांगताना पालकमंत्री म्हणाले, की वर्धा येथे समाज भवन ग्रंथालयासाठी जिल्हा नियोजन विकास निधी मधून 50 लक्ष रूपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात येईल. आदिवासी युवकांना शिक्षणाच्या सुविधा निर्माण करण्याच्या दृष्टीने राज्यातील 6 हजार अंगणवाड्या डिजीटल करण्यात येणार असून यासाठी 60 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे.
         आदिवासी समाजातील ज्या शूरविरांनी स्वातंत्र्यासाठी तसेच आदिवासींच्या कल्याणासाठी काम केले आहे, अशा 25 वीर पुरूषांचा सन्मान करण्यात येईल. त्यासोबतच शहीद बाबूराव शेडमाके यांचे यथोचित स्मारक करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आदिवासी विद्यार्थ्यांना आता जंगलात शिक्षण देता तालुकास्तरावर अत्याधुनिक सुविधा असलेल्या शाळा वस्तीगृह तयार करण्याचा निर्णय घेतला असून नामवंत शाळांमध्ये आदिवासी विद्यार्थ्यांनाही शिक्षण घेता यावे, यासाठी 25 हजार विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात आल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
आदिवासी हा प्रामाणिक आहे आणि विकासामध्ये त्यांचा सहभाग राहिला असल्यामुळे त्यांच्या विकासाला चालना देतानाच आदिवासी शेतक-यांच्या समूह विकासासोबतच त्यांना घरकुल देण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचे सांगताना आदिवासींच्या सर्वांगीन विकासासाठी कटीबद्ध असल्याची ग्वाही त्यांनी यावेळी दिली.
खासदार रामदास तडस यांनी आदिवासींच्या समूह विकासाला चालना देताना त्यांना भूदानामधील अतिरिक्त जमीन उपलब्ध करून देण्यात यावी, अशी सूचना केली. आमदार डॉ. पंकज भोयर यांनी नागपूर येथे आदिवासी विकास विभागाचे प्रकल्प कार्यालय असल्यामुळे योजनांचा लाभ घेण्यात अडचणी निर्माण होत होत्या. तसेच विद्यार्थ्यांनाही शैक्षणिक साहाय्य मिळत नव्हते. वर्धा येथे सहायक प्रकल्प अधिकारी कार्यालयामुळे योजनांचा लाभ सहज सुलभपणे मिळणार आहे. या कार्यालयात आठ कर्मचारी कार्यरत राहणार असून त्यांनी वर्धा येथेच राहावे, अशी सूचना केली. यावेळी आमदार राजू तोडाम यांनीही मार्गदर्शन केले. प्रास्ताविक राजू मडावी यांनी केले. यावेळी जंगल कामगार आदिवासी संस्थेचे बाबूराव उईके यांचा सत्कार करण्यात आला.
सहायक प्रकल्प अधिकारी कार्यालयाचे उद्घाटन
वर्धा येथील राम नगर परिसरात सहायक प्रकल्प अधिकारी कार्यालयाचे उद्घाटन पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याहस्ते झाले. यावेळी खासदार रामदास तडस, आमदार डॉ.पंकज भोयर, नगराध्यक्ष श्रीमती त्रिवेणीताई कुत्तरमारे, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष विलास कांबळे, प्रकल्प अधिकारी हरीराम मडावी आदी प्रामुख्याने उपस्थित होते. प्रारंभी प्रकल्प अधिकारी हरीराम मडावी, तसेच सहायक प्रकल्प अधिकारी आर.बी. मानकर यांनी स्वागत करून आदिवासी प्रकल्प कार्यालयातर्फे राबविण्यात येणा-या विविध योजनांची माहिती दिली.
*******

          

No comments:

Post a Comment