Monday 16 May 2016

डॉ. बाबासाहेबांचे विचार तळागाळापर्यंत पोहचवा
-   निवृत्त न्यायमूर्ती सी.एल. थूल
-     विकास भवन येथे राजपत्रित अधिका-यांची कार्यशाळा
          वर्धा, दिनांक 12 – भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी विविध विषयांचा, घटकांचा अभ्यास करून राष्ट्र उभारणीत मोलाचे कार्य केले आहे. देशाच्या विकासात डॉ. बाबासाहेबांचे कार्य मोलाचे आहे. त्यांचे विचार पुढे नेण्याचे कार्य अधिका-यांनी प्रामाणिकपणे पार पाडून तळागाळातील लोकांचा विकास साधावा, असे विचार अनुसूचित जाती जमाती आयोगाचे अध्यक्ष तथा निवृत्त न्यायमूर्ती सी.एल. थूल यांनी मांडले.
           विकास भवन येथेजिल्हाधिकारी कार्यालय व सामाजिक न्याय विभागाच्यावतीने डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 125 व्या जयंती वर्षानिमित्त राजपत्रित अधिका-यांसाठी आयोजित कार्यशाळेत राष्ट्रनिर्माते डॉ. बाबासाहेब आंबेडकर या विषयावर ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी आशुतोष सलिल, जिल्हा पोलिस अधीक्षक अंकित गोयल, प्र. अपर जिल्हाधिकारी दीपक नलवडे, प्र. मुख्य कार्यपालन अधिकारी विवेक इलमे, निवासी उपजिल्हाधिकारी वैभव नावडकर, उपवनसंरक्षक दिगांबर पगार, जिल्हा समाज कल्याण अधिकारी श्री. रामटेके, सहायक आयुक्त बाबासाहेब देशमुख, डॉ. सुभाष खंडारे, डॉ.चंद्रकांत हिवरे यांची उपस्थिती होती.
            श्री. थूल म्हणाले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर अष्टपैलू व सर्व गुणसंपन्न असे व्यक्तीमत्तव आहे. त्यांनी सर्व समाजांचा विचार करून वंचितांना विकासाच्या प्रवाहात आणले. भारतीय संविधानाचे शिल्पकार, मानववंशशास्त्र, अर्थतज्ञ, जलतज्ञ, मानवाधिकाराचे जनक, महिलांचे उद्धारक, ज्ञानपिपासू, उत्तम प्रशासक मंत्री आदींच्या माध्यमातून त्यांनी राष्ट्र उभारणीत मोलाचे कार्य केले आहे. देशाच्या विकासासाठी त्यांनी योग्य प्रकारचे प्रशासकीय नियोजनाची घडी बसवून दिलेली आहेत्यांचे विचार समाजातील प्रत्येक घटकांपर्यंत पोहचविण्याची जबाबदारी शिक्षितांची असून प्रत्येकाने ती प्रामाणिकपणे पार पडून देशाच्या विकासात मोलाचा वाटा उचलावावा. तसेच डॉ.बाबासाहेबांच्या विचारांची जयंती प्रत्येकाने साजरी करावी, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
             जिल्हाधिकारी आशुतोष सलिल म्हणाले, प्रत्येक अधिका-यांनी मानवी दृष्टीकोनातून कार्य करावे. समाजातील प्रत्येक घटकाला न्याय देण्यासह योग्य वेळेत काम करावे. लोकांच्या हितासाठी अधिकारांचा उपयोग करून त्यांचा विकास साधावा, असे आवाहन यावेळी त्यांनी अधिका-यांना केले.
           
          जिल्हा पोलिस अधीक्षक अंकित गोयल म्हणाले, भारतरत्न डॉ. बाबासाहेबांचे विचार सर्वांनाच प्रेरक असून सामाजिक समतेसाठी सर्वांनी पुढाकार घ्यावा, असेही ते म्हणाले.
          डॉ. सुभाष खंडारे यांनी सामाजिक न्याय व समतेसाठी शासकीय अधिका-यांसमोरी आव्हाने या विषयावर मार्गदर्शन केले. यामध्ये त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी रक्तांचा एक थेंबही न सांडवता  केलेली विश्वविख्यात क्रांती, भारतीय संविधान  आणि प्रशासकीय अधिकार याबाबत सविस्तर मांडणी केली. देशातील प्रत्येक मानवाला समान अधिकारी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांमुळे प्राप्त झाला. समता, स्वातंत्र्य, न्याय, प्रतिष्ठा आणि बंधुत्वाची शिकवण त्यांनी समाजाला दिली. तसेच वंचितांना विकासाच्या प्रवाहात आणून जगात नावलौकिक मिळविला. त्यांच्या कार्याची दखल आता संयुक्त राष्ट्र संघटनेने घेऊन जगात 14 एप्रिल हा जागतिक ज्ञान दिन म्हणून साजरा करण्यात येत असल्याचे सांगत डॉ. बाबासाहेबांचे विचार प्रत्येकाला मार्गदर्शक असून त्यांच्या विचारांचा अंगीकार करण्याचे आवाहन केले.
        कार्यशाळेत कार्यक्षमता व वृद्धी या विषयावर श्री. हिवरे यांनी तर समाजातील अंधश्रद्धा निर्मुलनासाठी अधिका-यांची भूमिका यावर अनिसचे जिल्हा संघटक पंकज वंजारे यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाची  सुरूवात महामानवांच्या प्रतिमा पूजनाने व दीपप्रज्वलनाने झालीकार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री.देशमुख यांनी केले. सूत्रसंचालन दीपा हेरोळे यांनी मानले.
****


No comments:

Post a Comment