Wednesday 22 November 2017



शेतकऱ्यांनी पिकावरील किडीवर वेळीच उपाययोजना करावी

वर्धा ,दि.22 (जिमाका) :-सध्यास्थितीत तुर पिक जोमदार असुन कळी, फुले लागण्याच्या अवस्थेत आहे. परंतु सध्याच्या ढगाळ वातावरणामुळे तुर पिकावर किड व रोगांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता  असल्याने शेतकरी बांधवांनी वेळीच उपाययोजना कराव्यात  जेणेकरून संभाव्य नुकसान टाळता येईल,असे आवाहन उपविभागीय कृषी अधिकारी कापसे यांनी केले आहे. वर्धा उपविभागात राबविण्यात येणाऱ्या क्रॉपसॅप प्रकल्पातर्गंत तुर व हरभरा पिकावरील किड व रोग सर्वेक्षण करून त्या आधारावर शेतकरी बांधवाना पीक संरक्षण सल्ला देण्यात येतो.तुरीवर येणाऱ्या विविध किडीपैकी शेंगा पोखरणारी अळी ही मुख्य किड आहे. या किडीच्या व्यवस्थापनासाठी शेतकरी बांधवानी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून 5 टक्के निंबोळी अर्काची फवारणी करावी. तसेच किडीने आर्थिक नुकसान संकेत पातळी गाठल्यास (10 ते 20 अळ्या प्रति 10 झाडे ) इमोमेक्टिन बेंझोएट 5 एस.जी. 3 ग्रॅम किंवा क्लोरँनर्ट्रनिलिप्रोल 18.5 एस.बी.2.5मि.ली.प्रति 10 लि.पाण्यात मिसळून फवारणी करावी. यासोबतच कापुस पिकावर शेंदरी बोंडअळीच्या नियंत्रणासाठी फेनव्हलरेट 20 टक्के प्रवाही 8 मि.ली.किंवा थिऑडीकार्ब 75 डब्ल्यु पी.20 ग्रॅम यापैकी कोणत्याही एका किटकनाशकाची 10 लि.पाण्यात मिसळून फवारणी करावी, अशी शिफारस डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ यांनी केली आहे. शेंदरी बोंडअळीचा प्रादुर्भाव कपासीवर जास्त प्रमाणात होत असल्याकारणाने उत्पादनात होणाऱ्या घटीसोबतच हाच प्रादुर्भाव पुढील वर्षी परावर्तित होण्याची शक्यता असल्यामुळे शेतकरी बांधवानी उशिरापर्यंत फरदड घेण्याचे टाळावे असे आवाहन उपविभागीय कृषी अधिकारी श्री.कापसे यांनी केले आहे.

No comments:

Post a Comment