Wednesday 21 November 2018







                                 चौकशीअंती दोषींवर  कारवाई करणार
                                                             -गृहराज्यमंत्री हंसराज अहिर
*गावाच्या सुरक्षिततेसाठी योग्य उपाययोजना करण्यात येईल.
केंद्र शासनाकडून मृत्यू आणि जखमी झालेल्यांना मदत देणार

वर्धा दि :-  पुलगाव येथील केंद्रीय दारुगोळा भांडारच्या डिमोलेशन कॅम्प मध्ये काल झालेल्या दुर्दैवी अपघातात   मृत्युमुखी पडलेल्या मजुरांच्या कुटुंबियांच्या दुःखात केंद्र शासन सहभागी आहे. या सर्व घटनेची उच्चचस्तरीय चौकशी करून दोषी अधिकारी आणि कंत्राटदारावर कारवाई करण्यात येईल अशी ग्वाही केंद्रीय गृहराज्य मंत्री हंसराज अहिर यांनी दिली.
या अपघातात मृत्युमुखी पडलेल्या सोनेगाव आबाजी येथील कुटुंबियांचे सांत्वन श्री अहिर यांनी आज सोनेगाव आबाजी येथील आबाजी महाराज मंदिरात केले. यावेळी खासदार रामदास तडस,  जिल्हा परिषद सदस्य वैशाली येरावार, प्रभारी पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, उपविभागीय अधिकारी उत्तम दिघे, राजेश बकाने उपस्थित होते.
ठेका मिळालेल्या कंत्राटदाराने मंजुरांचा विमा काढलेला होता का?  भविष्य निर्वाह निधी, मजुरांना बॉम्ब हाताळण्यासाठी देण्यात येणारे ट्रेनिग, सुरक्षितता साहित्य आदी बाबींचे नियमानुसार  पालन केले की नाही याची सखोल चौकशी करण्याचे आदेश देण्यात आल्याचे श्री अहिर यांनी यावेळी सांगितले. माणसांचा जीव महत्वाचा असून यामध्ये दोषी आढळणाऱ्या सर्वांवर कारवाई करण्यात येईल असेही त्यांनी स्पष्ट केले. त्याचबरोबर गावाच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने पुलगाव दारुगोळा भांडारात अशा प्रकारच्या घटना भविष्यात घडू नये यासाठी नियोजनपूर्वक उपाययोजना करण्यात येतील. यासाठी डीमोलेशन कॅम्प मध्ये सी सी टी व्ही कॅमेरे बसविणे, विनापरवानगी आतमध्ये येण्यावर बंदी घालणे,गावातील लोकांना पासेस देणे इत्यादी उपाययोजना  करण्यात येतील. विना परवानगी आतमध्ये येऊ देणाऱ्या डेपोच्या अधिकाऱ्यांची सुद्धा चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल असेही त्यांनी स्पष्ट केले.
या घटनेमध्ये ठार झालेल्या मजुरांच्या कुटुंबियांना आणि जखमी व्यक्तींना केंद्र शासनाकडूनही मदत देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आणि अर्थ व नियोजन मंत्री यांनी तात्काळ निर्णय घेऊन  राज्य शासनाकडून मयत आणि जखमी व्यक्तींसाठी तात्काळ मदत जाहीर केली यासाठी राज्य शासनाचे त्यांनी आभार मानले. यावेळी जबलपुर येथील खमरिया ऑर्डनन्स फॅक्टरी कडुन या घटनेत ठार झालेल्या  पाच मजुरांच्या कुटुंबियांना 15 हजार रुपयांचे सानुग्रह अनुदानाच्या धनादेशाचे  वितरण श्री. अहिर यांच्या हस्ते करण्यात आले.
मृत्यू झालेल्या कुटुंबियांच्या आणि गावकऱ्यांच्या  मागण्या श्री अहिर यांनी यावेळी  ऐकून घेतल्या.  डेपोमध्ये आजूबाजूच्या गावातील  बेरोजगारांची भरती करावी, गावाच्या सुरक्षिततेसाठी उपाययोजना कराव्यात, तसेच ठेकेदार आणि डेपोच्या अधिकाऱ्यांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी गावकऱयांनी  केली.
यावेळी खासदार रामदास तडस यांनी पुलगाव येथील दारुगोळा भांडारमुळे सोनेगाव आणि आजूबाजूच्या गावांना मोठा धोका असून याचा त्रास गावकऱ्यांना होतो. त्यामुळे यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात आणि घटनेची सखोल चौकशीची मागणी केली.
गृहराज्यमंत्र्यांनी रुग्णालायत घेतली  जखमींची भेट
केंद्रीय गृहराज्य मंत्री हंसराज अहिर यांनी प्रथम शालिनीताई मेघे सुपर स्पेशालिटी रुग्णालयात उपचार घेत असलेल्या घटनेतील जखमी व्यक्तींची भेट घेऊन त्यांच्या तब्येतीची विचारपुस केली. तसेच रुग्णालयामार्फत करण्यात आलेल्या उपचाराची डॉक्टरांकडून माहिती घेतली.
यावेळी पत्रकारांशी बोलताना त्यांनी सांगितले की, सावंगी मेघे रुग्णालयात जखमी व्यक्तींवर तातडीने उपचार करण्यात आले.तसेच 5 व्यक्तींवर  छाती, पाय आणि पोटाची शस्त्रक्रिया करण्यात आली.तात्काळ, योग्य व चांगले उपचार  दिल्याबाबत त्यांनी रुग्णालयाचे आभार मानले .  पत्रकारांशी बोलताना त्यांनी संबंधित कंत्राटदाराने आणि अधिका-यांनी नियमांचे पालन केले की नाही याची तज्ज्ञांच्या उच्चस्तरीय  चौकशीतून सर्व माहिती समोर येईल आणि चौकशीत दोषी आढळलेल्या सर्वांवर कारवाई करण्यात येईलअसे सांगितले.

000000

No comments:

Post a Comment